Maze Avadte Kathakar--V.Pu.Kale books and stories free download online pdf in Marathi

माझे आवडते कथाकार --व.पु. काळे !

कथा वाचनाच्या घनदाट जंगलातून वाट काढत असताना, वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु . नावाचा एक 'कथा'ळ पहाड लागतो. तो पार केल्याशिवाय मराठी कथा वाचनाचा प्रवास संपन्न होत नाही.

व.पु.नच्या लेखणीने एक मोठा कालखंड व्यापला आणि गाजवला हि आहे. त्यांचा वाचक वर्ग प्रचंड आक्राळ विक्राळ आहे. कथा, कादंबऱ्या, ललित ,आणि वैचारिक आणि किती तरी लेखन त्यांच्या लेखणीतून प्रसवलय ! पण ते खरे रमले ते कथा लेखनातच.

मी हि त्यांच्या बऱ्याच कथा वाचल्यात. पण त्यांच्या कथा वाचण्या पेक्षा त्या त्यांचाच तोंडून एकण्यात खरी लज्जत आहे! पु.ल.देशपांडे, द.मा.मिराजदार सारख्या दिग्गजांचे कथन मी ऐकल आहे पण व.पु.नचे कथा-कथन ---बात हि कुछ और है !शेकडो नाही तब्बल एक हजार सहाशेच्या वर कथा -कथनाचे कार्यक्रम या बाबाने केले आहेत ! टेप रेकोर्डवर येणारे हे पहिले मराठी लेखक!

साधारण मुंबई - पुण्या सारख्या शहरी फ्लॅट संस्कृतीतला ' माणूस 'हे त्यांच्या लेखनाचा आवकाश. या 'माणसा'चं जगणं , त्याची धडपड , त्याची जिद्द , त्याच भावविश्व , नाती ,त्यांचा गुंता हे सार त्यांनी त्यांचा कथातून नेमक्या शब्दात पकडल्यात. तुम्ही आम्ही त्यांच्या कथातून कसे वेगळे राहू शकतो !?

सिनेमा नट नट्यांच्या बद्दल बेफान आकर्षण असण्याचे ते दिवस !(तसे आज हि आहेत म्हणा.) त्यावर त्यांनी 'तूच माझी वहिदा !'नावाची एक सुरेख कथा लिहिली आहे. वहिदा रेहमान या लावण्यवती नटी सोबत एक दिवस घालवल्याची संधी मिळालेल्या एक मध्यम वर्गीय माणसाचा अनुभव ,त्याची घालमेल ,उच्छुकता , आणि शेवटी रात्री बनियानीच्या भोकांची तमा न बाळगता कुशीत शिरणारी त्याची बायको ! तेव्हा तो म्हणतो 'तूच माझी वहिदा !'? हि माझी त्यांच्या कथेतील सर्वात आवडती कथा.

त्यांच्या लेखनाची काही वैशिष्टे जी मला भावतात, त्यातील त्यांची वाक्य रचना हे एक आहे .बरेचदा ते खूप छोटी छोटी वाक्ये जोडून ते कथा प्रवाहित करत .लहान म्हणजे किती? तर तीन चार शब्दांच!हि हातोटी नंतर नाही अनुभवायला मिळाली. प्रत्येक वाक्याला त्याचा अंगचा एक अर्थ तर असायचाच , पण तो तीनचार वाक्यांचा समूह, न लिहलेल बरच काही सांगून जायची ! माझ्या स्मरणातल एक उदाहरण देतो .

' पैज सिनेमाची लागली. हरणाऱ्याने सिनेमा दाखवायचा. मी वर्तमान पत्र उघडल. त्यातल सिनेमाच पान काढल. त्यातून इंग्रजी सिनेमा बाजूला काढले. आणि त्यातलाच एक निवडला !' त्यांच्या या शेवटच्या वाक्यावरमाझ्या सारखे अनंत वाचक फिदा झाले असतील कारण येथे ते चटकन स्वतः ला कनेक्ट करायचे. हाच तो व.पु.टच !

त्यांचे दुसरे वैशिष्ट म्हणजे झकास, चमकदार आणि 'दिल को छु लेने वाली'वाक्यांची पेरणी ! काही मला आठवतात ती
' गंजण्या पेक्षा झिजणे केव्हाही चांगले '
'खर्च झाल्याच दुखः नसत ,हिशोब लागत नाही याची खंतच ज्यास्त असते '
'संवाद दोघांचा , तिसरा आला कि त्या गप्पा होतात '
त्यांची लेखनाची एक सिग्नेचर स्टाईल होती . आज हि व.पु.छाप कोणी नक्कल करायला गेल कि पटकन समजते!

मध्यम वर्गीय ,विशेषतः नौकरी करणारा, अश्या 'मना'वर त्यांची प्रचंड हुकुमत होती . त्याच्या खाचा खोचा त्यांना मायक्रोस्कोप मधून पहाव्या तश्या स्पष्ट दिसत . तेथे असलेले व्यथेची पुट , व्यवहार , स्वप्न , अवहेलना ,छोटे छोटे आनंदाचे कवडसे ,सार सार ते शब्दांच्या जाळ्यात पकडून , वाचकांना पेश करीत , त्यांच्या पद्धतीने. या सर्वान सोबतच एक छुपा फिलॉसरफर त्यांनी जपला होता. सामान्यपणे आपण जिथवर विचार करू शकतो त्या पेक्ष्या चार पावले पुढचा विचार ते मांडत ,आणि वाचकाला 'अरेच्या , हे हि आहेच कि !'असा गोड धक्का देत.एक नमून येथे देतो .कोठे तरी त्यांनी ' भांडणांचे वर्ग ' हि कल्पना मांडली आहे. काय तर ,शास्त्रोक्त कसे भांडावे !?--- ' त्या तिकडे महिलांचे वर्ग आहेत .खरे तर महिला उत्तम भांडतात. फक्त त्या भांडताना मुद्दा सोडून देतात !' बरेचदा बायका भांडताना मुदेसूद भांडत नाहीत हे आपल्याला माहित असून हि क्षणभर वाचताना आपण चकित होतो !

माझ्या साठी त्यांच्या कथा केवळ 'मनोरंजन'नाहीत. तर त्या एक उत्तम मार्गदर्शक आहेत . मी त्यातून ' कथा बांधणी ' आणि 'समर्पक संवाद लेखन ' याचे धडे घेतोय.

पुढे पुढे त्यांचातील तो 'फिलॉसरफर ' ज्यास्त प्रभावी वाटू लागला. ते वाचकांना 'गृहीत ' धरताय असाही भ्रम होवू लागला. म्हणून माझा त्याच्या लिखाणाकडचा ओढा कमी झाला . तरी माझ्या वाचन संस्कारात त्यांना वगळून पुढे जाता येणार नाही , आणि मीही जाणार नाही. माझी नावड त्यांच्या ऋणातून मुक्ती देण्यास दुबळीच आहे !

माझे हे काहीसे विस्कळीत लिखाण , व.पुं.ची एखादी कथा वाचण्यास तुम्हास उदुक्त करेल हि आशा वाटते .


सु र कुलकर्णी . तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED