Shambharachi Note books and stories free download online pdf in Marathi

शंभराची नोट

उद्धव भयवाळ

औरंगाबाद

शंभराची नोट

रघू कालपासून खूप खुश होता. त्याला कारणही तसेच होते. त्याच्या यमुनामावशीने पुण्याला परत जातांना रघूच्या हातावर शंभर रुपयांची नोट ठेवली होती. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पाच सहा दिवसांकरता यमुनामावशी पुण्याहून पैठणला रघूच्या आईला भेटायला आली होती. येतांना तिने रघूसाठी छान, छान कपडे आणले होते. तसेच रघूच्या, बाराव्या इयत्तेत असणाऱ्या स्नेहाताईला सुद्धा छान ड्रेस आणला होता. रघूला ते सर्वच कपडे खूप आवडले. या चार दिवसांमध्ये रघू सारखा मावशीच्या भोवतीभोवतीच होता. जूनमध्ये शाळा उघडतील तेव्हा रघू आता पाचव्या वर्गातून सहाव्या वर्गात जाणार होता. त्याने त्याची सहाव्या इयत्तेसाठी घेतलेली नवी पुस्तके मावशीला दाखविली. तसेच त्याने मावशीला गावातील आणि बाहेरील नाथमंदीर, त्याचप्रमाणे नागघाट, गणेश घाट वगैरे स्थळे दाखविली. एक दिवस मावशीला घेऊन रघू गोदावरी नदीमध्ये स्नानासाठीसुद्धा गेला होता. या सर्व गोष्टींमुळे मावशीला खूप आनंद झाला होता. मावशीने काल पुण्याला परततांना रघूच्या हातावर ठेवलेली शंभराची नोट रात्री उशाला ठेवूनच रघू झोपला. आज सकाळ होताच रघूने किचनमध्ये जाऊन आईला विचारले,

"आई या शंभर रुपयांचं मी काय आणू?" तेव्हा आईने त्याला जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळले आणि म्हणाली, "तुला जे आवडेल ते आण. खाऊ आण किंवा एखादं छानसं गोष्टीचं पुस्तक आण."

तिथे बाबा चहा पीत बसले होते. ते एका खासगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक होते. त्यांनीही हसून आईच्या बोलण्याला संमती दिली. रघू म्हणाला, "ठीक आहे."

रघू विचारात पडला. त्याने ती नोट आपल्या कंपासपेटीत ठेवली.

थोड्या वेळेनंतर रघूने स्नान उरकून नाश्ता वगैरे केला आणि आईला म्हणाला, "आई मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो. शंभराची नोटसुद्धा सोबत घेतली आहे. परत येतांना माझ्यासाठी काहीतरी छानसं घेऊन येतो."

"जा बाळा, जा. आणि पैसे नीट जपून ठेव." आई म्हणाली. तेव्हा "हो, हो" असे म्हणून रघू उड्या मारीतच एका वेगळ्या आनंदात घराबाहेर पडला. रघू चालत असतांना मनातल्या मनात विचार करीत होता, "या पैशाचं मला काय घेता येईल. आई म्हणाली तसं एखादं छानसं गोष्टीचं पुस्तक घेऊ की काही मिठाई घेऊ?"

असा आपल्याच विचारात चालत असतांना रस्त्याच्या कडेला रघूला एक फाटकी घोंगडी पांघरलेला वृद्ध भिकारी दिसला. "अरे कोणी तरी मला पैसे द्या रे. मी दोन दिवसांपासून उपाशी आहे. मला काही तरी खायला तरी द्या." असे तो म्हणत होता. त्या भिकाऱ्याच्या जवळून त्यावेळी टारगट मुलांचे एक टोळके चालले होते. त्या भिकाऱ्याचे हे आर्त उद्गार ऐकून त्यातील एकालाही त्याची दया आली नाही. उलट तुच्छतेने त्या भिकाऱ्याकडे पाहात, हसत खिदळत ते टोळके निघून गेले. हे सगळे पाहून रघूला खूप वाईट वाटले. त्याला आठवले की, एकदा रात्री आई अचानक आजारी पडल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यासाठीसुद्धा बाबांकडे पैसे नव्हते. तेव्हा बाबा किती अस्वस्थ झाले होते. शेजारच्या काकांना झोपेतून उठवून बाबांनी त्यांना विनंती करून त्यांच्याकडून पैसे आणले तेव्हा कुठे आईला दवाखान्यात नेता आले. हा विचार मनात येताच त्याचा हात खिशातील नोटेकडे गेला. तो ताडताड चालत समोरच्या हॉटेलमध्ये गेला आणि वीस रुपयांची पुरी भाजी आणून त्याने त्या भिकाऱ्यापुढे ठेवली. तेव्हा त्या भिकाऱ्याच्या म्लान चेहऱ्यावर केविलवाणे हसू उमटले. अधाशीपणे तो भिकारी ती पुरी अन् भाजी खाऊ लागला. ते पाहून रघूला खूप समाधान वाटले. आता त्याच्या खिशामध्ये ऐंशी रुपये शिल्लक राहिले होते. तो मनात म्हणाला, "आता माझ्याकडे ऐंशी रुपये अजून शिल्लक आहेत. त्यात माझ्यासाठी मी काहीपण विकत घेऊ शकतो." असे म्हणून तो चालू लागला. तितक्यात त्याचा वर्गमित्र सुरेश त्याच्याकडे येतांना दिसला. सुरेशची आई लोकांच्या घरी पोळ्या लाटून गुजराण करीत असे. सुरेशचे वडील एका गंभीर आजाराने मागेच वारले होते. सुरेश रघूकडे येतांना रडत होता. तो जवळ आल्यावर रघूने त्याला विचारले, "काय झाले? तू का रडतोस?"

तेव्हा सुरेश म्हणाला, "माझी आई तापाने फणफणलीय. त्यामुळे ती आज कामावर जाऊ शकली नाही. डॉक्टरकाकांनी ही औषधी लिहून दिलीत. पण आत्ता आईकडे पैसे नाहीत आणि मेडिकलवाले काका औषधी उधार देईनात."

रघूचा हात पुन्हा खिशाकडे गेला.

"ठीक आहे. चल माझ्यासोबत." असे म्हणून रघू सुरेशला औषधाच्या दुकानात घेऊन गेला. त्याने सुरेशला सर्व औषधे घेऊन दिली. त्या औषधाचे चाळीस रुपये रघूने दुकानदारास दिले. तेव्हा सुरेशने रघूला विचारले, "अरे, इतके पैसे तुझ्याकडे कुठून आले?"

तेव्हा रघू म्हणाला,

"अरे, पुण्याहून माझी मावशी आली होती. पुण्याला परत जातांना तिनेच मला हे पैसे खाऊसाठी दिले. हे ऐकून सुरेशच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने रघूचा हात हातात घेऊन "थँक्स" म्हटले आणि तो घराकडे धावत सुटला.

रघूकडे आता चाळीस रुपये शिल्लक होते. "माझ्यासाठी काय घेऊ? पुस्तकाच्या दुकानात जाऊन एखादे छान पुस्तक घेऊन टाकतो." असा विचार करीत तो पुढे निघाला. तितक्यात त्याला रस्त्याच्या एका बाजूला बांगड्यांचे एक छोटेसे दुकान दिसले. दुपारच्या वेळी त्या काचेच्या रंगीबेरंगी बांगड्या चांगल्या चमचम करीत होत्या. रघूला एकदम त्याच्या लाडक्या स्नेहाताईची आठवण झाली; आणि पटकन त्याच्या डोक्यात एक विचार चमकला, "या उरलेल्या पैशांच्या माझ्या ताईला बांगड्याच घेऊन टाकतो. तिला किती आनंद होईल! पुस्तकाचे नंतर बघता येईल." त्या दुकानाच्या एका कोपऱ्यातील एका उघड्या बॉक्समधील सोनेरी नक्षी असलेल्या लाल बांगड्यांनी रघूचे लक्ष वेधून घेतले. तो त्या दुकानदारास म्हणाला, "काका, त्या लाल बांगड्या दाखवता का जरा? मला माझ्या ताईसाठी हव्या आहेत."

दुकानदाराने त्या बांगड्यांचा बॉक्स त्याच्या हातात दिला. रघूने बांगड्या बघितल्या. त्याला त्या खूप आवडल्या. तो म्हणाला, " मला एक डझन हव्यात. किती पैसे होतील?"

"त्या पन्नास रुपये डझन आहेत." दुकानदार म्हणाला.

"पण काका, माझ्याकडे चाळीसच रुपये आहेत हो." रघूने दुकानदारास सांगितले. दुकानदार म्हणाला, "नाही जमणार." रघू पुन्हा म्हणाला, "द्या ना काका. मला माझ्या ताईसाठी हव्या आहेत त्या. माझ्याकडे एवढेच पैसे आहेत." त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून दुकानदारास काय वाटले कोण जाणे. "ठीक आहे. " असे म्हणून त्या दुकानदाराने एक डझन बांगड्या व्यवस्थित एका बॉक्समध्ये पॅक करून रघूकडे दिल्या. रघूने चाळीस रुपये त्यास दिले आणि " काका, थँक्स" असे म्हणून तो घराकडे निघाला.

घरी पोचताच आईने त्याला बघितले. त्याच्या हातातील बॉक्स पाहून आईने विचारले, "काय खरेदी केलीस रघू?" त्यावेळी बाबाही जवळच होते. तेव्हा तो बॉक्स आईच्या हातात देत रघूने, तो बाहेर गेल्यापासून घरी येईपर्यंत काय काय घडले तो सर्व वृत्तांत आईला आणि बाबांना सांगितला. आईला तर हे सारे ऐकून खूपच आनंद झाला. आई रघूला म्हणाली, "त्या उपाशी वृद्ध भिकाऱ्याची भूक जाणून त्यास तू अन्न दिलेस. त्याचप्रमाणे सुरेशलाही त्याच्या गरजेच्या वेळी मदत केलीस. खूपच छान केलेस. मला खूप आनंद झाला."

"बेटा रघू, मलाही खूप आनंद झाला. असेच प्रत्येकाच्या गरजेच्या वेळी मदतीस धावून जात जा." बाबा म्हणाले. तितक्यात स्नेहाताई आतून आली आणि म्हणाली, "आणि मला तू बांगड्या आणल्यास याचा मलासुद्धा खूप आनंद झाला बरं का, माझ्या छोट्याश्या भाऊराया." आणि सर्वजण खळखळून हसले.

**********

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

गादिया विहार रोड

शहानूरवाडी

औरंगाबाद ४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८

email: ukbhaiwal@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED