समर्पण - १४ अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्पण - १४

समर्पण -१४

किस्मत से हमसफर थे तुम,
हमराज़ भी अगर बन जाते,
सफ़र जिंदगी का आसाँ होता,
रास्ते प्यार के तय हो जाते ।


माझ्या आणि अभय च्या नात्यात एक असहजता होती, माहीत नाही का पण मी कधीच मला काय वाटतं किंवा माझा भावनिक कल्लोळ त्याच्या समोर मांडू शकली नाही.....आणि जेंव्हा सांगायची वेळ आली तेंव्हा तो समजू ही शकला नाही मला आणि मी समजवण्याचा प्रयत्न ही नाही केला..खरं तर काय आहे, अभय ला नेहमीच हे वाटायचं की मला कितीही पुस्तकी ज्ञान असेल किंवा मी कितीही जगात वावरली असेल तरी दुनियादारी मध्ये मात्र मी शुन्य आहे...त्याच्या मतानुसार मी कोणतेही व्यवहार करु शकत नाही कारण माझ्या संवेदनशील स्वभावामुळे मला कोणीही फसवू शकत...काय म्हणतो तो मला..हां..'इमोशनल... इमोशनल फूल'...हो खरच इमोशनल फूल आहे मी...डोक्याने कधी विचारच नाही केला कारण प्रत्येक गोष्टीत नफा तोटा बघणं मला जमत नाही , त्यामुळे मनाच जास्त ऐकलं, आणि अभय म्हणजे एकदम व्यवहारिक माणूस......आमच्या स्वभावातील हीच विसंगतता कदाचित आम्हाला मनाने जवळ आणू शकली नसावी....कालांतराने अभय ने त्याच्या स्वभावात बदल केला, मला आवडतात त्या सगळ्या गोष्टी त्याने जपण्याचा प्रयत्न केला...पण कदाचित तेंव्हा फार उशीर झाला होता.....

विक्रम ला पण मी व्यवहार ज्ञानात भोळीच वाटायची पण तो मात्र माझं सगळं ऐकून घ्यायचा....तो ऐकून घ्यायचा अस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की, मी खूप सहजपणे त्याला सगळं सांगून जायची...माझी मतं त्याला कितीही बालिश वाटली तरी तो त्यांचा मान राखायचा....खूप छान वाटायचं हा विचार करून की कोणीतरी आपल्या विचारांना इतकं महत्त्व देतं त्याच्या आयुष्यात...विक्रमला पाऊस खूप आवडायचा... माझ्या आयुष्यातही तो रिमझिम बरसणाऱ्या पाऊसासारखाच आला..आणि दरवळणारा सुगंध देऊन गेला....

-------------------------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी मी आणि अभय महाबळेश्वर ला गेलो. दिवसभर फिरत असताना मी फक्त वेळ शोधत होती अभयला विक्रम बदल सांगण्यासाठी, कारण अभयला अंधारात ठेऊन त्याच्यासोबत नवी सुरुवात करणं माझ्या मनाला पटत नव्हतं...पण मनात एक अनामिक भीती होती की जर त्याने मला समजुन घेतलं नाही तर... थोडीशी हिम्मत गोळा करू बोलायला, या उद्देशाने मी विक्रम ला फोन केला तर त्याचा फोन स्विच ऑफ होता आणि मी मोबाइल ठेऊन दिला....संध्याकाळी जेवण वैगेरे आटपून आम्ही हॉटेल ला परत आलो, अभयच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचा ताण दिसत होता..अभयला मी कोणत्याच चिंतेत बघु शकत नाही, प्रेमापेक्षा ही जास्त आपुलकी वाटते मला त्याच्याबद्दल आणि मी न राहवुन त्याला विचारलं,

"काय झालं अभय? बर वाटत नाहीये का?"

मी एवढंच विचारलं आणि अभय ने माझ्या कडे पाहिलं, त्याचे डोळे पाणावले होते...दोन सेकंद माझ्याकडे बघितल्यावर त्याने सरळ येऊन मला मिठी मारली...का म्हणुन अभय आज इतका हळवा झाला असेल...काहीवेळ तसाच तो मला बिलगून होता आणि थोड्यावेळाने अचानक बाजूला होत मला बोलला,

"सॉरी... मी थोड्यावेळेत येतो बाहेर जाऊन.."

त्याने या अवस्थेत बाहेर जावं, मला पटलं नाही..तो बाहेर जात असताना मी त्याला थांबवलं आणि विचारलं,

"काय झालं अभय...मला नाही सांगणार?"

"तुलाच सांगायच आहे, पण कळत नाही आहे कुठून सुरुवात करू....मला एक सांग नैना, तुला खूप राग आला असेल ना माझा, मी इतके दिवस तुझ्याशी नीट वागलो नाही, तुला माझ्याजवळ येऊ दिल नाही...खूप राग आला असेल ना, या सगळ्या गोष्टींचा बदला नाही घ्यावा वाटला तुला "

आता मात्र माझी धडधड वाढली...मला वाटलं अभयला विक्रम बद्दल कळलं तर नसावं ना? त्याने आमच्याबद्दल काही गैरसमज तर पळाला नसेल ना ? मी ठरवलं की हीच ती वेळ आहे अभयला सांगून देते सगळं काही,

"अभय हे बघ, मला तुला सांगायचंच होत, पण तू काही गैरसमज करू नको..मला तुझ्याबद्दल राग नव्हता पण..."

"पण काय नैना...वाईट तर वाटतच होत ना तुला किंवा आताही वाटतच असेल पण खूप झालं...आज मला मी तुला सगळं काही सांगणार..."

मी विचार करायला लागली की अस काय आहे जे अभय ला इतक अस्वस्थ करत आहे..आता मला ही जाणून घ्यायचाच होत की अस काय दडलंय अभय च्या मनात..

"नैना तुला विचित्र नाही वाटलं का ग एवढ्या घाईघाईत आपलं लग्न झालं, एवढं की तुझी परीक्षा होण्याची वाटही नाही पहिली आपल्या घरच्यांनी..."

"हो पण..."

"मला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं नैना...एवढंच काय तुझ्यासोबत लग्न केल्यावर जेंव्हा मी तुला सोडून अमेरिकेला गेलो
तेंव्हा हाच विचार करून गेलो होतो की मी परत कधीच येणार नाही, आणि कधीच तुझा विचार करायचा नाही..."

हे सगळं ऐकून माझा पारा चढला...मी काय वस्तू वाटली का अभयला की जेंव्हा त्याच्या मनात आल तेंव्हा मला जवळ केलं अन जेंव्हा मन भरलं तेंव्हा टाकून गेलं...मी माझ्या अश्रूंचा बांध सांभाळत बोलली

"अभय, माझी काय चूक होती रे एवढी की तू असा वागलास माझ्यासोबत, मी कितीवेळा विचारलं तुला की मी नको असेल तर जाते तुझ्या आयुष्यातुन, पण तू मला सोडलं ही नाही आणि जगू ही दिल नाही...मला न बोलवता कोणाच्या घरीही जायला आवडत नाही आणि इथे तर मला जबरदस्ती तुझ्या आयुष्यात घुसवल गेलं...एकदाही विचार नाही आला माझा...इतका कसा निर्दयी वागू शकतो तू..."

"तुझा चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे नैना... पण माझं आधी सगळं ऐकून घे, मग तुला काय निर्णय घ्यायचा तो घे"

"बोल"

"अस नाही की तुझी काही चूक आहे किंवा तुझ्यात काही कमी आहे, पण होत अस काही ज्यामुळे मी असा वागलो.... माझं प्रेम होतं नैना एका मुलीवर किंवा अजून ही आहे, आणि आपलं लग्न झाल्यावर ही मी तिच्या संपर्कात होतो खुप दिवस..."

अभय जसा जसा बोलत होता माझ्या मनाचे तुकडे तुकडे होत होतो, का अस घडावं माझ्यासोबत ? अशी काय मजबूरी होती अभय ची की त्याला माझ्याशी लग्न करून माझ्या आयुष्याचा खेळ करावा वाटलं? कितीतरी प्रश्नांची उत्तरं आज मला मिळवायची होती अभय कडून...

"माझ्याशी लग्न का केलं? फक्त या प्रश्नाच उत्तर हवय मला अभय.."

" मला माहित आहे तुझी खुप चिडचिड होत असेल नैना...तुझ्याशी लग्न करणारच नव्हतो मी आणि यासाठीच तुला सगळं सांगावं या उद्देशाने मी लग्नाआधी नागपूर ला यायला निघालोही होतो... पण मला माझ्या घरच्यांनी अडवलं..आईने मरायची धमकी ही दिली... मला माहित होत हा घरच्यांचा इमोशनल ब्लॅकमेल आहे, त्यामुळे मी कोणाचं काहीही न ऐकता घरातून निघालो ...आणि थोड्यावेळाने मला फोन आला की पप्पांना हार्ट अटॅक आलाय...आणि तुला माहीत आहे माझा आईपेक्षा ही जास्त पप्पांमध्ये किती जीव आहे...मी परत गेलो..पप्पा हॉस्पिटलमध्ये होते...त्यांना त्या अवस्थेत पाहून मला स्वतःचीच लाज वाटायला लागली...मी त्यांच्या जवळ हाच विचार करून गेलो की त्यांची तब्येत थोड्या दिवसांत सुधारली तर त्यांना मी मनवुन घेईल लग्न न करण्यासाठी.... पण त्यांनी मला शप्पथ घातली आणि वचन घेतलं की जर मी हे लग्न करण्यास नकार दिला तर ते कोणतीही ट्रीटमेंट घेणार नाही...माझा नाईलाज झाला नैना...आणि ती..."

"ती...कुठे आहे ती....काय नाव तीच?"

"ती...गेली सगळं सोडून...मला सोडून...."

"का? तिने तुला एकदाही स्पष्टीकरण मागितलं नाही?"

"साफिया...तिचं नावं... नाव ऐकून कळलच असेन ना नैना तुला... माझ्या घरच्यांना ती का नको होती ..धर्म, जात, रहनसहन सगळंच भिन्न..कसकाय कट्टर सनातनी माझ्या घरच्यांनी आम्हाला एकत्र राहू दिल असतं... तुला माहीत आहे मी आधीपासूनच असा आहे काहीसा अबोल, शांत..जास्त मित्र मैत्रिणी ही नव्हते मला...आणि एक दिवस आयुष्यात साफिया आली आणि सगळं काही बदललं...तसं तिच्या घरीही हे मान्य नव्हतंच...पण मी बोललो की मी नाही साथ सोडणार तर तिनेही हिम्मत दाखवली..माझ्यासाठी सगळं सोडायला तयार झाली ती...आणि बघ ना मीच तिला सोडलं...तुझ्याशी लग्न करतोय हे माहीत झाल्यावर खूप चिडली, रागावली...पण पप्पांची तब्येत अशी आहे हे माहीत पडल्यावर मला काही न बोलता निघून गेली..पण मीही तिचा पिछा सोडला नाही...लग्नानंतर कितीतरी दिवस तिला भेटत राहिलो..पण तिने हे मान्य केलं होतं की आता सगळं संपल आहे आणि आहे ती परिस्थिती आम्ही स्वीकारायला पाहिजे....तुला माहीत आहे नैना जेंव्हा कधी आम्ही भेटायचो, आमच्या बोलण्याचा विषय काय असायचा..."

"काय?"

"तू...फक्त तू...ती मला नेहमी तुझ्याबद्दल बोलायची..तू जेंव्हा माझी काळजी घ्यायची, माझे कामं करायची खूप चीड यायची मला तुझी, राग यायचा खूप... आणि जेंव्हा मी तिला हे सगळं सांगायचो ती माझ्यावर रागवायची...आज माझ्या मनात तुझ्याबद्दल जे काही आहे ना ते फक्त साफिया मुळे.... तिने मला नेहमी तुझी बाजू समजावून सांगितली आणि हळूहळू तिच्या बोलण्याचा परिणाम माझ्यावर व्हायला लागला...मी जेव्हा तुझ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, तेंव्हा तू माझी केलेली काळजी, तू माझ्या साठी केलेल्या सगळ्या गोष्टी, तुझा निरागस पणा मला सगळंच आवडायला लागलं...साफिया ची ईच्छा होती जो पर्यंत मी तुझा स्वीकार करणार नाही ती लग्न करणार नाही...मी सुरुवातीला खूप चुकीचं वागलो तुझ्यासोबत नैना, पण हेही खरं आहे की जर साफिया ने मला समजावलं नसत तर मी तुझ्याकडे लक्ष ही दिल नसत...पण माझा विश्वास कर नैना, जस जस मी तुला समजत गेलो मला तू आवडायला लागलीस... आणि हे सगळं ऐकून साफिया पण खूप खुश होती...तिने लग्न केलं, दुबई ला गेली राहायला...पण..."

"पण काय अभय..."

"काही दिवसांपूर्वी ती एका अक्सीडेंट मध्ये गेली... मला सोडून..हे जग सोडून..."

"क...काय?"

"हो...खुप वाईट वाटलं, खूप रडावं ही वाटलं...तुला आठवतं नैना मी मागे दोन दिवस घरी उशिरा आलो, घरी जेवलो ही नाही...तेंव्हाच...तेंव्हाच हे सगळं घडलं...आणि तुला वाटलं की मी तुझ्यावर चिडलो त्यामुळे असा वागतोय.. हो तुझ्यावरही चिडलोच होतो मी...कारण त्यावेळेस मला गरज होती तुझी, तुझ्या मानसिक आधाराची...आणि मी नकळत तुला मीठी मारली पण तुला वाटलं की मला तुझ्यासोबत...मला तेंव्हाच तुला हे सगळं सांगायला हवं होतं नैना, पण मला स्वतःलाच कळत नव्हतं की मी कसा वागू..."

"मला माफ कर अभय, मी नाही समजू शकली तुला...मी अस नाही म्हणणार की मी तुझी परिस्थिती समजू शकते...पण मला खरचं खूप वाईट वाटत आहे, तुझ्यासाठी.. साफिया सोबत जे झालं त्याच्यासाठी..पण मी इतके दिवस काय एकटेपण सहन केलंय हे माझं मलाच माहीत...लग्न आहे हे अभय...रुममेट्स नाहीत ना आपण की आज पटलं नाही म्हणून उद्या सोडून द्यायचं..."

वाईट मला नक्कीच वाटत होतं, माझा राग उफाळून येत होता.. पण हा राग अभय किंवा साफिया साठी नव्हता... हा राग त्या परिस्थिती साठी होता ज्यामुळे आमचं आयुष्य या वळणावर येऊन थांबलं होतं, हा राग त्या समाजासाठी होता ज्यात दोन लोकांच्या इच्छेपेक्षा जास्त जात अन धर्माला महत्त्व दिलं जातं...अभय आणि साफिया साठी खूप वाईट वाटत...किती स्वप्न बघितली असतील त्यांनी सोबत...अन मी अस त्यांच्या मधात येऊन सगळं विस्कळीत केलं...कळत नव्हतं जे झालं त्यात चूक कोणाची आहे..खूप प्रश्नांनी संभ्रम निर्माण केला होता.... मनाला वाटत होतं अभय ने अजून प्रयत्न केले असते घरच्यांना मनवण्याचे तर आज परिस्थिती वेगळी असती, जर माझं अन अभय च लग्न झालं नसत तर मी मुंबई ला आली नसती अन मला विक्रम भेटला नसता...आणि जर विक्रमच भेटला नसता तर आज मी या धर्मसंकटात अडकली नसती...आता या 'जर तर' च्या गोष्टीना काहीच महत्त्व नव्हतं, आहे त्या परिस्थितीला स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नव्हता....तीन वर्षांपासून अभय सोबत राहत होती पण त्याच्या मनातला हा हळवा कप्पा मी कधीच बघितला नव्हता..

नक्कीच साफिया मध्ये काहीतरी असावं जे अभय सारख्या अबोल व्यक्ती ला बोलकं करू शकते, आणि मनातून तिचे खूप आभार मानावे हेही वाटत होत...जर साफिया ने अभय ची समजूत घातली नसती तर आज मी आणि अभय इथे सोबत नसतो.. खूप हेवा वाटत होता तिचा समजूतदारपणा बघून..जाता जाता प्रेमाचा नवा अर्थ शिकवून गेली मला....चुकीचं म्हणतात लोकं की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच घर बरबाद करू शकते...अभय एकटक खिडकीतून चंद्राकडे बघत होता, इतक्या भावनाविवश अभयला बघून मला खूप गहिवरून आलं..मी जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवताच त्याने माझ्याकडे बघितलं...त्याच्या डोळ्यांतून कितीतरी दिवस साठवलेल दुःख वाहत होत, त्याच्या दाटलेल्या कंठातून मला बोलला...

"तुला माहीत आहे नैना माझ्या पेक्षा जास्त विश्वास साफिया ला तुझ्यावर होता, ती मला नेहमी म्हणायची की तू मला समजून घेशील...माझी साथ कधीच सोडणार नाही...नाही जाणार ना मला सोडून....साफियाच दुःख तर मी पचवलं... तुझ्यानंतर मला नाही माहीत माझं काय होईल..."

"नाही जाणार मी अभय...तू आधी रडणं बंद कर...थांब मी पाणी आणते तुझ्यासाठी.."
मी पाणी आणण्यासाठी जाणार तोच त्याने माझा हात पकडला आणि माझ्या डोळ्यात बघत बोलला,

"नैना..साफियाला अन मला परिस्थिती ने वेगळं केलं, मला वाटलं नव्हतं की साफिया ची जागा माझ्या मनात कोणी घेऊ शकेल, पण तू माझ्या मनात कधी घर केलंस नाही कळाल मला...आता कोणत्याच परिस्थितीला आणि कोणत्याच व्यक्तीला मी तुला माझ्यापासून दूर करू देणार नाही...मी नाही जाऊ शकत पुन्हा त्याच दुःखातून.."

हे सगळं बोलताना अभयचा आवाज खूप जड झाला होता, मला पाहवत नव्हतं त्याच्याकडे, त्याला शांत करण्यासाठी मी त्याच्या हातावर हात ठेवला तर त्याने मला घट्ट मिठी मारली...त्याला शांत करण्यासाठी मी पण त्याला थोपटत राहिली, थोड्या वेळाने मी दूर होण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला सोडलं नाही..

"नको...नको दूर जाऊस..मला फक्त तू हवीस नैना, अजून काहीच नाही.."

त्याच्या आवाजात एक आर्जव होता, त्याच्या डोळ्यातला आवेग पाहून मी सगळंच विसरली, त्यावेळेला मला फक्त दिसत होत अभयच दुःख..आणि वाटत होत आज याच्या मनातली सगळी पीडा वाहून जाऊदे...आणि मी स्वतःला सोपवून दिल त्याला...त्यारात्रीचा तो एक नाजूक क्षण...आणि आमच्यातली सगळीच बंधनं गळून पडली...जोपर्यंत दोन व्यक्ती शरीराने एकरूप होत नाही तोपर्यंत लग्नाला परिपूर्णता लाभत नाही....पण फक्त शरीरानेच एकरूप होणं म्हणजे लग्न का?? मनाचं काय??? त्यावेळेला हा प्रश्न माझ्या डोक्यात आला नाही किंवा ते क्षण असे नव्हते की या सगळ्या गोष्टींचा विचार मी तेंव्हा करावा...त्यावेळेला मी फक्त एक पत्नी म्हणून अभयचा विचार केला...

त्या दिवशी मी काय विचार केला होता आणि काय घडलं...हो..नक्कीच नवी सुरुवात करायची होती अभय सोबत, विक्रम ला दिलेलं वचनही पळायचं होतं... पण ज्याप्रकारे माझ्या आणि अभय मध्ये हे सगळं घडलं होत हे मला पटलं नव्हतं, कारण माझ्या खराब वेळेने आजही मला धोका दिला होता...अभयने जरी साफिया बद्द्ल त्याच मन हलकं केलं होतं तरी मी मात्र विक्रम बद्दल अजूनही त्याला सांगू शकली नव्हती....

---------------------------------------------------–-----------

क्रमशः