मद्यानंद! suresh kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मद्यानंद!

नवआंग्ल सालच्या शुभेच्छा देण्याच्या राहून गेल्या त्या आता' be lated ' मध्ये घेऊन टाका. त्या खरेतर एक तारखेसच देणार होतो, पण कार्यबाहुल्या मुळे राहून गेले. (डोम्बल्याच ' कार्यबाहुल्य' आळस दुसरं काही नाही - हे आमच्या श्याम्याचं मत आहे. ) एक जानेवारी म्हणजे साडे तीन मोहर्ता पैकी अर्धा मोहर्त.
अहो कसला काय म्हणून विचारता? 'तीर्थ ' प्राशनाचा! त्यानंतर दोन दिवसांनी एकाचा 'दीक्षांत' समारोह ठरला. मोहर्त साधला नाही. पण चांगल्या कामाला सगळेच दिवस शुभ! त्या गडबडीत आठवडा कसा गेला कळलेच नाही. असो.

तुम्ही म्हणाल हे 'साडे तीन मोहर्त ' आणि 'दीक्षांत समारोह ' काय भानगड आहे?,' तीर्थ ' म्हणजे तुम्ही समजत आहेत ...... ती दारू,मदिरा ,किंवा मद्यच आहे! साडेतीन मोहर्तातला पहिला मुहूर्त गटारी अमावस्या, दुसरा शिमगा, तिसरा एकतीस डिसेम्बर आणि अर्धा एक जानेवारी. या मोहर्तावर थोडी का होईना घ्यावी असे 'पिता मह, दत्तू मामा ' यांची आज्ञा आहे. तसेच या प्रसंगी एखाद्यास त्याची 'दीक्षा ' जरूर देऊन, हा 'सम्प्रदाय ' वाढवण्यास साहाय्य भूत ठरावे, असेहि त्यांनी प्रतिपादन केले आहे. 'दीक्षांताचा ' विधी पण त्यांनी आपल्या 'मद्यानंद ' ग्रंथात लिहून ठेवला आहे. तो येणे प्रमाणे.
' साडेतीन मोहर्ता पैकी एखादा मोहर्त, किंवा शुभ दिवस (चांगल्या कमला सर्व दिवस शुभच असतात, म्हणून कधीही!) पाहून, इच्छुक नवागतास सूर्यास्ता नंतर, एक प्रहरानी एखाद्या मदिरालयात न्यावे . दीक्षा देणाऱ्यास किमान पाच सालाचा, मदिरा सेवनाचा अनुभव असावा. त्याने नवागतास आपल्या वामांगी आसनस्थ करावे. त्यानंतर मदिरेची थोरली बाटली, खरावलेल्या काजूचा चखणा मागवावा. ( चखण्यांत अंनत प्रकार असतात, प्रसंगाशी साजेलसा मागवावा,- भुक्कड फुटाणे ,शेंगदाणे हा 'पेन्शनरी चाखणा' वर्ज असतो हे ध्यानात ठेवावे! अहो, ते पेन्शनरांना ठीक आहे, पेन्शन, ती किती असणार? बाटली घेतलीतर, चखण्याला पैसे कसे रहाणार? म्हणून तर, फरसाणचा चखणा फुटाण्यावर येत असतो!असो. ) चांदीच्या चमच्याने मोजून पाच चमचे मदिरा, सम प्रमाणात सोड्या सोबत नवागतास एका घोटात घश्या खाली उतरावयास लावावी. त्यानंतर 'चकणार्थे ' दोन काजू भरवावेत. 'इति दारू दीक्षांत विधी सम्पन्न ' करावा! सामिष भोजनोत्तर 'गुरु (दारू)दक्षणा ' म्हणून, नवागताने हॉटेलचं बिल द्यावं!.

दारू विषयी समाजात अनेक गैर समज हेतू पुरःसर पसरवले आहेत. जसे हि मदिरा अनेकांचे संसार मोडते, अनेकांना आयुष्यातून उठवते, 'दारू ' राष्ट्राला लागलेला 'कलंक 'आहे वगैरे वगैरे. मूठभर लोकांनी दारूला नावे ठेवली कि, लागले सर्व जण दारूच्या नावाने बोट मोडायला. खरे तर 'मदिरा साक्षरता ' हि काळाची गरज आहे! आणि हे मोलाचे कार्य आमच्या दत्तामामानि 'मद्यानंद'या ग्रन्थाची रचना करून केले आहे. दत्तामामा कोण? ते एक उच्य दर्जाचे मद्यसेवक ( गावठी भाषेत बेवडा !) आहेत. ते इतकी पितात कि, जाणकार मंडळी त्यांना दारूचे पिंप किंवा ब्यारल म्हणतात, पण कधी त्यांना गटारात किंवा रस्त्यावर लोळताना पाहिलेत का? शक्यच नाही! का काय? ते बसल्या जागीच लुंडकतात ,मग कसले रस्त्यावर जातंय! अस्तु . आम्हालाही दत्तामामा विषयी अधिक जाणून घेण्याची ओढ आहेच, त्यांच्याशी बातचीत झालावरच ते शक्य आहे. साल एक प्रॉब्लेम आहे. दारू पिल्याशिवाय त्यांना बोलतायेतं नाही, अन एकदा का पिले कि ते कुणाचंच ऐकत नाहीत!

'सकारात्मकता -परिवर्तनाचे एक शक्तिशाली शास्त्र ' या पुस्तकाचे निकष जेव्हा दत्तामामानी 'दारू'ला लावले तेव्हा 'मद्यानंद 'ची निर्मिती झाली!. 'दारू ' तशी दोन प्रकारची, एक शोभेची व दुसरी पिण्याची. पहिली शोभा दाखवते, तर दुसरी 'शोभा' करते!असे काही जणांचे मत आहे. लहानपणी आमच्या हातात भुई नळा फुटला, तेव्हा पासून आम्ही पुन्हा 'शोभे'च्या दारूला हात लावला नाही!

हरिश्चंद्र राजाने ज्या प्रमाणे स्वप्नात राज्यावर पाणी सोडले व जागे पाणी स्वप्नातला शब्द पाळला, त्याच प्रमाणे नशेत दिलेला शब्द खरा करणारे, अनेक हरिश्चंद्र आपल्याला ठायी ठायी आढळतील! आणि म्हणूनच अनेक आर्थिक व्यवहार मदिरेच्या साक्षीने होतात. व्यवसायात याला 'डील ' म्हणतात! म्हणजे लक्ष्मी जणू मद्याच्या वामांगी असते. हे जर खरे आहे असे गृहीत धरले तर, शुभांगी सरस्वती वसते म्हणावे लागेल! अनके 'सारस्वतां'ची प्रेरणाहि, त्यांच्या प्रियसी पेक्ष्या मदिराच असते. 'हिच्या' अराधने शिवाय त्यांच्या कल्पनेला म्हणे धुमरेचं फुटत नाहीत!

दारूचे औषधी उपयोग सांगता सांगता तर, प्रत्यक्ष अश्विनीकुमार सुद्धा थकून जातील! कष्टकऱ्यांच्या थकवा मग तो मानसिक असो व शारीरिक दोन पेगा, मध्ये दुप्पट जोम येतो! (पहिला पेग थकवा घालवण्यासाठी व दुसरा जोमा साठी असावा!) सुख-दुःखात तर दारू सारखा मित्र नाही. (खरे आहे आमचा दत्तामामा दुःखात एकटाच पितो पण आनंदात आपल्या सोबत इतरांना पण पाजतो!)

आता, आम्हाला सांगा, जी 'दारू' लक्ष्मी ,सरस्वती ,व आरोग्य देते ती, वाईट कशी?

'दारू मुळे अनेक संसार उध्वस्त होतात.' हा एक जबरदस्त, निर्दय आरोप या मदिरेवर केला जातो.
'विषारी दारूचे बारा बळी! पन्नास अत्यवस्थ!,
'खोपडी 'ने वीस जणांना खाटेवर लोटले!
अशा प्रकारच्या बातम्या या आरोपास बळकटी देतात. पण हि सारी, पेपरवाल्या अन मीडियाची हाकाटी हो! अश्या बातम्या शिवाय यांचे पेपर खपतील काय? अशी विषारी दारू प्यायला कोणी बोलावणं पाठवलं होत कि काय? पण नाही फडतूस दारू प्यायची, घराबाराला बेजार करायच, वर दारुलाच नाव ठेवायचं, पिणाऱ्या पेक्ष्या, पेयालाच बदनाम करायचं! (बुद्धिभेद, बुद्धिभेद म्हणतात तो हाच!) विषारी दारूने शेपन्नास लोक मेल्याने, सर्व दारूचं वाईट ठरवणं हास्यास्पद आहे. दारूने अनेक कुटुंब उद्धस्त होत असतील, नव्हे होतातच हे सत्य आहे! पण त्याच बरोबर लाखो कुटुंबांची, रोजी -रोटी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 'दारू' वर अवलूंबून आहे, याचा कोणी विचार करत नाही, हे हृदयद्रावक सत्य आहे! दारू कारखान्यात व हातभट्यावर अनेकांचे घाम (दारूसोबत )गळताहेत! मोठे कारखानदार पैश्याच्या जोरावर, हवेते परवाने घेऊन उघड पणे व्यासाय करू शकतात. पण आम्हाला, गरीब हातभट्टीवाल्यांची काळजी वाटते. म्हणजे पैशेवाल्या श्रीमंतांच्या, पाचोळ्या सारख्या 'चारोळ्या' प्रकाशित होऊन, तो 'कवी 'म्हणून मिरवतो आणि गरीब जिनिअस कवीच्या चारोळ्या, मात्र 'पाचोळ्या' सारख्या अंधारातच उडून जातात! (यात अस्मादिक पण आहेत!) बिचाऱ्या हातभट्टी वाल्याला चोरून दूर गावाबाहेर, रानावनात भट्टी लावावी लागते! येथे आम्ही काही उपाय सुचवू इच्छितो.

अनेक लोककलां प्रमाणे 'दारू गळणे' हि सुद्धा एक पारंपरिक कला आहे! याला सरकारी मान्यता आणि पाठबळ मिळावे. तसेच या कलेला, परवान्याच्या जोखडातून मुक्त करून, लोकाभिमुख करावे. एकदाका परवान्याची झगझग सपंलीकि (तसे हि, या व्यसायातील जिगरबाज लोक, त्याला फारशी भीक घालत नाहीत म्हणा! ) अनेक तरुण रक्ताचे (आमच्या भाषेत पैल्या धारेचे ), निधड्या छातीचे लोक यात उतरतील. चांगल्या प्रतीचा उत्तम माल, रास्त किमतीत गिऱ्हाहीकाना मिळेल. नासक्या गुळात नवसागराचं व सडक्या ब्याट्रीच्या सेलचे प्रमाण (यालाच ट्रेंड सिक्रेट म्हणतात),ज्याचे त्याला ठरवता येईल . सरकारतर्फे या 'कुटीर उद्योगास' मान्यता मिळाली की, जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत, 'श्री दारुणकर यांनी दि. १ ते २पर्यंत (दोन्ही दिवस सोडून )या व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.', अश्या प्रमाण पत्रावर बँकांना कर्ज मजूर करावी लागतील. शिवाय बेरोजगारीच्या प्रश्नास, काहीशी वाट मोकळी होईल ! दारूच्या उत्पादनात जबर वाढ होईल, त्या योगे 'कर' रूपाने सरकारचे 'कर '(हात ) मजबूत होतील. फायदे इथंच संपत नाहीत. या निमित्याने दारूवर निर्भर असणाऱ्या दुय्यम व्यवसायांना, जसे पान सिगारेटच्या टपऱ्या, खारेमुरे वाले, उकडल्या अंड्याचे गाडे, फुटाणे वाले, दारुड्याना घरी पोहचवणारे रिक्शा वाले वगैरे, इतकेच नाही तर डॉक्टर, दवाखाने, वकील, यानाहि 'अच्छेदिन ' येणारच कि ! अहो, दोन दिवसात दारू सोडवा' वाले वैदू सुद्धा, सन्मयकांच्या चकचकीत दुकानात, रंगी-बेरंगी फेटे बांधून , ऐटीत गल्ल्यावर बसतील! रांगोळ्यांची प्रदर्शने भरवणाऱ्या रिकामटेकड्या, 'सेवा भावी' संस्थांना दारुड्याचे पुनर्वसना सारखा विषय गवसून, वेळ व पैसे (त्यांचा व आमचा दान केलेला )सत्कारणी लागेल.

केवळ उत्पादन वाढून काय उपयोग? वितरण व्यवस्तेचे व खपाचे काय? वाढीव दारू कशी आणि कोणास खपवायची? ('खपवणे ' या शब्दाचा योग्य अर्थ सुज्ञ वाचक घेतील हि अशा आहे.) खरे तर हे काम सरकारचे आहे. (तशी सर्व कामे सरकारचीच असतात म्हणा.) तरी एक सुज्ञ, जवाबदार (आणि बेकार - हे शाम्याचे मत -मला मान्य नाही. निषेध.) जेष्ठ नागरिक म्हणूनआम्ही, काही मार्ग दर्शन करू इच्छितो. ते येणे प्रमाणे.
१. रेशनकार्डावर रॉकेल प्रमाणे, इच्छुकास रोज किमान' नाईंनटी ' एम एल, (मराठीत पावशेर), योग्य दर्जाची दारू किफायतशीर भावात मिळावी. यात दोन फायदे आहेत. बेहिशोबी नफ्याला चाप बसेल व लोकांना बिन विषारी, निर्धोक, 'श्रमपरिहार' द्रव्य सहज मिळेल. शिवाय 'दारूचे बळी ' हे पेपरवाल्यांचे प्रकरण बरेचसे आटोक्यात येईल. आता तर आर्थिक कुवती नुसार विविध रंगांची रेशनकार्ड सरकार देतंय, ज्याच्या त्याच्या पती प्रमाणे मंदिराचे वितरण करता येईल!
२. जेष्ठ 'पिता -श्री' ना, ओळख पत्रावर निम्या किमतीत मद्य देण्याचा कार्यक्रम, प्रवासी सवलती प्रमाणे राबवण्यास हरकत नसावी.
३ दारूचे व्यसन जबरदस्त असते, यात दुमत असण्याचं कारण नाही. भल्याभल्यांची फ्या -फ्या होते. ओठांची आणि बाटलीची तोंड मिळवणी करता करता नाकी नऊ येतात! तेव्हा बँकांनी, एक सामाजिक बांधिलकी म्हणून, अश्या 'पीत ' प्रकृतीच्या लोकांची कुवत (पिण्याची नव्हे तर परतफेडीची )पाहून, कर्ज पुरवठा करावा!( प्रायोरिटी सेक्टर खाली या साठी 'सुटेबल ' सब टार्गेट बँकांना दिल्यास उत्तमच. ) नेहमी प्रमाणे, कितीही काळजीपूर्वक कर्ज दिले तरी, ते थकणारच! कारण घेणाऱ्याची परत फेडीची इच्छाच नसते! तेव्हा बँकांनी हताश न होता, अशी कर्जे बुडीत खाती टाकून मोकळे व्हावे! आणि परत नवीन पतपुरवठा, 'नवा भिडू नवे राज्य ' या धर्तीवर देत रहावे, हि साखळी, दारू, दारुड्या, किंवा बँक असे पर्यंत चालूच ठेवावी!
४. या वेळे पावेतो संघटित पगारदार वर्ग, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता,या प्रमाणे 'मद्य भत्ता' आपल्या पदरी (कि गिलासात! ) पडून घेतील याची आम्हास खात्री आहे!

'दारू पिऊन लोक मारामाऱ्या करतात', हा एक जुना, रापलेला आरोप आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे! अहो, दारू पिऊन लोक काय, झिम्मा -फुगडी खेळणार? गुढगे, कोपर,डोकी फुटणारच कि! त्यात नवल ते काय? या कडे आपल्याला, पॉजिटिव्हली पाहायला पाहिजे. अश्या भांडणामुळे लढाऊ वृत्ती वाढीस लागते. मार देण्याची आणि मार खाण्याची क्षमता वाढते. रोजच्या राड्याने शेजारी पाजारी वचकून रहातात. याला आम्ही आमच्या भाषेत 'वट ' म्हणतो! मारा मारी दरम्यानजे गालिप्रदान होते, त्या मुळे मन मोकळे होते! ताण कमी होतो! वाईट भावनांना वाट मिळते! येणे प्रकारे प्रत्यक घटक सशक्त झाला तर ,समाज सशक्त होईल. जेथील समाज सशक्त, ते राष्ट्र शक्तिशाली होईल यात शंकाच नाही! बघताय काय ? सामील व्हा! देशास सशक्त आणि सम्पन्न करण्यासाठी! मग येतंय? एक एक पेग मारू या !!


---सु र कुलकर्णी -- आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच Bye
( माझा हा लेख -रविवारची धमाल जत्रा -या साप्ताहिकात २१ मे २००० मध्ये प्रसिद्ध झाला होता . त्यालाच घासून -पुसून तुमच्या साठी देत आहे . )