समर्पण - २० अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्पण - २०



फासले बढ़ जाने से,
एहसास कम नही होते।
ये दिल के रीश्ते है,
आसानी से टूटा नही करते।


खूप दुरावा आहे माझ्या आणि विक्रम मध्ये...कदाचीत एवढा की या आयुष्यात तरी तो भरून निघणार नाही...आणि तशी काही अपेक्षा ही नाही...कस आहे ना, प्रत्येक गोष्टीची जशी एक वेळ ठरलेली असते तसच प्रत्येक नात्यासाठी ही एक काळ ठरलेला असतो...जर अस आहे तर मग कोणतं नात शाश्वत आहे??? पती पत्नीचं...? मला नाही वाटत त्याचीही शाश्वती आहे...हां म्हणजे दोन व्यक्ती ओळखीचे असूनही अनोळखी म्हणून सोबत जगू शकतात पण एकमेकांना खरंच का ते साथ देऊ शकतात??? नाही सांगू शकत याच उत्तर मी.....पण एवढं जरूर सांगेन की सोप्प नाही हे नातं फक्त एक बाजूने टिकवणं...जेंव्हा कधी अशी परिस्थिती निर्माण होते तेंव्हा खूप वेळा मुली घरचा, समाजाचा विचार करून गप्प बसतात...आणि बरोबर आहे ना, त्यांना शिकवल्याही तेच जातं की नवरा बायको मध्ये काहिजरी वाद असतील तर त्या मुलीनेच पुढाकार घेऊन सोडवावेत...फक्त नवऱ्याला समजून घ्यावं आणि जर अस नाही झालं तर तीच मुलगी असमर्थ आहे संसार टिकवायला...सगळ्याच नाही पण खूप साऱ्या घरांत हीच परिस्थिती आहे...मलाही तेच सांगण्यात आलं होतं की संसार टिकवण्यासाठी 'प्राथमिक जबाबदारी माझीच आहे'....जेंव्हा अभय बद्दल घरी सांगण्याचा प्रयत्न केला, मला हेच समजवण्यात आलं की आपण फक्त नवऱ्याची मर्जी सांभाळायची...मला हेच समजवण्याचा प्रयत्न केला गेला होता की संसारात स्त्रियांनाच संयमी आणि हिम्मत ठेऊन जगावं लागत....आपल्या नारी शक्तीच 'शक्तिप्रदर्शन' फक्त स्वतःच्या भावनांवर करायचा.....त्यामुळे विचार केला की जर मलाच सगळं समजून घ्यायच आहे तर कोणाला काही सांगून काय उपयोग.... आणि हीच ढवळाढवळ मनात सुरू असताना विक्रम आला..आणि हे सगळं घडून गेलं...

विक्रमशी बोलून एक आठवडा उलटून गेला होता....तो कदाचित दिल्लीवरून परत ही आला होता....मनावर खूप मोठा दगड ठेवून, स्वतःला खूप आवर घालून विक्रमला मी बोलली होती की मला फोन नको करू...आणि खरच त्याने पून्हा विचारण्याची तसदी घेतली नाही माझी अडचण काय आहे...खूप वाईट वाटत होतं हा विचार करून की मी सांगितलं आणि विक्रमने ऐकलं...मग स्वतःलाच समजवत होती की हेच बरोबर आहे, पुन्हा अभयला तो त्रास नको....अभयचा त्रास त्याची पीडा आणि माझ्या त्रासाच काय? मी कोणाला सांगू...अभय घरात फक्त झोपण्यासाठी राहत होता...सकाळी घरातून निघालेला अभय रात्री कधीतरी उशीरा घरी यायचा...माझ्या प्रश्नांना उत्तर देणंही पसंत नव्हतं त्याला, माझ्या इतक्या विनवण्या इतक्या विनंत्या...कशाचा काहीच परिणाम होत नव्हता त्याच्यावर...मनातून खूप वाटत होतं कोणाला तरी माझी परिस्थिती सांगावी पण अजून भीती वाटायची की जर अभय सारख सगळ्यांनीच मला चुकीचं ठरवलं तर....खरं तर भीती या गोष्टी ची नव्हती की कोण मला काय समजेल पण माझ्या आणि विक्रमच्या नात्याला नावं ठेवलेलं मला पटणार नव्हतं.... विक्रम मला अश्या परिस्थितीत भेटला होता जेंव्हा माझं बोलणं किंवा माझी समस्या सगळ्यांनी माझा घरगूती प्रश्न म्हणून सोडून दिला होता....विक्रमने काय खूप मोठं अस काही केलं नाही माझ्यासाठी, फक्त त्याने दिला मला तो दिलासा.... त्याने दिला मला त्याचा वेळ आणि तोच होता ज्याने माझा अभयकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला...आणि हे सगळं करत असताना त्याने माझा 'गैरफायदा' घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही , मग यात त्याचा काय स्वार्थ होता?? एकच होता की त्याला मला मनापासून आनंदी पाहायचं होत आणि मलाही त्याला त्रास झालेला बघवत नव्हतं...अस नातं होतं आमचं..की अजूनही आहे, माहीत नाही.....

मी जेवढं स्वतःला खंबीर करण्याचा प्रयत्न करत होती तेवढीच आतमध्ये तुटत जात होती....आणि आज तर अगदी मन एवढं कासावीस झालं होतं की कदाचित विक्रमला बोलल्याशिवाय शांती मिळणारच नव्हती अस वाटत होतं...पण नाही मला अस वागून चालणार नव्हतं...खूप अशक्तपणा जाणवत होता, काही खाण्याची किंवा काम करण्याची इच्छा होत नव्हती...कदाचित विक्रमच्या आठवणीत अस होत असावं माझ्यासोबत अस मला वाटायचं...संध्याकाळी ऑफिस मधून घरी जायला निघाली...ऑफिसच्या खाली आली आणि समोर मला जे काही दिसलं त्यामुळे माझी पाऊलं जागेवरच थांबली....समोर विक्रम उभा होता..कदाचित...कदाचित नाही... नक्कीच खुप वेळेपासून माझी वाट बघत असावा...त्याला बघता क्षणी मला जो काही आनंद झाला ना तो फक्त मीच समजू शकते...माझं मन मला सांगत होत...जा नैना..आलाय तुझा विक्रम, सांग त्याला की त्याची किती आठवण आली तुला, सांग त्याला मागच्या काही दिवसांत काय झालं....सगळं मन खोलून ठेव त्याच्यासमोर...पण नाही मी असं करू शकत नव्हती... त्याला बघताच मला आठवलं की अभयने आमच्या नात्याला किती तुच्छ नजरेने बघितलं होतं.....त्यामुळे मी त्याला बघूनही न बघितल्या सारख केलं आणि त्याला न बघताच त्याच्या बाजूने मी पुढे जायला निघाली, मी फक्त दोनच पाऊलं पुढे गेली तर मला विक्रमचा आवाज आला,

"एवढा कसला राग आलाय सोनू की माझा चेहरा ही आठवत नाही तुला? वाटलं नव्हतं एवढ्या लवकर विसरशील मला?"

आता त्याचे शब्द मला मात्र बाणासारखे टोचले, सांगावं वाटत होतं त्याला...नाही रे नाही, कधीच नाही विसरू शकत मी तुला..पण मला अस काहीच बोलायचं नव्हतं,

"आहे लक्षात तू माझ्या, पण मला आता अजिबात वेळ नाहीये, मला घरी लवकर पोहचायचं आहे"

"सोनू प्लिज... काय झालंय सांग ना, मी जाताना तर बोलली होती तू लवकर ये म्हणून...किती वाट बघितली तुझ्या फोन ची, झोपही लागली नाही मला हा विचार करून की काय झालंय तुझ्यासोबत... एकदा बघ माझ्याकडे, तुला वाटत का गेल्या काही दिवसांमध्ये मला थोडा तरी चैन पडला असेन ते.."

नक्कीच विक्रम कडे बघून मला कळत होतं की माझ्यासाठी त्याचा जीव किती तळमळतोय पण आता त्याला थोडासा झालेला त्रास सहन करेल मी, पण माझी अवस्था कळल्यावर तो काय करेल हे मी सहन करू शकणार नव्हती,

"मी काहीही बोलेन त्याला एवढं मनावर घेशील का तू? मी ते सहज बोलली होती आणि सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला, माफ कर मला, पण आता माझ्यासाठी काहीच त्रास करून घेऊ नको...मला निघायला हवं आता..."

"मला फक्त माझी चूक काय झाली ते सांग सोनु, वचन देतो जर माझ्यामुळे तुला त्रास होणार असेल तर मी कधीच तुझ्या समोर येणार नाही..."

काय सांगू विक्रमला की चूक कोणाची झाली...तेंव्हाही आणि आताही मी हाच विचार करते की माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यात चूक मी अभय ची, माझी किंवा विक्रमची मानत नाही.....परिस्थिती होती जे चुकीची होती....

"त्रास तर देतोसच तू मला, त्यामुळे आता मला भेटण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करू नको....माझा नवरा वाट बघत असेल माझी, निघते मी.."

"तुला आठवतं सोनू, मी तुला नेहमी बोलतो की तुझे डोळे खुप बोलके आहेत...आज तुझ्या तोंडातून निघालेले शब्द आणि डोळ्यात असलेले भाव यांची भाषा जुळत नाही आहे ग...नक्की कोण खोटं बोलतंय...."

विक्रम अस बोलल्यावर मात्र मला त्याला नजर देण्याची हिम्मत झाली नाही आणि मला भीती वाटत होती की जर मी विक्रमच्या डोळ्यांत बघितलं तर माझ्या मनात जो महापूर साचऊन ठेवला आहे मी, त्यात तो पण वाहून जाईल आणि माझ्यामुळे त्याला कोणताही त्रास व्हावा अस मला वाटत नव्हतं,

"कोणीच काही खोटं नाही बोलत आहे, त्यामुळे माझा रस्ता अडवू नको जाऊ दे मला"

आणि अस बोलून मी जायला निघाली तर त्याने माझा हात पकडून मला थांबवलं,

"हे काय... आपण रस्त्यावर आहोत विक्रम त्यामुळे प्लिज काही तमाशा नको मला..."

"रस्त्यावर आहोत त्यामुळेच सांगतो आहे तू पण शांत हो, कुठेतरी बसू अन बोलु, नाहीतर उगचं लोकं येऊन मला बदडून काढतील ग आणि मी काही हिरो नाही दहा दहा लोकांचा सामना करायला...मी मार खाल्लेला आवडेल तुला???"

आता मात्र माझा बांध फुटला, नाही आवरू शकली मी स्वतःला, का विक्रमला मी काही न बोलता माझी चलबिचल कळून जाते...का नाही लपवू शकत मी काही त्याच्यापासून...

"रडू नको प्लिज..मी नाही बघू शकत ग तुला असा... आणि एक महत्त्वाच सांगू तुला सोनू..?"

"काय..?"

"विदर्भच्या लोकांना ना खोटं नाही बोलता येत आणि त्यामुळेच आम्ही विदर्भ वेगळा देत नाही😜😜"

मी डोक्यावर हात मारून घेतला... हा माणूस कोणत्याही परिस्थिती मध्ये मजाक करू शकतो...पण त्याच्या विनोदाने मात्र खुप दिवसाने माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं....

आम्ही नेहमीच्या कॅफे मध्ये गेलो, विक्रमने कोल्ड कॉफी ऑर्डर केली, माझी अजिबात ईच्छा नव्हती काही घ्यायची,

"तुझं डोकं थंड होईल ग त्यामुळे सांगितली, नाहीतर तुझा ज्वालामुखी माझ्यावरच फुटेल...😜😜"

"हम्म..."

"बोलशील प्लिज काय झालं ? आणि या दहा पंधरा दिवसांत काही खाल्लं नाही का? स्वतःकडे बघ कशी झाली आहेस.."

"ठीक आहे मी, ऑफिस च टेन्शन आहे थोडं.."

"तुला वाटतं का की तू दिलेल्या कोणत्याही कारणावर मी विश्वास ठेवेन...त्यामुळे मी चिडायच्या आधी बोल पटकन काय झालंय"

"हो तू पण चिडून घे ना, बायकांचं काही ऐकायचं नाही काही नाही अन चिडायला मोकळे तुम्ही पुरुष... तुम्ही जे करता ते सगळं बरोबर आणि आम्ही जर काही करून तुमचे पाय जरी पकडले तरी आमच्या भावना दिसत नाहीत तुम्हाला..."

"तुझं अन अभय च काहीतरी झालंय.... वाटलंच होतं मला..."
मी विक्रमला या दोन आठवड्यात काय काय झालं ते सगळं सांगितलं... त्याच्यापासून लपवण्याचा निष्फळ प्रयत्न केला मी पण नाही जमलं मला...

"मला ज्याची भीती होती तेच झालं...मला वाटतच होत की अभय असा वागेल, खूप अपराध्यासारखं वाटत आहे मला सोनू...माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी यावं हा विचार ही मला मान्य नाही आणि माझ्यामुळेच एवढा त्रास होतोय तुला...मला नाही बघवत तुला असं...एक काम करू...चल जाऊ आपण.."

"अरे अचानक काय झालंय..कुठे जायचय?"

"चल तू..तुझ्या घरी..मी अभयला भेटतो, बोलतो त्याच्याशी..."

"नको विक्रम, तो रागात आहे , आणि त्याने रागात तुला काही बोललेलं मला नाही सहन होणार..."

"त्याने मला चार शिव्या जरी घातल्या ना तरी मी ऐकून घेईल....जर यामुळे तुमच्या दोघांमध्ये सगळं काही ठीक होत असेल तर मी त्याच्या पायाही पडायला तयार आहे सोनू...पण मी तुला दुःखी नाही पाहू शकत..."

मला खरच कळत नव्हतं विक्रम कशाचा बनला आहे...स्वतःचा मानपान सगळा पणाला लावून माझ्यासाठी काहीही करायला तयार का असतो हा नेहमी...खूप कमी नशीबवान लोकांच्या आयुष्यात विक्रम सारखे लोकं येतात....पण काही कमनशिबी माझ्यासारखे ही असतात ज्यांना अश्या लोकांना दूर लोटव लागत..

"हे बघ विक्रम, ऐक माझं...अभय रागात आहे रे, तो मनाने काही खराब नाही, फक्त हे सगळं झालंय ना त्यामुळे थोडा चिडला आहे आणि मी समजवते ना त्याला, तो नक्कीच समजून घेईल...तू नको येऊस.."

" तू समजून सांगशील त्याला??? मग या पंधरा दिवसांत काय केलंस?? की हा विचार केला की आधी रडून घेते मग समजवते?? मला माहित आहे अभय ने तुझं काहीच ऐकून घेतलं नसेल त्यामुळे मी येतो आणि त्याची माफी मागतो."

"विक्रम प्लिज ऐक ना रे, मला जर खरच वाटलं ना की अभय माझं ऐकत नाही मी तुला नक्की बोलेल तस पण आता नको...ऐकेल रे तो त्याचा राग शांत झाला की...माझं सोड, तू सांग कशी झाली तुझी ट्रिप?? दिशा अन तू मज्जा केली असेल न?"

"तुझं काय चालू आहे अन तू काय बोलत आहेस सोनु...? माझं सगळं ठीक आहे नको काही विचार करू माझा, आधी तुझं सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करू आपण.."

'आपण'....विक्रमसाठी तो आणि मी 'आपण' होतो...माझं सुख दुःख त्याने सगळं स्वतःच करून घेतलं होतं आणि मी मात्र माझ्या दुःखात हे विसरली होती किंवा मी ते बघू शकली नाही की तो माझ्यापासून, मला त्रास नको व्हायला म्हणून काहीतरी लपवत आहे....

थोडा वेळ तिथे बसून मी घरी आली...विक्रमला बोलून नक्कीच थोडं तरी मन हलकं झालं होतं... आता फक्त मी अभयची वाट पाहत होती की तो कधी येतो आणि मी कधी बोलते त्याला...थोड्या वेळाने अभय घरी आला...माझ्याकडे न बघताच बेडरूममध्ये गेला...मी त्याच्या मागे गेली,

"अभय, फ्रेश होतो आहेस ना, मी वाढते तुला, तुझ्या आवडीचं आहे आज सगळं जेवायला.."
अभय च मात्र काहीच उत्तर नाही मला, त्याने माझ्याकडे बघितलं ही नाही आणि कपाटात काहीतरी शोधायला लागला...

"अभय..मी ताट आणते जेवायला.."

"किचन मध्ये जाऊन स्वतःला लपवण्याचा प्रयत्न नको करू नैना....आणि जेवण्यात वैगरे वेळ नको घालवू... एक महत्वाच काम करायचं आहे तुला..."

"काय.. काय करायचं आहे?"

"जास्त काही नाही, आपले कपडे भरायचे..बॅग घ्यायची आणि निघायचं घरातून आताच्या आता..."
मला वाटलं मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे त्यामुळे मी पुन्हा विचारल अभयला,

"काय... काय बोललास अभय..?"

"निघायचं घरातून...आत्ताच..."
मला खरच विश्वास होतं नव्हता मी जे काही ऐकलं आहे ते खरं आहे की खोटं... राग वैगरे ठीक आहे पण अभय इतक्या टोकाची भूमिका घेईल हे वाटलं नव्हतं मला... आधीच त्याची या काही दिवसातली वागणूक मला क्षण क्षणाला शंभर मरण देत होती आणि आता हे...

"अभय...काय बोललास तू? खरच बोलतो आहेस तू हे?? "

"तू ऐकायला आलं नाही का नीट? की फक्त विक्रमचेच शब्द ऐकू येतात तुला?"

"नको ना इतका कठोर वागूस अभय....हे घर माझं पण आहे मी नाही जाणार कुठे. "

"ठीक आहे तूच बस मग एकटी घरात... मीच जातो. "

"नको सगळं बिगडवू अभय...तूला जस वाटत तस मी वागत आहे, का माझी एवढी परीक्षा घेतोस?"

"मी??, मी नाही तू घेत आहेस माझी परीक्षा... आज विक्रम बरोबर कॅफे मध्ये काय गुणगान केलंस माझं?'

"हो मी भेटली त्याला, पण आमचं काय बोलणं झालं यावर विश्वास ठेवणार आहेस तू?"

"नाही ठेंवणार त्यामुळे निघायचं तू घरातून..."

"इतक्या रात्री कुठे जाऊ मी, सकाळ होऊ दे, तुला न सांगताच निघून जाईल. "

"कुठे जाऊ म्हणजे? जा तुझ्या मित्राकडे, मी पण बघतो ना बायको घरात असताना तो तुला घरात घेतो का?"
कधी कधी नात टिकवण्यासाठी आपण शांत राहतो..खूप वेळा झुकतो, माफी ही मागतो... पण या सगळ्या गोष्टींचा उपयोग तेंव्हा होतो जेंव्हा समोरच्या व्यक्तिला आपली तगमग कळते, तो कुठेतरी आपल्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो... आज मात्र अभयने कहरच केला होता, आता मात्र त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं महत्वाचं झालं होतं...माझ्या संयमाला अभय माझी कमजोरी समजत होता...पण आता त्याला माझा 'संयम' काय आहे
हे दाखवण्याची वेळ आली होती...आता मी स्वतःला तयार केलं होतं येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी...मला आता एका क्षणासाठी ही या घरात थांबायचं नव्हतं..त्या घरावरचा हक्क, नवऱ्या वरचा हक्क गाजवण्यात मला तिळमात्रही ईच्छा नव्हती..जिथे माझा नवरा माझा मान राखू शकत नाही तसे हक्क मी त्यालाच परत द्यायचं ठरवलं आणि नम्रताला फोन केला की मला येऊन घेऊन जा...तिच्याशिवाय माझं कोणीच नव्हत इथे...

"हम्म...बरोबर आहे...मला विक्रमच नाही माहीत काही आणि माहीतही असेल तरी तुझ्या नजरेत आमच्या नात्याची काय किंमत आहे हे माहीत आहे मला...पण तुझं आणि साफिया च नातं तर खूप पवित्र होत ना रे, मग तुझी 'नावाची' बायको घरात असताना तू का नाही घेऊन आलास तिला कधी घरी?"

"नैना..."
अभय जोरात ओरडला माझ्यावर...मी डोळे बंद केले, एक मोठा श्वास घेतला आणि अंगातली सगळी शक्ती एकत्र करून बोलली,

"आवाज...आवाज खाली करायचा अभय...बायको आहे 'प्रॉपर्टी' नाही मी तुझी की वाटेल ते निर्णय घेऊन मोकळा होशिल.. अजून बरच काही ऐकायचं आहे तुला...."

हो... बरंच काही बाकी होतं बोलायचं अभयला...आणि आज मी अभयला त्याच्या आणि सफियाच्या नात्याची जागा दाखवुनच जाणार होती... कायमची...कमीतकमी विचार तरी हाच केला होता...
-------/----------------------------------------------------
क्रमशः