समर्पण - २८ (अंतिम भाग) अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्पण - २८ (अंतिम भाग)

एक किनारा उस पार,
एक किनारा इस पार है।
इतनीसी दुरी दरमियाँ और,
न खत्म होनेवाला इंतजार है।


कधी कधी खूप जवळ असूनही ते जे थोडसं अंतर असत ना तेच गाठू नाही शकत आपण...आणि ते थोडसं अंतर खूप काही शिकवून जात आपल्याला...विक्रम आणि माझ्या मधात तेच 'थोडसं अंतर' आहे आता...माझ्या आयुष्यातले सगळ्यांत अनमोल क्षण दिलेत विक्रमने मला आणि त्या सोबत दिला न विसरता येणारा भूतकाळ....त्या भूतकाळाला पचवण्याची शक्ती हळूहळू मी आत्मसात केली, किंवा वेळेनुसार त्या जखमा भरत गेल्या आणि त्या जखमांचे व्रण ही मी झाकून ठेवण्यात यशस्वी झाली परंतू असा अचानक विक्रम गायब होईल याची कल्पना केली नव्हती कधीच मी...काय म्हणायचा तो, "सोनु, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असेल मी तुझ्यासोबत, तुझ्या चढत्या उतरत्या काळात नक्कीच उभा असेल तुझ्यासोबत..." दुःखापेक्षा ही हसू जास्त येत हे सगळं आठवलं की...हो हसूच येत...भावनेच्या भरात आपण किती काय बोलून जातो पण खरंच उतरता काळ आला तर त्या वाक्यांची पूर्तता होईल का याचा मात्र विचार करत नाही...खर तर चूक यात कोणाचीच नाही, मनयुष्याचा हाच एक गुण(अवगुण) आहे की तो फक्त चांगल्या गोष्टींच प्लॅनिंग करतो, चुकून काही वाईट घडलं तर त्यावेळी कस वागायचं याचा विचार केलेला नसतो त्याने... आणि त्यामुळेच उत्साहाच्या भरात बोललेल्या त्याच्या सगळ्या गोष्टी, वाईट प्रसंगी फोल ठरतात...

विक्रमचा खूप राग होता मला, नेहमी त्याला जे वाटलं तेच केलं त्याने, माझं मन दुखवायच नव्हतं ना त्याला मग माझ्या मनाचा जराही विचार केला नसेल का त्याने...त्याला खूप चांगल्याने कल्पना होती या गोष्टीची की तो असा अचानक गायब झाल्यावर माझी काय अवस्था होईल त्याची...मान्य आहे माझ्या भल्यासाठीच गेला तो, पण त्या मूर्खाने एकदा तरी सांगून पाहायचं होत मला की ही मैत्री आता सम्पूष्टात आणायची वेळ आली आहे मी सगळं काही मान्य केलं असत, पण हे याप्रकारे सगळं सम्पवून जाणं कितीपत योग्य वाटलं त्याला? एक शल्य होत मनात की ज्याप्रकारे या नात्याची सुरुवात झाली होती त्याचप्रकारे गोड आठवणी घेऊन याचा शेवट झाला पाहिजे, पण विक्रमने ही संधीही नाही दिली मला...आणि ती संधी कधीतरी येईल याची वाट पाहण्यातच माझे दोन वर्ष निघून गेलेत.....

हो...दोन वर्षे झालीत विक्रमला पाहून, त्याला भेटून. या दोन वर्षात एक दिवस ही असा गेला नाही जेंव्हा मला त्याची आठवण आली नाही, या दोन वर्षात जेंव्हा कधी माझा फोन वाजायचा प्रत्येक वेळी मला हेच वाटायच की विक्रम असेल..मला मनापासून वाटायचं की एकदा तरी शेवटचं त्याला बोलावं, भेटावं आणि सगळे काही गैरसमज दूर करून गोड आठवणी घेऊन यावं...याच गोष्टीची वाट पहायची मी रोज...माझी ही एक गोष्ट सोडून माझ्या...नाही फक्त माझ्याच नाही तर माझ्या आणि अभयच्या आयुष्यात खुप काही बदललं होतं....माझं आणि अभयच ते तोडक मोडकं नात सावरायला आता आमच्या मधात आमचा मुलगा होता..'निरीक्ष'...विक्रम, मला शेवटचं भेटून गेल्यापासून माझी तब्येत दिवसेंदिवस खराब होत गेली..शारिरीक दृष्टया आणि मानसिक दृष्ट्या ही मी खूप खचली होती...हे सगळं असताना अभय माझ्यासाठी भक्कम आधार बनून उभा राहिला....म्हणतात ना कोनाच्या बाबतीत आपलं मत बदलण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो...अभयच्या बाबतीत माझे मत बदलणारा तो क्षण 'निरीक्ष' च्या जन्माच्या वेळी आला..मला वारंवार काळजी घ्यायला सांगितले असूनही मी घेतली नाही आणि त्याचे परिणाम हे होते की बाळाच्या जन्माच्या वेळी आमच्या दोघांचा जीव संकटात होता आणि त्यावेळेला अभय तगमग पाहून मला कळाल की किती कठीण प्रसंगातून अभय जात आहे...सुदैवाने सगळं काही व्यवस्थित झालं पण देवाने माझ्याकडून मी पुन्हा आई होण्याचं सुख मात्र हिरावून घेतलं...या सगळ्या कठीण प्रसंगी अभय खंबीरपणे माझ्यासोबत उभा होता...एक पिता म्हणूनही अभय कुठेच कमी नाही पडत आहे आणि हे सगळं होतं असताना मी मात्र स्वार्थी होऊन विक्रमचा विचार करणं मनाला पटत नव्हतं... राग येत होता विक्रमचा की कधीतरी त्याने मी जिवंत आहे की मेली हे चौकशी ही करू नये, म्हणजे किती निष्ठूर व्हावं त्याने...पण मी स्वतःच्या मनाला समजवायची की त्याने जे केलं ते माझ्या सुखासाठी केलं....पण तरीही वाटत की एकदा तरी खबर घेऊच शकला असता तो माझी...पण आता स्वप्नांची दुनिया सोडून सत्य स्वीकारलं आहे मी....आज अभयला बाळासोबत खेळतांना त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद पाहून वाटते की जर मी खरचं मी नागपूरला निघून गेली असती तर या दोघांना वेगळ करण्याचं किती मोठं पाप घडलं असत माझ्या हातून....

" नैना...नैना...आम्हाला भूक लागली आहे.."
अचानक अभयच्या आवाजाने माझी तंद्री भांगली आहे आणि मी माझ्या विचारातून बाहेर आली...समोर अभय निरीक्ष ला उचलून घेत, माझ्याकडे पाहून मिश्कीलपणे बोलला,

"बाबू, तुझ्या मम्माची ना ही वाईट सवय आहे, एकदा काही विचारात बुडाली की आपल्या पोटापाण्याचा तिला काही फरकच पडत नाही...."

त्याच्या या वाक्यावर निरीक्ष ही टाळ्या वाजवत होता जस त्याला खूपच काही कळलं असावं...मी अभयला काही उत्तर न देता किचन मध्ये जायला निघाली तेवढ्यात अभय मला अडवत बोलला,

"नैना, गम्मत करत होतो मी, मी बनवून ठेवला आहे नाश्ता आधीच, तुला लक्षात आहे ना आज तुझी विजिट आहे डॉक्टरकडे, तयार हो पटकन.."

"आज नको हा अभय, एकतर तुला सुट्टी नाही आणि निरीक्ष ला घेऊन मी एकटी जाणार नाही, तुला माहीत आहे ना किती त्रास देतो तो..."

"मला माहीत आहे तो किती त्रास देतो आणि मला सुट्टी नाही त्यामुळे तू नम्रता सोबत जाणार आहेस, मी बोललो आहे तिला, ती येईलच आता..."

"वेडा आहेस का तू, तीच आताच लग्न झालय अभय, तिला कशाला त्रास दिलास, आधीच किती काय काय केलय तिने आपल्यासाठी...."

"सरळ सरळ सांग ना नैना की मला कंटाळली आहेस तू, त्यामुळे तू मला तुझ्या घरी येऊ देत नाहीस..."
नम्रता उगाच दुःखी होण्याच नाटक करत घरात येत बोलली,

"झाली तुझी नौटंकी सुरू, मी तर हरली बाबा तुझ्या आणि अभय समोर, चल मी होते तयार , निघुयात आपण.."

नम्रता खरच मला मैत्रीचा नवा अर्थ शिकऊन गेली... माझ्या प्रत्येक चढत्या उतरत्या काळात ती माझ्या सोबत होती...आज माझं आणि अभयच नात जे तग धरून आहे त्यात नम्रताचा खूप मोलाचा वाटा आहे...
----------------------------------------------------------- -------

कौन कहता है भगवान आते नहीं,
तुम मीरा के जैसे बुलाते नहीं |

आम्ही टॅक्सीने हॉस्पिटलमध्ये जायला निघालो, आणि ड्रायव्हर ने लावलेलं हे भजन कानावर पडलं... किती खर आहे ना, मिरेचे प्राण वाचवण्यासाठी तो लीलाधर ही धावून आला होता, त्यालाही तिच्या पीडा पाहावल्या नाही गेल्या...मग माझ्या मैत्रीत काय चूक झाली होती की विक्रम मला अश्याप्रकारे विसरून गेला...खर तर आता मला त्या मैत्रीची अपेक्षा नाही, पण तो कुठे असेल कसा असेल, सुखी तर असेल ना याची उत्तर जरी मिळाली तरी मनावरचं ओझं कमी झाल्यासारखे वाटेल मला, त्यांनतर मला कोणत्याच प्रकारे त्याच्या संपर्कात राहून त्याच्या अडचणी वाढवायच्या नाहीत... आज खूप प्रकर्षाने वाटत होतं की एकदा शवटच त्याला पाहून घ्यावं...आणि याच विचारात आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो..

माझ्या सगळ्या टेस्ट आणि चेकअप करून आम्ही परत निघणार की आमच्या लक्षात आलं माझी पर्स डॉक्टरांच्या केबिनमध्ये राहिली,

"नम्रता माझी पर्स विसरली ग मी, तू निरीक्षला घे, मी पर्स घेऊन येते..."

"नको ग बाई, तुझ्या नटखट कान्हाला तुच पकड, मला पागल करून सोडेल तो, तू थांब मी घेऊन येते..."
नम्रता निरीक्षचे गाल ओढत बोलली..मी नम्रताची वाट पाहत निरीक्षला तिथे खेळवत होती की मागून माझ्या खांद्यावर नम्रताने हात ठेवला, मी मागे न वळता बोलली,

"किती उशीर यायला...कीती वाट पहायची मी...आता बोल पटकन..."
आणि नम्रता उत्तर का देत नाही म्हणून मी मागे वळली तर माझे पाय जागेवरच थबकले, माझं हृदय पुन्हा रेल्वेच्या स्पीडने पळायला लागलं, डोळे वाहायला लागले, बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती पण शब्द सुचत नव्हते....कारण आज दोन वर्ष्यानंतर माझ्यासमोर विक्रम उभा होता...हो, विक्रम, माझा विक्रम...वेळ थांबल्यासारखी वाटत होती, आजुबाजुला काय सुरू आहे, कोणताच आवाज, कोणाचेच शब्द कानावर पडत नव्हेत, नजरेसमोर दिसत होता तो फक्त विक्रम...त्याला पाहून एका क्षणांत ते सगळे दृश्य माझ्यासमोर तरळले जे मी आणि विक्रमने सोबत घालवले होते, आणि तेही आठवलं की कसा तो मला सोडून गेला,

"सोनू.....कशी आहेस?"
त्याचे हे शब्द कानावर पडताच मी स्वतःला सावरलं,

"कोण तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला आणि माझं नाव नैनिका आहे..."
मी थोडं चिडूनच बोलली आणि निरीक्षला घेऊन जायला निघाली,
पुन्हा विक्रमचा आवाज कानी पडला,

"थांब ना जाडे, किती चिडशील...माहीत आहे मला मी खूप उशीर केला यायला, खूप वाट पाहिली असशील तू माझी..पण एक.."

"पण काय? बोला मि. विक्रम, तुमचे नियम, कानून, मर्यादा सगळे आडवे आले असतील ना, आणि मी का वाट पाहू तुमची, वाट आपल्या माणसांची पाहिली जाते, परक्यांची नाही..."
स्वतःचे अश्रू आवरत मी बोलली,

"बरोबर, मी परका आहे त्यामुळे आज मला पाहून स्वतःचे अश्रु लपविण्याचे निरर्थक प्रयत्न तू करत आहेस ना, एकदा बोल ना प्लिज, मला एकदा बाळाला तरी पाहू दे..."
अस बोलून त्याने निरीक्षला घ्यायला हाथ पुढे केला,

"तो अनोळखी लोकांजवळ जात नाही विक्रम.." आणि माझं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत निरीक्ष त्याच्या जवळ गेला पण..,मला खुप विशेष वाटल की एरवी अनोळखी लोकांना पाहून हंबरडा फोडणारा माझा मुलगा इतक्या लवकर विक्रम जवळ गेला तरी कसा,

"तुझी मम्मा किती चिडकी आहे रे बाळा, "
विक्रम बोलला,
"पण सोनू याचे गाल तुझ्यासारखेच आहेत ग, गब्बू एकदम, आणि डोळेही तुझ्यासारखेच आहेत, फक्त याला चष्मा नको लागायला, नाहीतर तुझ्यासारखा डबल बॅटरी होईल😝😝"
हाच आहे विक्रम, कोणाला कोणत्याही परिस्थितीत हसवू शकतो, मलाही हसायला आलं,
" बघ हसली की नाही, आता हा माझा फ्रेंड... तुझ्यापेक्षा माझा फ्रेंड जास्त समजदार आहे...हो की नाही चॅम्प..."

"हो, जुनी सवय आहे रे तुझी, आधी हसवायच आणि मग रडवायच,.."

आणि एवढ्यात नम्रता तिथे आली, विक्रमला पाहून तिचे चेहऱ्यावरचे रंग रागात बदलले, ती मला बोलली,
" नैना, अनोळखी लोकांशी काय बोलत बसलीस तू, चल उशीर होतोय..."
तिचा हा अवतार पाहून विक्रमला वाईट वाटलं आणि मलाही बरच काही बोलायचं होत त्यामुळे मी नम्रताला समजवण्याच्या स्वरात बोलली,
" हे बघ नम्रता प्लिज मला पंधरा मिनिटं दे, मला बोलायचं आहे, तू प्लिज निरीक्षला घेऊन बाहेर थांबते का? मी वचन देते तुला, या दोन वर्ष्यात जी नैना तुम्हाला पाहायला मिळाली तीच तुझ्यासोबत घरी येईल, विश्वास ठेव..."
आता मात्र नम्रता थोडी शांत झाली आणि निरीक्षला घेऊन गेली...त्यांनंतर विक्रम मला बोलला,

"सॉरी सोनू, मी पुन्हा एकदा चूक केली, माझ्यामुळे पुन्हा एकदा तुला बोलणी खावी लागली.."

"अस काही नाही विक्रम, जाऊदे ते सगळं, तू सांग कसा आहेस, दिशा कशी आहे...."

आणि विक्रमने बोलायला सुरुवात केली. या दोन वर्ष्यात त्याच्या ही आयुष्यात बरच काही घडून गेलं होतं... माझ्यामुळे कशी दिशा त्याला सोडून गेली, कस त्याने पुन्हा तिला समजवून परत आणलं, त्याचे बिझिनेस मध्ये झालेले नुकसान, माझ्या व्यथा...सगळं काही आम्ही सांगितलं एकमेकांना,
"एवढं सगळ झालं विक्रम, मला एकदा ही सांगितलं नाहीस तू, हॉस्पिटलमध्ये भेटायला आला तेंव्हा ही कसा वागून गेला तू, माझा एकदाही विचार नाही आला का रे तुला, का असा वागलास.."

"खूप वाटलं सोनू, तुला बोलावं, एकदा तुझी खबर घ्यावी पण हे सगळं वाटताना मला हॉस्पिटलमधला तो दिवस आठवायचा जेंव्हा मी तुला भेटायला आलो, अभय अक्षरशः माझ्यासमोर हाथ जोडून उभा राहिला सोनू, मला त्याच्या नजरेत खूप पडल्यासारख वाटलं आणि त्याला तुझी किती काळजी, किती प्रेम आहे हे सुद्धा दिसून आलं, तेंव्हा मला जाणीव झाली की मी तुझ्या आयुष्यात राहून फक्त तुझा संसार उद्धस्त करत आहे, कदाचित तुझ्या नजरेत मी चुकीचा असेल पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता..पण आज तुला पाहून वाटत माझा निर्णय योग्य होता..."

" आणि तुझं काय विक्रम? तू इथे काय करतोयस? सगळं ठिक आहे ना?"

"हो ग, ठीक आहे सगळं, दिशाला आणलं होतं, आई होणार आहे ती, थोडा अशक्तपणा होता तिला त्यामुळे सलाईन लावलं आहे"

"आणि तू पुन्हा तीच चूक करत आहेस तिला सोडून मला भेटायला आलास..."

" खर तर तुला पाहिलं आणि स्वतःला रोखु नाही शकलो मी, फक्त एकदा तुला बोलाव अस वाटलं, मला तर आधी वाटलं होत तू खुप चिडशील कदाचित मारशील ही मला😂😂"

" चीड तर अजूनही आहे माझी तुझ्यावर विक्रम, तुला माहीत आहे तू असा अचानक गायब झाला आणि माझी काय अवस्था झाली, कितीतरी दिवस रडण्यात घालवले, मी बाहेर जाणं सोडलं विक्रम, भिती वाटायची की चुकून त्याठिकाणी गेली जिथे आपण भेटलो, फिरलो, तर माझ्या जखमेवरची खपली निघून पुन्हा वाहायला लागेल आणि मी कदाचित स्वतःला आवरू नाही शकणार, आणि निरीक्ष साठी मला स्वतःला संभाळण गरजेचं होतं..."

"खूप त्रास दिला ना मी तुला सोनू...त्यासाठी तू मला काही पण शिक्षा देऊ शकतेस, पण आता मी माझ्या मैत्रीणीला नाही काही त्रास होऊ देणार, आता आपण खूप चांगले मित्र बनून राहू.."

"तुला खरच शिक्षा हवीय विक्रम? बघ बर, माझी शिक्षा खुप कडक असणार आहे..."

"चालेल ग...तू बोल फक्त.."

"विक्रम...मला तुझ्याकडून एक वचन हवंय...आजच्या नंतर तू मला कोणत्याच प्रकारे संपर्क करण्याचा प्रयत्न करणार नाहीस, मला पुर्णपैकी विसरून जाशील आणि आजच्या सारख चुकून कधी एकमेकांसमोर आलो तर मला ओळख ही देणार नाहीस.."

हे ऐकून विक्रमचे रंग उडाले, त्याला हे अपेक्षित नसावं, पण माझ्याकडेही दुसरा पर्याय नव्हता,
"सोनू तुला कळतंय तू काय बोलत आहेस, नको इतकी कठोर वागूस ग, कधीतरी चांगल्या मित्रासारख भेटूच शकतो ना आपण, मी..,मी नाही येणार तुझ्या आणि अभयमध्ये, तू त्याची काळजी नको करू..."

"मला माहित आहे विक्रम, तू मला त्रास होईल असं काहीच करणार नाहीस, पण आता स्वार्थी होऊन जमणार नाही रे, आणि नुसता अभय का, दिशाचाही विचार करायला हवा ना, आता मी पुन्हा तिला दुःखात टाकण्याच काम नाही करू शकत विक्रम, आणि आता ती मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी आहे, तिला तुझी जास्त गरज आहे, आणि मला पुन्हा तिचा विक्रम तिच्यापासून दूर करायचा नाही, हे पाप पुन्हा नाही करू शकत मी आणि राहिला प्रश्न आपला तर आपण इतके सुंदर क्षण सोबत जगलो आहोत की ते पुरेसे आहेत आपल्याला आयुष्यभर.."

"मला वाटलं नव्हतं तू अस काही मागशील माझ्याकडून"

"मला ही वाटलं नव्हतं की तू असा सोडून जाशील..."

"ठीक आहे तुही एक वचन दे, या विक्रमला आठवून कधीच डोळ्यांतून पाणी काढणार नाहीस, आणि लक्षात ठेव सोनु, या जन्मात अभय आणि दिशासाठी तुझी ही गोष्ट मान्य करत आहे, पुढच्या जन्मी ऐकणार नाही"

"पुढच्या जन्मी ऐकूही नको, ऐकलं तर फटके खाशील..."

"यामुळेच आम्ही विदर्भ वेगळा देत नाही😜"

"नालायक आहेस, नाही सुधरणार कधी तू..."

"बघ आता जसा पण आहे तुझाच..."

"माहीत आहे....एक शेवटचं गाणं ऐकवशील प्लिज?"

हु मैं यहाँ तुम हो वहा राधा,तुम बिन नही है कुछ यहाँ,मुझमे धडकती हो तुम्ही तुम दूर मुझसे हो कहा,तुम प्रेम हो तुम प्रीत हो ......

गाणं बोलताना विक्रमचे डोळे पाणावले, मलाही अश्रू आवरणं कठीण होत जातं होत, अभय आणी दिशासाठी मला इथून निघणं गरजेचं होतं...

"विक्रम, आज मी तुझी सोनू इथे सोडून चालली आहे, पुढच्या जन्मी ही सोनु घेऊन येशील मला भेटायला,...मी निघू विक्रम?"
पाणावलेल्या डोळ्यांनी तो बोलला,
" माझ्या परमिशन ची वाट पाहशील तर कधीच जाऊ शकणार नाहीस सोनू...काळजी घे, तुझी अभयची आणि माझ्या फ्रेंड कडे लक्ष दे..."

आणि पुन्हा एकदा, मी आणी विक्रम हतबल होऊन वेगळे झालो, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी... एक मात्र होत की, समाधान हे वाटत होत की विक्रम त्याच्या आयुष्यात आता सुखी आहे, माझ्या मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं, कदाचित याच भेटीची प्रतीक्षा होती मला आणि आज ती पूर्ण झाली होती...गोड आठवणी घेऊन मी आज परत जात होती...मी विक्रमला बोलली की मी त्याची सोनू सोडून जात आहे , पण खरं तर हे होत की मी माझा विक्रम माझ्या मनात बंद करून सोबत घेऊन जात होती...आणि तो मनाचा कोपरा या जन्मासाठी मी बंद करून ठेवणार होती...खर तर आज मी इथून विक्रमची सोनू नव्हे तर अभयची नैना बनून जात होती...स्वतःसाठी जगणं, स्वतःला काय हवंय ते मिळवणं ते खूप सोप्प असतं आणि तस आयुष्य जगणं ही सोयीस्कर असतं... पण मी आणि विक्रमने कठीण मार्ग निवडला...प्रेम आणि कर्तव्यांमध्ये आम्ही कर्त्यव्यांची निवड जरी केली होती तरी त्याचा पाया प्रेमच होतं...प्रेम कधीच स्वतःसाठी जगायचं शिकवत नाही आणि जो स्वतः साठी जगतो त्याला प्रेमाचा अर्थच कळत नाही.....मी आणि विक्रम चुकीच्या वेळी भेटलो तीच काय आमची चूक होती...मित्र म्हणून राहू शकलो असतो पण अभय आणि दिशा वर हा अन्याय असता....शेवटी आमचं समर्पण अभय आणि दिशाला खुश ठेवण्यातच होतं... कदाचित लोकांच्या दृष्टीने ही कहाणी अधुरी असेल पण आम्ही आमच्या प्रेमात पुर्णतः समर्पित झालो होतो त्यामुळे आमची कहाणी ही पूर्ण झाली होती... एवढ्या मोठ्या जगात मी आणि विक्रम भेटलो होतो याचा विचारही आम्ही केला नव्हता त्यांनंतर काही ध्यानी मनी नसताना पुन्हा हॉस्पिटलमध्ये भेटलो, त्यामुळे एक आशा होती की एक अस विश्व नक्कीच असेल जिथे नैना आणि विक्रम भेटतील.....
----–---------------------------------------------------------

( Dear readers....आज माझी मातृभारती वरची पहिली कथा संपली...विषय खूपच विवादास्पद होता पण तरीही तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून आभारी आहे तुमची...ज्या लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या त्यांचीही खूप आभारी आहे आणि ज्यांनी (अगदी बोटांवर मोजण्याइतके)कथेवर ब्रह्मस्त्रासारखे टीकास्त्र सोडले त्यांनाही माझा मनापासून धन्यवाद...

तर आधी बोलते त्या वाचक वर्गाबद्दल ज्यांनी नैनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला...तुमचे किती आणि कसे आभार मानायचे मला हेच कळत नाही, 'धन्यवाद' हा शब्द कमी पडतो त्यासाठी...ज्या पद्धतीने तुम्ही नैनाची बाजू बघितली खरच अस वाटते की तुम्ही सगळ्यांनी समाज, कानून, नियम या सगळ्यांच्या वर जाऊन, तुमच्या संवेदना आणि भावना जागृत करून फक्त नैना ची घालमेल समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी खूप अभिमान वाटतो मला तुम्हा सगळ्यांचा...

आता त्यांच्याबद्दल ज्यांना (तेही बोटांवर मोजण्याइतके समाजरक्षक) हे वाटलं की यातून 'extra marital affair' ला प्रोत्साहन मिळत...फक्त नैना एक स्त्री आहे आणि विक्रम पुरुष त्यामुळे त्यांची मैत्री काहीतरी चुकीचीच आहे असं होतं नाही..या लोकांना एकच सांगावस वाटत की आपल्या विवेक बुद्धी चा वापर करा आणि कोणतं नात कस आहे हे, भाषण देण्यापेक्षा ओळखायला शिका ...नैना चुकली, तिने तिच्या मर्यादा ओलांडल्या, अश्या गोष्टींमुळे संसार उध्वस्त होतात...bla, bla, bla....मला एक सांगा संसार उध्वस्त होणं म्हणजे काय?? हो, मान्य करते आपल्या जे दिले गेलेले संस्कार आहेत, जी संस्कृती आहे त्यात जोडीदार सोडून दुसऱ्या व्यक्ती बद्दल विचार करणं पाप आहे, माझं वैयक्तिक मत आहे की अस व्हायला ही नको...आजपर्यंत मी हे सांगत आली आहे की समाजात काय होतं काय नाही मला नाही माहीत, पण आता मी हे सांगते की मला सगळं माहीत आहे, मला सगळं कळतं... मी असे कितीतरी पुरुष पाहिले आहेत, रोज पाहते ज्यांना बायकोशी काही घेणं देणं नसतं, त्यांच्यासाठी ती फक्त घराची care taker किंवा त्यांच्या घरच्यांची सेवा करणारी nurse यापेक्षा जास्त किंमत नसलेली एक स्त्री असते (सगळ्यांच पुरुषांबद्दल नाही बोलत आहे त्यामुळे कोणीही मनाला लावून मनस्ताप करत बसू नये)...आणि असे पुरुष बाहेर जाऊन त्यांचा संसार किती चांगला सुरू आहे याचा बढाया मारत असतात (खर तर तो संसार दाखवण्यासाठी असतो, वास्तविकते मध्ये तो उध्वस्त झालेला असतो)..मग अश्या प्रसंगी त्या स्त्रीला कोणी समजून घ्यायच? हं, आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन कोणी विक्रम शोधा, पण जेव्हा असे पुरुष एखाद्या स्त्रीच्या चरित्राबद्दल बोलतात तेंव्हा त्यांच्या मानसिकतेची राग कमी, कीव जास्त येते...
आणि राग त्या बायकांचा येतो जे एवढं सहन करूनही, कोपऱ्यात जाऊन रडतील पण नवऱ्या बद्दल काही चुकीच बोलणार नाही किंवा ऐकून घेणार नाही,..त्यांना मला एकच सांगवस वाटत की जर तुम्ही तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठवू शकत नाही तर तुम्हाला कोणाकडून सहानुभूती ची अपेक्षा ठेवनही चुकीच आहे...respect जसा नवऱ्याला पाहिजे तसा बायकोलाही दिला गेला पाहिजे.... आणि हे माझं परखड मत आहे, कोणाला पटो न पटो...तुम्ही तुमच्या जोडीदारापासून विभक्त होणं म्हणजेच संसार उध्वस्त होण अस नाही, जेंव्हा जेंव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजू शकत नाही, तिला किंवा त्याला हवा तो मानसिक आधार देऊ शकत नाही आणि यामुळे जेंव्हा त्यांच्या मनात तुमची जागा कमी होत जाते तेंव्हाही संसार उध्वस्त च झालेला असतो... आणि हे फक्त मी पुरुषांबदल च नाही बोलत आहे.. स्त्रीयांसाठी ही खूप महत्त्वाचे आहे की त्यांनीही आपल्या जोडीदाराला समजून घ्यावं...जेंव्हा केवळ समाजाला दाखवण्यासाठी तुम्ही एकत्र राहता पण एकमेकांच्या मनातच तुम्ही नाही तेंव्हा खऱ्या अर्थाने तुमचा संसार उध्वस्त झालेला असतो....

ही कथा लिहीत असताना मला कितीतरी अभय, विक्रम, नैना, कोणीतरी दिशा, काही नम्रता ही भेटल्या.. सगळ्यात आधी तर मला या समाजातल्या 'अभय' ना सांगावस वाटत की तुमच्या मनात दुसरी कोणी असताना उगाच घरच्यांच्या समाधानासाठी कोण्या 'नैना' शी लग्न करून तिच्यावर उपकार नका करू..आणि जर लग्न केलंच आहे तर प्रयत्न करा तिला मनापासून स्विकारण्याचा, कारण तुम्ही जर फक्त घरच्यांच्या मनासाठी लग्न केलं असेल तरी खऱ्या अर्थाने बलिदान मात्र 'नैना' च होतं.

काही 'दिशा' पण भेटल्या, त्यांना हे सांगावस वाटत की 'विक्रम' जो वागला ते चुकीच आहे, पण जस अभय समजू शकला नसेल नैनाला तस तुम्हीही कुठेतरी कमी पडल्या असणार त्यामुळे वेळीच सावरा स्वतःलाही आणि विक्रमलाही...

साफिया बद्दल ही बोलावसं वाटत, ज्या वक्तीवर आपण प्रेम केलं त्याला दुसरीच होतना पाहणं किती पिडादायी असायला पाहिजे, पण तरीही तिच्यामुळे एका नैनाच आयुष्य खराब होऊ नये म्हणून अभयला वेळोवेळी समजवणारी आणि तिच्या संसारासाठी प्रेमाची आहुती देणारी साफिया ही आहे आपल्या आजूबाजूला...

'नम्रता' बद्दल काय बोलू... आपली मैत्रीण किती आणि कुठे चुकत आहे हे तिला सांगून, तिला खडसावून, तिची कानउघाडणी करून ही तिला शेवटपर्यंत साथ देते, जर अशी मैत्री निभावण्याचा chance तुम्हाला मिळत असेल तर सोडू नका, आणि अशी मैत्रीण किंवा मित्र असेल तर तुमच्या आयुष्यात तर तुमच्या इतकं भाग्यवान कोणी नाही..

आता येऊ यात विक्रमवर...या कथेत मला सगळ्यात न आवडलेलं पात्र म्हणजे विक्रम..हो..विक्रमच..स्वतः विवाहित आहे तरीही नैनासोबत अशी मैत्री का केली त्याने, ज्याचा त्रास त्यालाही झाला आणि नैनालाही झाला..बर एवढं त्याग करून गेलाच होता तर परत तरी का यायचं? त्याच हे वाटण स्वाभाविक आहे की त्यांच्यामुळे नैनाच्या संसारात काही बाधा नको यायला किंवा तिला काही त्रास नको व्हायला..पण अश्या 'विक्रम' ना एकच सांगवस वाटत की खरच तुम्ही निष्पाप मनाने मैत्री केली असेल तर जी नैना तुमची वाट पाहत बसली आहे तिची एकदा तरी चौकशी करा, तीला जास्त काही अपेक्षा नाहीत, ती समजून घेईल, पण तुमच्या 'कशी आहेस' या वाक्यानेही तिला जगण्याचं बळ मिळेल कदाचीत...

'नैना'..emotional fool.. हो, असच आहे हे पात्र.. तर मला जितक्या ही नैना भेटल्या आहेत त्यांना खूप महत्त्वाच मला संगायच आहे...मला कळत नाही, का तुम्हाला समजून घेण्यासाठी कोण्या 'अभय' किंवा 'विक्रम' ची गरज पडते...खर तर हे आहे की जेंव्हा तुम्हाला अभय किंवा विक्रमची गरज पडेल त्या क्षणाला तुम्ही कमजोर झाल्या हे समजा...तुम्ही स्वतः इतक्या strong का होत नाही की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही स्वतःला सांभाळू शकाल...जोपर्यंत तुम्ही chance देत जाणार तोपर्यंत अभय तुम्हाला दुखवत राहणार आणि कथेतल्या 'विक्रम' सारखे पात्र तुम्हाला कदाचीतच सापडतील पृथ्वीतलवार.. या दुनियेत कोणताच नवरा अभय नाही जो स्वतःची चूक मान्य करून आणि बायकोच्या चुका दुर्लक्षित करून तिचा स्वीकार करणारा आणि कोणताही विक्रम असा महान नाही अशी मैत्री निभावणारा त्यामुळे, अश्या 'नैना' ना एकच संगायच आहे की तुम्ही स्वतःच स्वतःचा आधार बना, आयुष्य खूप सुंदर आहे, कोणत्याही अभय किंवा विक्रम साठी रडत बसण्यापेक्षा, आयुष्याचा मनमुराद आनंद घ्या, स्वतःच्या आवडी निवडी जपा, करीअर करा, आणि जे लोकं तुमच्यासाठी काळजी करतात त्यांची किंमत करायला शिका, त्या लोकांसाठी जगायला शिका आणि दाखवून द्या त्या अभय किंवा विक्रम ला की कोणतीच नैना भावनिक दृष्टीने किंवा आर्थिक दृष्टीने त्यांच्यावर अवलंबून नाही....त्यांनाही कळायला हवं की एक नैना त्यांच्या आयुष्यात नसली तर त्यांचं आयुष्य किती रिकाम होऊ शकतं...

सरतेशेवटी एकच सांगते, या कथेतून कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू कधीच नव्हता पण तरीही कोणाच्या मनाला माझ्या लिखाणामुळे कळत नकळत ठेच लागली असेन तर मनापासून क्षमस्व.....)

तुमचीच,

अनु....🍁🍁