Samarpan - 19 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - १९

समर्पण-१९

हमारा ये सफर ऐसे मोड पे,
खत्म होगा ये सोचा ना था ।
तुम्हारे जाने से आँखे ना भिगती,
तुम अजनबी ही बने रहते तो अच्छा होता।


खूप वेळा प्रश्न पडतो मला, का विक्रमने माझ्या आयुष्यात यावं, का त्याच अस्तित्व मला माझं अस्तित्व वाटावं आणि का आम्ही एकमेकांसाठी इतकं व्याकुळ व्हावं... जर अश्याप्रकारे भेटून या वळणावर हे सगळं संपणार होतं तर आम्ही भेटलोच नसतो तर चांगलं झालं असतं... आज ही त्याची आठवण आली की असच वाटत तो अजूनही माझ्या आजूबाजूला आहे, त्याचे बोललेले शब्द आजही कितीतरी वेळ माझी झोप उडवून जातात....अभयला कदाचित माझी स्तिथी कळत असावी आता...कदाचित नाही, नक्कीच कळते त्याला पण ज्या गोष्टी हातातून निघून गेल्या त्यासाठी तोही काही करू शकणार नाही...

त्यारात्री खूप मुश्किलीने अभयला शांत केलं मी...माझं मन मलाच
खात होतं की मी अभयला दुःख दिलं... पण अभय तर माझ्या त्याच्या बाजूने सगळे निर्णय लावून मोकळा झाला होता, मी जर त्याच्या बाजूने विचार करू शकत होती तर तो का तयार नव्हता मला संधी द्यायला...असो, माझंच चुकलं असावं फक्त....

दुसऱ्या दिवशीची पहाट ही नैराश्यच घेऊन आली माझ्यासाठी... अभय सकाळीच उठून ऑफिसमध्ये निघून गेला, मी बनवलेलं टिफिन ही सोबत घेऊन जाणं पसंत केलं नाही त्याने...कस असतं ना लग्नाचं बंधन ही....दोन्ही बाजूने समतोल राखला गेला तर ठीक नाहीतर ते ओझं बनतं... मला निभवायचं होत अन त्यात मला अभयची साथ हवी होती...अभयला ही निभवायचंच होत पण माझी परीक्षा घेऊन...

विक्रम कदाचित पोचला असावा दिल्लीला, हे सांगण्यासाठी त्याने मला फोन केला पण मी काही फोन उचलला नाही... त्यानंतर त्यानेही पुन्हा फोन केला नाही...मात्र दर अर्ध्या तासात अभय मला फोन करत होता... काळजीपोटी नाही...तो हे बघायला फोन करत होता की मी खरच ऑफिस ला आहे ना...आता जरी ते आठवलं तरी स्वतःची परिस्थिती वर अजून ही डोळ्यांत पाणी येत...एकदा जर संशय संसारात घुसला की माणूस समजूतदारपणा ची पायरीच चढत नाही...

संध्याकाळी ऑफिस मधून घरी आली, पुन्हा तेच सत्र....कितीतरी वेळ अभयची वाट पाहिली, रोज संध्याकाळी साडेसात वाजताच घरी येणारा अभय आज रात्रीचे अकरा वाजले तरी घरी आला नाही आणि त्याने मला सक्त ताकीद देऊन ठेवली होती की जर मी त्याला जास्त फोन केले तर तो घरी येणारच नाही....अभय फक्त आणि फक्त माझा अंत बघत होता आणि माझी अवस्था काय होत होती हे मात्र मलाच माहित होतं...

खुप वेळ अभयची वाट पाहून मी उपाशीच झोपून गेली, रात्री एक वाजता कधीतरी अभय घरी आला....मी घाईघाईने त्याच्या साठी ताट वाढायला घेतलं तर मला बोलतो,

"मी जेऊन आलोय....आणि तसही तू जे काही दिलंय ना मला नैना त्यामुळे आता तुझ्या हातचं खायची पण ईच्छा नाहीये मला...."

"अभय, फक्त एक चान्स मागत आहे रे मी, मला बोलू तर दे, तुझ्या नजरेत मी चुकली..ठीक आहे...पण आपली बाजू ठेवण्याचा एक चान्स तर आरोपीला ही मिळतो...मग मी तर बायको आहे ना तुझी"

"काय बोलली नैना? बायको? तुला आज जाणीव झाली की तू माझी बायको आहेस.....इतके दिवस विक्रम सोबत हातात हात घेऊन फिरताना नाही कळाल तुला की तू कोणाचीतरी बायको आहेस..."

"अभय...प्लिज असे शब्द बोलू नको, माझं एकदा ऐक..एवढंच मागीतिये मी...."

"बोल...चल तुझं पण ऐकूनच घेतो एकदा...मला पण ऐकू दे अस काय आहे तुझ्या विक्रम मध्ये जे माझ्यात नाही...."

"अभय....मी अन नम्रता एका कार्यक्रमाला गेलो होतो ना...तिथून ओळख झाली आमची...आणि नंतर ही मैत्री एवढी कशी वाढत गेली आमची, नाही कळाल रे...हो कदाचीत मैत्री पेक्षा जास्तच आहे हे सगळं...पण माझा विश्वास कर मला विक्रम ने कधीही तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला नाही, तो मला नेहमी तुझी सकारात्मक बाजू दाखवत आलाय, आणि तुला दुःख व्हावं हे आमच्या ध्यानी मनीही नाही...मी त्याच्या सोबत बाहेर गेली मान्य आहे पण तो मला कधीच चुकीच्या ठिकाणी घेऊन गेला नाही किंवा माझ्यासोबत काही चुकीचं केलं नाही....आज मला नेहमी हेच समजावत आलाय की मी आपलं नात कस मजबूत करू शकते...आणि...."

"खरंच...मानलं पाहिजे हां तुझ्या विक्रमला...काय जादू केली त्याने काय माहीत, तुझं तर विक्रम पुराण बंदच होत नाहीये, आणि ना, खर बोललीस तू..त्याने नक्कीच आपल्या आपलं नातं बदलवलंय..पण ते कशाप्रकारे बदललंय हे मात्र तुझ्या डोक्यात घुसत नाही आहे नैना...."

"अभय तू त्याला चुकीचं समजतोयेस...तो असा नाही..."

"नैना...आपण एवढी वर्ष सोबत राहतोय, तुला माझं बोलणं पटत नाही, मात्र त्याच्यावर एवढा विश्वास आहे...आतापर्यंत राग येत होता तुझा आता मात्र तुला पाहयचीही ईच्छा नाही मला...."

"अभय, नको ना अस बोलूस...जे खरं आहे तेच सांगत आहे मी.."

"खरं?? ठीक आहे तू खरं सांगत असशील पण तो खरा नाही हे नक्की...जर त्याला एवढीच काळजी होती ना आपल्या मैत्रीनीची तर तो इतक्या पुढे गेलाच नसता...त्याने फसवलंय नैना तूला, आणि ती एवढी आंधळी झाली आहेस की तुला त्याच खर रुप दिसत नाही आहे..."

"तू त्याला भेटलाच नाही तर तू कस सांगू शकतो तो कसा आहे आणि कसा नाही..."

"मी सांगू शकतो...दुनियादारी कळते मला, पण दुर्दैवाने तुला कळत नाही....जाऊदे सगळं मला फक्त एक प्रश्नाच उत्तर दे?"

"काय?"

"तुला खरचं राहायचं आहे माझ्यासोबत? "

"हा काय प्रश्न आहे अभय, मला खरच राहायचं आहे तुझ्यासोबत?"

"विचार करून सांग, मागे पण मी तुला हेच बोललो होतो की जे आहे ते खरं सांग, पण जाऊदे ते, आता मात्र विचार कर, तुझ्या तोंडून मला त्याच नावही नको अन तुझ्या मनातही तो नको..."

"अभय..."

"काय झालं? नाही जमणार???"

"तसं नाही..हे अस एकदमच...तू एकदा भेटून घे ना त्याला, तो नक्कीच तुला चुकीचा वाटणार नाही.."

"मला कोणालाच भेटायचं नाही नैना...मी झोपतोय तुझा निर्णय झाला की सांग.."

असं बोलुन अभय झोपायला गेला...पण मला कळत नव्हतं मी काय करू, अभय सोबत नक्कीच संसार करायचा होता मला पण विक्रमला कस विसरू...ठीक आहे त्याला बोलणार नाही, त्याच नावही घेणार नाही पण त्याला मनातून कस काढू....आणि तिकडे विक्रम होता ज्याला हे सगळं काही घडलंय याची भनकच नव्हती.

-----------------------------------------------------------
आठवडा झाला होता विक्रमला दिल्ली ला जाऊन, आता दोन तीन दिवसांत तो परत ही येणार होता, पण इतक्या दिवसांत न मी त्याचे फोन घेतले न त्याच्या मेसेज ला रिप्लाय केला...मी अशी का वागत आहे यामुळे तो बेचैन असेल हे माहीत होतं मला, पण जर त्याला काही सांगितलं असत तर तो त्याचे सगळे कामं सोडून आला असता आणि मला ते नको होतं...मला त्याला त्याच्या कोणत्याच ध्येयापासून दूर करायचं नव्हतं...तो मला नेहमी म्हणायचा सोनू तू माझी प्रेरणा आहे पण आता मला त्याची मजबुरी किंवा त्याच्या दुःखाच कारण व्हायचं नव्हतं...मी विचार केला होता की तो परत आल्यावर मी त्याला सगळं काही शांतपणे सांगेन पण आज मात्र काय माहीत माझा स्वतःवरच ताबा नाही हे वाटत होतं....

आणि माझं मन अशांत होण्याचं कारण होतं अभय... हो अभयच...तो बोलला जरूर होता मला की तू सगळे कॉन्टॅक्ट बंद कर विक्रमचे... पण त्याचे रोजचे टोमणे, त्याचा तिरस्कार माझ्या सहनशक्ती च्या पलीकडे जात होत.... अभय जसं सांगेल तस मी राहण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचे दर अर्ध्यातासाला फोन, मला ट्रॅक करणं, मी कुठे आहे, कुठे नाही, त्याचे हजार प्रश्न मला चीड निर्माण करत होते....मी अभयला कधीच कोणते प्रश्न केले नव्हते, खर तर मी अभयला कधी संशयाच्या नजरेने बघितलच नव्हतं, जेंव्हा त्याने मला साफिया बद्दल सांगितलं तेंव्हाही मी हाच विचार केला की अभयला किती दुःख होत असेल..मग का अभय एका क्षणासाठी माझा विचार नाही करू शकत आहे...माझ्या जीवाची तळमळ मी कोणालाच सांगू शकत नव्हती....शारीरिक पीडा माणूस कितीही सहन करू शकतो पण मनाला होणारी पीडा त्याच काय?? त्यावेळेस लागतो मनाला आधार देणारा एक सहवास.... कोणी कोणाची पीडा वाटून घेऊ शकत नाही पण ते सहन करण्याचं सामर्थ्य तर देऊ शकतो ना, अभय कडून हीच अपेक्षा करत होती मी... पण तो मात्र हे सगळं वाढवण्याचं काम करत होता...आणि आता मला विक्रम ची कमतरता भासायला लागली, कधी कधी आपल्या भावना व्यक्त करण खुप जिकरिच होऊन जातं नाहीतर त्यांच्या उद्रेक होऊ शकतो...

तेवढ्यात विक्रमच फोन आला, मी खूप विचार केला फोन उचलू की नको म्हणून, पण जर तो अजून जास्त चिंतेत नको पडायला त्यामुळे मी बिझी आहे हे सांगून देते त्याला, या विचाराने मी फोन उचलला त्याचा,

"हॅलो.... हां विक्रम ऐक ना मी बिझी..."

"मी बिझी आहे, मला कामं आहेत, आता नाही बोलू शकत हे सगळे कारणं देऊन शहाणपणा दाखवू नकोस सोनू...सरळ सांग काय झालंय...काय प्रॉब्लेम आहे..."

विक्रम असं बोलल्यावर मला माझे अश्रु अनावर झाले होते पण मला इतकं भावनिक होऊन चालणार नव्हतं, त्यामुळे मी एक आवंढा गिळला आणि विक्रमला बोलली,

"अरे...हे काय जबरदस्ती आहे विक्रम...मला खरंच काम आहेत मी नाही बोलु शकत आता, तू प्लिज ठेव फोन...."

"या आठवड्या भरात खुपच कामं वाढलित तुझी, नाही?? इतकी काय बिझी आहेस सोनू की मेसेज ला एक रिप्लाय द्यायला तूझ्या कडे वेळ नाही...माझा जीव जातोय हा विचार करून की इतके दिवस झाले तुला बोललो नाही, तुला काही प्रॉब्लेम आहे का, तुझी तब्येत तर ठीक असेल ना, तुला काही झालं तर नसेल ना आणि तुला मात्र वेळच नाही माझ्यासाठी....."

"हे बघ विक्रम..मी ठीक आहे आणि मी खरच खूप बिझी आहे त्यामुळे वारंवार मला फोन करून त्रास देऊ नको..."

"तू रागावली आहेस ना माझ्यावर सोनू...मला माहित आहे मीच काहितरी केलं असेल त्यामुळे तू चिडली आहेस, ठीक आहे मी माफी मागतो...बर ते सगळं सोड, काय आणू तुझ्यासाठी दिल्लीहून ? "

"तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का विक्रम? मला कामं आहेत खूप, त्यामुळे मी फोन ठेवते आहे...आणि हो अजून एक, मला आता पुन्हा फोन करू नकोस, तू तुझ्या कामावर लक्ष दे.."

आणि एवढं बोलून खूप जड मनाने मी फोन कट केला...जर मी आज अस केलं नसत तर विक्रम मला वारंवार विचारत राहिला असता आणि मी जास्त वेळ त्याच्यापासून काही लपवू शकली नसती...जर त्याला काही कळलं असत तर तो लगेच यायला निघाला असता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच हे होत की तो दिशाला सोबत घेऊन गेला होता त्यामुळे तिच्यासमोर तरी त्याने माझा विचार न करावा हेच मला वाटतं होतं... पण हे सगळं विचार करताना मी हे विसरली होती की माझ्या अश्या बोलण्याने विक्रम जास्त दुःखी होईल आणि त्याचा सरळ सरळ परिणाम त्याच्या आणि दिशाच्या नात्यावर होईल....

त्यादिवशी मला खुप हताश झाल्यासारखं वाटत होतं... स्वतःला सांभाळण्याचा अतोनात प्रयत्न करत होती मी...घरात, ऑफसमध्ये कुठेच माझं लक्ष लागत नव्हतं... जेवणाकडे बघावही वाटत नव्हतं... आणि या सगळ्यामध्ये भर होती ती अभयच्या वागणुकीची...अभय संध्याकाळी घरी आला आणि मला बोलला,

"मग नैना....करमत नसेल ना तुला, खूप बंदिस्त वाटत असेल, हो ना? मग काय बोलले विक्रम साहेब आज.."

मला खूप आश्चर्य झालं की अभय ला कसं कळाल की विक्रमचा फोन आला होता पण तरीही मी काही चूकीच बोलली नाही विक्रमशी त्यामुळे अभयक उत्तर दिलं,

"अभय...मी त्याला सांगितलं की आता यापुढे मला फोन करू नको, त्याला माहित नव्हतं हे सगळं त्यामुळे त्याने फोन केला पण आता नाही करणार.."

"हो का...असं तर नाही ना की तुलाच दम निघत नाही त्याला बोलल्याशिवाय....कस स्वतःला थांबवशील म्हणा तू...एवढे घनिष्ट संबंध आहेत तुमचे..."
अभय तिरस्काराने बोलला मला,

"तू का असा वागतो आहेत अभय, तू जस म्हणतोस तस वागत आहे मी...तरीही तुझे टोमणे बंद होत नाहीत...त्रास होतो मला या गोष्टींचा..."

"कळतंय तुला नैना..त्रास काय असतं ते...पण मला जो त्रास दिला आहेस ना तू, त्याच्या तुलनेत तुला काहीच मिळत नाही आहे.."

आणि अस बोलून अभय दरवाजा आपटून निघून गेला...आता मात्र मला खरच कळत नव्हतं की अभयला माझा जराही विचार नसेल का?? इतका रुक्ष कसा वागू शकतो तो?? मी कधीच त्याला इतके प्रश्न नाही विचारले साफिया साठी...मी त्याला इतकं समजून घेतलं...त्याने कमीत कमी मला असं टोचून तर बोलू नये....पण कदाचित यालाच लग्नबंधन म्हणावं...या बंधनात अभय व्यवहारिक होता तर मी भावनिक आणि यातून सुटणं म्हणजे लग्न मोडणं.. आणि ते मला नको होतं....

हाच तर फरक आहे लग्न आणि प्रेमात.... प्रेम निसर्ग निर्मित आहे तर लग्न समाज निर्मित... त्यामुळेच प्रेम हे मुक्त आहे आणि लग्न हे बंधन...बरं बंधन असेल त्यालाही हरकत नाही पण ते बेड्या बनता कामा नये......माहीत नव्हतं काय नियती आहे माझी आणि हे ही माहीत नव्हतं की विक्रम परत आल्यावर काय करणार आहे...हीच तर खरी सुरुवात होती नात्यांच्या परीक्षेची....

----------------------------------------------------------
क्रमशः

( Dear readers...तुम्ही आतापर्यत माझ्या पाहिल्या वाहिल्या कथेला जो प्रतिसाद दिला आहे त्यासाठी मी मनस्वी आभारी आहे तुमची...तुमचे मेसेजेस, तुमच्या समीक्षा माझ्यात नवीन हुरुप निर्माण करतात लिखाणासाठी... पण एक सांगावस वाटतंय हा जो विषय मी मांडला आहे नक्कीच विवादास्पद आहे..पण कोणाला दुखवण्याच्या हेतूने हे लिहिल्या गेलं नाहीये.....आणि अजून एक समाजात काय होते काय नाही हे मला नाही माहीत, ही कथा काल्पनिक आहे....यात मी फक्त आणि फक्त दोन लोकांच्या त्यागा बद्दल लिहिलं आहे त्यामुळे माझ्यामुळे जर नकळतपणे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मला नासमज म्हणून माफ करा....)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED