पावबाबाचा शाप!---वेताळ कथा suresh kulkarni द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पावबाबाचा शाप!---वेताळ कथा

नाना झिपऱ्या म्हणजे, आडवं डोकं होत! सरळ साधी गोष्ट सुद्धा, वाकड्या मार्गाने करण्यात, याला काय आनंद मिळतो, ते त्यालाच माहित. पण झिपऱ्या हा एक जिवंत माणूस आहे, आणि जिवंत माणसाला अनंत इच्छा असतात. झिपऱ्याला पण आहेत. त्याच्या स्वभावाप्रमाणे, त्याने प्रामाणिक कष्टाच्या मार्गा ऐवजी, वाकडा मार्ग निवडला होता. आपल्या असणाऱ्या आणि भविष्यात उदभवणाऱ्या, सगळ्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला एकच 'सुपर वर' हवा होता! 'वेताळ' प्रसन्न करून, त्याच्या कडून हवा असलेला 'वर' मागून घेण्याचा झिपऱ्याने घाट घातलाआणि आता झेंगट होऊन बसलं. वेताळाला खांद्यावर घेऊन झिपऱ्याला, दर आमोशाला स्मशानापर्यंत 'मौने'च न्यावं लागतंय! समजा एखाद्या आवसेला झिपऱ्याने वेताळाच्या 'ठाण्याला' दांडी मारली, तर---तर वेताळ, 'नॉन पेइंग परमानेंट गेस्ट' म्हणून झिपऱ्याच्या घरी ठाण मांडून बसणार होता! आज आमावस्या असल्याने नाना झिपऱ्याला जाणे भाग होते.
वेताळाच्या 'ठाण्या' वरून, नानाने ते सुकलेले प्रेत, नेहमी प्रमाणे खांद्यावर घेतले. आणि त्याने स्मशानाकडे वाटचाल सुरु केली.
"नानबा, तुझ्या चिकाटीचे मला कौतुक वाटतंय! इतक्या चिकाटीने तू काही काम केले असतेस तर तुझ्या बऱ्याच कामना पूर्ण झाल्या असत्या. तू माझ्या नादी लागून चूक केलीस! असो. जशी तुझी इच्छा, मला काय? फुकटात मोकळ्या हवेत फिरायला मिळतंय!" प्रेतात वेताळाचा संचार झाला होता!
नाना झपाझप पाऊले टाकत निघाला. हा 'संचार' असे पर्यंत, न बोलता स्मशानात नेवून या प्रेताची विधिवत पूजा केली कि, वेताळ प्रसन्न होऊन इच्छित वर देणार होता!
"नाना, तू निवडलेली वाट खडतर आहे. तुझा आणि माझा वेळ सत्कारणी लागावा म्हणून, तुला आज पण एक गोष्ट सांगणार आहे."
नानाने कान टवकारले. कारण हा वेताळ काही तरी पाल्हाळ लावतो आणि मग प्रश्न विचारतो. दुर्लक्ष करून चालत नाही.
वेताळाने आपला डाव्या हाताचा हाडकीआइसकोल्ड पंजा, झिपऱ्याच्या डाव्या कानाला, हेडफोन सारखा लावला! उजव्या कानावर? किंचित वर मान करून, त्याने वेताळाकडे पहिले. त्याचा उजवा हात एंगेज होता. त्या हातात त्याने पेटलेली किंगसाईझ सिगारेट धरली होती!
"तर ऐका नानबा, एक टिनपाट नगर होते. तेथे शंकर आणि शकुंतला नामक जोडपे गुण्या-गोविदाने रहात होते. गुण्या मोठा तर गोविंदा धाकटा मुलगा होता. गुण्या आणि गोविंदा सख्खे भाऊ असल्याने, ते सदैव आपसात भांडत असत. तरी 'शाळा कशी बुडवावी?', याचे फंडे मात्र एकदिलाले ठरवत आणि कार्यान्वित करत असत! शंकर नावाप्रमाणे भोळा सांभ होता. दिवसा 'धूम्रपान' (कधी कधी गांजा विरहित!) सूर्यास्था नन्तर 'अपेयपान!', तरी पैसे उरलेच तर मग, तीनशे एकशे वीसचे 'साधे ' पान! खात असे. येणे प्रकारे तो खाऊन पिऊन सुखी होता! यातून त्या बिचाऱ्याला पोरानं कडे लक्ष द्यायला शुद्ध कोठे होती? दैवी तंद्रीत अडकल्याने त्याचा नाईलाज होता. देवा, अशी वेळ वैऱ्यावर सुद्धा येऊ नये! शिव!शिव!! त्याची अशी 'थकलेल्या बाबाची(करुण) कहाणी' होती! अस्तु!
शकुंतलेने मात्र निरुपरॉय, कनान कौशल, गेला बाजार आशा काळे यांनी सिनेमात रंगवलेल्या 'माया 'चा वसा घेतला होता. शंकररावांचे, त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे संसाराकडे लक्ष नसल्याने, शाकुन्तलेस गुण्या-गोविंदाचा भार उचलणे भाग होते. शिवाय शंकरावाचा(शंकऱ्या, मेल्या, मुडद्याचा) अतिरिक्त 'भार ' होताच! जळला मेला बाईचा जल्म!

तर या गुण्या-गोविंदा साठी, ती माऊली चार घरचे (त्यात तिचे सुद्धा एक घर होतेच!) धुणी-भांडी आणि बरेच खाडे करायची! तिची मिळकत ती किती असणार? तरी तिला लिपस्टिक पावडर पुरते मिळतच होते! त्यामुळे तिला भविष्याची काळजी नेहमीच असायची. गुण्या-गोविंदानी खूप शिकावं, मोठं व्हावं, खोऱ्याने पैसा ओढावा, असे तिला वाटे. वरचेवर खर्च वाढणार होता. आज नाही, पण उतार वयात केस पांढरे होणार होते, त्या साठी कलप लागणार होता. त्याचा खर्च वाढणारच होता. शिवाय ब्युटी पार्लरचे रेट्स तर गगनाला भिडत आहेत! सगळी दुखणी मेली बाईच्याच नशिबाला का येत असतील? जळाला मेला बाईचा जल्म!

गुण्या-गोविंदासाठी तिने सगळ्या देवांना नवस केले, वडा-पिंपळाला प्रदक्षणा घातल्या, गंडे -दोरे-ताईत -रंगीत खडे झाले, पत्रिका, शकुन, पोपट वाली कार्ड, टारो कार्ड, झाले. काळी दाढी,पांढरी दाढी,पांढरी साडी,केशरी कफनीतले, बाबा-माई-आई! हेही झाले. पण काहीच फरक पडला नाही, त्यांच्यात किंवा गुण्या-गोविंदात! फक्त या घाईत गुण्या -गोविंदाला शाळेत पाठवायचे तेव्हडे बारीक मागेच राहिले! हिय्या करून एकदा तिने, त्या दोन भूतान शाळेत घातलेच. गुण्या-गोविंदानी शाळेतहि पण नाव काढलेच! शिक्षकांना उणे मार्क देण्याची पाळी येऊ लागली, मग शाळेनेच नाव काढून टाकली! "तुमच्या मुलात(शाळेत) 'नाव ठेवण्या सारखे' काही नाही!" हा अभिप्राय शाळेच्या हेडमास्तरांनी दिला होता!

आणि एक दिवस ती बातमी शकुंतलेच्या कानावर आली. गावात एक बाबा आले होते. 'पाव बाबा!' सिद्ध पुरुष! खूप कोपीष्टआहेत. पण ते पटकन पावतात आणि भक्तांच्या अडचणी दूर करतात! असेही तिच्या कानावर आले होते. शकुंतला हि संधी सोडणार नव्हती. गुण्या-गोविंदा साठी तीने 'बाबा'च्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. आज मंगळवार, गुरुवार तिने या कामासाठी मुक्करर केला. दोन दिवस 'तयारी' साठी लागणारच होते. फेशियल, हेयरकॅन्डीशीनिंग, वॅक्सिन्ग यात एक दिवस जाणार होता. गुरुवार असल्याने तिने येल्लो कलरची थीम निवडली होती. पिवळी साडी, पिवळा ब्लाऊज(स्लीव्ह लेस), बिंदी मात्र ती लालच लावणार होती, कन्ट्रास्ट असल्याने उठून दिसणार होती. शिवाय नेवैद्या साठी केळी, पिवळे धम्मक हापूस आंबे, आणि पिवळसर झाक असलेले पेढे! शंकररावांच्याच्या दोन पॅंटी आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या विकून पिवळी सॅंडल घ्यावी लागणार होती, हे मात्र वेळखाऊ काम होते. शिवाय तिने एक टप्पोरा पिवळा गुलाब हेरून ठेवला होता. फक्त शेजारच्या म्हाताऱ्याकडे थोडे हसून पाहिले की तो फुलंच काय? कुंडी सगट झाडच देणार होता! लुब्रा मेला! पण गुण्या-गोविंदा साठी करावे लागणार होते!

अश्या प्रकारे तयारी केल्यावर तो पिवळा गुरुवार उगवला. ठरल्या वेळी, 'पितांबरी' शकुंतला, सर्व तयारीनिशी, पूजेचे साहित्य घेऊन निघाली, तेव्हा कॉलनीतल्या ('कॉलनी' कसली? ती एक बोळच होती! पण शकुंतला मात्र त्याला कॉलनीच म्हणायची.) बायांनी नाक मुरडली. 'निघाली, मेली नटवी कावीळ!' कोणीतरी टोमणा मारला. तिला वाईट वाटले. गुण्या-गोविंदासाठी ती असले अपमान गटागटा गिळायची! कधी डोळ्यात पाण्याचा टिपूस येऊ द्यायची नाही!(मेकप खराब होतो ना त्याने!) हे असले जगणे असते एखादीच्या! जळला मेला बाईचा जल्म!

जत्रेतल्या सर्कशीच्या तंबू सारख्या, भव्य शामियान्यात, 'पाव बाबाच्या' दर्शनाची, आज विशेष सोय केली होती. आज गुरुवार असल्याने दर्शनोउत्सुक भक्तांची संख्या वाढणार होती. शामियाना भर गाद्या -गिरद्या टाकलेल्या होत्या. वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी सुगंधीदरवळ पसरत रहावा याची सोया होती. राजेशाही पद्धतीने तो पूर्ण शामियाना सजवलेला होता. ए.सी. मुळे आत सुखद गारवा होता. ठिकठिकाणी फुलांची आरास केलेली होती. एका उच्चं, चांदीच्या पत्र्यात मढवलेल्या आणि मखमली बैठक असलेल्या, सिहासना सारख्या दिसणाऱ्या आसनावर, ते विरक्त 'पाव बाबा' बसले होते.

शकुंतलेने त्या शामियान्यात पाऊल ठेवले आणि तिला एकदम हायसे वाटले. बरे झाले ए.सी. आहे, नसता घामाने मेकप वाहून गेला असता! ती दर्शन रांगेत पूजेचे ताट घेऊन उभी राहिली. क्षणा क्षणाला भक्तांची आवक वाढत होती. तेव्हड्यात महाराजांचे काही शिष्य धावून शकुंतलेच्या दिशेने आले. तिच्या आसपास घुटमळणाऱ्या पाच सहा 'जेष्ठ नागरिकांना' त्यांनी हुसकावून लावले आणि आपणच उभे राहिले! अल्पावधीतच तिचा नंबर लागला.
'पाव बाबा' उच्चासनावर विराजमान होते. त्यांच्या मूळच्या काळ्या गुळाच्या रंगाच्या कांतीला, ती रेशमी पिवळी वस्त्रे उठून दिसत होती. कन्ट्रास्ट मॅचींग! शकुंतलेच्या मनात येऊनच गेले. तिने डोक्यावर पदर घेतला. थोडा तोकडाच पडला, पण तिने गेलं निभावून. फळांचे ताट बाजूला ठेवले आणि तिने महाराजांच्या पायावर डोके ठेवले.
"शुभम भवतु !काय समस्या आहे?" महाराजांनी मधाळ वाणीत आशिष दिला आणि विचारले. महाराजांच्या भक्तगणात कोणी तरी बोर खाऊन आलं असावं असा संशय शकुंतलेस आला, कारण सौम्य दारूचा वास तिच्या जवळूनच येत होता.
"महाराज, गुण्या-गोविंदा माझी मुलं आहेत. अजून लहान आहेत, थोडी हूड आहेत. पण चांगली आहेत हो! त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं हि कामना आहे माझी!" तिने याचना केली.
" आमची दक्षिणा आणि नेवैद्य ठेवा! मार्ग सांगेन!" महाराज म्हणाले.
शकुंतलेने तत्परतेने फळांचा आणि पेढ्यांचा नेवैद्य महाराजान समोर ठेवला. काही तरी बिनसले!
"संपSSS त !"महाराज रागाने ओरडले!
एक स्थुलोत्तम शिष्य, त्याला जमेलत्या लगबगीने महाराजा जवळ आला.
"काय झालाय महाराज?" त्याने विचारले.
"संपत! आधी ते ---ते ताट आमच्या नजरे समोरून हटाव!" रागामुळे महाराजांचा आवाज थरथरत होता!
संपतचे लक्ष शकुंतलेने ठेवलेल्या नेवैद्याच्या ताटाकडे गेले.
"बापरे! हा काय अनर्थ केलात बाई? " संपतने चटकन त्या ताटावर आपल्या खांद्यावरील पंचा टाकला आणि ताट झाकून टाकले!
शकुंतला कावरी बावरी झाली. काय झालंय? तिला कळेना. नेवैद्यातले कुठलेच फळ किडके-कुजके नव्हते. ताज्या फळांन पेक्षा शुद्ध सात्विक नेवैद्य दुसरा कोणता असणार? मग महाराज का कोपले?
"महाराज, माझे काही चुकले काय?" धीर गोळाकरून तिने विचारले.
महाराजांनी आपले तोंड दक्षिणे कडे फिरवले! संपतला तो अपशकून वाटला.
"बाई, हे, 'पाव बाबा' आहेत. याना फक्त पावपासून बनवलेल्या पदार्थाचा नेवैद्य लागतो! पिझा-बर्गर -सँडविच-पाव भाजी-वडापाव. अगदी बटर पाव सुद्धा चालला असता! तुम्ही बाहेर लावलेली आमची विशेष सूचना वाचली नाही का? पण आता काय उपयोग? आता ते जाऊ द्या, तुम्ही आणलेली दक्षिणा तेव्हडी समोरच्या तबकात टाका! एखादा वेळेस तुमची दक्षिणा पाहून महाराज शांत होतील. नसता आशीर्वादा ऐवजी, क्रोधिष्ट महाराज शाप देतील! आशीर्वादाचा मला कधी अनुभव आलेला नाही, पण शाप मात्र खरे झालेले पाहिलेत!" संपतने शकुंतलेस मार्गदर्शन केले.
शकुंतला खूप घाबरली होती. आजूबाजूचे शिष्य, भक्त तल्लीन होऊन हा तमाशा पहात होते. निरव शांतता पसरली होती! तिने ब्लाउज मध्ये लपवलेली, चार घड्या केलेली शंभराची नोट महाराजांच्या समोरच्या तबकात टाकली. ती टाकताना तिचा हात थरथरला. कारण गोविंदा दोन दिवसान पासून आईस्क्रीम मागत होता. त्या साठी तिने ती शंभराची नोट, शंकरराव पासून लपवून ठेवली होती.
" आग, कैदाशिणी, तू मला काय भिकारी समाजलीस कि काय? का हॉटेलचा वेटर? हि जुनी रद्दी शंभराची नोट मला दक्षिणा म्हणून देतेस? तू माझा अपमान केलास! याची तुला शिक्षा झालीच पाहिजे!"
तो काळा गूळ पिवळ्या वस्त्रात थडथडत होता! शेजारच्या कमंडलू मधील पसाभर पाणी महाराजांनी आपल्या उजव्या हातात ओतून घेतले.
दिग्मूढ झालेली शकुंतला हतजोडून अधोमुख होऊन समोर बसली होती. हताशपणे!
"ऐक, पापीणे! लक्ष पूर्वक ऐक! माझी शाप वाणी! तुझे गुण्या आणि गोविंदा, खूप शिकतील! मोठ्या मोठ्या उच्चं पदव्या मिळवतील! आणि अमेरिकेत जातील!-----" अशी शापवाणी उच्चारून महाराजांनी हातातील पाणी, सप्पकन शकुंतलेच्या तोंडावर मारले आणि आपले आसन सोडून निघून गेले! महाराजच नाहीत म्हणून, काही क्षणात तो मंडप रिकामा झाला, पण रिता झाला नव्हता! शकुंतला एकटीच धायमोकलून रडत होती, तिच्या आक्रोशाने तो मंडप काठोकाठ भरला होता!
"नका, असा शाप देऊ, महाराज! देवा, काय पाप केलं होत रे मी? म्हणून हा दिवस मला दाखवलास!! जळाला मेला या माईचा जल्म!!"
येथवर कथा सांगून वेताळ थांबला.
"नानबा, अरे, त्या महाराजाने जे दिले तेच तर, शकुंतला मागायला आली होती. गुण्या-गोविंदान शिकावं, मोठं व्हावं! मग ती का रडतीयय? माझ्या प्रश्नाचे उत्तर माहित असून हि तू दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर छकलें होऊन, तुझ्याच पायावर पडतील!" वेताळाने जाणीव करून दिली.
"वेताळा, मुलांचं कल्याण व्हावं हि कामना घेऊन शकुंतला आली होती हे खरं आहे! स्वतःच वाईट व्हावं म्हणून नाही!! तुला माहित आहे, आजकाल, एक वेळ स्वर्गात गेलेला परत येईल, अमेरिकेत गेलेला तरुण परतत नाही! त्याच दुःख तेच मायबाप जाणो, ज्यांची मुलं परदेशात गेलीत! या परदेश प्रलोभनाने किती म्हाताऱ्यांचा आधार गिळलाय कोणास ठाऊक? मायबाप मुलावर कधीच हक्क सांगत नाहीत, पण आशा मात्र असते, कि किमान मरताना ती नजरेसमोर असावीत इतकंच!"
झिपऱ्याने मौन मोडले. वेताळ निघून गेला. पण नाना झिपरे आज मात्र, तेथेच एका दगडावर बसून राहिला. त्याचाहि पप्या आठवीत होता. हुशार आहे पोरग. ते पण जाईल एक दिवस ---- दूर, आपण कसे राहूशकू त्याच्या शिवाय? या विचाराने त्याचे मन भरून आले होते.


सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.