बलमवाँ तुम क्या जानो प्रीत... Aaryaa Joshi द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बलमवाँ तुम क्या जानो प्रीत...

सजिली....
स्वातंत्र्यपूर्व काळ.... स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी आणि सर्वच भारतीय निकराने लढत होते.
सजिली या वातावरणातच भर तरुणाईच्या उंबरठ्यावर उभी होती. दिसायला आकर्षक नसली तरी तरतरीत होती. घरात दोन वेळा खायला मिळे आणि वर्षाला चार जोड कपडे. पाच भावंडांची आबाळ होऊ न देता वडिल आपला खाटीक व्यवसाय करत होते आणि आई घरी शिवणकाम करी.तिच बांगड्या भरायचं दुकानही होतं...
सजिलीचा गळा मुळातून गोड. देवळातलं कीर्तन भजन तिला आवडे आणि मशिदीची बांगही...
शाळेत जायचा प्रश्नच नव्हता पण स्वतःहून चित्र काढायला,गोधड्या शिवताना आईला मदत करताना त्यावर कापडांची नक्षी जुळवणं तिला आवडे.
मोहल्ल्याला लागून थोडं पलीकडच्या रस्त्याला मंदिर होतं.तिथे सकाळ संध्याकाळ भजन चाले. काहीतरी निमित्त करून धाकटीला कडेवर घेऊन सजिली अर्धा तास तरी संध्याकाळी भजन ऐके. ते तिच्या पक्कं लक्षात राही.
एके दिवशी घरातली भांडी घासताना तीने भजन गुणगुणताना आईने ऐकलं... या खुदा... तुझे अब्बा ऐकतील हे तर गहजब होईल सजिली...
अग पण शब्द सुदर आहेत आणि चालही...
सजिली चूप रहो तुम. मला तुझी आवड माहिती आहे पण या घरात हे जमणार नाही...
अम्मु का गं??
नहीं सजिली....
हे प्रकरण वर्षभर सुरु राहीलं. रामनवमीच्या नवरात्रात सजिलीने मंदिराच्या बाहेर पारापाशी रेंगाळत लोकांच्या नजरा चुकवत कीर्तन ऐकलं... बुवांची शास्रीय संगीताची तयारीही उत्तम होती. सजिलीला वेगवेगळे राग ऐकायला मिळाले.बुवांनी निरूपणात रागांची नावंही सांगितली...
बुवा कोकणात असतात अलिबागला ....  एवढंच तिला समजलं...
योगायोगाने जैतुद्दीनचा निकाह ठरला आणि तो अलिबागच्या नारळीच्या बागेत व्हायचा होता...
सजिली हरखलीच. अम्मी हम जायेंगे नं... नही बेटा.... दंगली चालू आहेत... कसा करणार प्रवास आणि खर्चाची ताळमेळ कशी बांधणार....
मुझे जाना है!!!
अब्बुला सजिलीने पटवलं.त्याची ती लाडकी होती. सकीना मावशी कोल्हापूरहून जाणार असेल तर मी जाईन तिच्याबरोबर.... 
अब्बु हो म्हणाले... त्याने तिला सकीनाकडे पोचवलं..
सजिलीने निघताना भावंडांना आणि आईला घट्ट मिठी मारली,,. डोळे भरून घरावर नजर टाकली आणि तिने उंबरठा ओलांडला...

अलिबागला सुखरूप पोचली पण तिला लग्नात स्वारस्य नव्हतच... एकटी कशी बाहेर पडणार म्हणून मावबहिणीला घेऊन फिरायला बाहेर पडली.. मोठा दादा सोबत होताच.. बुवांना शोधणं कठीण होतं...
तिच्या सुदैवाने एका मंदिरात बैलगाडी थांबली होती. वादक वाद्य काढीत होते आणि शेजारी तेच बुवा उभे होते...... 
सजिलीने विचार केला क्षणभर इथेच कीर्तन असणार...
भावाची नजर चुकवून आणि बहिणीला टाळून निघणं आणि पळणं कठीण होतं. नाराज होऊन ती नारळाच्या बागेत परतली.
रात्री झोपेतच ठरवलं तिने आणि तशीच धिटाईने उठली...कुणालाही नकळत अंधार्‍या कोकणातल्या लाल मातीच्या रस्त्याने जीव मुठीत धरून पण निग्रहाने तिने मंदिर गाठलं... काय आश्चर्य... जलसा उशिरापर्यंत संपवून बुवा निघालेले दिसले.. ती अधारात बैलगाडीच्या मागेमागे गेली आणि बुवांच्या वाड्यात पोहोचली...
क्षणात तिने बुवांना लोटांगण घातलं...
बुवा आणि साथीदार चपापले.. एक किशोरी... आणि परधर्मीय... आपल्या चरणांशी आपल्या वाड्यात...
बुवांच्या मातोश्री गोंधळ ऐकून बाहेर आल्या...
त्यांनी तिला दिलासा दिला आणि काय परिणाम होतील याची कल्पना दिली... 
पण तिने सर्व वृतान्त सांगितला आणि आपल्याला हिंदुस्थानी संगीत शिकण्याची इच्छा बोलून दाखवली...
बुवा जाणते होते आणि समाजात मानमरातबही होता.पण घाई करण्यात अर्थ नव्हता. पुरोगामी विचारांच्या या कुटुंबाने तिला आसरा द्यायचे ठरवले पण ही कोण कुठली याची खात्रीही करायला हवी होती.
बुवांनी दुसर्‍या दिवशी पहाटेच आपल्या विश्वासू शिष्यासह  तिला आपले स्नेही उस्ताद कादर खाँ याच्याकडे पाठविण्याची व्यवस्था केली... पण धोका होताच. मुलीचे कुटुंबीय तिला शोधणार आणि दोन धर्मियांच्यात नसते वैर उठणार...
पहाटे पहाटेच बुवांना वंदन करुन ती निघाली. पत्र घेऊन तो तरूण तिला घेऊन दोन तास पायी चालत पोहोचला. कादर खाँनी उत्तम स्वागत करुन तिला स्वीकारले आणि बुवांना लेखी पोचही कळवली...
शिष्य परतला...
कादर खाँ शास्रीय सँगीतातील नाणावलेले गवय्ये आणि दीलदार. पण असा प्रसंग प्रथमच ओढवलेला.. समाजात त्यांचा दबदबा होता आणि त्यांच्या संप्रदायातही त्यांना विशेष मान होता...
मुली मी तुझ्या वडिलांशी बोलेन.ते ऐकतील माझं.. मी तुला नक्की विद्या देईन पण त्यांची परवानगी हवी... तुझ्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल या धाडसापायी...
संगीत हे ईश्वराचे देणे आहे.त्याला जात धर्म पंथ लिंग असा भेद कळत नाही. पण आत्ताच्या परिस्थितीत तू घरी जाणे योग्य...
पण सजिलीने निकराने विरोध केला आणि आपल्या पदरी घेण्याची विनंती केली...
या सगळ्यात चौकशीचा ससेमिरा आपल्यापाठीही लागेल याची खाँसाहेबांना पूर्ण कल्पना होती. हे धाडस आपल्याला आणि बुवांंना पेलताना ब्रिटीश राजवटीच्या अमलाचा आणि क्रांतीचाही विचार करायला हवा होता...
दोन दिवसांनी खाँ साहेबांनी तिला बग्गीतून आपल्या मुंबईच्या थोरल्या बहिणीकडे पाठवले.
बडी बेगम.... संगीतातले आणखी एक नाव. बडी बेगम फक्त शास्रीय मैफलीच करत.राजे रजवाड्यांसाठी फक्त सांगीतिक करमणूक,.. आपल्या खानदानाचे नाव त्यांनी खाली पडू दिले नव्हते. त्याकाळातही आपल्या काकांकडे घरातच तालीम घेऊन बंधूंसह त्याही उत्तम गायिका झाल्या होत्या...
बडी बेगमने आपल्या बंधूंच्या विनंतीनुसार सडिलीला ठेऊन घेतले...
एकीकडे खाँसाहेबांनी शिष्यांच्या मदतीने सजिलीचे घर शोधून काढले आणि स्वतः त्या खाटकाला भेटायला गेले. सजिलीच्या घरी हाहाकार उडाला होताच...
खुद्द खाँसाहेब.... सजिलीचे अम्मी अब्बा चक्रावले...
तुमची मुलगी सुखरूप आहे.तिला गाण्याची सच्ची आस आहे. माझ्यावर विश्वास ठेवा.काही काळाने ती तुम्हाला नक्की भेटेल. तिच्याबरोबर कोणताही गैरव्यवहार होणार नाही.आम्ही खानदानी गायक आहोत... कलेला धर्म नसतो आणि हे आम्ही पाळतो. ती आमच्याकडे कशी पोचली हेही तिच्या पालकांना त्यांनी सांगितले...
शेवटी आईवडीलच ते... पण संप्रदायातील एवढी मोठी व्यक्ती दारी चालत येते आणि आपली मुलगी केवळ संगीत शिकण्यासाठी एवढे धाडस करते याची कल्पना सजिलीच्या आईवडिलांनाही आली.. 
आम्हाला तिला एकदाच भेटू दे.....
खुद्द खाँसाहेब जलशासाठी  जाताना तिच्या आईवडिलांना घेऊन गेले. भेडिबाजारच्या परिसरातील वरच्या माडीवरून दोन सुरेल जूळलेले तानपुरे डोलत होते...
बडी बेगम गात होती आणि तिच्या मागे सजिली सुरेल कंठाने मुक्त मनाने गात होती... बलमवाँ तुम क्या जानो प्रीत... मैं गई हार तुम्हरी जीत....