Loksakha Naag books and stories free download online pdf in Marathi

लोकसखा नाग

लोकसखा नाग

नागपंचमी हे श्रावण महिन्याचे व्रत. नागपंचमी हा कृषिवलांचा सण मानला जातो. शेतीची कामे चालू असल्याने नांगराच्या फाळाने शेतात वावरणारे साप किंवा नाग यांना इजा पोचू शकते आणि त्यामुळे माणसाला सापाचा दंशही होण्याचा संभव असतो. या कारणास्तव पावसाळयात नाग किंवा साप यांच्यापासून त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी नागांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असावी. साप हा उंदरांचा शेतातील उपद्रव कमी करणारा पर्यावरणदृष्टया शेतकरी गटाचा मित्रच असतो. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस.

गं.बा. मुजुमदार यांनी नोंदले आहे, की ही नागपंचमी नसून नागरपंचमी आहे. नाथपंथी संप्रदायांनी आदिमायेच्या उपासनेसाठी नागकुलदर्शक नावे दिलेली होती. ती नावे योग परिभाषेतील आहेत. पंथात नाथ वारुळाची पूजा करण्याची प्रथा होती, तीच प्रथा पुढे नागपंचमीच्या निमित्ताने सुरू राहिलेली असावी.

नागाला क्षेत्रपाल म्हणून मान दिला जातो. तो भूमीचा रक्षणकर्ता आहे अशी भावना त्यामागे आहे. शेतात वारूळ असणे हे शुभ लक्षण मानले जाते. तसेच, वारुळाची माती ही सर्वात सुपीक असाही समज दिसून येतो. वारुळाच्या मातीला मूळमृत्तिका असे संबोधले जाते.

डॉ. शैला लोहिया यांनी नोंदवले आहे, की वारूळ हे भूमीच्या सर्जन इंद्रियांचे प्रतीक मानले जाते आणि नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला जातो. त्याच्या अस्तित्वामुळे भूमी सुफळित होते अशी श्रद्धा आहे. (भूमी आणि स्त्री)

अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची त्या दिवशी पूजा केली जाते. 'वासुकि: तक्षकश्चैव कालियो मणिभद्रक:। ऐरावतो धृतराष्ट्र: कार्कोटकधनञ्जयौ॥' (भविष्योत्तरपुराण - 32-2-7) हा श्लोक म्हटला जातो.

नागपूजा जैन आणि बौद्ध धर्मांतही प्रचलित आहे. गौतम बुद्धाच्या जन्मानंतर त्याला नंद आणि उपनंद या नागांनी स्नान घातले अशी कथा आहे.

आध्यात्मिक महत्त्व

ज्ञानेश्वर महाराज यांनी कुंडलिनी शक्ती ही नागीण स्वरूपात असल्याचे म्हटले आहे. ती धारणा आहे नाथसंप्रदायाची. कुंडलिनी नुकत्याच कात टाकलेल्या, साडेतीन वेटोळे असलेल्या, कुंकवाने जणू न्हालेल्या अशा नागिणीप्रमाणे असून ती तेजाचे प्रतीक मानली आहे!

महिला आणि मुले शेतातील वारुळात जाऊन पूजा करतात. झाडाला झोके बांधून खेळतात, मेंदीने हात सजवतात. नाग हा सर्जनाचे प्रतीक मानला जातो अशी धारणा लोकसंस्कृतीत आहे. त्यामुळे स्त्रिया आणि महिला यांचा संबंधही सणाशी जोडला गेला असावा. ग्रामीण भागात नागाला भाऊ मानून त्याची आळवणी करणारी लोकगीते गायली जातात.

नागभाऊरायाला नैवेद्य –

नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी

नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी

नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा

नागा रे भाऊराय, तुला नैवेद्य ताजा पेढा

तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा

नागा रे भाऊराय, तुला नैवेद्य कढीचा

नागा रे भाऊराय, तुला वाहिल्या मी लाह्या

तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया

नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा

आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा।

माहेरवाशिणीला पंचमीला बांगड्या भरण्याची पद्धत आजही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. स्त्रिया भावांच्या आणि शेताच्या कल्याणासाठी त्या उपवास करतात.

नागचौथीला नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी भुलाबाई स्थापन करून तिची पूजा करतात. ते शिवाचे रूप मानले जाते. काही ठिकाणी शिराळशेठ मांडून त्याच्या दातृत्वाची पूजा केली जाते, आदर केला जातो.

महाराष्ट्रात बत्तीस शिराळा या गावी नागपंचमीच्या दिवशी विशेष उत्सवाचे आयोजन केले जाते. सांगली जिल्ह्यातील त्या गावात नागाची पूजा करण्याची प्रथा बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. त्या दिवशी मिरवणूकही असते. स्त्रिया त्यांच्या भावाचे सर्पदंशापासून रक्षण व्हावे यासाठी नागाची प्रतिमा तयार करून तिची पूजा करतात.

विविध प्रांतातील नागपंचमी

१. उत्तर भारतात नागपंचमीला शारीरिक शक्तीच्या प्रदर्शनाच्या आणि शारीरिक सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. मल्ल कुस्तीचे सादरीकरण त्या दिवशी कुस्तीच्या आखाड्यात करतात. कुस्तीची लढत पारंपरिक लढतीसारखी नसून त्या माध्यमातून शिव, श्रीराम, तसेच हनुमान आणि कुस्तीच्या आखाड्याची भूमी यांना अभिवादन केले जाते. नागपंचमीचा दिवस पुरुषांसाठी ब्रह्मचारी व्रताचे महत्त्व सांगणारा मानला जातो. त्या धारणेतून कुस्तीगीर पुरुषाचे शरीर हे सामर्थ्य व सदसद्विवेक यांचे प्रतीक मानले जाते! शेतकरी त्याने लावलेल्या पिकाची उत्तम काळजी घेतो. त्याचे रोगराईपासून किंवा अन्य आपत्तीपासून रक्षण करतो, त्याला पुरेसे पाणी देतो आणि शेतीची मशागत करतो. त्यातूनच उत्तम पीक आणि समृद्धी हाती येते. शरीर पोसलेला कुस्तीगीर आणि सुपीक जमिनीतील शेती यांचे रूपक त्या ठिकाणी स्वीकारलेले दिसते. सर्जनाची प्रक्रिया आणि ब्रह्मचर्य यांचा संगम नागपंचमीच्या निमित्ताने साधलेला दिसतो!

२. कच्छ प्रदेशाची प्राचीन राजधानी भूज हिचे नाव भुजंग या सर्पाच्या संस्कृत नावावरून पडले आहे, म्हणे. तेथील भुजिया नावाच्या टेकडीवर १७२३ साली मंदिर बांधले गेले आहे आणि त्यात सरीसृप देवतेला स्थान देण्यात आले आहे. अठराव्या शतकात येथील राजे या मंदिरात जाऊन नागपूजा करत असत आणि भक्तांच्या रक्षणासाठी नागाची प्रार्थना करत असत. बुलंद खान यांच्या आक्रमणापासून साम्राज्याचे रक्षण केल्याबद्दल नागांची पूजा करण्याची प्रथा तेथे सुरू झालेली आहे. नागपंचमीच्या मिरवणुकीत नागा जमातीतील सदस्यांना मान देऊन त्यांना अग्रभागी ठेवले जाते. हत्ती, घोडे यांना शृंगारून मिरवणुकीत आणले जाते. स्त्री-पुरुष त्यांच्या पारंपरिक रंगीबेरंगी पोषाखात उत्साहाने त्या शोभायात्रेत सामील होतात. नगारखान्यापासून निघालेली मिरवणूक टेकडीवरील मंदिरात वाजतगाजत नागपूजेसाठी जाते. यात्रेसाठी नागांच्या मूळ जमातीचे सदस्य नेपाळमधून आवर्जून आमंत्रित केले जातात. प्रेक्षणीय असा तो सोहळा असतो.

३. राजस्थानातील महिलांमध्ये त्या दिवसाचे महत्त्व सांगणारी आख्यायिका प्रसिद्ध आहे. असा या कथेचा विषय नागिणीने दिलेल्या मण्यामुळे एका सुनेचा घरात झालेला सन्मान असा आहे.

४. पंजाबात घरातील भिंतीवर नागाची काळया रंगाची आकृती काढली जाते. तसे केल्याने वर्षभर सापाचे दर्शन होत नाही अशी लोकांची धारणा आहे.

५. दक्षिण भारतात शेणाची नागप्रतिमा तयार केली जाते आणि तिची पूजा केली जाते. चंदन, हळद यांपासून पाच फण्यांचा नाग तयार करून त्याचे पूजन करण्याची प्रथाही आहे.

६. मध्यप्रदेश, काश्मीर, गुजरात, बंगाल, उत्तरप्रदेश या प्रांतांत नागांची पूजा केली जाते. काश्मीर परिसरात शेषनाग, इंद्रनाग, संतनाग अशी देवळे असून चिनाब नदीच्या काठी वासुकीचे मंदिर आहे.

प्राचीन साहित्यात व इतिहासात नागवंश

नाग जमातीचा आदर महाभारतकाळापासून करण्यात येतो. बलराम हा शेषाचा अवतार मानला गेला आहे. नागकन्या उलूपी आणि अर्जुन यांचा विवाह ही महाभारतातील घटना आहे. नागवंशाचा उल्लेख वायुपुराणात आणि ब्रह्मांड पुराणात सापडतो. महाराष्ट्रातही पैठण,नागपूर, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी नाग जमातीच्या वस्तीचे पुरावे मिळाले आहेत.

नवनाग या राजाने नवनाग वंशाची स्थापना केली असे डॉ. के.पी. जयस्वाल यांनी नोंदले आहे. त्या वंशाचे मूळ नाव भारशिव असे असून त्या राजाने कुशाण राजा वासुदेव यांच्या समकालीन राज्य केले. त्याचे राज्य इसवी सन 140 ते 170 या काळात अस्तित्वात होते. त्याची नाणी कौशम्बी येथून पाडली जात असत. छत्तीसगडच्या इतिहासात त्या वंशाचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. नाग किंवा सर्प ही त्या वंशाची पूजनीय देवता मानली जात असे. त्या वंशातील लोक नाग पाळून युद्धात त्यांचा वापर करत असावेत असेही एक मत आहे.

तैत्तिरीय संहितेत नागपूजेचा उल्लेख सापडतो. पुराण साहित्यात शिवासह नागाचे नाते जोडलेले दिसून येते. गणेशानेही सापाचा कंबरपट्टा बांधलेला आहे असे पुराणात उल्लेख सापडतात. शेषनागाने पृथ्वी त्याच्या मस्तकावर तोलली आहे ही आख्यायिका प्रसिद्ध आहेच.

श्रावणातील नागपंचमीच्या व्रताचा केवळ लोकसंस्कृतीतील संदर्भ अनेकदा माहीत असतो. या लेखाच्या निमित्ताने पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या पर्यावरणविषयक जागृतीमुळे शहरी भागात नागपंचमी सणाचा विशेष प्रसार दिसून येत नाही. सापाला सांभाळणे, त्यांची काळजी घेणे याविषयी जाणीवजागृती केली जात आहे.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED