श्रीकृष्ण जन्माष्टमी Aaryaa Joshi द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्रीकृष्ण जन्माष्टमी

श्रीकृष्ण जन्माष्टमी-आशय व महत्व

वाच. आर्या जोशी

''जन्माष्टमी''' म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.

श्रीकृष्णाचे चरित्र हे भारतीय समाज मनाला कायमच भुरळ पाडते. त्याच्या आयुष्यातील घटना आपण पाहिल्या तर कंस आणि पूतनेचा वध हे दुष्टांचे निर्दालन दाखविते. पांडवाना त्याने दिलेली साथ ही सुजनांचे रक्षण सुचविते. गोप परिवारातील सर्वांनाच त्याने खूप आस्थेने सांभाळले आहे यातून त्याचे समाजाप्रती प्रेम आणि जिव्हाळा दिसतो. अशा आदर्शाचे पूजन आपण यानिमित्ताने करतो.

भागवत पुराणात कृष्ण जन्माचे वर्णन आले आहे ते असे- कृष्ण जन्माचा काल विशेष शोभायमान होता. दिशा स्वच्छ आणि आकाश निर्मल होते. वायू सुखकारक होता. देवकीच्या ग्राभातून कृष्णाचा जन्म झाला तेंव्हा उत्तररात्र होती. (भागवत पुराण १०. ३. १-२, ४, ८, )

भविष्योत्तर पुराणात( ४४/१-६९) स्वत: कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले आहे की त्याचा जन्म वसुदेव आणि देवकीच्या पोटी भाद्रपद कृष्ण अष्टमीला झाला. त्यावेळी सूर्य सिंह राशीत, चंद्र वृषभ राशीत होता आणि रोहिणी नक्षत्र होते.

गोकुळ अष्टमीच्या आदल्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. व्रज, अवध, भोजपूर या प्रांतात हे व्रत विशेष महत्वाचे मानले जाते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात. वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो.

व्रत-

व्रताच्या दिवशी सूर्य, चंद्र, यम, काल, पंचमहाभूते, दिवस-रात्री, वारा, अष्टदिक्पाल, भूमी, आकाश, तसेच देवतांचे आवाहन करावे.

सप्तमीच्या दिवशी एकभुक्त राहून अष्टमीला पांढ-या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून लता पल्लवानी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुस-या बाजूला यशोदा आणि तिची कन्या, वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. मध्यरात्री शुचिर्भूत होवून संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची पूजा षोडशोपचार पूजा करतात. रात्रौ कथा, पुराण, नृत्य, गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात. अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. नवमीच्या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात. पूजा झाल्यानंतरचे कृत्य अग्नी पुराणात सांगितले आहे. ते असे-' याप्रमाणे पूजा करून पुरुष सूक्ताने, विष्णूसूक्ताने व इतर स्तोत्रांनी स्तवन करावे. ;वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, निरनिराळ्या सत्कथा प्राचीन पुराण इतिहास यांनी ती रात्र घालवावी. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इ. चे सिंचन करावे. कारण 'दही, दूध, तूप, उदक, यांनी गोपालानी परस्परांवर सिंचन व लेपन केले'असे भागवत पुराणामध्ये सांगितले आहे. यावेळी कृष्णजन्माचे प्रतीक म्हणून नाल-छेदन, षष्ठीपूजा, तसेच नामकरण इ. संस्कार करण्याचा संकेतही काही ठिकाणी रूढ आहे

या व्रताचे पारणे दुस-या दिवशी केले जाते, काही वेळा त्याच रात्री या व्रताची समाप्ती केली जाते. याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात वेगवेगळी मते प्रचलित आहेत असे दिसते.

गोपाळकाला/दहीहंडी-

उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो. गोविंदा आला रे आला |गोकुळात आनंद झाला | असे गाणे गात अनके लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जाता व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

काला हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गायी चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदो-या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दुस-या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.

गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. या उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, तांदुळ, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी टाकुन केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळुन यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्व वाटुन खात असत असे मानले जाते. कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.

भारताच्या विविध प्रांतात -

भारताच्या विविध प्रांतात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. गुजरातमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

बंगाल प्रांतात श्री चैतन्य महाप्रभू या कृष्णभक्ताचे महत्व विशेष आहे. गौडीय स्मार्त वैष्णव परंपरेचे अनुयायी असणा-या भक्त मंडळीत या पूजेचे विशेष महत्व आहे. गोवा आणि परिसरात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला स्थानिक कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देववून कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.

छत्तीसगड येथे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त महिला भिंतीवर एक सुरेख चित्र काढतात. या चित्राला ‘आठे कन्हय्या’ असे म्हटले जाते. यामधे कृष्णजन्माचे चित्र रेखाटलेले असते. येथील महिला कृष्णाचे मातीचे आठ पुतळे तयार करून त्यांची पूजा करतात.

समूहभावना वाढीस लावणारा, भक्तिरसाचा परिपोष करणारा हा उत्सव आनंददायी आहे आणि त्यामुळे गेली काही शतके तो आस्थेने साजरा केला जात आहे.

***