Samarpan - 27 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - २७

कुछ खाली सी, बोझल सी,
बिखरीसी, बैचेनसी ज़िंदगी।
तेरा दिया दर्द पलकों पर,
तेरे गम से आबाद ज़िंदगी।


आपण मनुष्य ही किती स्वार्थी असतो ना ! म्हणजे बघा ना, जोपर्यंत आपण एकटे असतो तोपर्यंत आपल्याला ना आनंदाचा भास होतो ना दुःखाची जाणीव होते...म्हणजे कस एकदम 'तटस्थ' असतो, तेंव्हा माहीत असत की आपल्या भावनांना आपणच आवर घालायचा आहे, त्यावेळी भावनाविवश होऊन कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही आपण, आणि त्यामुळेच दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा योग्य निर्णय घेऊ शकतो......आणि जर कोणी व्यथा ऐकुन घेणारा मिळाला तर??? इथेच तर चुकतो आपण... व्यथा ऐकून घेणारा मिळाला तर आपल्या व्यथा वाढत जातात, जे छोटे मोठे दुःख आपण विसरलेलो असतो तेही उकरून काढतो आणि मग सुरू होतो प्रवास कधीही न संम्पणाऱ्या मनस्तापाचा....

माझंही तेच झालं...अभय सोबत राहताना आहे ती परिस्थिती स्वीकारली होती मी, थोडसं मनं मारून का होईना पण सुरू होत सगळं व्यवस्थित, जर तीन वर्षे संयम ठेवून काढले होते तर अजून वाट पहायची असती मी...पण तसं नाही झालं माझ्याकडून, नाही ठेवता आला ताबा स्वतःच्या मनावर आणि हाच मनाचा ताबा तोडून विक्रम कधी आतमध्ये शिरला, कळलंच नाही.. आणि जसा जसा तो मला ऐकत गेला मला कळत गेलं माझ्या मनात किती काय काय साठवून ठेवलं आहे मी, आणि ते साठवलेल जस जस बाहेर पडत गेलं तशी तशी माझ्या आणि अभय मधली दरी अजून खोल होत गेली...मला वाटत होतं की ही दरी भरून निघत आहे पण तो एक मुखवटा होता, जेंव्हा हा मुखवटा उतरला तेंव्हा कळाल की खरं चित्र काय आहे...

माझा निर्णय पक्का होता अभयला सोडून जाण्याचा, नम्रताला नक्कीच हे सगळ बघवत नव्हतं. तिने जितके प्रयत्न मला समजवण्याचे केले तितकच तिने अभयला ही मनवण्याचा प्रयत्न केला...मुळात अभयला आमचं विभक्त होणं मंजूर नव्हतंच पण त्याने मला या गोष्टी साठी जबरस्ती नाही केली. त्याने मला काही दिवस मागितले होते आणि मी त्याला ते दिले. साहजिकच होत, जस मला खूप कठीण होत तस त्यालाही असावं पण आता मी त्याचा विचार करणं सोडून द्यायचं ठरवलं होतं...

आठवड्याभराने माझं नागपूरला जायचं ठरलं होतं, तोपर्यंत अभय आणि मी आपापल्या पद्धतीने आमच्या घरी आमचा निर्णय कळवणार होतो... मी रोज स्वतःला हिम्मत देऊन पक्क करायची की घरी सगळं संगायच आहे , पण जेंव्हा सांगायची वेळ यायची तेंव्हा मात्र तोंडातून शब्द निघायचे नाहीत... अभयची पण काही वेगळी अवस्था नव्हती. पण जसा जसा एक एक दिवस जात होता माझी बेचैनी वाढत होती... आपण इतक्या सहजासहजी लग्नगाठ तोडू शकतो का?? खूप विचार केला या प्रश्नावर, पण निष्कर्ष मात्र काहीच निघाला नाही...

इतक्यात माझे रिपोर्ट्स ही आले होते, आणि ते काही इतके चांगले नव्हते. अबोर्शन मला मान्य नव्हतं आणि रिपोर्ट्स पाहून अभयची मनस्थिती काही जागेवर नव्हती. आमच्यात संवाद नसल्यातच जमा होता आणि मी माझा हट्ट सोडायला तयार नव्हती...हो, हट्टच होता तो माझा, आणि त्याहट्टापायी मी हे विसरली होती की मी आई होणार आहे.. त्यावेळेला मी स्त्री म्हणून स्वतःचा विचार तर केला परंतु एक आई म्हणून विचार केलाच नाही...आणि माझ्या ह्या हट्टापायीच माझी तब्येत खालावत होती त्यामुळे न राहवून अभय मला बोलला,

"नैना, मी तुला काही समजवण्याची किंवा तू माझं काही ऐकण्याची परिस्थिती आपल्यात उरली नाही...आपल्या दोघांचं भविष्य तर ठरवून मोकळी झालीस तू, पण जर या बाळाचा जन्म झाला तर ते कोणाकडे राहणार, याबद्दल तर काही बोललोच नाही आपण..."

"हे अस काही होईल याची कल्पना ही आपण केली नव्हती अभय, त्यामुळे हे बाळ माझं आहे आणि माझ्याकडेच राहणार...आणि तसही बाळावर पहिला अधिकार आईचा असतो..."

"मान्य आहे हेही तुझं मला, पण इथे तुझ्याच जीवाचा काही भरोसा नाही आणि जर तुला काही झालं तर बाळाचं काय होईल याचा विचार केलास कधी?? बर ठीक आहे हेही मान्य करतो की एक बाप म्हणून ला जे करायचं आहे ते मी करेन त्याच्यासाठी पण त्याच्या आईची कमतरता कुठून भरून काढू मी...भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेणाऱ्यातला मी नाही नैना आणि आता खरंच वाटत की तू 'इमोशनल फूल' आहेस ते...माझ्यावरच्या रागामुळे तू खुप स्वार्थी होऊन विचार करत आहेस.."

"मी काय स्वार्थीपणा केला अभय?"

"काय केला? तू मला बोलतेस ना नैना की मला कोणाच्या भावनेची किंमत नाही, मी फक्त माझ्याच दृष्टीने विचार करतो वैगरे वैगरे..., तू आता काय करत आहेस ग? कधी विचार केलास, हे बाळ या दुनियेत आल्यावर तू त्याला काय देऊ शकते आणि काय नाही..काय सांगशील त्याला की त्याचे आईवडील का वेगळे झाले? सांगू शकशील त्याला आपलं वेगळं व्हायचं कारण? मला माहीत आहे तुझ्या नजरेत फक्त एकच व्यक्ती महान आहे त्यामुळे माझ्या चांगल्या गोष्टी तुला दिसणारच नाहीत..मी लाख वाईट असेल नैना पण एका निष्पाप जीवाची अवहेलना करणाऱ्यातला मी नाही...पण तुझी ही जिद्द तुला खूप मोठ्या पापाच भागीदार बनवत आहे, आणि तू इतकी आंधळी झाली आहेस नैना की विक्रम पुढे तुला तुझं बाळही दिसत नाही आहे...त्याने खरच त्याचा संसार मोडला का ग तुझ्यासाठी??? नाही ना, मग तू का हा मूर्खपणा करत आहे...कधीही हातात न येणाऱ्या मृगजळमागे धावत आहेस, तुझ्या असण्या नसण्याचा काहीच फरक विक्रमला पडणार नाही, तुझ्या विना ही तो आनंदी आयुष्य जगू शकेल...पण हे जर हे बाळ जन्माला आल तर त्याला आई आणि वडील दोघांची गरज आहे, आणि मला तू चुकीच समजलं तरी चालेल पण एक सांगतो, बाळावर पहिला अधिकार जरी आईचा असला तरी बाळाला त्याच्या पित्यापासून वेगळं करण्याचा अधिकार तिला नाही... पण असो, तुला सांगून काहिच फायदा नाही, तुला जे पाहिजे तेच होईल...अगदी तुझ्या मनासारखं...."

मला एकही शब्द न बोलू देता अभय निघून गेला, जाताना मात्र माझी अडचण वाढवुन गेला...मला अस वाटते जर एका स्त्रीने ठरवलं तर ती कोणत्याही परिस्थितीत न डगमगता निडरपणे लढू शकते, पण एक आई म्हणून आपल्या बाळाचा विचार करताना ती कुठेतरी कमजोर पडते....एक गोष्ट मात्र अभय बरोबर बोलून गेला की बाळाला आई वडील दोघांची गरज असते आणि मी खरच आता स्वार्थी बनून विचार करत होती का? आणि विक्रमला माझ्या असण्या नसण्याचा काही फरक पडत नाही म्हणजे काय? एवढया लवकर मला विसरून जाईल तो? काहीच कळत नव्हतं, विचारांच्या चक्रव्यूहात मी पुन्हा फसली आणि माझ्या डोळ्यासमोर कधी अंधारी आली मला कळालच नाही...

जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा हॉस्पिटलमध्ये माझ्यासमोर अभय आणि नम्रता दोघे उभे होते, दोघांचे चेहरे चिंतेने उतरलेले दिसत होते, अभय किती अगतिक झाला आहे हे त्याच्याकडे बघून सहज कळत होतं, पण स्वतःला सावरत माझ्याजवळ येऊन तो मला बोलला,
"नैना, मला माहित तुला अबोर्शन करायचं नाही, मीही थकलो तुझ्यासमोर आता पण डॉक्टर बोलतायेत की तू रेस्पॉंड नाही करत आहे, आणि जर असच चालू राहील तुझं तर तुला हे बाळ ही गमवाव लागेल...आता बोल चालेल का तुला?? तुला काहीही करून हा स्ट्रेस कमी करावा लागेल नैना...तुला जे चांगलं वाटते ते तू कर...तुला विक्रम शी बोलायचं आहे का? मी फोन करतो त्याला, बोलावतो इथे, जर तुला यामुळे चांगलं वाटणार असेल तर तेही करतो मी, पण तू टेन्शन घेऊ नको, तू माझ्यापासुन दूर गेली तर चालेल पण तुझा जीव सुरक्षित राहिला पाहिजे हेच वाटत मला.."

अस बोलून अभय विक्रमला फोन करायला निघून गेला, पण तो अस अचानक का बोलला ? विक्रमच नावही ऐकणं ज्याला पसंत नव्हतं तो आज त्याला बोलावून घेतो आहे, माझ्यासाठी सगळं काही अनाकलनीय होत, मी नम्रताला विचारलं,

"ह्याला काय झालं ग? आणि हे विक्रमला बोलावणं वैगरे काय नाटक आहे याचं?"

"तुला त्याचं सगळं काही नाटकच वाटणार नैना, एवढा आंधळा विश्वास कधीच चांगला नसतो, तू शुद्धीत येतानाही विक्रमच नाव घेत होतीस, मग काय करणार तो? तुझ्या नजरेत अभयने तुझ्यासाठी काहीही केलं तरी नाटक आहे...मी हे नाही बोलत की विक्रम वाईट असेल पण त्याच्यामुळे आज तुमचं वाटोळं होत आहे आणि तुझ्या हाताने तू ते करत आहेस...नातं टिकवण्यासाठी तडजोड महत्त्वाची असते नैना....तुला हे सगळं खरच कळत नाही आहे की तुला समजून घ्यायचंच नाही ?"

"बरोबर आहे नम्रता, नातं टिकवण्यासाठी तडजोड करावी लागते पण आमच्या तर नात्याची सुरुवातच तडजोडीने झाली आहे, हे नातं नाही टिकू शकत आणि अजून एक विक्रम चुकीचा नाही,"

"असेलही....पण आज तुझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी अभय तुझ्यासोबत आहे नैना, विक्रम नाही....आणि आपल्या अडचणींच्या वेळी जो आपल्या सोबत असतो तोच आपला असतो जे लक्षात ठेव..."

बरोबर बोलली नम्रता...अडचणींच्या वेळी जो आपल्या सोबत असतो तोच आपला असतो, पण परिस्थिती कधी कधी अशी होते की अडचण माहीत असूनही आपला व्यक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही, पण म्हणून त्या व्यक्तीला आपली चिंता नाही असं होतं नाही...पण ही गोष्ट सगळ्यांना पटवून नाही देऊ शकत आपण, विक्रम माझ्यासाठी काय होता हे फक्त मलाच माहीत होतं... तो माझ्याजवळ नाही म्हणून त्याला माझी चिंता नाही असं नव्हतं....पण हे खरं होत का???
------------------------------------------------------------
कधी कधी एखाद्यावर खूप जास्त विश्वास ठेवणही खूप घातक असत...विक्रमने मला याचा प्रत्यय आणुन दिला होता, मला अस वाटलं होतं, केवळ माझ्या समाधानासाठी अभय बोलला असेल की तो विक्रमला फोन करतो पण जेव्हा मी विक्रमला हॉस्पिटलमध्ये पाहिलं, मला खूप मोठा धक्का बसला...खरच विक्रम आला होता मला भेटायला आणि तेही अभयच्या सांगण्यावरून...विक्रम आणि अभयला सोबत पाहून मला भीती होती की अभय रागाच्या भरात काय करेल पण अभय मात्र एकदम शांत होता...काही क्षणांसाठी तिथे निर्विकार शांतता पसरली, मात्र अभय बोलला,

"नैना, मी आणि नम्रता डॉक्टर ला भेटून येतो , तुम्ही बोला तोपर्यंत.."

मी केवळ होकारार्थी मान हलवली, हे सगळं काय चालू आहे मला काहीच कळत नव्हतं, पण विक्रमला पाहून मला नक्कीच आंनद झाला होता, मी त्याला बोलली,

"मला वाटत नव्हतं रे अभय तुला फोन करेल आणि तू लगेच येशील मला भेटायला..."

"हम्मम... तस मी येणारच नव्हतो पण यावच लागलं, तो बोलला की तुला मला भेटायचं आहे, विनंती केली त्याने आणि मीही विचार केला की काय ते एकदा क्लिअर करूनच टाकावं त्यामुळे आलो...आणि तुझ्या तब्येतीला काय झालं? तू का आहेस इथे?"

"ते विक्रम मी ना...."

"जाऊदे सोड नैनिका....तूझ काहीना काही चालूच असतं...."

विक्रम कपाळावर आठ्या आणत बोलला, मला मात्र त्याच अस बोलणं फार खटकलं, तरीही मी ते दुर्लक्ष करत त्याला विचारलं,

"तू कसा आहे? दिशा कशी आहे?"

"ठीक आहे, आणि जर इथून पुढे तू मला कॉन्टॅक्ट नाही केला तर अजून चांगल चालेल माझं.."

"म्हणजे?"

"म्हणजे हे की प्लिज आता वारंवार मला फोन करून इरिटेड नको करू, खूप मुश्किलीने माझ्यात आणि दिशा मध्ये सगळं व्यवस्थित केल आहे मी आणि आता मला ते बिगडवायच नाही पुन्हा...आणि तुला पण हेच सांगतो की तुही व्यवस्थित रहा अभयसोबत..."

विक्रम हीच गोष्ट मला प्रेमाने पण सांगू शकला असता पण आज त्याच बोलणं, त्याच वागणं सगळंच अजब होतं.. नेहमीच माझ्या मनाचा विचार करणारा विक्रम आज एवढ टचटच बोलतो आहे मला...पण तरीही स्वतःला आवरत मी त्याला बोलली,

"नाही करणार रे फोन, पण प्लिज तू असा का बोलतो आहे, एवढा रुक्ष... तू एवढा बदलशील हे वाटलं नव्हतं..."

"वेळेनुसार आणि परिस्थिती नुसार बदलावं लागत नैना, पण तुला हे कळत नाही आहे, आणि त्यासाठी मला इथे यावं लागलं तुला ते सांगण्यासाठी माझे सगळे कामं सोडून..."

"बरं उपकार केलेस माझ्यावर....मला कोणीतरी बोललं होत, सोनू मी कितीही बिझि असलो कामात तरी तुझ्यासाठी नक्कीच वेळ असतो माझ्याकडे... आठवतं का काही..?"

"हो सगळंच आठवतं पण आता परिस्थिती वेगळी आहे, कधी कधी प्रॅक्टिकल राहून विचार करावा लागतो आणि तसच जगावं लागत..."
हे सगळं बोलताना एकदाही विक्रमने माझ्या नजरेला नजर दिली नाही, अस वाटत होतं विक्रमच्या मनातले भाव आणि त्याचे तोंडातून निघणारे शब्द यात खुप तफावत आहे...मी त्याला बोलली,

"विक्रम, मला कोणीतरी अजून काय बोललं होत माहीत आहे?? आपण खोटं बोलू शकतो पण आपले डोळे नाही...तुझी आणि तुझ्या डोळ्यांची भाषा वेगळी आहे रे..."

मी अस बोलताच विक्रम उठुन उभा राहिला आणि मान दुसरीकडे वळवत बोलला,
"ह्या सगळ्या फालतू गोष्टी असतात नैना, तोंडातुन निघालेला शब्द खराच असतो अस नाही, त्यामुळे विसरून जा सगळं..."

"विसरून जाऊ?? कस विसरून जाऊ?? तू माझ्या आयुष्यात आला तेंव्हाच हे सांगायचं होत ना की हा सगळा माझा टाईमपास सुरू आहे...आज तू एवढं सगळं बोलत आहेस मला, तू खरंच विक्रमच आहेस ना, तुझी ही बाजू कधीच बघीतली नाही मी.."

"मी जसा होतो तसाच आहे, त्यामुळे तुला जे समजायचं ते समज, तुला कोणतच स्पष्टीकरण देणार नाही मी..."

"नाही मागत कोणतच स्पष्टीकरण, पण माझी काय अशी चूक झाली ज्यामुळे तू असा वागत आहेस माझ्यासोबत हे जाणून घेण्याचा अधिकार नक्कीच आहे मला.."

"हे बघ नैनिका, जास्त विचार करू नकोस, मूव्ह ऑन करायला शिक, चालत राहतात या गोष्टी, कधी कधी भावनेच्या भरात वाहून जातो आपण, आणि तू 'या अवस्थेत' अश्या फालतू गोष्टींवर विचार नाही करायला पाहिजे..."

"फालतू गोष्टी?? तुला काहीच कस वाटत नाही आहे विक्रम हे सगळं बोलताना? कसं एवढं बदलू शकतोस रे तू?"
आता मात्र मला खूप भरून आलं होतं, मी स्वतःला सावरू शकणार नव्हती, आज विक्रमने मला अभयपेक्षा ही जास्त दुःख दिल होत, माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते

"हे बघ नैनिका हे अस रडून जास्त तब्येत खराब करून घेशील तू, त्यामुळे जास्त विचार नको करू, मी खूप खुश आहे दिशासोबत आणि तू पण तुझे सगळे मतभेद विसरून जा अभयसोबत चे आणि सगळं नव्याने सुरू कर...आता हे..."

"बस...काहीच बोलू नको आता, माझी खोटी काळजी करण्याची काही गरज नाही तुला, अजून एक, माझ्या आणि अभयच्या मधात कोणी तिसऱ्या व्यक्तिने बोललेलं मला पटत नाही, तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे....आज मला स्वतःचा राग येत आहे की मी तुझ्यासारख्या व्यक्ती वर विश्वास ठेवला, लाज वाटत आहे मला स्वतःची की अभय वारंवार मला तुझ्याबद्दल सांगत राहिला आणि मी मूर्खासारखी त्याला भांडत राहिली....फक्त तुझ्यासाठी विक्रम...आणि तू काय केलंस...बरोबर बोलतो अभय, अंधविश्वास होता माझा तुझ्यावर....खुप झालं आता हे रडणं तुझ्यासाठी.. 'विक्रम' हे नाव ही विसरून जाईल मी, बर झालं माझे डोळे उघडलेस तू, तुझी काम बाकी असतील, निघ तू...खूप आनंदी रहा खुप प्रगती कर..."

"जाता जाता एक गाणं ऐकवू तुला नैना?? म्हणजे मला हे अस रडून वैगरे सगळं संपवण पटत नाही, आता जरी मला काही वाटत नाही तुझ्याबद्दल पण चांगला वेळ घालवला आहे तुझ्यासोबत त्यामुळे....आणि तुला काय सवय आहे रडायची पण मला सगळं चांगल्याने संपवायचं आहे माझ्या बाजूने..."
मला खूप आश्चर्य वाटत होतं, हाच का माझा विक्रम ज्याला माझ्या डोळ्यात अश्रूंचा एक थेंब ही सहन होत नव्हता, हाच का माझा विक्रम जो रात्र रात्र फक्त माझ्या काळजीत घालवायचा, विश्वास पटत नव्हता पण जे समोर आहे ते नाकारता ही येत नव्हतं..

"तू मला कितीही दुःख दिल तरी तुझी हर एक इच्छा पूर्ण होओ हेच निघतं आणि हेच निघणार माझ्या मनातून विक्रम, ऐकव गाणं, बघू दे मला ही की किती तुझं मन दगड बनवलं आहेस तू..."


महफ़िल में तेरी हम न रहें जो , ग़म तो नहीं है, ग़म तो नहीं है, क़िस्से हमारे नज़दीकियों के कम तो नहीं हैं, कम तो नहीं हैं,
कितनी दफ़ा सुबहा को मेरी तेरे आँगन में बैठे मैंने शाम किया


माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि अचानक मला अस जाणवलं की विक्रमचा कंठ दाटून आलाय आणि त्याने गाणं थांबवलं, मी त्याच्याकडे बघितलं तर त्याने नजर खाली केली आणि बोलला,
"माझा गळा मला ठीक नाही वाटत आहे, असू दे...निघतो मी, तू काळजी घे..."
आणि असं बोलून विक्रम निघून गेला....कायमचा...एकदाही मागे वळून बघितलं नाही..जाता जाता माझं सगळं काही घेऊन गेला, मी माझं सगळं काही हरून बसली होती त्याला...त्याचे शब्द मला बाणासारखे टोचले होते, आज मला कोणीच सावरू शकणार नव्हतं...विक्रम गेला आणि अभय, नम्रता आले....अभयला पाहून माझा बांध फुटला आणि मी जाऊन त्याच्या गळ्यात पडली...माझ्या आयुष्याचा खेळ झाला होता...अभय आणि नम्रताला मी सगळं काही सांगितलं...त्यांनी सगळं ऐकून घेतलं माझं. दोन दिवसांनी मी घरी आली, मला कशाचाच भान नव्हतं. अभय आणि नम्रता माझी सगळी काळजी घेत होते...न राहवून अभय मला एक दिवस बोलला,

"नैना, तुला त्रास होईल असं मला काहीच बोलायचं नाही किंवा वागायच नाही तरीही सांगतो, एक चूक मी केली, एक तू केली... विक्रम तसाच होता, तो आता त्याच्या आयुष्यात खुश असेल आणि तू काय करत आहे, माझं ऐक अजूनही वेळ गेली नाही, विसर सगळ, आपण आनंदाने राहू सोबत, मी वचन देतो तू जस म्हणशील तस मी राहायला तयार आहे पण प्लिज स्वतःला त्रास नको करून घेऊ.. आपल्या बाळाचा विचार कर...

"अभय बरोबर बोलत आहे नैना, तुझे आधिच खूप प्रॉब्लेम आहेत प्रेग्नन्सी मध्ये, विक्रमला एक खराब स्वप्न म्हणून विसरून जा...अभयला एक चान्स दे," नम्रता बोलली...

काय कलाटणी घेतली होती ना माझ्या आयुष्याने ! स्वप्नातही जो विचार केला नव्हता ते सगळं घडलं माझ्यासोबत.. पुढे जाता येत नव्हतं आणि मागचं सुटत नव्हतं....पण तरीही माझ्या होणाऱ्या बाळासाठी मला जगणं गरजेचं होतं...मी अभयसोबत राहायचं ठरवलं... मी ऑफिसला जाणं ही बंद केलं होतं...अभय त्याचा जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत घालवायचा..माझ्यासाठी रात्र रात्र जगणं, माझी काळजी घेणं सगळं काही करत होता..मला एकट वाटायला नको म्हणून कधी त्याचे तर कधी माझे आईवडील राहायचे आमच्याजवळ, अभयने कधीच आमच्यातले वाद घरच्यांपर्यंत नेले नाही...प्रत्येक रविवारी नम्रता मला भेटून जायची..माझी काळजी घेण्यात अभयने कोणत्याच प्रकारची कमी ठेवली नाही..खूप आदर वाटायचा त्याचा..आणि प्रेम?? नाही, अभयवर प्रेम नव्हतंच माझं...पण विक्रमने जे काही माझ्यासोबत केलं आणि तरीसुद्धा मी अभयला त्याच्यासाठी जे भांडली त्याबद्दल मला खूप वाईट वाटायच...

एक एक दिवस निघुन जात होता, सगळं काही होतं पण तरीही रात्री अचानक झोपेतून जाग यायची, भास व्हायचे की विक्रम मला बोलतोय...कधितरी वाटायचं की विक्रम येईल अचानक आणि मला बोलेल, "चशमिश, ये खाली लवकर मी वाट पाहतोय.." पण हे सगळे माझे भ्रम होते. अस काहीच घडणार नव्हतं..आणि मग मला आठवायची ती शेवटची भेट..ती भेट आठवल्यावर खूप राग यायचा माझा आणि विक्रमचाही....विक्रमने बोललेले एक एक शब्द आठवायचे आणि माझं मन तुटत जायचं...का? का असा वागला असेल तो?? मीच भेटली होती का त्याला खेळण्यासाठी??कित्तीतरी प्रश्न होते मनात..उत्तर मात्र कशाचच नव्हतं...

का विक्रम माझ्या आयुष्यात आला?? त्याने मला जगायला शिकवलं, आकाशात झेप घ्यायला शिकवली आणि स्वतःच माझे पंख कापून गेला...का केलं असेल त्याने अस?? एकदाही त्याच मन दुखलं नसेल का त्याच?? माझ्या आयुष्यातल्या पुस्तकात विक्रम नावाचं पर्व अश्याप्रकारे संपेल याची कल्पना केली नव्हती...आणि एक दिवस आठवला तो प्रसंग... हॉस्पिटलमध्ये विक्रम मला भेटायला आला होता तेंव्हा त्याला हे माहीत नव्हतं की मला काय झालंय...मी किंवा अभयनेही त्याला सांगितलं नव्हतं माझ्या प्रेग्नन्सी बद्दल मग तो का बोलला की 'या अवस्थेत तू टेन्शन घेऊ नको..' अरे देवा!! किती मोठी चूक केली मी..मी पुन्हा विक्रमला चुकीचं समजली...तरी त्याच्या बोलण्यातून वाटत होतं मला की तो खोटं बोलत आहे...मी घाईघाईने मोबाईल घेतला त्याचा नंबर शोधून काढला पण काही फायदा झाला नाही...फोन बंद होता... कितीतरी दिवस सगळ्या प्रकारे प्रयत्न केले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे, पण काही फायदा झाला नाही...आणि आता माझे दिवस ही भरत आले होते त्यामुळे बाहेर कुठे जाण मला शक्य नव्हतं...अभय आनंदी होता माझ्यासोबत त्यामुळे त्याच्याकडे पाहून वाटायचं की आता नको पुन्हा भूतकाळात जायला... नम्रताला ही काहीच सांगितल नाही मी...पण एक मात्र खरं होत, मी विक्रमला गमावलं होत..कायमचं...
---------------------------------------------------------------

क्रमश:

तुमचीच,
अनु...🍁🍁


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED