राम कहाणी! suresh kulkarni द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राम कहाणी!

मोहन्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर, रामा अंदाजे आपल्या घराकडे वळला. हातातली काठी हलकेच जमिनीवर आपटून पहिली. उघड्या पायाच्या तळव्याने अदमास घेत, सराईतपणे घरा समोरची नाली ओलांडली. चार पावलावर अपेक्षे प्रमाणे, घराच्या पायऱ्या लागल्या. एक, दोन, तीन, तो पायऱ्या चढून गेला. हात सावध पणे समोर केल्यावर हाताला लाकडी दराचा स्पर्श झाला. हलका हात फिरवून आपल्याच घराचे दार असल्याचे त्याने खात्री करून घेतली. अन मग कडी वाजवली.
"शांते, दार खोल ग, मी आलुया!"
शांती रामाची बायको. रंगाने कोळश्याची अंतरसाल! काळी ढुस्स! पण नाकी, डोळी नीटस. काळ्या रंगामुळे, चमकदार डोळे पहाणाऱ्याचा काळजाचा ठाव घ्यायचे! आवाज कमालीचा गोड. वागायला नम्र. बाप दारुड्या, घरची गरिबी, सावत्र माय, शिक्षण शून्य!, या सर्व परिस्थितींनी तिला, आंधळ्या रामाचा हात धरायला भाग पाडले होते. येत्या उन्हाळ्यात तिच्या लग्नाला दोन सरून तिसरे वर्ष लागणार होते.
रामाने दार किंचित ढकलले, दार उघडेच होते! तो आत आला आणि दार लावून घेतले.
"आलव जनु !" स्वयंपाक घरातून बाहेर येत शांती म्हणाली.
"कूट व्हतीस?, अन दरुजा उगडाच!" रामा तिच्यावर भडकला.
"अवो, चुलीजवळ होते, आमटीला उकळी आल्ती, भांड खाली उतरिपत्तोर तुमी घरात आलाव."
"तस नव्ह शांते, म्या घरात नसताना दरूजा बंद ठीवीत जा! "
"व्हय."
" अन आया -बायाच्या संगती बगर कूट भाईर जात नग जाऊस. लोक वंगाळ असत्यात!" रामा तिची समजूत घालत म्हणाला.
"तुमी नगा घोर करू, मी घिन माजी काळजी."
"तस नव्ह शांते, तू लै चांगली हैस!, थोर -मोठ्या म्होरं अदबीनं वागतोस, मले समद ठाव हाय. आजूबाजूचं लोक तुही तारीफ करत्यात. 'रामा गड्या, तू लई ताकदीरवाला हैस. शांती जोगी तुला बायको मिळालीय. ' असं कुनी म्हनलं कि बर वाटत,पर दुसरी कून तुजी फिकीर पन वाटतीय!"रामाच्या शब्दातून शांतीबद्दल वाटणारी काळजी ठिबकत होती. शांतीला ते जाणवतही होते.
"मज्या परीस तुमी सोताला जपा, मंजेन झालं."
"ते तर हैच. पर आज तुज्या सटी गंमत आणली हाय!" रामाचा सूर आता सामान्य झाला होता.
"ठाव हाय! तुमी घरात आलाव तवाच भज्याचा वास आला!"
"तुला आवडत्यात मनून आणलेत बग! "
"आमच्या आवडी- निवडी बऱ्या ध्यानात ठिवताव?"
"आग, आंधळा असलो तरी, तुज मन मला कळतं कि! तुला आनंद झाला कि समजत. तू हिरमुसली कि कळत मज्या काळजाला! शांते डोळेवाला असतो तर लै कोड कौतिक केलं असत बग तुज!"
"आता काय कमी करताव? सदान कदा काय न काय माज्या साटी अनंताच कि! लगीन झाल्या पसन बगती हाय मी, लै बडदास्त ठुलीया माजी!"
"बर तस का असना. पर खरं सांगू. तूला आनंद झाल्यास कशी दिसतीस? तू चालताना कशी दिसतेस?
तू बोलताना कशी दिसतेस? हे समद बगाव वाटतंय बग! पर काय करू देवानं मला असं आंधळं केलय!म्या काय पाप केलं आसन ग, शांते?" रामाचा आवाज गहिवरला.
"आता बास करा. आमटी गर व्हतिया, हातपाय खंगाळा, जेवन करून घ्या."
शांतीचा आवाज पण घोगरा झाला.
००००००
"राम्या, तयार हैस का?" सकाळी नवाच्या सुमारास मोहन्याने रामाच्या घराबाहेरून हाळी दिली.
"हा,आलूच बग, शांते, अमी जातुया, दरूजा लावून घे." घरा बाहेर पडत रामा म्हणाला.
रामाची वडिलोपार्जित काही जमीन धरणाखाली गेली होती. त्याचे बऱ्या पैकी पैसे मिळाले होते. ते त्याने बँकेत ठेवले होते. एक पाच -सात एकरचा तुकडा अजून रामा बाळगून होता. शेती बरी होती, त्यात त्याच्या गरजही कमीच होत्या. तसा तो काटकसरीने रहात असे. त्यामुळे तो चार पैसे बाळगून होता. त्यातून त्याने 'अडल्या -नडल्याना मदत करण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यात जसा जसा तरबेज होत गेला तशी बरकत येत गेली. छटेसे घर पण त्याने बांधले. बस्तान व्यवस्तीत बसल्यावर त्याने शांतीशी लग्न केले होते. आंधळेपण, त्याच्या व्याज बट्ट्याच्या कामात आड येत नसे, इतका तो आता तरबेज झाला होता! अश्या कामासाठी तो मोहन्याला सोबत घेत असे. 'सोबती ' पेक्षा गरज पाडलीतर 'साक्षीदार ' म्हणून मोहन्या उपयोगाचा होता! त्या साठी तो त्याला, कधी मधी शंभर -दोनशे देत असे. आजही तो त्याला सोबत घेऊन शेजारच्या खेड्यात वसुलीला निघाला होता.
००००००
रामाला परतायला तिन्ही सांजा झाल्या होत्या.
"तुमी, हातपाय खंगाळा, तवर मी तुमच्यासाटी चा करते."शांती म्हणाली.
त्याने हातपाय ओले केले. तोंडावरून ओला हात फिरवताना नकळत त्याची बोट डोळ्यांच्या खाचा पाशी रेंगाळली. आपल्याला पण शांती सारखे डोळे असते तर? हा विचार मनात चमकून गेला!
"असं एका एक तुमचे डोळे कशे काय गेले?" शांतीने चहाचा कप रामाच्या हाती देत विचाले.
"कोणास ठाव? न्हानपनी एक दिस सकळा उठलो तर ढवळ ढवळ दिसाया लागलं. दोपारा पण तसेच राह्यलं. दुसरे दिशी पाक अनदारच झाला. मग पुन्यांदा काय दिसलं नाय!"
"मंग दवाखान्यात जायचं कि."
"गेल्ताव. चार -सा महिन तालुक्यास दवा -दारू केली. काय फरक झाला नाय."
"मग?"
"बा, डाक्तर वर खवळला. तसा त्यो म्हंतु कसा ' पुन्या मुमैला मोठ्या डाक्तरला दावा, त्यायच्या कड मोठाल्या मशनी असत्यात, झाल तर तिकडचं इलाज व्हईल '. मंग आमी पुण्यास गेल्ताव. तीत तर लैच ईपरीत सांगतील. "
"काय?"
" तिथलं डाक्तर मानलं कि, दोनी डोळ पाक गेल्यात! निस्त्या गारगुट्या झाल्यात! आता काय पुन्यांदा या पोराला दिसायचं नाय!"
"आर, देवा! पर कायत इलाज असंनच कि ?"
"बा न, इचारलं कि! त डाक्तर मनला 'फकस्त एकच विलाज हाय! कोन्या दुसऱ्या माणसाचं डोळ बसवल त एखादं बार दिसलंबी!' पर कोण दिन आपलं डोळ मला?" त्याच्या आवाज काळजाला घर पडणारा होता!
"पर म्या असं ऐकलेया, कि मेल्या मानसाची डोळ काडून आंधळ्याला बशीवत्यात मन. खरं असंन तर बागाकी भेटत्यात का ते?" शांती म्हणाली.
" शांते, भेटत्यात पर आपल्या पत्तोर नाय यायची! लै लम्बर हैती! अन रगड पैसा लागतुया, वरन आपरेशन वायलाच! ते काय मज्या लशीबी नाय! मी असाच आंधळा मरणार!" रामा उदास वाणे म्हणाला.
शांतीला कोठून हा विषय काढला असे झाले. काय बोलावे हे तिला सुचेना.
"चला, रात झालीय जेवन करू, दिसभर वनवन केलीत, थकला अशीला. तुकडा खाऊन निजा!"
००००००
जेवण -खाण झाल्यावर रामाने हाताने चापचडून पिशवीतून एक रेशमी साडी बाहेर काढली.
"या बया, लुगडं!"शांती आनंदाने ओरडली.
" व्हय. आज तुजा वाढदिस हाय नव्ह! मानून मुद्धाम तुज्या साटी गिफ़्त आणलाय! आवडल का नाय?"
"लई आवडलं! झाक हाय! एकदम मऊ सूत! पर तुमासनी कसा याद रहायला मजा वाढदिस?" शांती आनंदाने मोहरून म्हणाली.
"कसा अन काय? डोक्यामंदी सदा तुजाच इशय असतुया! "
"आता काय मनाव याला?"
" काय मनूने! गुमान नवं लुगडं घालून दावं!"
"काय? या वक्ताला? अवो आता रात हाय! रातच्या कोर कापड घालूने असं मनत्यात! सकळा नेसते कि."
"हे पहाय शांते, मला सकाळ -रात सारखीच! आत्तालाच नवं लुगडं लेऊन दावं!" रामा हट्टाला पेटला.
"तुमची जिद असनंतर दावतो नेसून. पर तुमी कस बगनार?" शांतीने जीभ चावली, पण शब्द निघून गेले होते! रामा दुखावला.
"ते बी खरच हाय! मला कूट दिसतंय?---- नका डोळ्यानं दिसना! हाताच्या बोटानं चापचून बगन , नव्या कापडाच्या वासानं बगन, लुगड्याच्या सळसळ आवाजानं बगन! समदं जग फकस्त डोळ्यानं बगत, पर मी हातानं, कनान, नाकानं, पायानं समद्यान बगतो!"रामा कळवळला. त्याच्या डोळ्याच्या खाचा ओल्या झाल्या. शांतिचे मन गलबलून आले.
तिने ती नवी साडी घातली. साडी घालताना रामा पुतळ्या सारखा स्तब्ध बसला होता. तिची, साडीची प्रत्येक हालचाल, साडीची मुलायम सळसळ, ध्वनीचा प्रत्येक कवडसा, गंधाचा प्रत्येक कण त्याचा मेंदू ग्रहण करत होता. अन त्याच्या मनात गुलाबी साडीतील एक सुंदर परी साकारत होती!
"शांते, लै गोड दिसतोयस!"
"काय?"
" मला काय दिसत नाय, पर समदं कळतया! आज तुला एक सांगायचं हाय!"
"अन काय ते?"शांतीने विचारले
"शांते, मला काय पण नग, ती शेती नग, ते बँकेतले पैस नग, हे घर नग, त्यो व्याज -बट्टा नग, हि जिंदगानी बी नग! हे समदं घिऊन, मला आत्ता तू कशी दिसतेस, ते कोन तर दावाया पायजे! देवा म्हादेवा, मला घडीभर नजर दे, शांतीला डोळ भरून पाहीन, मंग म्होरल्या घडीला कैलासाला चाल म्हणालास तर, ना म्हणणार नाय!"रामाचा आवाज कातर झाला.
"अवो, असं काय करताव? सोताला आवरा!" रामाला जवळ घेत शांती पण गहिवरली!
"शांते, तुला सांगतु. आपलं लगीन व्हायचे पैले पण मी आंधळाच होतो. पर तवा त्याच कदी वंगाळ वाटलं नाई. नशिबानं दिलंय मानून घेतलं व्हतं. कदी दिसावं असं वाटलं नाई. अदलेपनाची कंदी याद पण अली नाई. पर आपलं लगीन झालं अन समदं पलटल! तुला बगायची लई आस लागलीय!" रामाच्या शब्दांनी शांतीच्या काळजाला घर पडत होती. कसे बसे रामाला शांत करून तिने झोपी घातले.
००००००
रामाला झोप लागली पण शांतीला झोप येईना. रात्र भर ती जागीच होती. रामा बरोबर लग्नाच्या वेळी ती नाराजच होती. आंधळ्या बरोबर संसार म्हणजे जीवनाचं मातेरं! पण दारुड्या बापाची गरिबी, सावत्र माईचा जाच, ढोर मेहनत हे तर होतीच. बापानं परस्पर सुपारी फोडली! आपल्यला विचारले नाही म्हणून खूप त्रागा केला, पण उपयोग झाला नाही. रात्री विहीर जवळ केली पण, ऐनवेळी उडी मारायची हिम्मत झाली नाही. खाली मानेने ती परत आली. लग्न नंतर रामाने आपले आंधळेपण तिच्यावर लादले नाही. फार क्वचित तो तिची मदत घ्यायचा. स्वतःची कामे स्वतःच करायचा. तिला तो फार सन्मानाने वागवायचा . 'मज समद तुजच हाय ' म्हणायचा. तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. तिची आवड निवड जपायचा. खाण्या -पिण्याची, कपड्या- लत्त्याची कधी आबाळ होऊ द्यायचा नाही. बरेचदा ती त्याचा भाकर -तुकडा घेऊन शेतात जायची, तिला उन, पाऊस लागू नये म्हणून, त्याने तिच्या साठी त्याने, शेतात एक झोपडी बांधली होती. आंधळा होता, पण गुणी होता. म्हणूनच तिला त्याच्या बद्दल माया वाटत होती, प्रेम वाटत होते, कणव वाटत होती.
बराच विचार करून तिने एक निर्णय घेतला! तेव्हा तिला कोठे हलके वाटले. मग पहाटे पहाटे तिला झोप लागली.
००००००
साधारण दीड -दोन महिन्यानंतर पुण्याची शेवटची गाडी रात्री दीडच्या सुमारास गावाजवळ थांबली ,तेव्हा त्यातून दोन पॅसेंजर उतरले. एक पुरुष आणि एक स्त्री. पुरुषाच्या डोळ्यावर गॉगल होता. स्त्रीच्या डाव्या डोळ्यावर गुणिलेंच्या चिन्हा सारखे जाड जुड बँडेज होते. ते रामा आणि शांती होते!
००००००
"राम्या हैस्का घरात?" काल पर्यंत घराला कुलूप होते, पण आज दिसत नव्हते म्हणून मोहन्याने हाळी दिली.
"कोन हाई?" रामाने दार उघडत विचारले. मोहनन्या आ वासून रामाच्या तोंडाकडे पाहतच राहिला.
" ऑ s s , तुजा एक डोळा खुल्ला कसा? अन कोण हाय काय? म्हैन्यात वळक इसरलास कि काय?"
मोहन्याच्या शब्दात आश्चर्य मावत नव्हते.
रामाला त्याची चूक कळली. गॉगल न लावताच त्याने दार उघडले होते. घरासमोर एक काटकुळा आश्चर्यचकित झालेला माणूस उभा होता. कोण हा? रामाने क्षणभर डोळे बंद केले. हा आवाज कोणाचा?मोहन्याचा! नक्कीच!
"तस नव्ह मोहन्या, वळक बुजया काय झालं? पर पैल तू घरात ये. समदं सांगतो. "
रामाला डोळा मिळाला होता, हे उघडच होत. पण कसा? कधी? कुणाचा?मोहन्याचा गोंधळ उडाला होता. तो भिंतीला टेकून बसला.
"माजी शांती लई चांगली हाय! आक्षी देवावानीच हाय! आर, लई थोर मनाची हाय! तिनेच आपला एक डोळा मला दिलाय! तीच उपकार कस फेडू?असं इचारलं तर काय म्हनली ठाव हाय?" रामा सांगू लागला .
" काय?"
"म्हन्ती कशी? 'आपुन काय दोन हाईत काय? मज्या जवळ दोन डोळ हाईत, एक एक वाटून घु, दोगाना बी दिसंन!' मोह्न्या, मज्या कातड्याचं जोड करून तिला घातलं तरी बी तीच उपकार फिटायचं न्हाहीत !" रामा भरभरून बोलत होता. आणि मोहन्या सुन्न होऊन ऐकत होता. शांतीन आपला एक डोळा नवऱ्याला दिला! असा देता येतो? इतकं प्रेम कुणी कुणावर करू शकतो?
मग रामाने, ते दोघे पुण्यास कशे गेले? तेथे डॉक्टरांनी मोठाल्या मशनीवर कश्या तपासण्या केल्या? चार चार वेळेला दोघांचे रक्त कसे तपासले? तिचा डोळा काढून त्याला कसा बसवला? नजर सरावताना काय काय अडचणी आल्या? तेथून कसे परतले? पुढील उपचार तालुक्याच्या डॉक्टर कडून कसे करून घ्यायचे आहेत? हि सारी सविस्तर माहिती रामाने मोहन्याला सांगितली.
शांतीने आपला एक डोळा रामाला दिल्याची बातमी पंचक्रोशीत वणव्या सारखी पसरली. शांती सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली.
००००००
चार -सहा महिन्यात शांतीला अन रामाला एका डोळ्याचा सराव झाला. दोघांच्या जखमा भरून आल्या होत्या. रामाचा धंदा तेजीत होता. डोळ्या मुळे तो आता शेती कडे पण ज्यास्त लक्ष्य देत होता. कधी मधी शांती शेतातल्या खोपटात बसून एका डोळ्यांनी हिरवेगार रान न्याहाळत असे. सुख -सुख म्हणतात ते हेच का? असा ती स्वतःशीच विचार करत असे.
००००००
रामाच्या घराच्या माळवदावर सतरंजी टाकलेली होती. दिवेलागण टळून अंधार पडला होता. मुंडेरीवर कंदील ठेवला होता. सतरंजीवर राम आणि मोह्न्या बसले होते. दोघांच्या पुढ्यात, फरसाण, खारेदाणे, पापड, अन एक फुल खंबा होता! दोघांचे ग्लास अर्धे भरलेले होते. थोडक्यात जंगी पार्टी चालू होती. डोळे आल्या पासून रामाच्या घरात बऱ्याच नव्या वस्तूंनी प्रवेश केला होता, जसे गाद्याचा सोफा, फ्रीज, टेबल, त्याच बरोबर 'दारू ' पण आली होती!.
खाली अंगणात चुलीवर मटणाच भांड रटरटत होत. त्याचा वास सर्वत्र दाटला होता. शांती भाकऱ्या थापत होती. अजून थोडं मटण शिजलं कि भाकरीची चवड अन गरमागरम मटणाचं भांड वर नेऊन ठिवायचं. मग दोघे मित्र तिथंच जेवणार होते. महिन्या -पंधरा दिवसाला, असा नेहमीचाच कार्यक्रम होतो.
"मायला राम्या, आज जरा ज्यादाच लवकर चढतीय, नव्ह का?" मोहन्या म्हणाला.
"तस नाय, मोहन्या, आज जरा 'पानी ' बदलून आणलाय! नेमी परता तेज हाय. पर मजा येतीय. " रामाची पण जीभ जडावली होती.
"राम्या, तू लई नशीबवान हैस!"
"कस काय?"
" मायला ,फुकटात आज पाच हजार व्याज वसूल केलंस कि मर्दा! पैल सम्बरला दोन रूपे याज घेत व्हतास, आता दहा रूपे घेतुस!"
"पैले लोक देतीन ते घेत होतो, पर आता दिसाया लागलंय नव्ह? समूरच्याची नड त्याच्या आवाजा परीस तोंडावरुन कळतिया! ज्यादा नड, ज्यादा याज!" रामा अडखळत म्हणाला.
"तुहं तकदीर लैच भारी, मायला आमची बायको भाकर पन येळेवर देत नाय! जेवाया मागितलतर 'घ्या हातानं' म्हणती! अन तुला न मागता डोळा मिळतो!"
" मोन्या, मागून काय बी मिळत नसत!"
"तेच तर म्या मंतुय! आमची बाईल मागून पण जेवाय देत नाई, हरामखोर हाय साली, अन तुही बायकू न मागता डोळा पण देती ..... मंजे काय? मायला, राम्या आता बास, गड्या! दारू पार डोक्यात घुमतिया! " मोहन्या बरळला.
"तेच तर म्या तुला सांगतुया! मागून काय पण भेटत नसत!" राम्याचा तोल ढळत होता.
"मग, तुला कस भेटलं?" मोहन्यान कस बस विचारलं.
"तेला जाळ टाकावं लागत!" रामा आता रंगात आला होता.
"जाल? काय मसुली धरायची काय?"
" व्हय! मसुलीसटी नाय, पर शांती सटी जाळ टाकलं व्हतं! मला मोप आंधळ्या पोरी सांगून आल्त्या, पन मी शांतीच्या भिकारी बापाला पैस दून दोन डोळ्याची शांती घेतली!"
"पर याच अन डोळ्याचं काय देणं घेन?" मोहन्यान विचारलं. खर तर रामा काय बोलतोय हे मोहन्याला आकलन होत नव्हते.
"काय मंजी? हि त निस्ती सुरवात व्हती! मंग ग्वाड ग्वाड बोलून, कवा भजी, जिलबी, त कवा लुगडं देत ऱ्हायलो!"
"मंग?"
"कवा घैवरायच, कवा रडायचं, कवा उगाच उदास ऱ्हायच! तवा कूट हि बया डोळ्याला राजी झाली!"
" मंजी? तुवा नाटक करून फाशीवलास शांती वौनी ला? "
"मला कूट फुकटात डोळा भेटला असता?! मी काय येडा हाय का? भज्या वर अन लुगड्यावर पैसा सांडायला?!"
" मायला, तिचा जीव हाय तुज्यावर अन तू असलं सैताना गत वागलास? तुला मैतर म्हणायची शरम वाटतीय!"
"आर, समदं ऐकून तर घे!" मोहन्या काय म्हणतोय या कडे रामाचे लक्ष होते कोठे? तो आपलीच फुशारकी सांगत सुटला होता. त्याचे ' विमान ' उंच उंच घिरट्या घालत होते.
"दिसाया लागल्या पसन एक मातर बेक्कार झालं बग! मायला, शांती एकदम काळीढुस्स अन ईद्री हाय!वर एक डोळ्यानं आंधळी बी !! हे आता दिसाया लागलंय!"रामा भेसूर हसला.
"हू ... "मोहन्याने हुंकार दिला. त्याला बोलायचे होते पण जीभ जड झाली होती. दगडा सारखी.
"मोहन्या, तू मजा जिगरी, मनून तुला सांगतु, तुला सुताराची चंपी ठाव हाय का? तीच! एकदम गोरी पान हाय! जनू कोंबड्याचं अंड! ती अन मी मिळून या काळ्या डुचक्या, शांतीला कटवणार होइत! कूट बोलू नगस! "
तेव्हड्यात पायऱ्यांवर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. शांतीच्या हातून मटणाचे भांडे निसटले होते. पायऱ्यांत भाकरी, मटणाचा उकळता रस्सा सांडला होता!
"मायला, काय पल्ड? शांते कालवण भाकऱ्या आन! लय भुका लागल्यात ---- " रामाने उचक्या देत शांतीला हाळी देण्याचा प्रयत्न केला,पण निम्मे वाक्य घशातच राहिले. समोर मोहन्या लुडकलेला, आडवी पडलेली दारूची बाटली, रामाला अंधुक दिसत होती. मुडेरी वरील कंदील राहून राहून भडकत होता. रामाला डोळे उघडे ठेवायचे होते पण उघडत नव्हते. तो तेथेच कलंडला!
००००००
शांतीने रट रट त्या मटणाच्या भांड्यावर, एका पीतळीत भाकऱ्याची चवड, चार सहा कांदे, हिरव्या मिरच्या ठेवल्या व ती जेवण घेऊन माळवदा वर जाण्यास निघाली. पायऱ्यांत असतानाच "तेच तर म्या मंतुय! आमची बाईल मागून पण जेवाय देत नाई, हरामखोर हाय साली, अन तुही बायकू न मागता डोळा पण देती ..... मंजे काय? "ते मोहनचे वाक्य कानी आले. आपला विषय निघाला म्हणून ती तशीच पायऱ्यांत थांबली. रामाच्या शब्दागणिक तिच्या काळजाच्या ठिकऱ्या उडत होत्या! हातातलं भांड निसटलं. भाकरी पायऱ्यांवर विखुरल्या, उकळता रस्सा पायावर पडून पाय भाजला. पण तिचे त्या कडे लक्ष्य नव्हते. शांती पळत खाली आली, समोरच्या दाराची कडी उघडून अंधारात पळत सुटली. पाय नेतील तिकडे! जाळ काय? मासोळी काय? एखाद्या सराईत शिकाऱ्यागत आपली पारध केली त्याने!
आपल्याच डोळ्याने आपल्यालाच पाहून 'काळी, ईद्री ' म्हणणारा, माणूस कि सैतान?. अन हे कमी म्हणून त्या चंपी शी सूत! हलकट, हरामखोर, स्वार्थी! आपल्या तना -मना बरोबर तो खेळत होता! रडण्याचं , अगतिकतेच त्यानं नाटक केलं आणि आपण त्याला माया -प्रेम समजत होता!, अन तो फक्त स्वार्थ पहात होता! सावत्र आईचा त्रास चुकला, आंधळा का असेना नवरा मिळाला, हक्काचे घर मिळाले म्हणून आपण किती आनंदी आणि समाधानी होतो! पण याने झोपेत धोंडा घातला डोक्यात! देवा, असा काय गुन्हा केला म्हणून हा दिवस दाखवलास! असल्या विचारात भरकटलेली शांती शेतातल्या खोपटं पाशी आली. तिच्या पायांना फक्त हीच वाट माहित होती. त्यांनी तिला तेथेच आणले होते. ती खोपटात भिंतीला पाठ लावून बसली, हरवल्या गत! हरल्यागत! आपल्याच डोळ्याने, दुसऱ्या बाईवर नजर ठेवणाऱ्या नीच माणसाचा रोज होणारा स्पर्श आता कसा आणि का सोसायचा?
समोरच्या कोनाड्यात फवारणी साठी आणलेली कीटक नाशकाची बाटली, अंधारात पण चमकत होती. तिने झटक्यात बाटलीचे झाकण उघडले आणि बाटली घश्यात रिकामी केली!
००००००
पहाट पहाट गावात गलका झाला, शांतीने 'एंड्रीन ' पिलं अन तिला दवाखान्यात नेलंय!
रामा धावत दवाखान्यात पोहंचला.
"कशी हाय माजी शांती?" धापा टाकत त्याने डॉक्टरला विचारले.
केबिन मध्ये डॉक्टर एकटेच होते. त्यांनी प्रथम घाबरलेल्या रामाला खुर्चीवर बसवले.
"प्रथम तुम्ही शांत व्हा, तुम्ही कोण?"
"मी शांतीचा नवरा रामा! कुठं हाय माजी शांती?अन कशी हाय?" रामाचा स्वर घाबरा अन अधीर झाला होता.
"त्यांना दवाखान्यात आणण्यास उशीरच झाला होता. आम्ही प्रयत्न केले पण .. "
"पण, काय डॉक्तरसाहेब?"
" पण यश आले नाही. शांताबाई आता आपल्यात नाहीत!" डॉक्टरांनी परिस्थितीची स्पष्ट जाणीव करून दिली.
" अरे देवा!" म्हणून रामाने दोन्ही हाताने तोंड झाकून घेतले आणि तो हुंदके देऊ लागला.
" रामराव, स्वतःला सावरा. धीरानं घ्या, घडणारी गोष्ट घडून गेली. आणि आता जी गोष्ट आपल्या हाती नाही, तिच्यासाठी शोक करून काय उपयोग?" डॉक्टर समजुतीने, रामाला धीर देण्याच्या सुरात म्हणाले.
डॉक्टरच्या बोलण्याचा रामावर परीणाम झाल्या सारखा वाटत होता, त्याचे हुंदके देणे थांबले होते.
"खरं हाय डाक्तर, व्हायाच ते हुन गेलं! ते काय आपल्या हाती नव्हतं! आता शांती काय पुन्ना जिंदी होनार नाई! पर आपल्या हाती हाय ते त करता यील कि!"
"म्हणजे?"डॉक्टर गोंधळले.
"मंजी, आता शांती मेली! तिचा असलेला एक डोळा काढून घ्या! आता तेचा तिला काय उपेग? माज्यात कामाला इन! हे त तुमच्या हाती हाय कि? तुमची काय बिदागी आसन ती दिवू कि! कस?"आपल्या एकुलता एक डोळा डॉक्टरवर रोखून, थंडगार आवाजात रामाने विचारले!


सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye. (माझीच एक पूर्व प्रसिद्ध कथा )