मी एक प्रमुख पाहुणा Uddhav Bhaiwal द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी एक प्रमुख पाहुणा

उद्धव भयवाळ
औरंगाबाद
मी एक प्रमुख पाहुणा!
माझा मित्र दिवाकर देशपांडे याचा मला एक दिवस सकाळी सकाळीच फोन आला, "हॅलो, नमस्कार हो मानकर साहेब."
"नमस्कार दिवाकरराव, बोला. अगदी 'अहो, जा हो' ने सुरुवात केलीस. बरं ते जाऊ दे. आज कशी काय सकाळी सकाळीच आठवण केलीस? काही विशेष?" मी विचारलं.
"हो, विशेषच आहे. तुला एक आनंदाची बातमी सांगायचीय. नव्हे, नव्हे, तुला एक आमंत्रणच द्यायचंय." तो म्हणाला; आणि त्यानंतर त्याने फोनवर जे काही सांगितले ते ऐकून मी तर खूपच खूश झालो. तो म्हणत होता, "तुला तर माहित आहेच की, औरंगाबादपासून पस्तीस किलोमीटरवर माझे जन्मगाव सावंगी आहे. अधून मधून मी सावंगीला जात असतो."
"हो, कल्पना आहे मला." मी म्हणालो.
"तर सावंगीला पुढच्या आठवड्यात एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचा तू प्रमुख पाहुणा आहेस. तसे सर्वानुमते ठरले आहे. मी तुला हे निमंत्रण देत आहे. " तो म्हणाला.
"अरे वा, हे तर छानच झाले. पण कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे, हे सांगशील की नाही?" मी विचारले.
"अरे, हो रे, तेच तर सांगतोय. ऐक." दिवाकर पुढे बोलू लागला, "आमच्या गावामध्ये एक हायस्कूल आहे. तसेच एक ज्यूनियर कॉलेजही आहे. यावर्षी जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गावातील एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे गावातील काही कर्तृत्ववान तरुणांचा सत्कार करण्याचेही ठरले आहे; आणि या सत्कारसमारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून तुला बोलावण्याचे ठरले आहे. तुझ्या साहित्यसेवेबद्दल तिथे मी सर्वांना अगोदरच माहिती सांगितलेली होती. त्यावेळी त्या सर्वांना तुझ्या साहित्यसेवेबद्दल ऐकून खूपच छान वाटले होते आणि त्यांनी तुला भेटण्याची, तुझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो योग या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता येत आहे. त्यामुळेच तुला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. येशील ना तू? कार्यक्रमाचे रीतसर लेखी निमंत्रण नंतर येईलच. तुझ्याकडून कन्फर्मेशन घेण्यासाठी अगोदर फोन केला."
"नक्की येईन. माझा होकार समज. पण कार्यक्रम नेमका कधी आहे?" मी विचारले.
"पुढच्या रविवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम आहे." तो म्हणाला.
"अन् तिथे जाण्याची काय व्यवस्था आहे? तू असशील ना माझ्या सोबत? कारण तुझे गाव थोडे आडबाजूला आहे, म्हणून विचारतोय." मी म्हणालो.
"तेही सांगतो. माझ्या गावातला कार्यक्रम आहे म्हणून मी पूर्वतयारीसाठी शनिवारीच मुक्कामाला तिथे जाईन. माझ्या ओळखीचा एक रिक्षावाला आहे. बबन त्याचे नाव. त्याला मी सर्व सांगितले. तो रविवारी सकाळी दहाच्या सुमारास तुला न्यायला येईल. त्याचा मोबाईल नंबर तुलाही एसएमएस करतो." दिवाकर सांगत होता.
"म्हणजे मी त्या कार्यक्रमाला रिक्षाने यायचे?" मी विचारले.
"हो, रिक्षावाला माझ्या चांगला परिचयाचा आहे, सज्जन आहे. बबन आहे त्याचं नाव; आणि रिक्षा स्पेशल केवळ तुझ्या एकट्यासाठीच आहे. चुकूनही त्या रिक्षावाल्याला 'किती पैसे झाले?' असे विचारू नकोस किंवा रिक्षातून उतरल्यावर पैसे देण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याला मी अगोदरच पैसे देऊन टाकणार आहे. इथून निघाल्यावर साधारणपणे एक तासात तू तिथे सावंगीला पोचशील; आणि छोट्या गावातला कार्यक्रम म्हणजे अकराचे साडेअकरा होतीलच. त्याची चिंता तू करू नकोस. दुसरे म्हणजे तुला प्रमुख पाहुणा या नात्याने विद्यार्थ्यांसमोर आणि ग्रामस्थांसमोर प्रसंगाला अनुरूप असे बोलावे लागेल. तशा तयारीने ये म्हणजे झाले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्थाही तिथेच आहे. ठेवू का फोन आता? पुढच्या शनिवारी पुन्हा आठवणीसाठी फोन करीन. ओके." असे म्हणून दिवाकरने फोन ठेवला.

माझा आनंद तर गगनात मावेना. माझी फार दिवसांची एक इच्छा पूर्ण होणार होती. कारण मागील अनेक वर्षांपासून माझ्या कथा, कविता, बालकथा, चारोळ्या वेगवेगळ्या मासिकांतून, नियतकालिकांतून अन् महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध होत असतात. दिवाळीच्या दोन तीन महिने अगोदर न चुकता संपादक मंडळीची आगामी दिवाळी अंकातील लिखाणासाठी आठवण करून देणारी पत्रेही येतात. दिवाळी अंकांमधील माझे साहित्य आवडल्याबद्दल मला वाचकांची पत्रे येतात, तसे फोनही येतात. माझ्या कथांना, कवितांना, स्पर्धांमधून पुरस्कारही मिळालेले आहेत. थोडक्यात काय, तर महाराष्ट्रातील साहित्यक्षेत्रामध्ये स्वत:चा एक वेगळा ठसा मी उमटवला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. स्वत:विषयी आणि स्वत:च्या लिखाणाविषयी अशी जाणीव जेव्हा मला होऊ लागली, तेव्हा माझ्या मनामध्ये एक विचार वारंवार उसळी मारू लागला. तो म्हणजे, एखाद्या छोट्याशा का होईना पण कार्यक्रमाचं अध्यक्षपद किंवा प्रमुख पाहुणेपद आपल्याला मिळायला हवं. मग भलेही ते छोटंसं कविसंमेलन असेल, स्थानिक पातळीवरचं साहित्य संमेलन असेल किंवा एखादा तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम असेल. वरचेवर हा विचार माझ्या मनामध्ये जास्तच जोर धरू लागला; आणि तो जसजसा जोर धरू लागला तसतसा मी अस्वस्थ होऊ लागलो. म्हणतात ना की, एखाद्या गोष्टीची तीव्रतेने इच्छा व्यक्त केली की ती इच्छा लवकरच पूर्ण होते. माझेही तसेच झाले. खरोखरच मला हवी तशी संधी आज चालून आली होती. लगेचच ही आनंदाची बातमी मी सौ.ला सांगितली. तिलाही खूप आनंद झाला. पुढच्या रविवारी त्या कार्यक्रमात काय बोलायचे याची तयारी आतापासूनच करायला हवी असे मनाशी म्हणत मी पुढच्या कामाला लागलो.

ठरल्याप्रमाणे आठवणीसाठी म्हणून शनिवारी दुपारी दिवाकरचा फोन आला आणि रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास बबन रिक्षा घेऊन माझ्या दारी उपस्थित झाला.
"चला साहेब." बबन म्हणाला.
"बबनराव, आत या ना. चहा घेऊ." मी म्हणालो.
"नको, नको. उशीर होईल. रस्त्यात कुठेतरी टपरीवर चहा घेऊ. चला लवकर." तो म्हणाला.
खास ठेवणीतले कपडे घालून मीसुद्धा जाण्यासाठी तयारच होतो. घरातील देवाच्या फोटोसमोर हात जोडून, सौ.चा निरोप घेऊन मी रिक्षात बसलो. "रिक्षामध्ये बसतांना आधी उजवा पाय रिक्षात ठेवा" हे कालपासून शंभर वेळा तरी मला सौ.ने बजावले होते. त्यामुळे उजवा पाय अगोदर रिक्षात ठेवूनच मी रिक्षामध्ये बसलो. कार्यक्रमाच्या निमित्ताने काय बोलायचे याची मी कालपासून मनातल्या मनात उजळणी केलेलीच होती. तरीही रिक्षामध्ये बसल्यानंतर पुन्हा एकदा मी ते सर्व पुन्हा पुन्हा आठवून पक्के करू लागलो. रिक्षावालासुद्धा अधूनमधून माझ्याशी जुजबी गप्पा मारीत होता. तो स्वभावाने मोकळा वाटला. साधारणपणे अर्ध्या तासानंतर मोठा रस्ता सोडून आडवळणाने खडबडीत रस्त्यावरून आमची रिक्षा निघाली. तेव्हा जवळच एक चहाची टपरी पाहून बबनने रिक्षा थांबवली. आजूबाजूला रस्त्याच्या कडेने काही लोक थांबलेले होते. बहुदा इच्छित स्थळी जाण्यासाठी एखादे वाहन मिळते का याची ते वाट पाहत असतील, हे मी ताडले.
"चला साहेब, इथे चहा चांगला मिळतो. इथून पुढचा रस्ताही थोडा खराब आहे. त्यामुळे खराब रस्त्यावरून गाडी चालवायला एनर्जी नको का?" असे म्हणून बबन हसू लागला.

आमच्यासाठी टपरीवाल्याने स्पेशल चहा बनवून दिला. चहा घेतल्यानंतर मी चहावाल्याला पैसे दिले आणि आम्ही दोघे रिक्षाजवळ आलो. पाहतो तर काय, चार पाच लोक रिक्षामध्ये जाऊन बसले होते. कुणी सावंगीला जायचे म्हणत होते तर कुणाला सावंगीच्या अलीकडे निमगावला उतरायचे होते. बबनने त्या सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण "आम्ही पैसे देतो ना, फुकट थोडेच न्या म्हणतो?" असे म्हणून दोघे तिघे हमरीतुमरीवर आले. शेवटी बबनने त्या सर्वांची समजूत काढून महत्प्रयासाने त्या सर्वांना खाली उतरवले. मग पुढच्या खडबडीत रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू झाला. थोडा वेळ गेला आणि बबनने रिक्षा थांबविली. एका निर्मनुष्य जागेवर आमची रिक्षा थांबली होती. आजूबाजूला अगदी शुकशुकाट होता. दूरपर्यंत कुणाची चाहूल नव्हती.
"काय झाले बबनराव? काही प्रॉब्लेम?" मी विचारले.
"खाली उतरा साहेब. आहे थोडा प्रॉब्लेम. पुढचं चाक पंक्चर झालंय." बबन म्हणाला.
मी हातातल्या घड्याळात बघितले. दहा वाजून पन्नास मिनिटे झाली होती.
"आता काय करायचे?" मी विचारले.
"अजिबात चिंता करू नका साहेब. आपल्याकडे स्टेपनी आहे. दहा मिनिटात चाक बदलतो." तो म्हणाला. म्हणजे सावंगीला पोचेपर्यंत साडेअकरा होणार असा मी अंदाज बांधला.
"साहेब, तुम्हाला थोडा त्रास घ्यावा लागणार." बबन म्हणाला.
"बोला, बोला, बबनराव, एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ." मी म्हणालो.
"काही नाही. मी जॅक घरी विसरलो. तो तिकडे मोठ्ठा दगड दिसतो ना. तो घेऊन या; आणि मी जसे पुढचे चाक बाजूला करीन तसा तो दगड समोर त्या चाकाऐवजी लावून द्या. आता तोच आपला जॅक." बबन म्हणाला.
तो तिथला दगड पाहून माझ्या पोटात तर गोळाच उठला. एकदम माझ्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, "अरे, बाप रे!" पण घरी इंग्लिश मिडीयममधल्या आपल्या तिसरीतल्या चिरंजीवाचे अवजड दप्तर उचलून त्याच्या पाठीला अडकवायची आपली सवय इथे नक्की कामास येणार हा विचार मनात आला आणि मला हायसे वाटले. मग मनामध्ये एकदा बजरंगबलीचे नाव घेतले आणि तो अवजड दगड ढकलीत आणण्याचा आधी प्रयत्न केला. पण ते काही जमत नाही हे पाहून मोठ्या कष्टाने तो दगड दोन्ही हातांनी जोर लावून उचलला आणि रिक्षासमोर आणून पटकला.
"वा! वा! जमले." बबन माझ्याकडे पाहत म्हणाला.
"आता असे करा, मी हे पुढचे चाक मोकळे केले आहे. ते आता अलगद रिक्षाच्या खालून काढतो. तुम्हाला तो दगड रिक्षाखाली घालायला जमेल असे वाटत नाही. मी जसे हे पुढचे चाक बाजूला करीन, तसे तुम्ही पुढे येऊन हा रिक्षाचा पुढचा भाग ताकद लावून दोन्ही हातांनी तोलून धरा. मी लगेच दगड खाली सरकवतो." बबन सांगू लागला. मी ''बरे'' म्हटले. "नाही जमणार " असे म्हणावेसे वाटले. पण माझे शब्द मी आतल्या आत गिळले. कारण "अडला हरी....."
मग ती पुढची सगळी सर्कस पार पडल्यानंतर मी ''हुश्श" म्हटलो आणि आम्ही दोघेही रिक्षामध्ये बसलो.
'' मी जॅक घरी विसरल्यामुळे तुम्हाला त्रास झाला साहेब. सॉरी." बबन म्हणाला.
"होतं असं कधी कधी. जाऊ द्या." मी म्हटलं. रिक्षामध्ये बसल्यानंतर आणि रिक्षा सुरू झाल्यानंतर सहज माझ्या कपड्यांकडे माझं लक्ष गेलं आणि मी सर्दच झालो. सगळे कपडे मातीने माखले होते. तो दगड उचलून रिक्षापर्यंत आणतांना कपड्यांचा बेरंग झाला होता. हातांनी थोडे झटकण्याचा मी प्रयत्न केला पण मातीचे 'हट्टी डाग' जसेच्या तसेच होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचायला आता उशीर होणार आणि आपल्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू होणार अशी एक अपराधी भावना माझ्या मनामध्ये उचल खाऊ लागली.
एकदाची आमची रिक्षा कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोचली. तेव्हा पावणेबारा वाजले होते. दिवाकरने आम्हाला पाहिले आणि तो पटकन पुढे आला. त्याने माझे हसतमुखाने स्वागत केले.
"प्रवासात त्रास नाही झाला ना?" दिवाकरने विचारले.
"अजिबात नाही.'' मी माझ्या कपड्यांकडे पाहात सांगितले. त्याचे बहुदा माझ्या कपड्यांकडे लक्ष गेले नसावे.
"मला उशीर नाही ना झाला?" मी दिवाकरला विचारले.
"अजिबात नाही. कारण इथले सरपंच परगावी गेलेत. ते दोन वाजेपर्यंत येतील. त्यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन आहे.''
"असं होय. मला वाटलं मलाच उशीर झाला की काय?" मी म्हटलं.
तिथल्या शाळेसमोरच्या पटांगणावर कार्यक्रमाची व्यवस्था केलेली दिसत होती. वर कापडी मंडप होता आणि कार्यक्रमास येणाऱ्या लोकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खाली जमिनीवर एक मोठी सतरंजी अंथरलेली होती. त्या सतरंजीवरून लोक बिनदिक्कतपणे पायातील चपला आणि बूट न काढता इकडून तिकडे फिरत होते. माईकची व्यवस्था मात्र दिसत नव्हती.
मी बसण्यासाठी खुर्ची पाहू लागलो. पण त्या ठिकाणी एकही खुर्ची नव्हती. माझी अडचण बहुतेक दिवाकरच्या लक्षात आली असावी. तो म्हणाला, "शाळेच्या किल्ल्या, शाळेच्या शिपायाकडे आहेत. तो जवळच्याच गावाहून जाणे येणे करतो. त्याला आज लवकर यायला सांगितले होते. पण अद्याप आला नाही. इतक्यात येईलच तो. तो आला की, शाळेमधून चार पाच खुर्च्या आणि दोन टेबल बाहेर घेऊन मुलांच्याकरवी तिथे त्या कोपऱ्यात मांडून घेऊ म्हणजे झाले व्यासपीठ तयार. तोपर्यंत असा इकडे ये. इथेच खाली सतरंजीवर बसू मोकळेचाकळे."
असे म्हणून त्याने खालीच बसकण मारली. मग मीही अनिच्छेने खालीच त्याच्याजवळ बसलो. कपडे खराब होण्याचा प्रश्नच नव्हता! ते आधीच खराब झालेले होते.
तितक्यात एक मुलगा अंगठ्याएवढ्या 'यूज अँड थ्रो' कपांमधून चहा घेऊन आला. रंगाने आणि चवीने तो चहा निव्वळ गुळवणीसारखाच होता. दिवाकर सराईतपणे तो चहा प्यायला. पण मी मात्र कसाबसा घशाखाली उतरवला. ''मी पुढची तयारी बघतो" असे म्हणून दिवाकर तिथून उठला. थोड्या वेळेनंतर शिपाईमहाशय आले. दोन टेबल आणि चार खुर्च्या मुलांच्या मदतीने त्या शिपायाने एका कोपऱ्यात मांडल्या. त्यावर एक टेबलक्लॉथ टाकून आजच्या कार्यक्रमाचे व्यासपीठ तयार केले आणि तो शिपाई अदृश्य झाला. हळूच मी व्यासपीठावरची एक खुर्ची बाजूला घेतली आणि त्या खुर्चीवर बसून राहिलो. माझे अर्धे लक्ष घड्याळाकडे आणि अर्धे लक्ष सरपंचांच्या वाटेकडे होते. दोन वाजून गेले तरी सरपंचांचा पत्ता नव्हता. मंडपामध्ये बऱ्यापैकी मंडळी जमली होती. त्यांची चुळबूळही सुरू होती. एव्हाना माझ्या पोटात कावळ्यांनी भरतनाट्यम सुरू केले होते. कार्यक्रमाच्या स्थळाच्या अगदी जवळच स्वयपाक चाललेला होता. तिथल्या भाज्यांच्या फोडणीच्या वासामुळे माझी भूक जास्तच चाळवली. तितक्यात कुणीतरी बोलले, "आले, आले सरपंचसाहेब आले." सर्वजण एकदम उठून उभे राहिले. मीही उभा राहिलो. सरपंच आले की थेट व्यासपीठावरील खुर्चीत जाऊन बसले. झकपक कपडे घातलेले एक गृहस्थ त्या व्यासपीठाच्या बाजूला येऊन उभे राहिले. बहुतेक ते गृहस्थ म्हणजे त्या शाळेतील एखादे गुरुजी असावेत असा मी अंदाज बांधला. "आपल्या गावचे सर्वांचे लाडके सरपंच श्री यादवसाहेब आलेले आहेत. आता त्वरित कार्यक्रमास सुरुवात होईल. तरी सर्वांनी शांत बसावे.'' ते गुरुजी बोलू लागले, " सरपंच साहेब व्यासपीठावर येऊन बसलेलेच आहेत. तरी एक औपचारिकता म्हणून त्यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामांकित साहित्यिक श्री मानकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावे. ज्या संस्थेतर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या जय हनुमान सेवाभावी संस्थेचे चेअरमन श्री लांडगे आणि सचिव श्री कोळेकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो."

अशाप्रकारे सर्व पाहुणे व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर संस्थेचे सचिव श्री कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांचे प्रास्ताविक संपते न संपते तोच सरपंच उभे राहिले आणि म्हणाले, "मित्रांनो मला दुसऱ्या एका ठिकाणी ताबडतोब जाणे भाग आहे म्हणून तुम्हा सर्वांची क्षमा मागून मी थोडा अपवाद करतो आणि अध्यक्षीय समारोप उरकतो." असे म्हणून त्यांनी जे भाषण सुरू केले ते एका तासानंतरच थांबले आणि त्वरित तिथून निघून गेले. सरपंचांची पाठ वळताच मंडपातील अर्धे अधिक लोक उठून शेजारीच असलेल्या भोजनव्यवस्थेपाशी जाऊन रांगा लावून उभे राहिले. शेवटी तर फक्त ज्यांचा सत्कार होणार होता तेवढेच मोजके सात आठ विद्यार्थी आणि दोन तीन कर्तृत्ववान युवकच मंडपात अगतिकतेने बसलेले दिसले. सर्वांनाच भूक लागल्यामुळे असेल कदाचित माझ्या हस्ते त्या सर्व गुणवंतांचा सत्कार अवघ्या पाच मिनिटात संपन्न झाला. लगोलग ते सूत्रसंचालन करणारे गुरुजी उठले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानून मोकळे झाले. त्याचप्रमाणे "आज आपल्या या कार्यक्रमासाठी मुद्दाम औरंगाबादहून आलेले नामांकित साहित्यिक श्री मानकर साहेब यांचेदेखील मी आभार मानतो'' असे शेवटी त्यांनी सांगितले आणि सर्व उपस्थितांना ''भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये " अशी आग्रहाची विनंती केली. त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा घेऊन सर्वांनी दोन मिनिटामध्ये मंडप रिकामा केला आणि भोजनस्थळी गर्दी केली. मी मात्र एकटाच तिथल्या व्यासपीठावरील खुर्चीत बसून माझ्या खिशातील, माझ्या न झालेल्या भाषणाचा कागद, कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने चुरगळून त्या टेबलाच्या खाली फेकून दिला.

उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००५
मोबाईल: ८८८८९२५४८८
email: ukbhaiwal@gmail.co