Kayakalp---Purvardh books and stories free download online pdf in Marathi

कायाकल्प --पूर्वार्ध

आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं.
कौसल्याबाई वय वर्ष पंच्चावन. सुखवस्तू घरातील. नवरा लवकर गेला. शरयूच -मुलीचं-करियर घडवलं. हाल अपेष्टा सोसल्या. आता त्या तश्या सुखात होत्या. शरयू न्यूयार्कला होती. तिची काळजी नव्हती. तरी त्यांना एक खन्त होतीच. फक्त पंच्चावनीत त्यांच्या चेहऱ्यावर, सुरकुत्यांनी जाळे विणायला सुरवात केली होती! कंबरदुखी, गुडघेदुखी, थकवा, चालतानाची लागणारी धाप या व्यथा त्यांनी स्वीकारल्या होत्या. पण अकाली झालेला म्हातारा चेहरा! तो त्यांना नको होता! त्यांच्याच वयाच्या त्यांच्या मैत्रिणी, योगा, जिम, डाएट, काय काय करून मस्त मेंटेन करून होत्या. आहेत त्या पेक्षा, चार सहा वर्षांनी तरुण दिसायच्या. त्यांना काही टिप्स विचारल्या तर म्हणायच्या 'अग, इतकं काय त्या चार सुरकुत्यांचं मनाला लावून घेतसे? वयोमानाप्रमाणे हे होतच. अजून दहा एक वर्षांनी, आम्हाला पण हे फेस करावंच लागणारच आहे! ' चोम्बड्या मेल्या! सहानुभूतीच्या नावाखाली -तू दहा वर्षांनी बुड्डी दिसतेस -हेच सुचायच्या! पण शरीने अमेरिकेतून डॉ. राजेंचा पत्ता पाठवला होता, दोन वर्षा खाली. तिनेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. आणि त्यांनी डॉ. राजेंची ट्रीटमेंट सुरु केली होती. सावकाश का होईना, त्यांच्या कायाकल्पास सुरवात झाली होती. नो जिम, नो योगा, नो डाएट! फक्त एक इंजेक्शन मानेच्या मागे! ते हि तीन महिन्यातून एकदा!
०००
डॉ. राजे. अस्ताव्यस्त केसांचा, उंच आणि स्लिम, गबाळा राहणी असणारा माणूस! बारीक सोनेरी काडीच्या चष्म्यातून लुकलुकणारे निरागस निळसर डोळे! पण हा साठीतला गृहस्थ, त्याच्या म्हणजे -डर्माकोलॉजितला 'बाप' माणूस! एक प्रस्त! जिनियस! आणि संशोधक!
नेहमीचे स्किन सॅम्पल, आणि ते मानेतील इंजक्शन देऊन झाल्यावर, डॉ. राजेंनी कौसल्याबाईंच्या हातावरच्या आणि डोळ्या जवळच्या सुकुत्यांचं निरीक्षण करून पाहिलं. आणि समाधानाने मान हलवली. नजरेत न भरणारी असली तरी, प्रगती होतीच. आज त्यांनी मुद्दाम आज जरा ज्यास्त कॉन्सन्ट्रेशनचा डोस दिला होता. जेणेकरून रिझल्ट लवकर मिळतील.
"कौसल्याबाई, तुम्हाला या तीन महिन्यात काही बदल वाटतोय का?"
"हो तर! मी ते सांगणारच आहे. माझे पाय पाघरुणा बाहेर जातात हल्ली!"
"अजून?" काय सांगावं, हे हि या बाईला काळात नाही, अशा नजरेने पहात डॉक्टरांनी विचारले.
"मला, न काही तरी वेगळंच वाटतंय!"
" म्हणजे? मला तर तुमच्यात काहीच वेगळं दिसत नाही."
"कसे दिसेल? मला आतून काहीतरी बदलत असल्या सारखे वाटतंय!"
"नक्की काय वाटतंय, सांगू शकाल?"
"मला न हल्ली, पूर्वी सारखं थकायला होत नाही!" हि सिमटम पॉसिटीव्ह असली तरी सायकॉलॉजिकल असावी, म्हाणून डॉक्टरांनी दुर्लक्ष केले.
"मग चांगलंच आहे कि!"
"अजून, मला पूर्वी पेक्षा खूप एनर्जीटिक वाटतंय! गुडघेदुखी -कंबरदुखी पळून गेलीयय! तुमची औषध लागू पडताहेत! चेहरा पण जरा बरा दिसतोय!"
"ठीक आहे. पण फार स्ट्रेनिस म्हणजे थकवणार काही करू नका. कारण तुमचे हार्ट खूप वीक आहे. वर मधुमेह! तेव्हा जपून रहा."
कौसल्याबाई निघून गेल्या, त्या दिशेला पहात, 'वेडी बाई!' ते स्वतःशीच पुटपुटले. कारण ते जी ट्रीटमेंट देत होते, त्यात फक्त त्वचेच्या संबंधित औषधे होती.
त्वचा हि शरीरातील बदलाशी संबंधित असते. वय वाढेल तसे शरीरातील अवयव क्षीण होत जातात. मग बाहय कातडीवरही, जरा किंवा झुरळया पडायला सुरवात होते. माणसाचा चेहरा 'म्हातारा' दिसायला लागतो. हे नैसर्गिकच असते. जर शरीरातील अवयवांचा आणि त्वचेचा असलेला संबंध तोडता आला तर?त्वचेचे वय थांबवता येईल. पुराणांतील वरा प्रमाणे माणूस 'अजरामर' नाही झाला तरी, 'अजर ' मात्र नक्की होवू शकेल! आणि यावरच डॉ. राजेंचे गुप्त संशोधन गेल्या दहा वर्षांपासून चालू होते! त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येत होते! त्यांनी एक हार्मोन तयार केले होते. ते एकदा पाठीचा कणा आणि कवटीच्या जोडातून मेंदूत सोडले कि ते मेंदूवर आपला आमल सुरु करणार होते. मेंदू शरीरसंचलन करताना, त्वचेस न बदलण्याचे संकेत देणार होते! हे हार्मोन टप्या -टप्याने देत एका ठराविक वया पर्यंत त्वचा आली कि थांबायचे होते.
०००
मॉर्निगवॉक करून आलेलं डॉ. राजे आपले स्पोर्टशूज काढत असताना त्यांचा फोन वाजला. कौसल्याबाई? या वेळेस? आणि तेही पर्सनल फोनवर?
"हा, बोला कौसल्याबाई. आज सकाळीच? तेही माझ्या पर्सनल नंबरवर? काही विशेष?"
"सॉरी डॉक्टर, पण एक गोष्ट आत्ता माझ्या निदर्शनास आलीय. ती तुमच्या कानावर घालावी म्हणून फोन केला."
"काय?"
"माझ्या डोळ्या शेजारच्या त्या तीन सुरकुत्या अस्पष्ट झाल्यात!"
डोस देऊन आठवडाही झाला नाही अन परिणाम सुरु झाला? क्षणभर डॉक्टर विचारात पडले.
"अहो, सकाळी चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स असतात, त्वचा आरद्र असते, त्यामुळे सुरकुत्या क्षीण दिसू शकतात! रात्री झोपताना पहा! अन हो, आत्ताचा एक सेल्फी काढून ठेवा! रात्रीची पण काढा!"
"काय म्हणता? सेल्फी काढू? अन त्याच काय करू?"
"मला पाठवा!"
"ई SSS श!!" कसल्याबाई फोनवर लाजल्या.
"अरे देवा! अहो मला, झाला असेल तर, तो बदल कळवा, म्हणून सेल्फी पाठवा म्हणतोय!" खरच हि बया म्हणजे कठीण काम होते.
०००
सकाळचा चहा झाला होता. कौसल्याबाईंनी स्वतःला समोरच्या पूर्णाकृती आरश्यात न्याहाळलं. आरशाच्या वरच्या चौकटीला त्यांचे प्रतिबिंब टेकले होते. पूर्वी दोन बोटांची फट रहायची! त्यांनी पुन्हा निरखून पहिले. बरोबर! पूर्वी कंबरदुखीमुळे त्या नकळत किंचित वाकून उभ्या राहत आणि चालत. आता तो त्रास नसल्याने त्यांच्या पाठीचा कणा ताठ झाला होता! डॉ. राजे म्हणजे साक्षात 'अश्विनीकुमार' होते! थँक्स डॉक्टर!
त्यांनी माळ्यावरचे, शरीने पाठवलेले स्पोर्टशूज काढले. धूळ झटकली, आणि ते पायात घालून त्या घराबाहेर पडल्या. हे शूज घातल्यावर त्यांना एकदम कॉलेजचे दिवस आठवले. रनिंगमध्ये मिळालेली असंख्य मेडल्स आणि त्या निमित्याने झालेले कौतुक पण आठवले! ते सोनेरी दिवस! तो 'त्याचा' उबदार सहवास! कुठे असेल सुरश्या, कोणास ठाऊक? पुन्हा ते दिवस परत यावेत, असे त्यांना प्रकर्षाने वाटले. किती तरी दिवसांनी, त्या अश्या सकाळच्या मोकळ्या हवेत निघाल्या होत्या. त्यांच्या सत्तर फ्लॅटच्या इमारती भोवती एक छोटासा जॉगिंग ट्राक होता. त्यांनी चार पावलं थोडेसे भरभर चालून पहिले. काही त्रास झाला नाही.
"हाय, कौशल्यकाकू! आज एकदम फिरायला?" शेजारची मंजिरी, हाय करून जॉग करत पुढे निघून गेली.
पुन्हा त्यांनी आठ दहा पावले जरा जोरात चालून पहिले. नो प्रॉब्लेम! पर्स मध्ये सॉरबिटॉटची गोळी असल्याची खात्री करून घेतली. वाटला त्रास तर घेऊ. थोडं जॉग करूयात! त्या जॉगिंग करून घरी आल्या तेव्हा तासभर उलटून गेला होता! थकवा वाटत नव्हता, उलट फ्रेश वाटत होते! उद्या रनिंग? पाहू करून! त्यांनी मनाशी ठरवून टाकले.
०००
डॉ. राजे डोळे फाडून कौसल्याबाईंनी पाठवल्या सेल्फी आहेत होते. तेव्हड्यात रोजी -त्यांची पीए -कुरियरने आलेले मुंबई आणि कलकत्ता लॅबचे कौसल्याबाईंचे स्किन रिपोर्ट घेऊन आली. ते मुद्दाम रिपोर्ट्स कुरियरने मागवत. कारण आजून त्यांचं संशोधन 'ऑफ लाईनच'ठेवायचे होते.
" सर, काय इतकं त्या मोबाईलवर पहाताय?" रोजीने विचारले.
"त्या कौशल्याबाईंनी त्यांच्या 'सेल्फी ' पाठवल्यात, त्या पहात होतो!" म्हातारा चळावला कि काय?
डॉक्टरांना बोलण्यात काहीतरी गल्लत झाल्याचे रोजीच्या चेहऱ्यावरून कळले.
"नाही! म्हणजे मीच ते मागितले होते!" अजून गैरसमज! जाऊ दे. त्यांनी रोजीला फार स्पष्टीकरण देण्याचे टाळले.
"रोजी, अशात म्हणजे, आपली ट्रीटमेंट सुरु केल्या पासून तुला त्या कौशल्याबाईत काही फरक जाणवतोय का?"
"हो! त्या हल्ली खूप ऍक्टिव्ह वाटतात. स्किन खूप फेयर वाटतीय, आणि त्यांचा आवाज आधी थोडा खर्जात होता, आत्ता तो खरखरे पण जाणवत नाही!"
" थँक्स रोजी! यु मे गो!"
रोजी गेल्याची खात्री केल्यावर, त्यांनी नुकत्याच आलेल्या स्किन रिपोर्टमध्ये डोके घातले. अधून मधून ते कौसल्याबाईंची सेल्फी पहात होते. बाई बावळट होती. पण खरे बोलत होती! खरेच तिच्या कपाळावरली आणि डोळ्याच्या शेजारच्या सुरुकुत्या साठ टक्क्यांनी कमी झाल्या होत्या! शिवाय मुंबई रिपोर्ट प्रमाणे त्यांच्या कातडीचे वय अठ्ठेचाळी होते, तर कलकत्ता रिपोर्ट सत्तेचाळीस दाखवत होते! हा वैज्ञानिक पुरावा होता! ट्रीटमेंट सुरु केली तेव्हा दोन्ही लॅबचे रोपोर्ट पन्नाशी दाखवत होते! म्हणजे 'अजरत्वचा फार्मुला' हाती आला होता! आता काय? रिसर्च पेपर ऑर्गनाईझ करून लिहणे, मेडिकल मॅगझिनच्या देणे, मेडिकल कॉन्फरन्सेस मध्ये पेपर वाचणे, चर्चा तर होणारच, एखादे वेळेस -नोबल पण पदरी पडेल! जगभरातील औषध कंपन्या मागे लागणार, प्रसिद्धी, नावलौकिक, अन पैसाच - पैसा !!!- डॉक्टर विचारात गढून गेले.
०००
नेहमीचे रुटीन चेकिंग आणि स्किन सॅम्पल दिल्यावर कौसल्याबाई या तीन महिन्यात झालेला बदल डॉक्टरांना सांगत होत्या. त्याची त्वचा खूप फेयर दिसत होती, आणि आवाजात गोडवा आला होता, हे रोजीचे निरीक्षण खरे होते. पण त्या, आज जे सांगत होत्या त्यावर डॉक्टरांचा विश्वास बसणे शक्यच नव्हते.
"तुम्ही जे सांगताय त्यावर कसा विश्वास ठेवू?"
"अहो, इतकी आनंदाची बातमी आहे, आणि तुम्ही पुरावा मागताय?"
"अहो, तुम्ही रोज चार किलोमीटर, चालता किंवा जॉगिंग नाही तर रनिंग करता! एक हार्ट प्रॉब्लेम असणारी, छप्पन वर्षाची बाई, कसलाही सराव नसताना एक दिवस सकाळी उठून रनींगला जाते! यावर कोण विश्वास ठेवेल?"
कौशल्याबाईंनी शांतपणे मोबाईल काढला. त्यावरील फिटबीट हेल्थबॅन्डचे ऍपमधील रिझल्ट ओपन केले, आणि मोबाईल डॉक्टरांना दिला. गेला महिनाभराचे त्यावर, डेली स्टेप्स, रनिंग डेटा, जिने किती चढ उतार केले, पीकलेव्हलला असलेला हार्ट बिटिंग, हा सगळा पुरावा कौसल्याबाईंच्या बोलण्याचे समर्थन करत होता! हि बाई आपल्याला चिट तर करत नाही ना? हा एक वेडगळ विचार डॉक्टरांच्या मनात येऊन गेला.
डॉक्टरांकडून मोबाईल परत घेवून कौसल्याबाई 'बाय' करून निघण्याच्या बेतात असताना, अचानक डॉक्टरांना ती गोष्ट खटकली.
"कौशल्याबाई, थोडे ऑड वाटेल, पण विचारतो, तुमचे केस खूप सिल्की आणि शायनिंग दिसताहेत,हल्ली तुम्ही कोणता हेयर डाय वापरता?" ट्रीटमेंट साठी आल्या तेव्हा, त्याचे केस पिकल्याच डॉक्टररानी पाहिलं होत.
" गेल्या दोन महिन्या पासून मी डाय वापरायचं सोडून दिलंय! माझे केस नैसर्गिक रित्या काळे होत आहेत!" क्षणभर डॉक्टरांच्या डोळ्यात रोखून पहात त्या म्हणाल्या आणि झटक्यात निघून गेल्या!
न्याचुरली केस काळे? हा, बरोबरच आहे! डोक्याची सुद्धा त्वचाच कि, त्यात हि बदल होणारच. सहाजिकच हेयर फॉलिकल्स डार्क पिगमेंट तयार करत असतील. केस काळे होणे अपेक्षितच होत. खरे तर कौशल्याबाई अकाली वृद्धत्वाची समस्या घेऊन त्यांच्या कडे आल्या होत्या. आणि डॉक्टरांनी फक्त आणि फक्त त्याचीच ट्रीटमेंट सुरु केली होती. हि चपळता, वाढता स्टॅमिना, कम्बर आणि गुडघेदुखी नाहीशी होणं, ते रनिंग, हे हे सारे अपिक्षित नसलेले बदल होते! काय होतंय हे दिसत होत, पण का होतय हे कळत नव्हतं! आपलं काही चुकतंय का? या विचारात डॉक्टरअसताना, अचानक कौशल्याबाई परत आल्या.
"सॉरी डॉक्टर, माझी बॅग चुकून येथेच राहिली म्हणून यावं लागलं." त्या बसल्या होत्या त्या खुर्चीच्या पायाशी ठेवलेली पिशवी त्यांनी उचलली. घाईतउचलताना पिशवीचा एकच बंद हाती आल्याने, पिशवीतील वस्तू जमिनीवर सांडल्या. त्या वस्तू परत पिशवीत भरताना, एका वस्तूने डॉक्टरांचे लक्ष वेधून घेतले.
"शरयू आली आहे का ?" त्यांनी विचारले.
" नाही, का?"
" मग --- ते सॅनिटरी नॅपकिन्स?" डॉक्टरांनी अडखळत विचारले.
"माझ्या साठीच! काल थोडं लागल्या सारखं वाटलं!" कौसल्याबाई जाताजाता म्हणाल्या.
डॉक्टर मात्र वेड्या सारखे त्या गेल्या त्या दिशेला पहातच राहिले!
"सर, काय बाई आहे?" रोजीच्या प्रश्नाने डॉक्टर भानावर आले.
"काय झालं?"
"सर, कौशल्याबाईंना हार्ट प्रॉब्लेम आहे ना?"
"हो. काय झालं?"
"मघाशी त्या, लिफ्ट बंद होती म्हणून चार मजले पायऱ्याचढून वर आल्यात!"
"काय?" अविश्वासाने डॉक्टर उद्गारले.
०००
कौसल्याबाईंच्या नुकत्याच आलेल्या स्किन रिपोर्टसनी डॉक्टरांची 'काहीतरी चुकतंय,' हि शंका अधिक दृढ केली. त्या रिपोर्ट नुसार सॅम्पल स्कीनचं वय होते चाळीस! त्वचेचं वय थांबणे अपेक्षित असताना, ते कमी होत असल्याचे संकेत मिळत होते! काही दिवसापूर्वी झालेल्या आनंदाची जागा आता काळजीने घेतली होती. हार्मोन प्रोसेसची पुन्हा खातरजमा करणे गरजेचे होते. काहीतरी चुकत होते एव्हडे मात्र खरे होते.
त्यांनी तडक आपल्या बंगल्यातले ग्यारेज गाठले. त्याच्या बेसमेंट मध्ये त्यांच्या लॅबचा पसारा होता. त्यांनी लॅब अनलॉक केली. आत नेहमीचेच वातावरण होते. नेहमी प्रमाणे, आतील इलेकट्रोनिक्स मशीनरीची असेंब्ली, एका लयीत आणि मंदपणे धडधडत होती. एका कोपऱ्यात 'जुही ' आणि 'रंभा ', या दोन माकडिणीनचा पिंजरा होता. त्या हार्मोनचा प्रयोग त्यांच्यावर यशस्वी झाला होता. त्या नॉर्मल होत्या. कौसल्याबाईन सोबत जुही आणि रंभेला पण ते 'तो ' स्किन अँटीएजिंगचे हार्मोन देत होते. त्यांच्या कातडीचे वय गेल्या सात वर्षांपासून वाढले नव्हते. मग मानवी शरीराचा प्रतिसाद का विपरीत येत होता?
डॉक्टरांनी सर्वप्रथम चार दिवसाखाली कौसल्याबाईंना दिलेल्या लॉटमधले हार्मोन अंपुल रेडिएशन साठी ठेवले होते, ते मशीन मधून काढले. 'जुही'ला पॅरोलाईज करून, तिच्या मानेत टोचले. तिला तिच्या पिंजऱ्यात अलगद ठेवून दिले. मग त्यांनी मशीनमध्ये वापरले जाणारे, बायोइन्पुट्स चेक केले. सर्व स्पेसिफिकेशन परफेक्ट होते, अगदी नॅनो डिजिट पर्यंत! मग त्यांनी त्या सोफिस्टिकेटेड असेंब्लीच प्रत्येक पार्ट काळजी पूर्वक तपासला. कोठे ओव्हरफ्लो किंवा लिकेज नव्हते. सगळंच व्यवस्थित होत. मग असं का व्हावं? ते विचार मग्न होऊन, ठिकठिकाणी जोडलेल्या डाटा प्रोसेसिंगच्या इलेकट्रोनिस इंडिकेटरच्या लुकलुकत्या दिव्यांकडे पहात राहिले. मेकॅनिकल लूप होत तर दिसत नव्हता, पण एखादा सॉफ्टवेयर डिफेक्ट असेल तर?
त्यांनी ती असेम्ब्ली, ज्या कंपनीने त्यांच्या साठी स्पेसिफिकली बनवली होती, तिला फोन करून आपली शंका बोलून दाखवली. त्याच दिवशी कंपनीचे दोन तरुण तंत्रज्ञ तातडीने फ्लाईट मध्ये बसले होते.
काही हि झाले तरी या हार्मोनचा ऍंटीडोस तयार करणे गरजेचे होते. कौसल्याबाईंना दिलेल्या डोसमध्ये काही तरी बिनसले असावे याची खात्री आता डॉक्टरांना वाटू लागली होती. आणि तसेही कुठल्याही मेडिसिनचा अँटीडोस गरजेचा असतो.
०००
डॉ. राजे क्लिनिकला आल्याबरोबर त्यांनी रोजीला इंटरकॉम करून बोलावून घेतले.
"रोजी, हि यादी. यातील सर्व साहित्य ताबडतोब मागवून घे!"
रोजीने ती यादी नजरेखालून घातली. त्यात क्वचित लागणारी आणि अतिशय महागडी औषधे होते. त्यातली काही ड्रग्स तर, डॉक्टरांनी गेल्या पाच वर्षात एकदाही वापरलेली नव्हती!
"सर, यातील बहुतेक ड्रग्स आपल्याला लागत नाहीत. खूप कॉस्टली आहेत म्हणून विचारतीयय!"
"रोजी, यु नो, आपण जे अँटीएजिंग स्किन हार्मोन बनवलाय, त्याचा अँटीडोस तयार करायचा आहे. त्यासाठी हे ड्रग्स गरजेचे आहेत."
"अँटी डोस कशाला? ते तर खूप सेफ आहे! आपण खूप काटेकोर चाचण्या घेतल्या आहेत!"
"ते जरी खरं असलं तरी, एका रिसेन्ट केस मध्ये मला अनपेक्षित परिणामाची शंका येतीयय! आपल्या हार्मोनमुळे फक्त स्किन एज थांबणे अपेक्षित आहे. पण त्या केस मध्ये स्किनएज थांबतच नाही तर कमी होतंय!"
" रिसेन्ट केस म्हणजे, कौसल्याबाईंची का?"
"शट-अप रोजी! कितीदा तुला सांगितलं आपल्या संशोधनातील पेशंटची नाव घ्यायची नाहीत! कोणी ऐकलं तर? अजून आपलं संशोधनाला वैद्यकीय क्षेत्राची स्वीकृती नाही!" डॉक्टर भडकले.
"सॉरी सर, आपण दोघेच आहोत म्हणून मी बोलून गेले."
" ठीक, या पुढे लक्षात ठेव!"
रोजी डॉ. राजेंच्या केबिन मधून बाहेर पडली. समोरच्या मेन एंट्रन्स मधून घाईघाईने लिफ्टकडे जाताना पाठमोऱ्या कौसल्याबाई तिला ओझरत्या दिसल्या! Wow! परफेक्ट फेमाईन फिगर, ग्रेसफुल चाल! रोजीला क्षणभर त्यांचा हेवा वाटला!

(पूर्वार्ध )

सु र कुलकर्णी

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED