माझे आवडते कथाकार -- द.मा.मिरासदार ! suresh kulkarni द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझे आवडते कथाकार -- द.मा.मिरासदार !

कथा वाचनाचा भवसागर पार करणाऱ्यांना ग्रामीण कथा वाचल्या वाचून किनारा सापडत नाही. ग्रामीण पार्श्वभूमीवर अनेक कथाकारांनी आपल्या लेखण्या आजमावल्या आहेत आणि आजही आजमावत आहेत.

तसा मी अल्पमती वाचक आहे. फार जुने ग्रामीण साहित्य माझ्या वाचनात नाही. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि द. मा.मिरासदार यांच्या काही कथा वाचण्यात आल्यात. हे तिघेही ' स्वतंत्र संस्थाने ' आहेत. प्रत्येकाची शैली,लेखनाचा पोत, आणि ग्रामीण जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोण भिन्न आहेत. या तिघांनी मिळून केलेले कथाकथनाचे प्रयोग, कथा रसिक विसरणे शक्य नाही.

माडगुलकरांचे लेखन अत्यंत साधे, सोपे, सुपाच्य म्हणावे असे बाळबोध स्वरूपाचे आहे. वहिवाटेच्या रस्त्यात माणूस जसा, रात्री अंधरात सुद्धा न ठेचाळता चालतो, तसे त्यांचे लेखन वाचताना कुठे 'हिसका'बसत नाही. अशा प्रकारचे मऊसूत लिहिणे महा कर्मकठीण असते. माडगुलकरांची 'बंडगर वाडी' आणि 'सत्तांतर' हि कथानके वाचनीय आहेत. पण मला त्या पेक्षाही त्यांचे, 'माणदेशीची माणसे' ह्या व्यक्ती रेखा खूप भावल्या. 'व्यक्तिरेखा'हा प्रांत अनेक जुन्या, नव्या लेखकांना भुरळ घालत आलाय. माडगुलकर आणि पु.ल.यांच्या व्यक्तीरेखानी माझ्या सारख्या अनंत वाचकांना वेड लावले आहे. आणि आम्ही ते अभिमानाने सांगतोय!

माडगुळकरांचे लेखन 'कथा'स्वरूपाकडे झुकत असले तरी, दुधावर दाट साय यावी तशी ग्रामीण कथेची साय येते ती शंकर पाटील आणि द.मा.नच्या कथेनीच! ग्रामीण कथा येथे जोमाने बहरते. शंकर पाटलानी अनके खुमासदार विनोदी कथा लिहिल्यात. 'धिंड'हि कथा, उदाहरण म्हणून संगता येईल. हि कथा ऐकावी तर पटलानच्याच तोंडून! दारुड्या खोताची गाढवावरून धिंड गावकरी काढतात. त्याची हि कथा. जसा, जसा वेळ जाईल, तसा, तसा धिंड काढणाऱ्या मंडळीचा उल्हास मावळत जातो. पण गाढवावर बसलेला खोत, गाढवावरून उतरायला तयारच होत नाही! आजून 'घुमावा'म्हणून हट्ट धरतो! शंकर पाटील, हि कथा खूप रंगवून सांगत. त्यांचे 'घुम्व्वा ,घुम्व्वा ', अजून कानात घुमतय! पण त्यांची लेखणी, गंभीर कथानकात ज्यास्त रमते. या उलट द. मा. नी 'ग्रामीण विनोदी कथा' हिमालयाच्या शिखरावर नेवून ठेवली असली, तरी त्यांनी काही 'गवत', 'स्पर्श', ' कोणे एके काळी', पाऊस', 'रानमाणूस' अश्या लक्षणीय गंभीर कथा पण लिहल्या आहेत!

या तिन्ही दिग्ग्जात उजवे डावे करणे कठीण काम आहे.मी मात्र द.मा.न चा 'भक्त'आहे. कारण मी त्यांच्या कथांचे अनेक पारायणे केली आहेत. करतो आहे.
द.मा.मिरासदार यांचा कथांची वैशिष्टे किती आणि कशी सांगावीत? त्यांची कोणतीही कथा घ्या. ती एक सारखी चालूच रहावी आणि, ती आपण ती सारखी ऐकत राहावी असे वाटते. त्यांची कथा एकाच वेळेस वात्रट आणि गंभीर असू शकते. त्यांच्या कथा गोष्टी वेल्हाळ असतात, पण कंटाळवाण्या नसतात. त्यांच्या कथात एक मिस्कीलपणाची झाक असते. कथा कधीच एकसुरी होत नाही. एक गमतीदार विक्षिप्तपणा त्यात भरलेला असतो. त्यांच्या कथात मला आवर्जून जाणवतो तो, 'कथा' निर्मितीचा ध्यास! त्यात कथा सूत्र प्रमुख असते आणि त्या खालोखाल त्यातील पत्रांचा स्वभाव! हा माणूस, 'गावरान'माणसाच्या स्वभावातला 'गोडवा'पकडण्यात पटाईत आहे. माणसामाणसातला तऱ्हेवाईकपणा, गबाळेपणा,खेडवळ 'इगो', दांभिकता, श्रद्धा,अंधश्रद्धा, स्वार्थीपणा, हेकेखोरपणा, स्वतःला वेगळा आणि श्रेष्ठ समजण्याची वृत्ती, या सारख्या गोष्टी ते नेमक्या, चिमटीत पकडतात आणि त्याचा वापर ते खुबीने कथा प्रवाही करण्यासाठी करतात. बापू(गवत ), दिगुआण्णा(साक्षीदार), सारखी बेरकी माणसे , तात्या(विरंगुळा),बाबू(गवत),सारखी दुर्दैवी माणसे, नाना चेंगटे(नव्व्यांवबादची सफर)सारखी थापडी माणसे, व्यंकू (व्यंकूची शिकवणी)सारखी, मास्तरांचे मास्तर असलेली इब्लीस कार्टी, या सारखे किती तरी नमुने त्यांनी पेश केली आहेत.
विनोद, उपहास,आणि अतिशयोक्ती या गोष्टी त्यांच्या कथात असतात. त्या कुठल्याही विनोदी संहिसाठी गरजेच्या आहेतच. ते त्यांचा उपयोग कथे साठी करतात. विनोदासाठी ते कथा राबवत नाहीत, तर कथे साठी विनोद, एक साधन म्हणून वापरतात. त्यामुळे ओढून ताणून कथा 'इनोदी'केल्या सारखी वाटत नाही!

कथा आणि हास्य कथा अनेकांनी लिहिल्या आहेत. पण द.मा.नची, 'कथा'नसतेच,ती 'गोष्ट'असते! कथा वाचायची असते आणि गोष्ट ऐकायची असते! त्यांची कथा वाचताना आपण, किमान मी तरी, ती ऐकतच असतो. 'गोष्ट'म्हटल कि मग निवेदन शैली महत्वाची ठरते. द.मा.नची निवेदन शैली अफलातून आहे. निवेदन करताना थोडा जरी तोल ढळला तरी, त्यालाअहवाल वाचनाचा निरसपणा येतो, मग रसभंग आलाच! पण द.मा.नच्या लेखनात तसे होत नाही.
शाळा, मास्तर,आणि निरागस, अतिचौकस, डामरट, इरसाल कार्टी, हा त्यांच्या अनेक कथांचा विषय आहे. 'ड्रॉईंग मास्टरचा तास', शिवाजीचे हस्ताक्षर', 'माझ्या बापाची पेंड', अश्या खुमासदार कथा विसरतो म्हटले तरी, विसरता येत नाहीत. काही काळ ते शिक्षक होते, तेथेच या कथांची बीजे गवसली असतील.

त्यांचे जवळ पास चोवीस कथा संग्रह प्रकाशित झालेत. त्यांच्या सर्व कथान मध्ये 'कोणे एके काळी' हि कथा एकदम 'हटके'आहे. त्यांचे नाव जर लेखक म्हणून नाही पहिले तर, हि त्यांची कथा आहे, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही, इतकी ती वेगळी आहे! राजे-महाराज्यांच्या काळातील कथानक आणि त्याला साजेलशी भरजरी भाषा. 'वक्रतुंड'या विदूषकाच्या बौद्धिक कौशल्यावर, राज्याचे महाराज, मोहिनी, या रूपसुंदरीचे मन जिंकतात, आणि तिचा अनुग्रह प्राप्त करून घेतात. वक्रतुंड जेव्हा या सौदर्यवतीला महाराजा कडे नेत असतो, तेव्हा ती वाटेत आपले मनोगत प्रगट करताना म्हणते, 'मी लहानपणा पासूनच निश्चय केला होता कि माझा पती माझ्या सारखाच बुद्धिवान हवा. मग भलेही तो फारसा रूपवान वा धनवान नसला तरी चालेल, इतकेच काय पण दरिद्री असला तरी हरकत नाही!' कथेच्या प्रवाहात, या क्षणी वक्रतुंडाची, आपण काय गमावले आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर महाराजांना काय मिळवून दिले, याची खंत, वाचकांना बेचैन करून जाते!

हीच कथा, हेच प्रसंग, हीच व्यथा, जी.ए.कुलकर्णी, या दिग्गज लेखकांनी पण हाताळलीय, 'विदुषक'या कथेत!. द.मा.आणि जी.ए.सारखे महारथी कथा लेखक, कथा बीजांची पेरणी, मशागत, हाताळणी कशी करतात या साठी नवोदित लेखकांनी या दोन्ही कथा अभ्यासण्या सारख्या आहेत.

कथा बांधणीत सुरवात आणि शेवट खूप महत्वाचे असतात. कथेची सुरवात वर्णनात्मकतेने करू नये असा एक विचार प्रवाह आहे. कारण सकाळ,संध्याकाळ,परिसर वर्णन बरेचदा बेचव आणि अनावशक होवून जाते. मुख्य कथेशी त्याची सांगड बसली नाही तर, वाचक कंटाळून पुस्तक बंद करतो. पण द.मा.नच्या बहुतेक कथा वर्णनात्मक परिच्छेदाने सुरु होतात. पण ते इतके रसाळ असते कि वाचकांचे पाय अधिकाधिक कथेत रोवले जातात, नजर शब्दा मागून शब्दात गुंतत जाते!

सुरवाती इतकाच, त्यांच्या कथेचे शेवटचे लँडिंग अफलातून असते. एखादा गरुड पक्षी जसा आकाशातून अलगत भुईवरल्या सावजावर झेप घेतो, किवा झाडाच्या एखाद्या नाजूक फांदीवर, शाही दिमाखाने ,डौलदारपणे विसावतो,तशीच त्यांची कथा समाप्तीच्या समेवर येते. एक याचे उदाहरण म्हणून 'व्यंकूच्या शिकवणी'या कथेचा शेवट पाहू.
--शेवटी एक तरी प्रश्न व्यंकूने असा विचारला होता कि ज्याचे उत्तर मला देता येण्या सारखे होते!
"ती हल्ली माझ्या कडे असते."
'माझ्या बाबाची पेंड','माझी पहिली चोरी','निरोप','चोरी:एक प्रकार',अशा गोष्टी द.मा.च लिहू जाणे. ते इतरांना जमणे कठीणच .
एकंदर काय तर अश्या 'द.मा.चा'गोष्टी सांगणार कथाकार विरळाच.

सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय.पुन्हा भेटूच.Bye.