रॉक ! suresh kulkarni द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रॉक !

राकेशने 'त्या' कामा साठी दहा डिसेम्बर हि तारीख ठरवून टाकली. तेव्हा कोठे त्याला थोडे हलके वाटले. हवी असलेली पूर्व तयारी, (म्हणजे प्लॅनिंग )झाली होती. आता फक्त अम्मलबजावणी!
०००
"हाय, रॉक!" स्नेहलने राकेशला ग्रीट केले.
"हाय! स्नेहल! वॉव !! कसली क्युट दिसतीयस! आज काय विशेष?" आज खरच स्नेहल दिलावर घाव घालणारी कट्यार दिसत होती. राकेशच काय कोणीही हि, 'मीठी छुरी' आनंदाने, स्वहस्ते पोटात खुपसून घेतली असती! सणसणीत साडेपाच फुटापेक्षा थोडी ज्यास्त उंची, सडसडीत बांध्याला शोभेलसा टोकदार हनुवटीचा उमलत्या कळी सारखा चेहरा, किंचित काळ्या रंगाकडे झुकणारी सतेज कांती आणि त्यावर तिने घातलेला क्रीम कलरचा ड्रेस! आफत !! 'चंदन सा बदन'च मूर्तिमंत उदाहरण! स्नेहलला काहीही चांगलेच दिसते. म्हणजे किमान राकेशला तरी वाटायचं. जीन्स -टी मध्ये, असो कि साडीत! नाहीतर ----
"अरे, आज मेहता काकांच्या मुलीची एंगेजमेंट आहे. त्यासाठी या ड्रेसची भानगड. येथून तिकडेच जाणार आहे. मला ते, जडबोके कशिदाकारीचे एथिनिक झोळणे नाही आवडत! तुला माहित आहे, मला जीन्स टी शर्ट नाहीतर, पुलओव्हर सुटसुटीत वाटतो. मी त्यात कम्फर्टेबल असते. " ती राकेशच्या समोरच्या खुर्चीत बसत म्हणाली.
राकेश कॉफी कॅफे डेच्या काउंटर वरून, दोन कोल्डकॉफीचे उंच ग्लासेस घेऊन आला. हे सिसिडेचे आउटलेट त्यांचे नेहमी भेटण्याचे ठिकाण होते. एका निवांत कोपऱ्यात स्नेहल सोबत तासभर घालवला कि राकेश फ्रेश होत असे. कधी कधी त्याला, 'आपण तिला फसवतोय, स्वार्था साठी प्रेमाचं नाटक करतोयं ' असे वाटायचे. पण हल्ली त्याची त्यालाच कळेनासं झालाय कि, हि सो कॉलड मैत्री आहे कि, तो खरच तिच्यात गुंततोय? पण हिची ओळख वाढवण्याचा त्याचा हेतू ---- प्रेम करणे हा मुळीच नव्हता, हे मात्र खरे होते!
"रॉक, तुझं उत्तर अजून दिल नाहीस! मी वाट पहातेय!" स्नेहलच्या बोलण्याने तो भानावर आला.
"लूक स्नेहल!अजून मला जॉब नाही. छाट-छुट पेन्टिंगच्या पैशात, आपलं कस भागणार? तुझी जवाबदारी कशी घेऊ मी? आणि 'लग्न 'हेच सर्वस्व नसत!"
"साली, पुन्हा तुझी तीच फिलॉसफी! आय हेट ईट!! तू नको घेऊ माझी जवाबदारी, मीच घेते तुझी!, पप्पांच्या बिझनेस मध्ये पार्टनर हो. मी त्यांना कन्व्हिन्स केलंय!"
"नो! ते मला नाही पटत."
"ते तुझं तू बघ! पण एक मात्र खरंय, आता मी फार काळ तुझ्या शिवाय नाही राहू शकत! आय लव्ह यु मॅडली!! एक दिवस तुझ्या बाईकवर बसेन अन ------"
" अन काय?"
"अन, मग उरणारच नाही! ने कुठं हि!"
राकेश फक्त हसला. स्नेहल अशीच आहे सुंदर आणि हेकट! आता श्रीमंत बापाची एकुलती एक, आईविना लाडात वाढलेली पोरगी, हट्टी असणारच.
कॉफी संपवून स्नेहल निघून गेली.
०००
" गुड मॉर्निंग! हैप्पी बर्थडे! अँड बेस्ट ऑफ लक !" राकेशने फुल मिरर मधल्या आपल्याच प्रतिमेला ग्रीट केले. क्षणभर आरश्यात स्वतःलाच न्याहाळलं. सहा फूट उंची. कमावलेले शरीर, रोमन योध्या सारखे. रेखीव भुवया, पातळ ओठ ह्या पाहणाऱ्याच्या चटकन डोळ्यात भरणाऱ्या गोष्टी होत्या. पण त्याही पेक्षा महत्वाचे होते ते, त्याचे सोफ्यास्टिकेटेड बोलणे, वागणे आणि त्याला अनुरूप अशी देहबोली. या गोष्टींचा स्नेहलशी सलगी वाढवण्यास त्याने उपयोग करून घेतला होता.

चार स्केचेस पूर्ण करून त्याने आळस दिला. दुपार टळून गेली होती. चार वाजता स्नेहल सिसिडेला येणार होती. कालच्या दिवसाची डायरी त्याने पूर्ण करून आपल्या नेहमीच्या सॅक मध्ये टाकली. हि सॅक राकेशच्या नेहमी सोबत असे. काय असते या सॅक मध्ये? एखादे स्केचिंग पॅड, चारकोल पेन्सिल, चार-दोन ब्रश, कलर बॉक्स, लुंगी,आणि हि डायरी! यात काही सुचलं, भावलं तर तो लिहून ठेवतो. शिवाय दिवसभराची रोजनिशी! वेळ मिळेल तस रॅपिड स्केचिंग, सवड असेल तर पेंटींग! landscape पेंटिंग करताना, समजा स्पॉटवर उशीर तर, जवळच्या खेड्यात तो मुक्काम करायचा, त्या साठी लुंगी. या सॅकला स्नेहल, 'उद्याची सवत ' म्हणते! या सुंदर पोरीला अफलातून सेन्स ऑफ ह्यूमरआहे! (दुर्मिळ असत हे. )
०००
फ्रेश होऊन राकेशने बाईकला वेग दिला. प्रथम बाईकची टाकी पेट्रोलपम्पावर फुल करून घेतली. आज ते लागणारच होते! सीसीडेला तो बरोबर चार-पाचला पोहंचला, तेव्हा स्नेहल त्याची वाटच पहात होती.
"हाय! हैप्पी बडे!" स्नो व्हाईट लूज शर्ट आणि लाईट ब्लु जीन्स मध्ये स्नेहल मस्त दिसत होती.
"थँक्स!"
"पार्टी?"
"तुला माहित आहे स्नेहल, मी बर्थडे सेलिब्रेट करत नाही! आजच्याच दिवशी माझ्या वडिलांनी --------"
"सो सॉरी! मला ठावूक आहे! आजच्याच दिवशी तुझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्याचा शेवट करून घेतला होता!"
"प्लिज स्नेहल! नको काढू त्या कटू आठवणी."
"ओके! पण रॉक, हे सार तू, आता विसरायला हवंस. अरे, झाली त्याला दहा वर्ष! "
"नो! स्नेहल! नो! ज्याच्या मुळे हे झालय, त्याला शिक्षा नको का व्हायला?"
"पुन्हा तेच! अरे वेड्या, कितीदा तरी तुला सांगितलंय. सोड ती सुडाची भावना! या 'बदला' आणि सूडा पोटी सुंदर आयुष्य, नको धुळीस मिळवू! सूडाच्या प्रवासाचा अंत, सर्वनाशात होतो! अन, मी नाही तुला त्या वाटेने जाऊ देणार!!" स्नेहल पोटतिडकीने बोलत होती. का हि इतका जीव लावते ?
बापाच्या आठवणीने ओले झालेले डोळे राकेशने पुसले.
"स्नेहल, आज लॉन्ग ड्राईव्हला जावू बाईकवर. येतेस? आज माझा बर्थडे असाच साजरा करू! तू ,मी मोकळं आकाश,अन भिरभिरत वार!" राकेशन हळुवारपणे विचारलं.
"चल कि! तू सोबत असशील तर स्वर्गात पण येईल!"
"छे! त्याची काय गरज? तू सोबत असताना स्वर्ग कसा दुसरीकडे असेल?"
"कसला सॉलिड डायलॉग मारलस यार! म्हणून तर मी ------"
"बस! बस! पुरे!आता गाडीवर बस! का तू ड्राइव्ह करतेस?"
"नको, तूच कर!"
राकेशने बाईक स्टार्ट केली. स्नेहल त्याच्या कमरेला हाताचा घट्ट विळखा घालून बसली. कारण तिला त्याचे ड्रायव्हिंग माहित होते.
दुसऱ्या क्षणी ते साडेतीनशे सीसीवाल बुलेटचे अवजड धूड सुसाट धावत सुटलं. स्पीडोमीटरवर शम्भरीचा आकडा मागे पुढे होत होता! पहाता पहाता लोकवस्ती मागे पडली.
वाटेत कुठे झाडाजवळ, कुठे पाण्याच्या खळखळत्या झऱ्या पाशी, खडकाला टेकून, मावळतीचे, फुलांचे, स्नेहल फोटो /सेल्फी काढत होती. एखाद लहान लेकरू जस बागेत हुडत, तशी हुंदडत होती. झोपडी छाप टपरीवर चहा घेताना, केसांच्या बटा सावरताना, पाण्यात पाय ठेवताना, अशे किती तरी फोटो राकेशने घेतले. निसर्ग आणि स्नेहल एकत्र म्हणजे राकेश साठी जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट होत! त्याच्या पेंटिंगसाठी मोलाचे रेफरन्सेस यातूनच येत!
राकेशने जेव्हा, बाईक एका झाडीतल्या बैठ्या घरापाशी उभी केली, सूर्यास्त झाला होता, तरी संधी प्रकाश अजून रेंगाळत होता. ते एक दुर्लक्षित रेस्ट हाऊस होते. त्याने डाव्या खांद्याला हलकासा जर्क दिला. स्नेहल त्याच्या खांद्यावर डोके ठेवून चक्क झोपली होती. तिने डोळे उघडले.
"बापरे! रात्र झाली?" तिने विचारले.
"नाही! पण लवकरच होईल!"
"पण, आपण कोठे आहोत? हे घर कोणाचं?"
"स्नेहल, छोटासा प्रॉब्लेम झालाय! मघाशी गाडीचा ब्रेक लागत नव्हता!"
"मग रे?"
"काही नाही, जवळपास मेकॅनिक असेल तर पहावा लागेल!"
स्नेहालचे अंग शहारले. हा मेकॅनिक पहायला एकटा जाईल! रात्र होईल! आपण एकटेच या भूत बंगल्या समोर!
"मी एकटी नाही थांबणार! तुला पण जावू देणार नाही! नसता दोघे पण जावूत!" स्नेहल राकेशला बिलगत म्हणाली.
"हो, हो, किती बावरतेस? मी तुला असा कसा सोडून जाईन? येथे कोणी आहे का पहातो. "
तेव्हड्यात एक खत्रूड चेहऱ्याचा म्हातारा ओळखीचं हसत पुढे आला.
"कोण तुम्ही?"
"सखाराम! या गेस्ट हाऊसचा वॉचमन !"
" जवळपास एखादा मेकॅनिक आहे का? गाडीत जरा गडबड आहे!"
"हाय कि! डोंगराच्या पल्याडल्या वस्तीवर! अबदुल्या!"
"किती लांब आहे ती वस्ती? आत्ता गेलं तर अब्दुल येईल गाडी दुरुस्ती साठी?"
" आसन चार कोस! पण आता अब्दुल्याचा काय उपेग नसतो!"
"का? "
"त्यो मावलतीलाच ख्म्बा मारून मुडद्या सरका पडतो!"
"आता रे काय करायचं?" स्नेहलने काकुळती येऊन विचारले.
"कुल डाऊन स्नेहल! एक उपाय आहे!आजची रात्र आपण येथेच थांबू!" राकेश सावकाश म्हणाला.
"काय?" ती विचित्र नजरेने त्याच्या कडे पहात म्हणाली. तरुणासोबत रात्र काढावी लागणार असेल तर, जे विचार एखाद्या तरुणीच्या मनात येतील, ते राकेशला स्नेहलच्या डोळ्यात दिसत होते.
"डोन्ट बी सिल्ली! तसलं काही मनात आणू नकोस! तु मला चांगलाच ओळखतेस!"
"नाही म्हणजे! येतच ना मनात!"पडलेल्या आवाजात ती म्हणाली.
"ओके! तर सखाराम आज आमची राहायची सोय?" त्याने आपला मोहरा सखारामाकडे वळवला.
"राहायला हे घर हाय!"
"अन,खायला?"
"माझ्या खोपटात चार अंडी हैत! सकाळच्या दोन कडाक भाकरी हैत! घ्या भागवून!"
राकेशने स्नेहलकडे पहिले. नाईलाजाने तिने होकार्थी मान डोलावली. नाही तरी तिच्या कडे दुसरा उपाय नव्हताच!
सखारामानें कमरेच्या टीचभर किल्लीने ते जुनाट गंजलेले कुलूप उघडलं. एव्हाना अंधार पडायला सुरवात झाली होती. गोल काळ्या खटक्याच बटन दाबून त्याने तिन्ही झिरोचं बल्ब लावले. त्यांचा पिवळा धम्मक प्रकाश घरभर पसरला. एक बल्ब किचन मध्ये, एक बेड रूम मध्ये आणि एक बाहेर व्हरांड्यात. एक लोखंडी सिंगल कॉट गादी- उशी त्या बेड रूम मध्ये होती. तेथे स्नेहल झोपणार हे ठरले. बाहेरच्या व्हरांड्यात एक काथ्या लोंबणारी बाज होती.त्यावर ताडपत्री टाकून बेड केला होता. तेथे राकेशचे बस्तान.
सखाराम 'डिनर 'ची सोय करायला निघून गेला.
"बापरे!"स्नेहल किंचाळी.
"काय झाल?"
"बाप! पपांना कळवायला पाहिजे रे! दे माझा मोबाईल!" स्नेहलने हात पुढे केला. चहा घेताना 'माझा मोबाईल घाईत घरीच विसरला.' म्हणून राकेशने तिचा मोबाईल घेतला होता, तो त्याच्या कडेच होता.
"आग, मघाशी रेंज मिळत नव्हती! आता पहातो!" त्याने ट्राय केला.
"सॉरी, नाही य रेंज! या बाजूला थोडे वीक असेल नेट वर्क! रेंज सापडली कि मी करतो पप्पाना इंटिमेट! तू ,नको काळजी करुस!"
त्या रूमला लागून किचनच्या बाजूला छोटेसे बाथरूम होते. स्नेहल फ्रेश होण्यासाठी आत गेली. त्याने आपल्या सॅक मधली लुंगी काढून तिच्या बेडवर ठेवली. आणि रूम मधल्या एकुलत्या एक खुर्चीत बसला.
"हे काय ?" तिने बाथरूम मधून आल्या बरोबर लुंगी कडे संशयाने पहात विचाले.
" लुंगी! तू जीन्स मध्ये कशी झोपणार? म्हणून तुझ्या साठी!"
"म्हणजे? मुक्काम? तू ठरवून?" तिच्या बोलण्यात पुन्हा संशय डोकावला.
"शिट! पुन्हा तेच! अरे, हि लुंगी मी नेहमीच सोबत ठेवतो! आणि हो तुला काय वाटतंय ते वाटू दे!"राकेश आपली नाराजी लपवू शकला नाही.
"सॉरी! माला भूक लागलीय!" तिच्या डोळ्यात अपराधी भावना होती.
" मी पहातो सखारामला. " तो जागेवरून उठला. तेव्हड्यात सखारामाने गरम भांडे फडक्यात धरून आणले होते. त्या भांड्यावरच्या झाकणीत दोन भाकरी आणि एक कांदा होता. राकेशने कोपऱ्यातला जुना शिसवी लाकडाचा दणकट टीपॉय, आपली खुर्ची आणि पलंगाच्या मध्ये ठेवला. सखारामाने आणलेले जेवण त्यावर ठेवले. आणि तेथेच उभा राहिला. राकेशला चटकन लक्षात आले. त्याने पाचशेची नोट त्याच्या हातात कोंबली. ओशट हसत तो निघून गेला.
गरम भांड्याच्या झाकणावरली एक भाकरी हातावर घेऊन राकेशने ती झाकणी राहिलेल्या भाकरी सकट स्नेहल कडे सरकवली. भांड्यात लाल भडक तिखटाच्या पाण्यात उकडलेली अंडी बदका सारखी तरंगत होती !
त्याने सॅक मधून मूठभर चॉकलेट काढली आणि तिच्या ताटलीत टाकली. तिला हे 'डिनर ' कायम आठवणीत रहाणार होत. मेनू काय तर अंडा करी, भाकरी अन तोडिलावायला चॉकलेट! ती सु सु करत एका हाताने खात होती, दुसऱ्या हाताने नाका -डोळ्यातून येणार पाणी पुसत होती. तिखटाने पुरती बेजार झाली होती. 'फक्त आजची रात्र! मग सगळंच ठीक होणार आहे!' तो तिला मनातल्या मनात समजावत होता.
राकेश बाथरूम मधून ब्रश करून आला. तोवर स्नेहल हात पाय पोटाशी घेऊन त्याने दिलेली लुंगी घट्ट लपेटून पलंगावर झोपी गेली होती! अगदी गाढ! त्या बल्बच्या पिवळ्या प्रकाशात तिचे गुलाबी ओठ मोहक दिसत होते. तो तिच्या बेड कडे सरकला. तिचा नितळ चेहरा, झाकलेल्या पापण्यातूनही स्पष्ट जाणवणारी टपोरी डोळ्यांची बुबळं, रेखीव भुवया, आणि मंद स्मितातले ते, सोनेरी झाक असलेले गुलाबी ओठ! कोणा साठी हिला इतकं सुंदर केलं असेल देवानं? माझ्या साठी? तो तिच्या चेहऱ्यावर झुकला आणि तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले! स्नेहल, मी तुझ्या सोबत असेन! नेहमी!
त्याने तिच्या पलंगाच्या शेजारची खिडकी लावून घेतली. त्यातून बाहेरच्या व्हरांड्यातले दिसत होते. तो आवाज होऊ न देता बाहेर व्हरांड्यात आला आणि दाराला बाहेरून कडी घातली! तो बराच वेळ त्या लेदर कव्हरच्या डायरीत आज दिवस भराची नोंद करत होता. लिहून झाल्यावर त्याने ती डायरी, आपले पाकीट, आणि स्नेहलचा मोबाईल उश्या खाली सरकवला. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन झाडीतून डोकावणाऱ्या, चंद्राचा विरळ पांढऱ्या ढगांशी चाललेला लपंडाव पहात राहिला. आज लिहलेल्या डायरीने त्याचे मन खूप शांत झाले होते. या चांदण्या रात्री स्नेहलचा हातात हात घेऊन, दूर दूर जाता आले असते तर? त्याच्या डोळ्यावर झोप घिरट्या घालू लागली.
पण आजची रात्र झोपून चालणार नव्हते! त्याने स्नेहलचा मोबाईल ऑन केला. पंचेचाळीस मिस कॉल होते! स्नेहलच्या पप्पांचे! स्नेहल कडून फोन घेतल्यावर त्यानेच तो ऑफ करून टाकला होता! त्याला मोबाईलचा त्रास नको होता! त्याने कानोसा घेतला. सर्वत्र सामसूम होती. स्नेहल दिवसभराच्या दगदगीने उठण्याची शक्यता नव्हतीच. तरी तिचे दारा- खिडकीचा बंदोबस्त त्याने केला होता! त्याने पप्पाना फोन लावला.
"हॅलो स्नेहू! कुठे आहेस? फोन का उचलत नव्हतीस? काय झालाय? आर यु ओके? तू सेफ ---" तो काही बोलण्या पूर्वीच तिच्या पप्पानी सुरवात केली.
"पप्पा, मी राकेश बोलतोय! स्नेहल माझ्या सोबत आहे! आणि ती सेफ आहे!"
"थँक्स गॉड! अरे, फोन तरी करायचा! मी किती काळजीत होतो! ती तुझ्या सोबत आहे, म्हटल्यावर मला काही काळजी नाही. बरे आहात कोठे? आणि केव्हा परत येतंय?"
"ती माझ्या सोबत आहे हे खरे आहे! तुम्हाला काळजीचे कारण नाही, हे खोटे!ती माझ्या जवळ आहे म्हणूनच तुम्हाला काळजी करावी लागेल!"
"म्हणजे? शुद्धीवर आहेस का?" पप्पा ओरडले.
"ओरडू नका. बीपी वाढेल! स्पष्टच सांगतो, मी तिला किडन्याप केलय!"
"अरे पण ती तुझ्यावर प्रेम ---"
"ते प्रेम बीम झूट असत! ती करत असेल मी नाही! कमिंग टू द पॉईंट! वीस वर्षा पूर्वी तुम्ही तुमच्या मित्राला फसवून त्याची पंधरा एकर जमीन बळकावलीत! त्या जागेवर आज तुमचे भव्य रिसॉर्ट आहे. मित्राला जागा भाड्याने देत आहेत असेच त्याला वाटत होते. पण तुम्ही लीज डिड ऐवजी, सेल डिड करून घेतलंत! त्याच्या लक्षात येई पर्यंत उशीर झाला होता. तो आपली जमीन परत मागायला आल्यावर तुम्ही कानावर हात ठेवलेत!"
"पण याचा तुझा काय संबंध?"
"मी तुमच्या, त्या मित्राचा, रघु तात्याचा मुलगा! आपल्या एकुलत्या एक पोराच्या तोंडचा घास गेल्यावर त्याने आज रोजी, म्हणजे दहा डिसेम्बरला आत्महत्या केली होती आणि याला तुम्ही जवाबदार आहात! "
"राकेश या जुन्या गोष्टी मला नाही आठवत! येथे स्नेहलचा काहीही सबंध नाही! तुला काय पाहिजे? पैसा?किती?"
"पोटच्या लेकरा पासून दुवलेल्या बापाला काय यातना होतात, त्याची आज रात्र अनुभव घ्या! मला काय पाहिजे? या साठी उद्या पर्यंत वाट पहावी लागेल! पण तोवर लक्षात ठेवा. पोलिसानं पासून दूर रहा. कारण , मी आणि स्नेहल एकत्र आणि एकांतात आहोत! दुसरे मी किडन्यापर आहे! आणि स्न्हेहल सारखी रती समोर असताना ----- थोडक्यात काळजी घ्या. माझ्या निरोपाची वाट पहा! तळमळत आणि चरफडत अनुभवा! बाय!"
"स्नेहलच्या केसाला जरी धक्का लावलास तर, तुझे केसा सारखे तुकडे करीन! यु बास्टर्ड!! "
राकेशने फोन ऑफ करून टाकला. आणि झोपी गेला.
०००
अचानक स्नेहला जाग आली. कोणी तरी बोलत होते. तिने कानोसा घेतला तो आवाज बाहेरच्या व्हरांड्यातून येत होता. तिने तो आवाज ओळखला, बाहेर राकेश फोनवर कोणाशी तरी फोनवर बोलत होता! तिने खिडकीच्या फटीला कान लावला.
' ओरडू नका. बीपी वाढेल! स्पष्टच सांगतो, मी तिला किडन्याप केलय!'---------
तो तिच्या पप्पांशीच बोलत होता. क्षणा -क्षणाला तिचे डोळे विस्पारत होते! काही क्षण तिला आपल्या कानावर विश्वासच बसला नाही. रॉक ने आपल्याला किडन्याप केलाय? आणि कसली मावलीछाप भाषा! काय तर म्हणे, 'सुंदर रती समोर---' शी! अनबिलीव्हेबल! हा-- हा राकेशच! कशा साठी? पैशासाठीच! दोन दिवसांनी चार दोन कोटी मागणार पप्पाना! श्रीमंत बापाची पोरगी फसवायची, अन इझी मनी मिळवायचा! सगळंच हिडीस, घाणेरडं!
तिने स्वतःला सावरलं. आता तिच्या लक्षात येऊ लागलं. हे सगळं प्री-प्ल्यानेड होत! ते लॉन्ग ड्राइव्ह ठरलेले! बाईकचा ब्रेक फेल खोटं! बापरे, रेंज मिळत नाही म्हणत होता अन अत्ता बरी रेंज सापडली? येथे आलो त्यावेळेस सखाराम ओळखीचे हसतोय असे वाटले, ते खरेच होते! 'माझा मोबाईल विसरला म्हणून ' त्याने आपल्या जवळचे सम्पर्काचे साधनच हस्तगत केले होते! आणि मग त्याचे ते प्रेम? कोणते प्रेम? 'प्रेम बीम झूट!' तोच सांगत होता! आपण मात्र त्याच्या सोफिस्टिकेटेड वागण्याला भुललो! लाखभर वेळेला तरी, त्याला 'लव्ह यू ' म्हणाली असेन! त्याने मात्र नेहमींचं 'स्नेहल' म्हणून सम्बोधलं! प्रेमाचे नावही कधी काढले नाही! आणि मी पप्पाना या दुष्टाला 'जावाई' करून घेण्यासाठी भांडले! याला अशी नाही सोडणार! माझ्या प्रेमाचा अभद्र फायदा घेणाऱ्याला शासन झालेच पाहिजे! त्या साठी आधी आपल्याला या नीच माणसाच्या तावडीतून सुटले पाहिजे! तिचा राग उफाळत होता!
तिने अंगावरची त्याची लुंगी त्वेषाने भिरकावून दिली. चाहूल लागू न देता तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला. ते बाहेरून बंद होते! असणारच तिला आत कोंडून ठेवायचे होते ना! ती किचन मध्ये आली. किचन ओट्यावर, लागूनच एक लाकडी पट्ट्या मारलेली खिडकी होती. त्या पट्ट्या उन्हा -पावसानी कुजून जीर्ण झाल्या होत्या. तिने आजू -बाजूला पहिले. एक जुना किचन नाईफ ओट्यावर दिसला. तिने त्यांनी त्या पट्ट्या कापण्याचा प्रयत्न केला. पण थोड्याश्या हाताच्या दाबाने दोन पट्ट्या मोडल्या. तिचे काम सोपे झाले. काही मिनिटातच तिने ओट्यावर उभाराहून बाहेर उडी घेतली. ती अलगत बाहेरच्या गवतात पडली. हाती सूरी तशीच होती. ती गेस्ट हाऊसला वळसा घालून व्हरांड्याच्या जवळ आली. तो बेशरम, बाहेर बाजेवर निवांत झोपला होता. त्याच्या उश्या खालून तिचा मोबाईल, त्याचे पाकीट आणि ती पॉकेट बुकच्या आकाराची डायरी, अर्धवट बाहेर आलेली दिसत होती. बाहेर अंगणात त्याची बाईक झोपल्या सारखी मान टाकून उभी होती. पाकिटातून बाईकची चावी काढताना तिने त्याला बरेचदा पहिले होते. पाकीट ,चावी,आणि बाईक याचे गणित मनाने केव्हाच पक्के केले! ती सावकाश त्याच्या बाजे कडे सरकली. पाकिटाला हात घातला, तो धक्याने ती डायरी आणि मोबाईल खाली पडला! त्या आवाजाने ती घाबरली. तो नक्की उठून बसणार! त्याने कूस बदलली. तिला हाती सूरी असल्याचे जाणवले. तिने त्वेषाने ती सूरी त्याच्या बरगडीत खुपसली! हलकट! दोनदा, तीनदा! तो 'स्नेहल SSS ' म्हणून अस्पष्ट ओरडला आणि बाजे खाली पडला. ती डोळे फाडून ते दृश्य पहात होती! पण क्षणभरच. तिने झटक्यात खाली पडलेला मोबाईल आणि त्या सोबत हाती लागलेली डायरी रक्ताळलेल्या हाताने पॅन्टच्या हिप पॉकेट मध्ये कोंबली. त्याच्या पाकिटातून बाईकची चावी काढली. पळत अंगणात ठेवलेल्या गाडीवर टांग टाकून , हॅण्डलवरचे हेल्मेट डोक्यावर घातले. किल्लीने गाडी ऑन करून 'स्टार्ट 'चे बटन अंगठ्याने दाबणार , तेव्हड्यात प्रखर प्रकाश झोताने तिचे डोळे दिपले!
"हॅन्ड्स अप! पोलीस!! मी इन्स्पे. राघव. आहे तेथेच थांब!" दरडावणीचा आदेश कानी पडला.
समोर पोलिसांची गाडी अस्पष्ट दिसत होती! त्याच्या मागेपण एक काळी गाडी होती.ती तिच्या ओळखीची होती. तिच्या दारातून एक पांढरा सूट घातलेला माणूस उतरत होता. पप्पा!
स्नेहलने डोक्यावरचे हेल्मेट फेकून दिले. ती धावत जाऊन तिच्या पप्पांच्या गळ्याला पडून रडू लागली. रडत रडताच तिने राकेशच्या बाजे कडे निर्देश केला आणि तिची शुद्ध हरवली. इन्स्पे. राघव राकेशकडे धावला. स्नेहलला गाडीत बसवून दामोदर, स्नेहलचे पप्पा, राघव कडे आले.
"सर, पूल्स वीक आहे. कोणी तरी याला भोसकलंय! किचनची सूरी जवळच पडलीय!"इन्स्पे. राघव म्हणाला.
"राघव, मी तुझ्या गिल साहेबांशी बोलतो. तू या हरामखोर माणसाला, डॉ. मेहतांच्या हॉस्पिटलला घेऊन जा. हात जोडून तुला एक विनंती आहे, हे प्रकरण सध्या तरी तुझ्या ' पोलिसी ' कक्षे बाहेरच ठेव! माझ्या पेक्ष्या या पोरीच्या भवितव्यासाठी! प्लिज! हा जगला, मेला तर काय करायचं ते उद्या गिलच्या समक्ष ठरवू! "
राघवन राकेशच्याच चादरीने त्याचे पोट बांधले. आणि ते ऐंशी किलोचे ओझे अलगद धंद्यावर घेऊन पोलीस जीपच्या मागे टाकले आणि डॉ. मेहतांच्या हॉस्पिटल कडे निघाला. तो हॉस्पिटलला पोहचला तेव्हा दस्तूर खुद्द डॉ. मेहता गेटवर उभा होते. नाहीतर या बाबाच्या अपॉइंटमेंट चारचार दिवस मिळत नसे!
००००
सकाळी अकरा पर्यंत स्नेहल झोपून होती. ती फ्रेश होऊन ब्रेकफास्ट साठी आली, तेव्हा दामोदर नाश्ता उरकून फोनवर बोलत होते.
"थँक्स मेहता! मी पोलीस सुपरिंटेंडंट गिल आणि इन्स्पे.राघवशी यांच्याशी बोललोय. तुला पोलिसांचा त्रास होणार नाही! बर कसा आहे तो बास्टर्ड ?"
" ओके! मरू देऊ नकोस त्याला! त्याचे काय करायचं ते मी करीन! माझ्या पोरी कडे वाकडी नजर करून पाहणाऱ्याला, मृत्यू सुद्धा या दामोदरापासून वाचवू शकणार नाही! आणि हो, तुझ्या त्या चॅरिटी ट्रस्टला दामोदर कडून काहीतरी पाठवतो! आहे, माझ्या लक्षात! बाय !"
" आर यु ओके, बेटा? काल तू शॉक मध्ये होतीस. काही बोललो नाही. त्याने तुला काही ----" फोन कट करून दामोदरानी आपला मोहरा स्नेहल कडे वळवला. किती मलूल दिसतंय माझं लेकरू!
" नाही. मला काही झालेलं नाही, पण रॉकन असं करायला नको होत!"
"आता, नो रॉक! त्या नालायकच नाव या घरात नको!"
"पण पप्पा ,मी तुम्हाला कशी सापडले?"
"राघवने तुझा फोन ट्रेस केला."
"पप्पा अजून माझा गिडीनेस कमी होत नाहीय. मी थोडी अजून झोपते. "
"आणि हो मी ऑफिसला जातोय तू वेळेवर लंच घे आराम कर, मिटिंग आहेत दोन, त्या उरकून रात्री दहा पर्यंत परतेन. काही वाटलं तर फोन कर. आणि नो रॉक! त्याचा विचारहि करू नकोस! एक वाईट स्वप्न समजून विसरून जा!"
स्नेहल काहीच न बोलता आपल्या रूमकडे वळली. म्हणे 'वाईट स्वप्न समजून विसरून जा!' इतकं सोपं असत का ते?
००००
लंच त्यांनतर झोप झाल्यावर स्नेहलला बरीच हुशारी वाटत होती. वेळ जाण्या साठी तिने समोर पडलेला मोबाईल उचलला. कालचे फोटो पहात होती. कित्ती आनंदी दिसत होती ती त्या फोटोत! आणि आनंदाचे सुद्धा किती मूड्स! किती सुंदर क्लिक केलेत रॉकने! हाडाच्या कलावंताची नजरच और असते! पण तो कमनशिबी! शुल्लक कारणासाठी त्यानं माझा वापर केला! त्या हि पेक्षा निरागस प्रेमाचा विश्वासघात केला! मूर्ख! तिने रागाने मोबाईल बेडवर फेकून दिला. कितीही नको म्हणले तरी राकेश तिच्या डोक्यातून जात नव्हता.
समोरच्या टेबलवर पडलेली राकेशची ती लेदर कव्हरची डायरी तिने उचलली.त्या वर अजून हि त्याच्या रक्ताचे अस्पष्ट डाग होते. डोक्याखाली उशी घेऊन तिने तीडायरी चाळायला सुरवात केली. बरेच जागी तिच्या डोळ्याचे, ओठाचे, चेहऱ्याचे, गॉगल वाले, हसत असतानाचे,असे बरेच स्केचेस होते. त्यांच्या खाली, 'आजची स्नेहल!' असं काहीस कॅप्शन होते. गेल्या चार-सहा महिन्यात एक हि दिवस तिच्या उल्लेखाशिवाय गेला नव्हता. डायरी हि लिहणाऱ्याच्या मनाचे प्रतिबिंब असते. कोठेही तिच्याबद्दल हिडीस भावना व्यक्त केलेली नव्हती. मला स्नेहल खूप 'जवळची असल्या ' सारखी वाटतीयय. असे काही ठिकाणी लिहले होते. म्हणजे त्याला आपल्या बद्दल 'प्रेम' नसलेतरी, सॉफ्ट कॉर्नर जरूर होता तर! कशावरून? खरे तर त्याला पैसा आणि ती दोन्ही विनासायास मिळवता आले असते. मग हे किडण्यापिंगचे नाटक कशा साठी? फक्त पप्पांसाठी? कदाचित असे हि असेल. म्हणून तर आपल्याला किंचितही कल्पना न देता त्याने हळूवार पणे हे नाटक केल. त्याची ओळख झाल्या पासून त्याने, त्याची मर्यादा कधीच ओलांडली नव्हती. मग तो पप्पांशी बोलताना इतके वाईट का बोलत होता? कदाचित पप्पांना त्याला फक्त त्यांच्या कृत्याच्या परिणामाची जाणीव करून द्यायची असेल! तीच आंधळ मन राकेशचीच बाजू घेत होत! हे सर्व विचार मेंदूने बाजूला सरले. तिने शेवटचे पान म्हणजे कालची -दहा डिसेम्बरची- नोंद वाचायला घेतली.
"आज शेवटी सगळे माझ्या मना प्रमाणेच घडले,तरी मला गिल्टीच का वाटतय माहित नाही! स्नेहल म्हणते तेच खर आहे. 'सूडाच्या प्रवासाचा अंत सर्वनाशात होतो' मलाही पटतय. सकाळी तर किती पोटतिडकीने आणि ठामपणे म्हणाली कि, 'अन मी तुला त्या मार्गावर जावू देणार नाही !' त्या क्षणी तिला माहित नव्हते कि, तिचेच पप्पान मुळे, माझ्या बाबाना हे जग सोडून जावं लागलं! याच माणसाची पोरगी माझ्या सूड भावनेला प्रेमाने जिंकायला निघालीय! अख्या जगात अशी प्रियासी नसेल. आज आख्खा दिवस तिच्या सोबत होतो. माझा सोल मेट मला मिळालाय, याची मला खात्री पाटलीय! मी खरच तिच्या प्रेमात पडलोय. हे पैशाचं किंवा शरीराचं आकर्षण नाही! आय लव्ह यु स्नेहल! तुला या पुढे अंधारात ठेवणार नाही! या क्षणापर्यंत झाले ते झाले. आज रात्री तुझ्या पप्पाना त्यांच्या चुकीची जाणीव मात्र करून देणार आहे. उद्या सकाळी तुला तुझ्या घरी सुखरूप पोहचवणार आहे! त्या पूर्वी तुला सर्व खुलासा करीन . तू देशील ती शिक्षा मान्य करीन. या उप्पर क्षमा केलीस तर ठीक, नसता हे शहर सोडून गावी निघून जाईन! स्नेहलचा रॉक! रियली लव्ह स्नेहल! "
स्नेहलच्या डोळ्यातील पाण्याने उशी भिजली होती. प्रेमाच्या शक्तीचा तो विजय होता. स्नेहालचे प्रेम जिकंले होते! एका 'सूडाची आग 'विझली होती! नवीन प्रेमाचा अंकुर विश्वसासाने, जगात डोकावू पहात होता!
००००
स्नेहल रात्री आठच्या सुमारास डॉ. मेहतांच्या हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरील स्पेशल रूम मध्येच्या दारात उभी होती. पलंगावर राकेश नाका -तोंडात असंख्य नळ्या घालून पडला होता. त्याच्या पोटावर चार बोट जाडीचा पांढरे बँडेज बांधले होते. त्यावर रक्ताचा एक डाग पसरलेला होता. जवळच्या मॉनिटर वर अगम्य ग्राफ, आकडे निर्जीव पणे हालचाल करत होते. तिला भडभडून आले. आपणच त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहोत, त्याची टोचण मनाला बेचैन करून गेली.
"कसा आहे?" तिने अटेंडिंग नर्सला विचारले.
"खूप रक्त गेलाय!आम्ही दोन बाटल्या लावल्यात. जखम खोलवर झालीय. हृदय थोडक्यात बचावल. नसता स्पॉटवरच गेला असता! अजून क्रिटिकल आहे! केव्हा कोमात जाईल ठाऊक नाही!"
"रॉक सॉरी !"स्नेहल पुटपुटली
त्याच्या पापण्यांची थोडी हालचाल झाली. मॉनिटरवरील ग्राफ ऍक्टिव्ह झाला. नर्स डॉक्टरांना बोलवायला पाळली. राकेशने मोठ्या कष्टाने पापण्या उचलल्या. समोर स्नेहल दिसत होती. म्हणजे अजून तीच स्वप्नच चालू आहे का? पण नाही, स्वप्नातली स्नेहल हसत खेळत असते. समोरची स्नेहल गम्भीर दिसतीय, आणि तिचे डोळे पण सुजल्या सारखे दिसताहेत! खूप रडलेली दिसतीय! हे स्वप्न नाही सत्य आहे! आणि हे काय? तिच्या हातात माझी डायरी? गॉड थँक्स! माझ्या भावना तिच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल! त्याने डोळ्यांनीच खूण करून तिला जवळ बोलावले. ती त्याच्या जवळ गेली. तो काही तरी पुटपुटत होता ,काही सांगू पहात होता. तिने त्याच्या ओठाजवळ कान नेला.
"आय लव्ह यु स्नेहल !"
त्याने पुन्हा डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता होती!
तेव्हड्यात डॉ. मेहता घाई घाईत आले. मॉनिटरवर नजर टाकून पुटपुटले. मिरॅकल! सिम्पली मिरॅकल!!त्यांनी राकेशच्या नाडी तपासली. आणि समाधानाने मान डोलावली. नाऊ परफेक्टली आऊट ऑफ डेंजर!
आता पुन्हा पप्पाना कन्व्हिन्स कसे करायचे या विचारात बराच वेळ स्नेहल तेथेच बसून राहिली!
०००

सु र कुलकर्णी . तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.