Barkya--Manchakmahatmy books and stories free download online pdf in Marathi

बारक्या!--मंचकमहात्म्य

सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या, दोन शिळ्या भाकरी, बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा 'अल्प ' नाश्त्याचा मुडदा पाडून, मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत, चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते. अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते. मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत. अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते.
"आक्का, मी आलोय ग SSS !" अंगणातून कोणी तरी टाहो फोडला. मंचकरावची धुंदी खाड्कन उतरली. पण स्वभावा प्रमाणे मुळीच घाई न करता त्यांनी सावकाश डोळे किल किले करून अंगणात नजर फेकली. सुकलेल्या चिपाडा सारखा ततंगडा माणूस हाळी देत होता. त्याने कपड्याचे एक बोचके बायकी थाटात बगलेत धरले होते.
"हे पहा अजून गिरिजाबाईंचा स्वयंपाक झालेला नाही. दुपारी दोन नंतर या, तेव्हा भीक वाढू! " मंचकराव म्हणाले.
"अहो, पण मी भीक ----"
"आम्हास माहित आहे, तुम्हास शिळे-पाके चालते! पण कालच्या पोळ्या आणि भाकरी गिरिजाबाई आम्हांसच खाऊ घालतात! तेव्हा, नो शिळे -पाके बिझिनेस! आपण दुपारीच या!"
"कोण? बारक्या!" तेव्हड्यात गिरिजाबाई पदराला हात पुसत अंगणात आल्या. बगलेतलं बोचक भिरकावून देत त्या काटकुळ्या माणसाने गिरीजाबाईंचे पाय धरले.
"ये, ये बारक्या घरात ये! अन आज आठवण झाली व्हय आक्कांची? इतके दिवस कुठं होतास?"
"आग, तिकडं चम्पाआक्काकड साल भर होतो. तिच्याकडनचं तुझा पत्ता आणि गाडीभाडं घेतलं अन तडक आलो बग! पर ह्यो मिशाळ बाबा कोण म्हणावा?" त्याने मंचकरावकडे निर्देश करत, हनुवटीला तर्जनी लावत,बारक्याने नाजूक मुरका घेत विचाले .
" अरे, हे तुझे ----"
" आम्ही मंचकराव! गिरिजाबाईंचे पती! या वाड्याचे मालक! " आपल्या झुपकेदार मिश्यावरून पालथी मूठ फिरवीत मंचकराव खर्जात म्हणाले.
" या बया, म्हणजे दाजी का? नमस्कार करतो हा दाजी." बारक्या नमस्कारासाठी झुकला.
"ठीक आहे!" असे काहीसे पुटपुटत त्यांनी पाय मागे घेतले. साधारण हे सोंग गिरिजाबाईंच्या माहेरचे असावे इतकी त्यांना कल्पना अली होती. तरी त्यांनी गिरिजाबाईना विचारले.
"हे कोण?"
"ह्यो बारक्या, गावाकडन आलाय." त्यांनी तुटक उत्तर दिले. म्हणजे त्या बारक्या बद्दल फारसे बोलू इच्छित नव्हत्या. त्या बारक्याला घेऊन तडक घरात गेल्या. दुपारच्या जेवणात गिरिजाबाईनी रव्याचा गोडं सांजा केला. 'बारक्या ' हे काहीतरी 'खास ' प्रकरण असल्याची मंचकरावच्या मनाने नोंद घेतली.
०००
बारक्या येऊन जेम तेम चारच दिवस झाले होते. पण अख्ख्या आळीत तो ' मंचकरावचा मेव्हणा ' म्हणून व्हायरल झाला होता. इतकेच काय शेजारच्या भुजंगाने सुद्धा, 'हे तुमचे मेहुणे का मेहुणी ?'अशी कुजकट पूछा केली होती! भुजंग्या डाम्बिसच आहे. बारक्या आता घरात चांगलाच रुळला होतो. 'दाजी , बाजारात जातोय. काही आणायचे आहे का? 'असे आवर्जून विचारात असे. आणि सांगितलेली वस्तू हमखास 'विसरत ' असे! बाहेरून येताना तो स्वतः साठी बिड्याची बंडल मात्र आठवणीने आणत असे! मागल्या दारात बसून बिड्या ओढणे, हि त्याची अनंत जन्माची अतृप्त इच्छा, तो आवडीने तृप्त करून घेत असावा! पण गिरिजाबाईस बारक्याचे कोण कौतुक! कारण बारक्या त्यांना हर कामात मदत करायचा. अंगण झाडून सडा टाकणे, घर साफ करून ओल्या फडक्याने पुसून घेणे, भांडी घासणे, कपडे धुणे, बाजारातून भाजी आणणे, भाजी निवडून देणे, कणिक मळून देणे. सबकुछ!

गिरिजाबाई आणि बारक्या गवार निवडत बसले होते. समोर चांदीच्या पानदानातून, टपोरी सुपारी मंचकरावनी उचालली. तिचे बारीक काप करून वेलदोड्या सोबत तोंडात टाकता टाकता त्यांनी बारीक नजरेने बारक्या कडे पहिले. त्यांच्या नेमके लक्षात आले नाही पण काहीतरी ओळखीचे मात्र जाणवले.
"काय, बारकेराव काय करता तुम्ही?" मंचाकरावनी बारक्यास विचारले.
"काय म्हणजे? सगळंच करतो कि! अन दाजी तुम्ही बगताच कि?"
"तसे नव्हे. पोट-पाण्यासाठी?"
"त्याची काय गरज पडली नाही आजवर! पडलं तवा बघू!"
"म्हणजे?"
"आता बघा, गेल्या साली सालभर चम्पाआक्का कड होतो.आता तुमच्याकडं आहे. असाच फिरणार ,जिंदगीभर!"
"अहो, आश्रितासारखे असे किती दिवस जगणार?" मंचकरावनी नको ते बोलून गेले .
"बारक्याला दोनवेळच्या जेवणाची कधीच भ्रांत पडणार नाही! तो आम्हास जड नाही!" इतकावेळ गप्प असलेल्या गिरिजाबाई ताड्कन उत्तरल्या. गिरिजाबाईंचा नूर बघून मंचाकरावनी बोलणे आवरते घेतले.
"अरेच्या, बारकेराव मघापासून आमच्या लक्षात येत नव्हते ते आत्ता आले. आज आपण आमचा गंजीफ्रॉक चुकून घातलेला दिसतोय!"
"चुकून नाही मुद्दाम घातलाय! फडताळात अकरा बनियानी पडल्यात! घेतल्या दोन ., आता थोडं ढगळ्या हैत, पण चालतंय कि! अन फक्त बनियनच नाही, तर अंडरवेट पण तुमचीच आहे! दाखवू का?" बारक्याने आपले किडके दात दाखवत विचारले . 'बारक्या' प्रकरण हाता बाहेर जातंय हे मंचकरावना जाणवू लागले. 'सालभर चंपाआक्का कडे होतो.' हे वाक्य मंचकरावना आठवले. म्हणजे वर्षभर हा 'आदिभार ' उचलावा लागणार कि काय?
००
गिरिजाबाईना न दुखावता, बारक्याचा कसा बंदोबस्त करावा, हा भुंगा डोक्यात घेऊन मंचकराव साईबाबाची पोज घेवून पिंपळाच्या पारावर बसले होते. तोच समोरून खंडोबा झुकांड्या तोल सावरत आला.
"काय मंचक -राव कसल्या इचारात हैती?" आंबूस स्वरात त्याने विचारले.
"त्याचे काय कि, एक 'बारक्या' आमच्या घरात आले आहेत. ते गिरिजाबाईच्या माहेरचे आहेत आणि त्याने लाडके पण आहेत. ते त्रासदायक ठरणार, असा आमचा होरा आहे. तेव्हा गिरिजाबाईस न दुखावता या बारक्यास कसे परत पाठवावे या विचारात आम्ही आहोत. आपण काही सुचवू शकाल का?" मोठ्या आशेने मंचाकरावनी झुकांड्यास विचाले. कारण मागेच्या वेळेस ' दारुडे व्हा ! गिरिजाबाई तुमच्यावर प्रेम करतील!" हा सल्ला याच झुकांड्याने दिला होता. एकाच 'बैठकीत ' काम झाले होते! (सन्दर्भ -मंचकमाहात्म्य -शेजार -प्रेम -अध्याय दुसरा).
"बारक्या! हा, ठाव हाय, तुमचं मेव्हन! सिम्पल हाय, तेल दारू पाजा! तुमचं सोडून दुसऱ्याच्या घरात घुसलं! अहो, माजच बाग, दोरु पोटात गेलीकी डोक्यात शिट्टी वाजती! शिट्टी वाजाया लागली कि समूर दिसलतंय त्या घरात घुसतो! मग लोक भायेरुन कडी घालत्यात! पक्का बंडुबस्त होतो! बर ते जाऊदे. एक शंबर रुपडे द्या, रातची सोय करायचीय. मजी बाटलीचं पैस हैत, चकण्याला कमी पडत्यात, कमी कसलं न्हाईच हैत!"
"आता बुडखा हलवा झुकांडे, नसता -----" पायताना कडे पहात मंचकराव खर्जात म्हणाले. तसा झुकांडे सरळ चालण्याचा प्रयत्न करत, तिरपा तिरपा चालत दूर गेला. या झुकांड्याला काही विचारा, याचा आपला एकच सल्ला 'दारू प्या /पाजा '. ----पण हा उपाय करून पहाण्यास काय हरकत आहे. दारूच्या नशेत 'बस्तान' हालावण्यचा सल्ला बारक्याच्या गळी उतरवता येईल. आणि मुख्य म्हणजे आपणही ' तीर्थ ' घेऊन बरेच दिवस झालेत. तृप्ती होईल!. बारक्यास 'पार्टी ' देण्या साठी गिरिजाबाई खुशीने राजी होतील ! मंचकरावांनी अपेयपान आणि अभक्षभक्षणचा बेत पक्का केला.
००
मध्य रात्रीचा समय असावा. दोन्ही हात वरकरून, तांगडे फाकवुन तोंडावर गोधडी पांघरून मंचकराव झोपले होते. एक विचित्र स्वप्न त्यांना पडत होते आणि त्यामुळे त्यांचे अंग घुसळत होते. काय होते ते स्वप्न ? आपण डुक्कर झालो आहोत आणि कुजकट वासाच्या गटारात लोळत आहोत! हे ते स्वप्न होते. तो वास इतका असहाय्य होता कि ते जागे झाले. स्वप्न भंगले, डोळे उघडले तरी तो वास येतच होता. हे भलतेच! बारक्या फडतूस कुठलीशी सडकी दारू पिऊन आला होता आणि तो मंचकरावाच्या गोधडीत घुसला होता. बेन झुकांड्या सोबत ढोसून आलं असावं. झुकांड्याचा असाच वास येतो. आता मात्र या बारक्याचा बंदोबस्त करणे गरजेचं आहे. असा काहीसा विचार करत, दुसरे अंथरून पांघरून घेऊन मंचकराव मारुतीच्या गारढोण काळ्या पथरच्या चौथऱ्यावर झोपायला निघून गेले.
००
संध्याकाळी वेताळ टेकडीला डाव्या बाजूने फेरी मारून मंचकराव घरी परतले. आणि अंगणातच थबकले . त्यांच्या पोटात खड्डा पडला! का काय? कसला जीवघेणा खमंग मसाल्याच्या फोंणीचा वास घरात न मावता, अंगणात उतू जात होता. घरात सामिष पदार्थ शिजत होता. आणि हे काय? कधींनोव्हे तो संध्याकाळी अंगणात सडा. त्यावर ठळक रांगोळी! (चार ठिपके, चार ओळीची -काय कि गिरिजाबाईना एव्हडीच एक रांगोळी येते!) आज गिरिजाबाईना काय झालाय? एकदम 'चिकना 'बेत! वा! वा!
" काय गिरिजाबाई, आज काय विशेष प्रयॊजन? कसली तयारी चाल्लीयय?" घरात येत मंचाकरावनी विचारणा केली.
" बेत तुमच्यासाठीच आहे! बारक्या तुम्हास 'पार्टी 'करतो म्हणून हटून बसला. त्यानेच सर्व घाट घातलाय. सगळी तयारी त्यानेच केलीय."
परमेश्वर दयाळू आहे! जे आपण करणार होतो ते अपसुख होतंय!

साधारण आठच्या सुमारास मंचकराव बैठकीत स्थानापन्न झाले.
"आक्का बाहेर ये ग " बेरक्याने गिरिजाबाईना हाक मारली. त्या माजघरातून बाहेर आल्या.
"हा, आता दाजी शेजारी बस. "
" पण, का?"
"आग, बस त खरी."
त्या मंचकराव शेजारी बसल्या. बारक्याने घरातून पंचपाळे आणले. सोबतच्या पिशवीतून शाल, श्रीफळ ,धोतर जोड, फेटा, भारीची साडी बाहेर काढली.नव्या कापडाला, थोडे थोडे कुंकू लावून, दोघांना आहेर केला.
"अहो, बारकेराव हे कशाला?" मंचकरावानी बुचकुळ्यात पडून विचारले.
"कशाला काय? मी आक्कांच्या लग्नात नव्हतो, माझा आहेर राहिला होता. तो समजा. "
गिरिजाबाईंचे डोळे पाणावले होते. कोण कुठला, समज आल्यापासुन खंबीर भावासारखा पाठीशी उभा आहे!
बारक्याने दोघांना वाकून नमस्कार केला. काय बोलावे, काय करावे हे मंचकरावांना कळेना. त्यांनी आपल्या तर्जनीतील पाच ग्राम सोन्याचे येडे काढले आणि बारक्याच्या ओंजळीत टाकले! बारक्या वेड्यासारखा त्यांच्या कडे पहातच राहिला.
"दाजी, हे आणि कशाला? मी तुमच्याकडून खुप घेतलय."
"असुद्या बारकेराव, हा आमच्याकडून कानपिळणीचा आहेर समजा!"
मग सगळं आवरून बारक्याने दारूचा खंबा काढला. तश्या गिरिजाबाई उठून आत निघून गेल्या. त्याने हे घरात पिणे अजिबात खपत नसे. आज केवळ आणि केवळ बारक्यासाठी त्या कबूल झाल्या होत्या.
मंचकरावानी उठून फडताळातून दोन चांदीचे पेले, जे केवळ मदिरेसाठीच वापरत, काढले. पहिला पेला रिता केला दुसरा भरला, काजूचा बकाणा तोंडात भरला.
"हे कशा साठी, बारकेराव?" त्यांनी विचारले.
"काल मी झुकांड्या सोबत तुम्हाला सोडून दारू पिलो. खूप वाईट वाटलं!"
"म्हणून आज हा अट्टाहास केलात?"
" नाही! आज हि माझ्याकडुन शेवटची 'पार्टी'. "
"शेवटची म्हणजे?"
"म्हणजे आता उद्या सकाळी मी येथून जाणार!"
इतक्यात चढली कि काय? का खरच हा 'जातो 'म्हणतोय?
"काय? जाणार?"
"होय! असे किती दिस आश्रितासारखे तुकड मोडायचे?"
त्याचा वाक्यातला 'आश्रितासारखे ' शब्द त्यांना खटकला!
" अहो रहा कि! आमचे बोलणे, नका इतके मनाला लावून घेऊ!"
"नको! लोक नवे ठेवतात. काल झुकांड्या पण ' किती दिस रहाता, आता जवा कि' म्हणत होता. "
म्हणजे झुकांड्या नशेत बरळला कि काय? त्याचा नेम नाही.
"तुम्ही रहाता, आम्ही ठेऊन घेतो. यात झुकांड्याचा कोठे सम्बन्ध येतो?."
"जाऊ द्या दाजी. आता मन उठल. नका अडवू आता. पण एक मागणं हाय !"
"बोला. "
"आमच्या गिरिजाआक्काला सांभाळून घ्या! कधीच अंतर देऊ नका! लहानपणापासून लई सोसलाय तीन! तवा माझा काळ चलता होता. गिरीजा सारख्या चार सहा पोरी होत्या. आमचा तमाशाचा फड पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. पोरींवर वाईट नजर ठिवणारी गिधाड कमी नव्हती. पण मी मध्ये पहाडासारखा उभा असायचो. तमाशाची मूळ उपसली. सगळी वाताहत झाली. गिरीजा भाग्याची. तिला चांगल घर मिळाल! बाकी आता नको ते करत्यात अन पोटाची खळगी भारत्यात! अन माझ काय? ढोलकी शिवाय काय येत नाही! ढोलकी गेली, खंद्या पासून हात गेल्यात आस वाटतय! पार मोकळा -रिकामा झालोय! 'आत्महत्या पाप ' हि शिकवण नसती तर बर झाल असत! सुटका करून घेतली असती ---मागच!"
बारक्या बोलत होता. मंचकराव ऐकत होते. त्यांच्या झुपकेदार मिश्या त्यांच्याच डोळ्यातल्या पाण्याने भिजून चिंब झाल्या होत्या.
किती वेळ कोणास ठावूक बारक्या आपली कर्म कहाणी सांगत होता. मंचकराव बसल्या जागीच झोपले होते.
०००
सूर्यनारायण हातभार वर आला होता. मंचकरावनी तोंड खंगाळले. डोळे अजून चुचुरत होते. धोतराच्या सोग्याने तोंड पुसत गिरिजाबाईनी आणलेला चहाचा कप घेतला.
"बारकेराव, गेले का?" त्यांनी गिरिजाबाईना विचाले.
" सकाळीच गेला. " मंचाकरावनी चहा घेतला. रिकामा कप घेऊन गिरिजाबाई घरात गेल्या. सुपारीचा कातरा तोंडात टाकावा म्हणून ते पानाचा डब्बा पाहूलागले तो मिळेना.
"गिरिजाबाई, आमचे पानदान पाहिलेत का? "
"नाही. काल तर तुमच्या जवळच होता! पहा तुम्ही चुकून फडताळात ठेवला असेल "
त्यांनी फडताळात धुंडाळा घेतला, तेथे पानदान तर नव्हतेच पण ते दोन चांदीचे पेले आणि इतर वस्तू पण नव्हत्या! म्हणजे बेरक्याने ---
बरोबर झुकांड्या सोबत दारू पिताना आता बस्तान हलवण्याची वेळ अली आहे याची जाणीव बारक्याला झाली असणार. ती 'पार्टी ' आपल्या झोपे साठीच होती तर?!
तेव्हड्यात गिरिजाबाई घाबऱ्या होऊन आल्या.
"माझ्या पाटल्या, बोरमाळ अन बांगड्या ----"
"नाहीत! असेच ना?"
"हो --"
"जाऊ द्या गिरिजाबाई!"
"मेल्या बारक्याने तर हे केले नसेल?"
"जाऊ द्या, तुम्ही नका त्रास करून घेऊ! या पिकावर तुम्हास नवे दागिने करून देऊ!"
" तळपट येओ या बारक्याला! मेल्यान घर धून नेल! अहो, असा नव्हता आमचा बारक्या! चोऱ्या -माऱ्या ची नव्हती हो सवय! आमची लाज वाचवताना चारदा डोकं फोडून घेतलं होत यान! मला त्याची हि सवय माहित असती, तर नसता हो घेतला घरात! तुम्ही ताबडतोब पोलिसात जा! बारक्याची तक्रार करा! मेल्याला पडूदेत बेड्या!" गिरिजाबाई रडत रडत बोलत होत्या.
"हो हो गिरिजाबाई आधी तुम्ही शांत व्हा. नको. पोलिसात तक्रार नको! आम्ही ती कदापि करणार नाही! अहो, त्यांनी तुमचे जीवाची पर्वा न करता कितीदा तरी रक्षण केले आहे, तुम्हास त्यांचे कवच लाभले होते. हे तुम्ही विसरत आहेत. त्यांनी जे तुमच्यासाठी आणि म्हणजेच आमच्या गिरिजाबाईंसाठी केले ते पैशात , सोन्या- चांदीत नाही, हो, तोलता येणार! त्यांनी जे दिले त्यामानाने काहीच नेले नाही! तुमच्या पाटल्या साडी रूपाने आणि आमचे चांदीचे पान -दान धोतर, फेट्याच्या रूपाने आपल्यापाशीच आहे! अभागी जीव, जे ढोलक त्यांना वाजवता येत, त्याच आज मोल नाही. असुरक्षततेची भावना त्यांना चोरी करावयास भाग पाडते. उद्याचे म्हातारपण कदाचित त्यांना भीती दाखवत असेल! जाऊ द्या करा त्यांना क्षमा! आमच्यासाठी तरी त्यांना माफ करा! "
विशाल मनाच्या या रांगड्या माणसाला गिरिजाबाई बिलगल्या. मंचकरावच हे रूप त्यांना नवेच होते.

बारक्याने त्यांच्या नावाने गावात किती उधाऱ्या केल्या असतील याचा विचार करत मंचकराव बिलगलेल्या गिरिजाबाईच्या पाठीवरून सांत्वनाचा हात फिरवत राहिले.


इति त्रितिय अध्याय Endam .

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियानची वाट पहात आहे. पुन्हा भेटूच. Bye.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED