सेकंड इनिंग! suresh kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सेकंड इनिंग!

आपण जसे आपल्या पहिल्या ' इनिंग ' कडे,- म्हणजे शिक्षण, नौकरी -व्यवसाय, लग्न - या कडे जसे लक्ष देतो, तसे आपल्या ' सेकंड इनिंग ' कडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. सेकंड इनिंग म्हणजे निवृत्ती नंतरचे आयुष्य. या उतरत्या आयुष्याचे नियोजन गरजेचेच असते. 'वेळ आल्यावर पाहू ' ' आत्ताच काय घाई आहे ?' म्हणून टाळून देतो.

मीही तेच केले. अचानक दोन वर्ष मुदत -पूर्व निवृत्ती घेणे भाग पडले, अन माझे काय चुकले हे लक्षात आले. पण तोवर वेळ पुढे सरकली होती! मला ज्या अडचणींना सामोरे जावे लागले, त्यातील बऱ्याचश्या, पूर्व नियोजन केले असतेतर, कमी किंवा सौम्य झाल्या असत्या, असे आता वाटतंय. काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्याश्या वाटतात, म्हणून हा लेखन प्रपंच.

' राहायला घर आहे, गाठीला चार पैसे आहेत, खायला पेन्शन आहे. आणि काय पाहिजे म्हातारपणी?' खरे आहे आर्थिक तरतूज आपण सर्वजणच करतो. ती गरजेची आहेच. पण शारीरिक आणि मानसिक 'तयारी' हि तितकीच महत्वाची असते. मला हे अंमळ उशिराच समजले. तोवर एक बायपास, एक अँजिओप्लास्टी पदरी पडली होती! बोनस मध्ये बी.पी.!

उत्तम शरीर प्रकृती, एक 'असेट ' असते. रिटायर्ड लाईफ साठी सुद्धा. या मुळे अनेक गोष्टी तुमच्या पक्षात रहातात. जसे म्हातारपणी तुम्हाला, इतरांवर विसंबून राहावं लागत नाही. प्रवास, तीर्थ यात्रा. उल्हासात करता येतात. माझे एक जेष्ठ मित्र आहेत, वय साधारण सत्तरीच्या आसपास, गेल्या पाच वर्षात, निम्मा जगप्रवास एन्जॉय केलाय, सी -डायविंग सह! प्रकृतीची साथ नसती तर, हे शक्य झाले नसते! उत्तमप्रकृतीच्या जोरावर उद्योग धंदा, समाजकार्य करता येते. तुम्ही आधार मागणाऱ्यात नव्हे, तर देणाऱ्यात असता.

निरोगी प्रकृती एक दिवसात मिळत नाही. येथे पूर्व नियोजन गरजेचे असते. व्यायामाचा अभाव आणि व्यसनाधीनता, या कात्रीत बरेच जण केव्हा अडकतात हे त्यांनाच काळात नाही. (व्यसनात, दारूचा खुप वरचा नम्बर लागतो. हल्ली दारू सोशल ड्रिंक झालीय! स्टेट्स सिम्बॉल! न पिणारा 'मागास ' ठरतोय!). कुठल्याही व्यसनाचा ताण तरुणशरीर सहन करू शकते. पण त्यापासून होणाऱ्या हानी मुळे, उतार वयात गम्भीर आजारांना आमंत्रण मिळते. तेव्हा वाटते आपण फक्त, रोज सकाळी दोन कि.मी. चा वॉक केला असतात तर ....... किंवा वेळीच सिगारेट सोडली असती तर ...... पण उशीर झालेला असतो. असो. ' आरोग्य, व्यसन आणि पुनर्वसन' या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. येथे फक्त उत्तम आरोग्य या ' असेट ' चे शेअर्स घेण्यास लागलीच सुरवात करा इतकेच. योगा, प्राणायाम, जिम, पायी फिरणे, जे जे शक्य असेल, ते ते करण्याकडे कल असू द्या. याचे खात्रीशीर आणि फायदेशीर 'रिटर्न्स ' नक्की मिळतील .

निवृत्ती नंतर येणारे सर्वातमोठे संकट रिकामा वेळ! अक्षरशः हा प्रचंड असतो! हा वेळ रविवारच्या सुटी सारखा हवा हवासा वाटणारा नसतो. ती एक निर्जीव पोकळी असते! न भरून निघणारी! हि पोकळी भरून काढण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे, छंद!

'छंदानं विषयी ' नावाचे एक नितांत सुंदर पुस्तक, डॉ. अनिल अवचट यांनी लिहलंय. एखादी व्यक्ती स्वतः चे छंद कसे जोपासते?, त्यासाठी किती कष्ट घेते?, कसा वेळ काढते? ते हे पुस्तक वाचून कळेल. अहो, छंद तरी किती, स्वयंपाक, ओरोगामि, बासरी, लाकडी कोरीवकाम, चित्रकला,......... बापरे विचारू नका . निवृत्त होणाऱ्यांना ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध या पेक्षा, असले एखादे पुस्तक प्रेझेन्ट देणे योग्य होईल असे मला वाटते. एकंदर सांगण्याचा मुद्दा असा कि एखादा छंद जोपासा. पेपर वाचणे, टीव्ही पाहणे, नेट वर काही बाही पहात टाइम पास करणे या पेक्षा, काही नवीन शिकण्या कडे कल असू द्या. कारण नवीन शिकण्याने मेंदू वापरात रहातो, 'विस्मरणा ' सारखे आजार दूर रहातात. इंटर नेट मुळे खूप काही घरबसल्या शिकता येते. चित्र कला, शिवणकाम, गिटार, ग्लास पैंटिंग, विणकाम भरपूर पर्याय आहेत. कुठलीही एखादी कला, जरूर शिका. सर्व कलांमध्ये एक समान धागा असतो, लय आणि तल्लीनता! आणि कलेतली तल्लीनता हि प्रत्यक्ष 'समाधी ' असते! हा अनुभव घेऊन पहा. दहा मिनिटे एकाजागी मी न बसणार, पेंटिंग करताना तीन तीन तास एका जागी स्थिर असतो! अन मला वेळेचे भान नसते! माझा अनुभव तुम्हाला सांगतोय.

तुम्ही म्हणाल 'अरे, मी आता पन्नाशी पार केलीय, आता कसली कला शिकतोय? असल्या गोष्टी लहानपणीच शिकाव्या लागतात! ' तुम्हाला सांगतो काही शिकायला वय लागतनाही. आईच्या पोटात असल्या पासून ते मरेपर्यंत काहीही शिकता येते. त्याला वय नाहीतर आवड असावी लागते. रवींद्रनाथ टागोर उत्तम चित्रकार होते. हि कला त्यांनी उत्तर वयातच आत्मसात केली. लांब कशाला माझेच उदाहरण देतो, (आत्मप्रवढीचा दोष स्वीकारून ) मी बरी चित्र काढतो असे पहाणारे म्हणतात, मी हि कला निवृत्ती नन्तर सुरवात करून शिकतोय.

एखाद्या विषयात -कलेत अशक्यप्राय वाटणारी प्रगती करण्यासाठी एक फण्डा तुम्हाला सांगतो! फक्त दोनच गोष्टी करायच्या! एक आवश्यक ती सर्व सामग्री जमवायची आणि या सामुग्रीतून शक्य ते सर्व करायचे, यात मात्र बिल्कुक कसूर नको. या दोन गोष्टी सातत्याने केल्या कि तुम्हीच पाहाल, एके काळी ,अशक्य वाटणारी गोष्ट तुम्ही आत्मविश्वासाने करत असाल!

' आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाच शिक्षण घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा. पण एव्हड्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातील एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचे उद्योग तुम्हाला जगवील. पण कलेशी केलेली मैत्री, तुम्हास का जगायचं हे सांगून जाईल.' ---- हे उदगार आहेत, आपल्या लाडक्या पु. ल. देशपांड्यांचे. तेव्हा --काम नाही काडीचं, अन फुरसद नाही घडीची -- असली अवस्था टाळायची असेल तर 'कलेचा ' प्रस्ताव आहे. पहा विचार करा.

आपले उरलेले आयुष्य समाधानात जावे असे सर्वानाच वाटत असते. सकारात्मक दृष्टिकोन, किमान गरजा, आणि किमान अपेक्षा, या गोष्टी समाधानाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात. नौकरीत असाल तर खुर्ची गेलेली असते. तिला चिटकलेला, मानसन्मान हि तिच्या सोबतच जातो. त्याची अपेक्षा फोल ठरते. 'अरे याला मी किती मदत केली होती! अन हा आता साधी ओळखही दाखवत नाही', हे शल्य बोचले, तरी खरे असते. त्याला त्याचा कामासाठी नवा 'साहेब ' मिळालेला असतो! मनावरचे ओझे कमी करून घ्यायची सवय करून घ्यावी लागते. मनावरचा ताण कमी करण्यासाठी 'क्षमा ' हे प्रभावी शस्त्र आहे. आपल्या दृष्टीने आपल्यावर अन्याय करणारे अनेक गुन्हेगार असतात. अन्याय सहन केलेले मन बदला घेण्यासाठी संधी शोधात असते, आणि संधी मिळाली तरी, मनाचे समाधान होत नाही. पुन्हा 'ये दिल मांगे मोर ' असतेच! यावर उपाय एकच सर्वाना माफ करून टाकणे!

प्रामाणिकपणे सांगायचे तर, या 'गुन्हेगारांच्या ' यादीत आपण स्वतः हि असतो! एखाद्या चुकीच्या निर्णया साठी, मनाला खात असतो /स्वतःला दोषी समजत असतो! तुम्हाला गम्मत म्हणून सांगतो माझ्या 'क्षमे 'च्या यादीत टॉप ला 'मी'च होतो आणि दोन नंबरला कोण होत ठाऊक आहे? प्रत्यक्ष 'परमात्मा'! माणसापेक्षा मी अन्यायासाठी खूपदा देवालाच मी दोष दिला होता! मग काय? इतरांन सोबत स्वःताला आणि देवाला पण माफ करून मोकळा झालो! क्षमा करणे हे इतरां साठी नाहीतर, स्वतःसाठी गरजेचे असते, हे कृपया ध्यानात असुद्या.

जात -जात एक महत्वाची गोष्ट. आजवर आपण खूप जणांवर प्रेम केलाय. तसेच स्वतःवर हि करा. प्रेम करणे खूप सोपे असते. पण वयाच्या या टप्यावर, या पेक्षाहि एक अवघड गोष्ट अंगिकारायची असते, द्वेष न करण्याची! हे जमले तर उतार वयातले वरदान ठरेल!

आपला उत्तरार्ध सुखा -समाधानाचा जावा म्हणून थोडे मन मोकळे केले.' उपदेशाचे डोस ' पाजणे हा हेतू नाही. आनंदाने, नियोजनपूर्वक, येणाऱ्या जेष्ठत्वाला सामोरे जा. आपल्या 'सेकंड इनिंग 'ला शुभेच्छा!
माझ्या प्रमाणे तुम्हालाही मंगेश पाडगावकरांची हि कविता आवडेल.

' सांगा कस जगायचं ?
कण्हत कण्हत कि गाणं म्हणत .
तुम्हीच सांगा कस जगायचं ?
डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना ?
ऊन ऊन घास तुमच्या साठी वाढतच ना ?
दुवा देत हसायचं कि शाप देत बसायचं .....
काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसत ,
दिवा घेऊन तुमच्यासाठी कोणीतरी उभं असत ,
प्रकाशात उडायचं कि काळोखात कुढायचं
तुम्हीच सांगा कस जगायचं ?'

----सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye