"दम्मान घ्या मालक!" पण दाराबाहेर उभा असलेल्या त्या निरोप्याने त्यांना लगेच सावरले!
पंतांनी त्याचा हातात आपला हात दिला. त्याच्या भक्कम आधाराने ते चटकन सावरले. त्याचा तो स्पर्श, आश्वासक आणि सरंक्षक होता. हा सोबत आहे तो पर्यंत घाबरण्याचे कारण नाही. याच्या सानिध्यात आपण पूर्ण सुरक्षित आहोंत. हि भावना पंतांच्या मनात भरून राहिली.
"चल, कसे जायचे? मी पंढरीला जीप घेऊन बोलावतो! मग जाऊ बसून त्यात!"
"नका, मालक! मी चाकर मानुस, तुमच्या संग नाय बसता येत आमाला! तुमास घोड घडलाय आमच्या मालकांनी!"
चारी पायाच्या खुरा भोवती आणि भरदार आयाळीला पांढरे शुभ्र रेशमी केस असलेला, उभ्या पांढऱ्या कानाचा, तो खांद्याइतका उंच, कृष्ण वर्णाचा घोडा सावकाश पावले टाकत येउन, पंताजवळ उभा राहील. उंची खोगीर पाठीवर घेतलेलं, ते उमदं जनावर अनोख्या तेजानं झळाळत होत. असा उमदा घोडा आपल्या पागेत असायलाच हवा. आता भेटल्यावर याच्या मालकाकडून, हा पंचकल्याणी अश्व विकत घेऊन टाकू! पंतांनी मनात ठरवून टाकले.
झटक्यात रिकेबित पाय टाकून पंतांनी घोड्याचा पाठीवर मांड ठोकली.
"कोणत्या बाजूला जायचंय आपल्याला?" पंतांनी त्या निरोप्याला विचारले.
"विरोबाच्या माळाकडं! "
पंतांनी माळाकडे घोडा वळवला. टाच मारली, तशी घोड्याने चाल धरली. मागून तो निरोप्या धावत होता. पंतांनी लगाम खेचून घोडा थांबवला.
"अरे, असा किती वेळ या घोड्या मागे धावणार? बस माझ्या मागे!"
"नका!" निरोप्याने ठाम नकार दिला.
"मग, या घोड्याचा काय उपयोग? रस्ता तुला ठाऊक, तू मागचं आणि मी घोड्यावर पुढे! असं कस जमेल?"
"माजी नका फिकीर करू. म्या हाय तुमच्या संगच. अन ह्या घोड्याला हाय रस्ता ठाव! लगाम द्या मोकळा सोडून, त्यो नेईल तुमासनी मुक्कामी!"
हे खरच अजब होत. पण पंताला यात काही विशेष वाटलं नाही. जनावरांना असे ज्ञान उपजतच असते. त्यांनी लगाम सैल केला. घोड्याच्या पोटावर दोन्ही पायानी टाच मारली. घोडयाला इशारा समजला. तो दौडत निघाला. विरोबाच्या माळाकडे! त्या माळावर विरोबाचे छोटेसे मंदिर होते. आणि तो माळ गावाच्या दक्षिणेस होता!
त्या घोड्याने आता बराच वेग घेतला होता. वीरोबाचा माळ मागे पडला होता. पंतांना तो निरोप्या जवळ पास दिसत नव्हता. त्या वेगवान घोड्यावर बसून मागे पहाता येत नव्हते. इतक्या वेगातल्या घोड्याचा लगाम सावकाश खेचायचा असतो, पण ठीक आहे, घोडा लयीत आणि न बुजता दौडत आहे. म्हणजे तो योग्य मार्गावरच आहे. समोर कातर डोंगर रांग दिसत होती. पंतांनी सहज जमिनीकडे पहिले. पंढरी जीप चालवताना, जसा गाडीखालचा रस्ता पाळतो, त्यापेक्षा ज्यास्त गतीने जमीन मागे पडत होती! घोड्याचा वेग वाढतच होता. कातर डोंगराच्या आडव्या रांगेतून आपण केव्हा आणि कसे बाहेर आलो ते पंतांना समजलेच नाही! आता हिरवेगार मैदान लागले होते. समोर मैदानाच्या कडेला निळे आकाश मिळाले होते. क्षितिज! घोडा दौडत होता तसे ते दूर जायला हवे होते, पण ते एका जागी स्थिर होते आणि क्षणा क्षणाला जवळ येत होते! पंतांचा धीर सुटू लागला. काहीतरी विचित्र घडत होते. जगातला कोणताच प्राणी या घोड्याच्या गतीने धावू शकणार नाही याची त्यांना खात्री पटू लागली. त्यांनी समोर पहिले. जमिनीचा हिरवा पट्टा संपत आला होता, त्यासमोरचे अथांग आकाश स्पष्ट दिसत होते! पंतांनी मागचा पुढचा विचार न करता घोड्याचा लगाम पूर्ण शक्ती लावून खेचला. त्या निळाईत घोड्यासगट जाणे म्हणजे, खूप उंचावून जमिनीवर कोसळण्या सारखे होते. पण भलतेच झाले. खेचलेला लगाम, घोड्याचा तोंडातून तुटून पंतांच्या हाती आला! घोड्याच्या गतीत तसूभरही फरक पडला नव्हता! लगाम नसल्याने पंतांनी घोड्याच्या मानेला दोन्ही हातानी पकडले!आणि गच्च डोळे मिटून घेतले. काय होईल ते होईल,या निर्धाराने! आणि तसेही त्यांच्या हाती काहीच उरले नव्हते!
०००
शेवटी तो अश्व एकदाचा थांबला. पंतांनी डोळे किलकिले करून पहिले. आसपासचा परिसर रम्य होता. एखाद्या राज्याच्या उद्यानं सारखा. फुलझाडांनी भरलेला. समोर एक भव्य पांढरा शुभ्र प्रासाद उभा होता! राजवाडा नसला तरी एका गर्भश्रीमंत माणसाची हवेली नक्कीच होती!
पंतांनी त्या वास्तूच्या प्रवेश द्वारावर असलेली घंटा वाजवली.
ते विशाल दार आवाज न करता उघडले. आणि उघडणारा, तो निरोप्या होता!
"तू? माझ्या आधी कसा आलास?" आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर पंतांनी विचारले.
तो फक्त गूढ हसला!
"या, आपले स्वागत आहे, विष्णुपंत! हेच ना आपले नाव?"
विचारणारी, धवल वस्त्रातील वृद्ध व्यक्ती होती. रेशमी धोतर, खांद्यावर उपरणे आणि डोक्यावर विपुल पांढरे मुलायम केस, मागे फिरवलेले. तेजस्वी चेहरा आणि चमकदार डोळे होते! हाती एक सुवर्ण दंड होता. त्याच्या अधिकाराचे प्रतीक.
"हो! पण आपण कोण? आणि काय काम आहे माझ्या कडे?" पंतांनी आसपार नजर फिरवली. त्या विशाल हॉल मध्ये, फक्त दोनच आसने होती. एक, ज्यावर ती वृद्ध व्यक्ती बसली होती, ते एखाद्या सिहासना सारखे, परंतु पांढऱ्या दगडाचे आणि थोडीश्या उंचावर होते, म्हणजे चार पायऱ्या वर. बहुदा संगमरवरी असावे. आणि दुसरे आसन, शिसवी लाकडाचे. ते मात्र रिक्त होते. या दोन आसनाखेरीज, त्या भवनात इतर कोणतीहि वस्तू नव्हती! कडेला फक्त पांढऱ्या भिंती!
"आपण माझे पाहुणे आहेत. तेव्हा आसनस्थ व्हा. म्हणजे वार्तालाप करणे सोईचे होईल!" तो म्हातारा, लाकडी आसनाकडे निर्देश करत म्हणाला.
पंत त्या लाकडी आसनावर बसले.
"आधी मी माझी आणि या भवनाची ओळख करून देतो. हे मुक्ती द्वार भवन आहे! आणि मी या भावनांचा सध्याचा स्वामी! माझ्या बद्दल खूप दंत कथा आहेत. कोणी मला 'काळ' म्हणतो, कोणी 'यम' तर कोणी 'मृत्यू!'म्हणतो! पण हे एक पद आहे!
आता आपणास 'निरोप' पाठवून बोलावू घेण्याचा प्रश्न!कारण होते, आपला 'सजीव' राहण्याच्या कालावधी संपला होता!"
हा म्हातारा काय बरळतोय? हा स्वतःस 'यमदेव' म्हणवतोय! आणि 'सजीव रहाण्याचा कालावधी संपला काय?'
"तुम्ही काय बोलताय मला समजत नाही. मला माझ्या वाड्यावर परत जायचे आहे! तुम्ही कोणीही असा. मी परतणार!" पंत ताव तावाने म्हणाले.
"कोठे जाणार आता? परतीचे मार्ग बंद झालेत! मला वाटले होते, एव्हाना आपणास कल्पना आली असेल! असो. मी, ती तुम्हाला जाणीव करून देतो! आपल्या समोरच्या भिंतीवरती पहा. तेथे तुमचा भूत काळ दिसेल!"
पंतांनी समोर पहिले. तेथे त्यांचा वाडा दिसत होता. ते जणू वाड्याच्या माळवादावर उभे होते. अंगणात गावकऱ्यांची गर्दी दाटली होती. तरी सर्वत्र विचित्र शांतता होती.
"मालक सकाळा बंगईवर बसले होते. मी अन तुका बोलून निगालो. कायतर 'निरोप्या-निरोप्या' म्हनत व्हते. मग बंगई वरन उटून वाड्यात निगाले, मग काय झालं ठाव नाय. येकायेक मागारी फिरले, उपरन घेतलं अन भाईर निगाले. सांचाला वाड्यावर मुक्कामी यतो मनले, अन लगबगीनं दिंडी दारातन भाईर पडताना, घेरी आली जनू, तितच पडले. म्या धावलो. डाक्तर आलते. काळीज बंद झाल्यानं गेलं, असं काय त सांगत होते!" हणम्या कोणाला तरी हलक्या आवाजात सांगत होता!
पंतांना परिस्थितीची स्पष्ट जाणीव झाली!
"म्हणजे, मला फसवून तुम्ही मारून टाकलंय!" ते गरजले.
"नाही मुळीच नाही! तुमच्या परवानगीनेच येथे आणलय!"
"आणि नाही तरी तुम्हाला, आमच्या सारख्या मृत मानवाच्या परवानगीची गरजच काय? अधिकार आणि शक्ती आहेत, तुमच्या कडे! कुणाचाही, केव्हाही, अन कसाही मुडदा पाडू शकता!"
"मित्र, असे वैतागून नाही जमणार! मृत्यू पूर्वी आम्ही प्रत्येकाला, देहातून विलग करण्याची संमती मागत असतोच! हे सत्य सांगायला कोणी जिवंतच नसत, म्हणून ते तुम्हास माहित नाही! असो तो प्रश्नही आता गौणच आहे!"
"मग खरा प्रश्न काय आहे?"
"तेच तर सांगणार आहे! आता येथे एक सोहळा होणार आहे. तो तुम्ही पाहिलात तर 'पुढे काय?' हे तुम्हास कळणार आहे. तुम्हास आमच्या दूताने येथे, तुमच्या परवानगीने आणले आहे. तसेच, तुम्हास एक 'जीव' आणावयाचा आहे! तरच पुढील प्रवास करता येईल! माझ्या सारखा! मी आता तो सोहळा सुरु करत आहे. आपल्या आदरणीय दूतास मी माझ्या समीप बोलावतो."
तो काळा निरोप्या चार पायऱ्या चढून, त्या पांढऱ्या केसाच्या म्हाताऱ्या जवळ गेला. म्हातारा आसन सोडून उभा राहिला. त्याने आपल्या हातातील तो दंड, सन्मान पूर्वक त्या निरोप्याच्या हाती दिला. त्याने तो दंड प्रथम माथ्याशी लावून, उजव्या हातात धरला. म्हाताऱ्याने आदरपूर्वक त्या निरोप्याला आसनावर बसवले. तो हि ऐटीत बसला. म्हाताऱ्याने अत्यंत नम्रपणे दोन्ही हात जोडून त्या आसनस्थ निरोप्याला नमस्कार केला!
"या क्षणा पासून, आपणास या आसनाचे, सर्व अधिकार आणि शक्ती मी प्रदान करतो!" म्हातारा म्हणाला. आणि त्याने आपले दोन्ही हाताचे तळवे, त्या आसनस्थ निरोप्याच्या मस्तकावर ठेवले. तसे त्या निरोप्याचे रूप पालटले. अंगावर भरजरी रेशमी धोतर, खांद्यावर उपरणे आणि मस्तकावर धवल केश समभार, मानेवर रुळणारा आला! तो आता राजबिंडा दिसू लागला.
"देवा, आता माझे कार्य संपन्न झाले. माझ्या जागी आता आपण दायित्व सांभाळावे. आणि मला पुढील प्रवासाची परवानगी द्यावी!" त्या म्हाताऱ्याने आसनस्थ नव्या शासकाला विनंती केली.
" अहो, जरा थांबा! हे -हे नक्की काय होतंय? मला कळले नाही. आणि यात माझे काय काम?" पंतांना साधारण कल्पना आली होती. तरीहि त्यांनी विचारलेच.
"काही नाही. तुम्ही जेव्हा या आसनाने सांगितलेला 'जीव', यमदूत बनून, या मुक्ती द्वारा पर्यंत आणलं, तेव्हा, हे सत्ताधीश तुम्हास या आसनावर बसवतील! आणि आज मी जसा पुढील गमनासाठी सज्ज्य आहे, तसे आत्ता आसनस्थ आहेत ते सज्ज्य होतील! आणि तुम्ही यांच्या जागी 'यमराज' म्हणून बसला! या राज्यात यमराज आणि यमदूत हे स्थायी सेवक कधीच नसतात! येणाऱ्या जीवांना हि जवाबदारी पार पडूनच, पुढील गती साठी जावे लागते!म्हणजे जन्म -मृत्यूचा फेरा सुरळीत चालू रहातो."
"प्रस्तानची परवानगी हे सिहासन प्रदान करते!" त्या आसनावरून हातातील दंड उंचावून घोषणा झाली.
म्हाताऱ्याने दोन्ही हात उंच केले. आणि क्षणात तो वातावरणात विरून गेला!
०००
सकाळी साधारण आकाराची वेळ होती. शालिनी मॅडम खूप बिझी होत्या. नुकतीच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग सुरु झाली होती. पॉमिला, मॅडमची पर्सनल सेक्रेटरी, त्या मध्यम वयीन गृहस्थाकडे टक लावून पहात होती. पन्नाशीच्या आसपास त्याच वय असावं. ब्रँडेड जीन आणि व्हाईट शर्ट. त्यावर वेल टेलर्ड कोट! म्हटलं तर फॉर्मल, म्हटलंतर नाही. त्याने ट्रिम केली दाढी राखली होती. एकंदर भारदस्त आसामी होती. त्याला शालिनी मॅडमची पर्सनल भेट हवी हाती आणि त्याच्या कडे अपॉइंटमेंट नव्हती! तो सकाळी साडे नऊलाच येऊन बसला होता. शालिनी मॅडम दुपारी बाराच्या दरम्यान फ्री होणार होत्या, आणि त्यानंतर आणि लंचच्या आधी काही मिनिटे त्यांना मिळणार होते, त्यात त्या त्याला भेटणार होत्या.
"काय काम आहे? माझ्या कडे सांगा, मी निरोप देईन त्याना!" या पॉमिलाच्या प्रस्तावाला त्याने नकार दिला होता! तेव्हा पासून तो समोरच्या सोफ्यावर बसून एक टक मिटिंग हॉलच्या दारा कडे पहात होता. जणू तो ते उघडण्याचीच वाट पहात होता!
मिटिंग संपली शालिनी मॅडम आपल्या केबिन मध्ये गेल्या. त्यांनी पॉमिलाला इंटरकॉम वर, त्या माणसाला आत पाठवण्यास सांगितले.
तो केबिन मध्ये आला.
"मॅडम, मी विष्णू! एक विशेष दूत आहे. आपणासाठी एक महत्वाचा निरोप घेऊन आलोय! आमच्या बॉसनी आपणास आग्रहाची विनंती केली, आहे कि, आपण, माझ्या सवेत, त्यांच्या भेटीस यावे! मी आपल्यासाठी कार घेऊन आलोय! तेव्हा येणार ना?"
तो उत्तरासाठी कानात जीव आणून वाट पहात राहिला.--------
(समाप्त)
सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. बाय!