Maza Cinema books and stories free download online pdf in Marathi

माझा सिनेमा!

भारतातले 'सिनेमावेडे' लोक १९५२ सालात जन्मले असावेत हा माझा लाडकाआणि दृढ समाज आहे. कारण मी त्याच सालात या पृथ्वीचा भार वाढवलंय. या पूर्वीच्या पिढीचे सिनेमा बद्दल 'एक छछोर नाद!' असे मत होते. असो.(मी महाराष्ट्रातला तेव्हा 'सिनेमा ' म्हणजे 'हिंदी सिनेमा' असाच घ्यावा.)
आमचं ' शिंग ' फुटण्याचा आणि त्या 'छछोर ' सिनेमाचा डेरेदार वृक्ष होण्याचा एकच समय आला. मग काय? कसलाही विचार न करता,पाणी पुरी सारखे, मिळतील तितके सिनिमे पाहून घेतले! त्याचे तेव्हाही वाईट वाटले नाही, आणि आजही वाटत नाही! उलट आज तर मी जुन्या सिनेमाच्या ऋणात असल्याचे अभिमानाने सांगतो! घरच्या वडीलधाऱ्यांन आणि शाळेतल्या शिक्षकानं पेक्षा, काकणभर ज्यास्तच संस्कार या सिनेमाने केले आहेत!
तेव्हाच (म्हणजे १९६५-७०चे) जगणं आजच्या मानाने, साधे सोपे होते. त्याच प्रतिबिंब सिनेमात दिसायचे.(हल्ली सिनेमाचे, प्रतिबिंब समाजात पडतंय!) सिनीमे पण 'साजूक' असायचे. त्यांचा फॉर्मेट पण साधारण ठरलेला असायचा. त्या फोर्मेटची एक झलक.
'हिरो' गरीब का बेटा. ( 'इज्जत, गरिब को भी होती है, सेठ !' ' गरीब है, पर अपने मेहनतकी रोटी खाते है!' 'गरीब हू, पर लाचार नाही!' वगैरे ढासू डायलॉगची सोय आपसुख व्हायची!). गरीबी म्हटलं की खेडे गाव आलाच. तर एका खेडेगावात हा 'बेटा' राहायचा. त्याची गरिबी दाखवायला, फक्त फाटक्या खिशाचा शर्ट पुरायचा.(डायरेक्शन!) हा खाऊन पिऊन सुखी असायचा. आणि दिसायचा पण! डायलॉग मध्ये 'रुखी सुखी खाते है.' म्हणायचा, पण चांगले गोरे गुबगुबीत गाल असायचे!
सोबत त्याची माय रहायची. हि बहुदा विधवाचं असायची. या बाईचा, पांढरे केस, पांढरी साडी(पदराला काटकोन चौकोनी दोन -तीन काळ्या कपड्याची ठिगळ!--गरिबी उठून दिसावी म्हणून!) असा ड्रेस कोड असायचा. हि अशी नीट नेटकी माय, एक तर मशनीवर शिलाई काम करायची, नाही तर आंधळी असायची, हातात वेडी वाकडी काठी घेऊन घरभर ठेचकाळत(न पडता!) फिरायची! (बाई आंधळी, पण घर मात्र चकाचक असायचं!--तेही हजार-दीड हजार स्केयर फूटच्या फ्लॅटच्या थोबाडीत मारील इतकं मोठं, पितळी ताट, वाट्याच्या सेट सकट!)
'हिरोईन' (आमच्या दाम्याच्या भाषेत -हिरोनी ) गावच्या 'जमीदार की एकलौती बेटी!' शहरात शिकायला रहाणारी. सुट्ट्यात बापाकडे यायची. कसले कसले कपडे (तेव्हाचे कसले -कसले म्हणजे, आजचे साधे सुधेच हो!) घालून, पडदाभर फडफड करत हुंदडायची. डोक्यावर चेहऱ्याच्या उंचीच्या, दीडपट उंच, केसात फिरकीचा पितळी तांब्या(*तळटीप पहा.) लपवल्या सारखी हेअरस्टाईल! डोळ्यात बटबट काजळ मात्र मस्ट. या काजळासाठी हिरोईनच्या डोळ्याचा, एक(किमान ) तरी क्लोजप असायचा. त्या क्लोजप मध्ये ती पापण्यांची (मुंडी वाकडी करून) फडफड करून दाखवायची. यालाच आम्ही acting म्हणायचो!
तर अश्या होरोईनच लग्न खुनशी दिसणाऱ्या व्हिलनशी ठरलेलं. हि अन हीचा हा 'मगेंतर' हिच्या बापाच्या गावी सैर करायला ( उंडरायला) आलेले. ह्या टोणग्याच लक्ष ' गावरान' पोरींवर.
मग कहाणी मे ट्विस्ट! हिरो अन होरोइनची भेट. या भेटी साठी विशेष प्रसंग असायचे. एक- ती सायकल वरून पाठमोऱ्या हिरोला धडकायची. दोन- रेडा/बैल या बयेच्या लाल दुपट्याला बघून बिथरायचा, 'बचाव-बचावं ' हिरो बैलाची शिंग पकडी फाईट!, तीन- हि काट्टी म्हशी धुवायच्या नाल्यात पोहताना बुडायची, 'बचाव-बचाव' किंवा असाच एखादा प्रसंग असायचा. एकदा का हिरो-हिरोईनची भेट झाली (या भेटीत त्या पापण्यांच्या फडफडीचा क्लोजप) कि लगेच त्यांचं 'प्यार ' नाहीतर, 'इष्क ' व्हायचं. (टवळे, लग्न ठरलाय कि तुझं?) पण नाही! 'प्यार दिवाणा होता है!', 'दिल दे दिया, अब मेरे बस मे कुछ नाही!' तत क्षणी गाणं, झाड मागचं. पहिल्या कडव्याला हि झाडा माग, दुसऱ्या कडव्याला तो झाडा माग, तिसऱ्या कडव्याला दोघंही झाडामाग! मग पडदाभर दोन फुलांची घुसळण!(डायरेक्शन!)
इकडे तो कोटवाला 'मगेंतर ' व्हिलन(शहरातला ,म्हणून त्याला कोट वापरायची परवानगीअसायची) गप्प बसलेला नसायचा. त्याने भावी सासऱ्याच्या तिजोरीतील 'माल ', अन गावरान 'चंपी हेरून ठेवलेली असायची!
या व्हिलनच्या 'चंपी' साठी बरेचदा, हिरोच्या बहिणीची अपॉंइंटमेन्ट केलेली असायची! हि बहीण इंटरव्हलचा मोहूर्त गाठून 'मै, राकेशके (तो कोटवाला) बच्चे कि माँ बननेवाली हूं !' म्हणून डिक्लीयर करायची. पुन्हा कहाणी मे ट्विस्ट!
मग, हा हिरो अत्यंत दीन चेहरा करून, (डोळ्यात ग्लिसरीन के आसू ) दोन्ही हात जोडून, त्या व्हिलनकडे म्हणजे हिरोईनच्या बापाच्या हवेलीत जायचा. व्हिलन तेथेच राहायचा ना!
' मेरी बहीण से शादी कर लो! क्यू कि वो तुम्हारे बच्चे कि माँ बनने वाली है! आपने शादी नही कि तो, वो बरबाद हो जाये गी!' माय मेल्या सारखा रडत भीक मागायचा.
'आबे, हट! तेरे जैसे भिकार्डे से कोण रिश्ता करेगा? उसेन कही और शेण खाया होगा! अब मेरा नाम लेती है!' अशी झिडका झिडकी झाली कि, व्हिलनचा एक क्लोजप खुन्नसवाल्या एक्सप्रेशनचा, डावी भुवई होईल तितकी वर गेलेली!
बोंबाबोम होणार याची खात्री व्हिलनला आलेली असायची, तो त्याच रात्री अमीर सासऱ्याची तिजोरी धून संबुल्या करण्याच्या बेतात असतानाच, हिरो यायचा!
ढिशुम -ढिशुम! मग, फायटिंग!. साल, आम्ही फक्त या लास्टच्या फैयटिंगसाठी आक्खा फिच्चर बघायचो! अचानक व्हिलनच्या हाती बंदूक, पिस्तूल नाहीतर रामपुरी चाकू यायचा! आमचं टेन्शन वाढायचं. तो हिरोवर चाकू फेकून मारायचा, नाहीतर गोळी घालायचा. लगेचच ती बहीण, नाहीतर आंधळी माय आडवी यायची अन हिरोला वाचवायची! इतका वर्मी घाव लागल्यावर, पुटकन मरायचं सोडून, खूप वेळ उपदेश करत राहायची. हिरो -हिरोईनचे हात एकमेकांच्या हाती देऊन,' नांदा सौख्यभरे ' टाईप निवांत मरायची.
या क्षणाला पोलिसांची एन्ट्री व्हायची. ते हिरोला आणि व्हिलनला बेड्या घालून, पोलीसच्या उघड्या जीपीत बसवायचे. ती पोलिसांची गाडी निघणार इतक्यात, हिरोईनचा श्रीमंत बाप यायचा! (बंद गळ्याचा काळा कोट, कोटाच्या वरून घातलेली सोन्याची जाड साखळी, हाती वाकड्या मुठीची सरळ काठी, खाली चुडीदार पांढराफेक पायजमा, विचंवाच्या नांगी सारख्या टोकाचे पायात बूट! हा श्रीमंत आणि बुजुर्ग पुरुषांचा ड्रेस कोड असायचा!)
'इन्स्पेकटर साब, राजू बेकुसूर है!, असे छोड दो !' हा फैसला तो सांगून टाकायचा.
' जी, राय साहेब!' म्हणून तो पोलीस इन्स्पेक्टर, कोर्टाचा हुकूम असल्या सारखा, त्याचा आज्ञेचे पालन करायचा!
हिरो-हिरोईनच झाडामागचं गाणं पुन्हा दिसू लागायचं. हे चित्र हळू हळू मागे सरकायच अन 'समाप्त ' किंवा ' The End ' हि अक्षर -आता जा कि घरी -म्हणत अंगावर धावून यायची!
आम्ही घरी येताना डोक्यात काय काय घेऊन यायचो. हिरोची हेयरस्टाईल, फायटिंग करतानाचे हातवारे, म्हातारी माय घास भरवतानाचा डायलॉग, हिरोच्या तोंडची गाणी, हिरोईनच्या फडफडत्या पापण्या, तिने खांद्यावरून पुढे घेतलेला केसांचा शेपटा! अजून एकदा हा सिनेमा पाहायचा, हा संकल्प!
'सुरश्या, ती हिरोनी आपल्या वर्गातल्या शालू सारखी दिसतीयय कारे?' घरी येताना दाम्या खांद्यावर हात टाकून विचारायचा.
तर, असे होते ते 'सिनेमाचे' दिवस आणि सिनिमे. तेव्हाच्या सिनेमानं काय दिल? आणि आताच्या सिनेमात काय नाही, हे गौण आहे. ते वय आणि ती ओढ आत्ता नाही, आणि असणारहि नाही. हे खरे आहे.मी वयाने अनुभवाने वाढलोय तसा हा 'सिनेमा 'पण प्रगल्भ झाला असावा असे वाटत होते. त्यावेळीस तो सिनेमा अजून एकदा पाहावा वाटायचा. परवा खूप दिवसांनी सिनेमाला गेलो होतो. घरी येताना एकच भावना मनात होती. ' पैसे वाया गेले!'
०००

*टीप --फिरकीचा तांब्या!--त्या काळी प्रवासात फिरकीचा तांब्या, पिण्याचे पाणी सोबत घेणारी 'वाटर बॉटल' होती. आकाराने तांब्या सारखीच. तिच्या झाकणाला, आट्या असायच्या. ते झाकण फिरवून घट्ट बसावे लागायचे, मग पाणी झाकणा तुन गळायचे नाही. ते बुडात पडलेल्या चिरीतून गळायचे! 'फिरकीचा तांब्या' एक भारी प्रकरण आहे. त्याची एक आठवण --- लहानपणी आम्ही बालाजीला गेलो होतो, तिरुमालाहुन मंदीराकडे जाण्यासाठी बस मध्ये बसताना, आईने तो फिरकीचा तांब्या डोक्यावरच्या सामानाच्या जागेत ठेवला. बस सुरु झाल्यावर तो, आधी माझ्या टाळक्यात, मग बस मध्ये पडला. मी तिरुपतीला ऐकू जाईल इतक्या जोरात रडत होतो. आणि तो तांब्या बसच्या या टोक पासून त्या टोकापर्यंत गडगडत होता. आईचे सारे बारीक लक्ष होते, तांब्या कडे! माझे टेंगुळ चार दिवसांनी जिरले. तेव्हा पासून आजवर मी पुन्हा बालाजीला गेलो नाही! असला तो 'तांब्या ' भारी असायचा, वजनाला पण !)

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED