संतश्रेष्ठ महिला भाग १५ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संतश्रेष्ठ महिला भाग १५

संतश्रेष्ठ महिला भाग १५

यात पुढील नाव येते ते संत सोयराबाई यांचे

यमाजी आणि हौसा या जोडप्याची ही मुलगी.
मंगळवेढ्याजवळच्या लहानशा गावातली.
काळी-सावळी, टपोऱ्या डोळ्यांची, समंजस, शालीन, चाणाक्ष सोयरा हीला
चोखोबांच्या आईनं हेरली आणि सून म्हणून घरात आणली.
चोखोबा प्रथम पासून नामदेव भक्त असल्याने
चोखोबा आणि सोयराच्या लग्नाला संत नामदेव आले होते.
आपल्या नवऱ्याचं वेगळेपण, विठ्ठलावरचं त्याचं अपार प्रेम, नामदेवांच महात्म्य,
नामदेवांची चोखोबांवर असणारी माया हे सगळं कळण्याचं सोयराचं तेंव्हा वय नव्हतं.
पण हे सगळं काहीतरी वेगळं आहे हे कळण्याचा चाणाक्षपणा मात्र तिच्यात होता.

सोयरा सुगृहिणी होती.
गृहकृत्यदक्ष सुद्धा होती.
आपला चार गाडग्या-मडक्यांचा खोपटातला संसार तिने चांगला आणि नेटका केला .
जातिव्यवस्थेला चूड लावणारा चोखोबा हा पहिला संत.
आणि पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं हे पहिलं कुटुंब ठरलं.
त्यांचं वेगळेपण असं की आपला सवतासुभा न मांडता सगळ्यांच्यासोबत राहून
ते आपल्या स्थानासाठी भांडत राहिले.
म्हणूनच आज शेकडो वर्षांनी चोखोबांची पालखी ज्ञानोबांच्या पालखीसोबत मानाने मिरवली जाते.

हे अख्खं कुटुंबच जातिव्यवस्थेला प्रश्न् विचारणारं
निर्मळा त्याची बहीण,बंका महार त्याचा मेहुणा आणि नंतर कर्ममेळा त्याचा मुलगा
ही सर्वच मंडळी पांडुरंग भक्त होती .
आपलं साधंभोळं जगणं आणि जगण्यातले बारीक-सारीक आनंदही सोयराबाईच्या अभंगांचे विषय बनले.
अगदी नणंद निर्मळा हिच्या प्रेमाचे,
तिच्या घरी राहण्याचं सुखही सोयराबाई आपल्या अभंगात आनंदानं सांगते.
नणंद निर्मळेच्या घरात अंघोळ करणे म्हणजे,
कोटी कोटी वेळा प्रयागाला जाण्यासारखं आहे,
असं ती म्हणते.
त्यापुढं तिला गंगा, इंद्रायणी, न् चंद्रभागेचं स्नानही फिकं वाटतं.
आपली नणंद निर्मळा हिच्याबरोबर जात्यावर दळण करताना गोड आवाजात ती जनाबाईचे अभंग गायची.
गावात होणाऱ्या कीर्तनातून त्यांना या अभंगांचे अर्थ समजायचे.
या दोघी कायम एकमेकीच्या मैत्रिणी सारख्या राहिल्या .
दोघींच्या बुद्धीची तीव्रता इतकी की या दोघी अभंगांवर भान हरपून बोलत बसायच्या.
आई, बाप, भाऊ, बहीण, मित्र इतकेच नाहीतर आपल्या कामातून देव बघता येतो
सध्या संत चोखामेळा यांचे ३५८, सोयराबाईचे ९२, कर्ममेळाचे २७,

बंका यांचे ४१, तर निर्मळाचे २४ अभंग उपलब्ध आहेत.ची दृष्टी होती.
आपल्या सगळ्या कुटुंबालाच त्यांनी या ज्ञानभक्तीत सहभागी करून घेतलं होते .

सोयराबाईसोबतच चोखोबाची बहीण निर्मळाही सुंदर अभंग लिहू लागली.
सोयराबाईप्रमाणं निर्मळेचीही भाषा रोख ठोक आहे.
तिनं तर थेट आपल्या गुरुला म्हणजेच संत चोखामेळ्यालाही खडसावलं.
बाळंतपणाच्या काळात सोयराबाईला एकटं सोडून आल्याबद्दल
ती अभंगातून चोखोबाची कानउघाडणी करताना दिसते.
चोखोबांची बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका याच गावात राहत.
मेहुणपुराशी असलेलं नातं सोयराबाईच्या अभंगांतून उलगडतं.

झाली निर्मळेची भेटी। सोयरा पायी घाली मिठी।।
धन्य बाई मेहुणपुरी। म्हणे चोख्याची महारी।।

या नणंद भावजया एकमेकीच्या तेला-मीठा-पीठाला, सुख-दु:खाला आधार असणार
हे दोघींच्याही अभंगांमधून जाणवत राहतं.
बाकी त्यांच्या नात्याविषयी लोकप्रिय आख्यायिकाही प्रचलित आहेत.
कर्ममेळ्याच्या वेळी सोयराबाईच्या पोटात दुखत असताना
चोखोबा मदतीसाठी निर्मळेकडेच गेल्याचा उल्लेख आहे.
चोखोबा निर्मळेला घेऊन लवकर येत नाही
म्हणून देवच निर्मळेचं रुप घेऊन सोयराबाईचं बाळंतपण करतो, अशीही कथा प्रचलित आहे.

तरीही आनंददायी अभंग लिहिणार्‍या सोयराबाईने एकदा रणरागिणीचा अवतार धारण केल्याचं खुद्द संत नामदेवांनी पाहिलं होते .
त्यांनी ते अभंगात लिहून ठेवलंय.
पंढरपुरात एकदा चोखोबाला मारहाण झाली .
मदतीला कोणीच आले नाही तेव्हा शांत बसणार्‍या विठोबाला ती झणझणीत शब्दांत सुनावते.
खाइलें जेविलें त्याचा हा उपकार। दुबळीचा भ्रतार मारुं पाहसी।।
काढी हात आतां जाय परता उसण्या।जाय पोटपोसण्या येथोनियां।।

देवाला अशा कडक शब्दांत सुनावणारी आपली आईच पुढं
कर्ममेळ्याची प्रेरणा ठरली.
चोखोबा अन्याय निमूटपणे सहन करत असताना सोयराबाईनं खमकी भूमिका घेतली.
कर्ममेळ्यावर तसे संस्कार केले.
म्हणून तर कर्ममेळ्यानं पुढं जाऊन

आमुची केली हीन याती।
तुज कां न कळे श्रीपती।।

असा थेट सवाल देवालाच केला.
पायगुणानं लक्ष्मी,बुद्धीने सरस्वती आणि अन्नपूर्णा असलेली ही सोयरा नामदेवांची अतिशय लाडकी होती.


विठ्ठलभक्तीत रंगून गेलेल्या चोखोबांचे वारंवार पंढरपूरला जाणे,
गेले की तिकडचेच होणे, त्याला प्रपंचाची शुद्ध न उरणे , बायकोची आठवणही न येणे.
या गोष्टी असह्य झाल्यावर विठोबाच्या अभंगातून सोयरा बोलते .
सोयराबाईचा हा अभंग विठोबाच्या आडून चोखोबांसाठी आहे हे जाणवते.

बहु दिस झाले वाटतसे खंती केधवा भेटती बाई मज
तुम्हासी तो चाड नाही आणिकांची
परि वासना आमुची अनिवार...

त्या काळात महार-हीन जातीतील म्हणून समाजाकडून सततची अवहेलना सहन करणे.
असे सर्व सोयरा मुकाट्याने न कुरकुरता, न त्रागा करता समजून घेत राहिली.
अपमान सोसूनही विठ्ठलभक्तीत रममाण झालेला,
आई-वडिलांच्या निधनाने सैरभैर झालेला भोळाभाबडा चोखा
सोयरा काळजीने, प्रेमाने, अभिमानाने सांभाळत राहिली.
सोयरा- चोखोबाला बरेच दिवस मूल नव्हतं.
सोयराबाईला मूलबाळ नसल्याची खंत होती .
अपत्यप्राप्तीच्या आसेनं कासावीस झालेली सोयराबाई अभंगात भेटते.
आमच्या कुळी नाही वो संतान
तेणे वाटे शीण माझ्या मना..

पण पांडुरंगानं त्यांच्या या भक्ताची इच्छा ओळखली.
आणि याचकाच्या रुपानं येऊन त्यानं सोयराबाईच्या हातचा दहीभात खाऊन तिला आशीर्वाद दिला.
यथावकाश देवाच्या आशीर्वादानं या दाम्पत्याला मुलगा झाला.
उदास असलेली सोयराबाई मुलाचा जन्म झाल्यावर
आनंदाने फुलून येते .
ती बारशासाठी विठ्ठल रुक्मिणीलाच निमंत्रण देते

चोखोबा-सोयराला मुलगा झाला.
ही बातमी जेंव्हा नामदेवांना समजली तेंव्हा त्यांनी सांगितले,
आम्ही सर्व संत मंडळी तुमच्या झोपडीत येणार,
सहभोजन करणार.
ज्ञानेश्वर माऊलीही येणार या भोजनाला .
आणि या तत्कालीन शुद्रातिशूद्र, अस्पृश्य जमातीतील जोडप्याकडे
सर्व संत मंडळी जेवायला गेली.
याशिवाय मुलाच्या जन्मप्रसंगाची भेट म्हणून नामदेवांकडून चोखोबाना “गुरुमंत्र” मिळाला.
गोरा कुंभारानी त्याचं नाव ' कर्ममेळा ' ठेवा असं सुचवलं, आणि सोयरा म्हणाली,

उपजता कर्ममेळा। वाचे विट्ठल सावळा।।
विठ्ठल नामाचा गजर। वेगे धावे रुक्मिणीवर।
विठ्ठल रुक्मिणी।बारसे करी आनंदानी।।
करी साहित्य सामुग्री। म्हणे चोखाची महारी।।

या सगळ्या घटनांचा परिणाम सोयराच्या संवेदनशील मनावर इतक्या आर्ततेने झाला
की तिच्यातली प्रतिभा जागृत झाली.
आपण अस्पृश्य, आपण म्हारडी, आपण समाजातून लाथाडल्या गेलेल्या
या सगळ्या भावना जाऊन तिच्यातलं चैतन्य जागं झालं
आणि तिनं चोखोबाना आपला अभंग ऐकवला.

संत चोखामेळा यांची विठ्ठलभक्ती अपार होती.
ते सतत विठ्ठलाच्या नामस्मरणातच गुंग असायचे.
एके दिवस विठ्ठलाने चोखोबांना, मी तुझ्याकडे जेवायला येतो, असे सांगितले.
हे कळताच चोखोबांची पत्नी सोयराबाई हिला फार आनंद झाला.
सोयराबाईंनी नकळत एका महिलेला याबद्दल सांगितले.
काही मिनिटात ही बातमी संपूर्ण गावात पसरली.
अनेकांनी ही गोष्ट थट्टेवारी नेली.
या गोष्टीवर कोणी विश्वासच ठेवला नाही.

एक गृहस्थ त्या रात्री लपतछपत चोखोबांच्या झोपडीजवळ आला.
त्याने डोकावून आत पाहिले.
घरामध्ये विठ्ठलमूर्तीच्या पायांशी चोखोबा बसले होते.
जवळच सोयराबाई नम्रतेने उभी होती.
सोयराबाईंनी जेवणाची पाने वाढली.
विठ्ठलाने जेवायला प्रारंभ केला.
त्याचवेळी चोखोबांचे शब्द त्या गृहस्थाच्या कानांवर पडले.
चोखामेळा म्हणत होते की, सोयरा जरा हळू.
देवाच्या पीतांबरावर ताक सांडले ना.

ही घटना पाहून ते गृहस्थ तेथून निघाला.
पाहिलेली गोष्ट भेटेल त्याला सांगितली.
संत चोखोबांच्या घराभोवती मोठी गर्दी जमली.
ही गोष्ट विठ्ठल मंदिराच्या पुजाऱ्यांपर्यंत गेली.
मंदिरातील पुजाऱ्यांनी खरे-खोटे करण्याचे ठरवले.
सर्व जण मंदिरापाशी जमा झाले.
मंदिर उघडून पाहिले आणि तेथील दृश्य पाहून ते थक्क झाले.
नेहमीप्रमाणेच विठ्ठलाची मूर्ती जागच्या जागी होती.
वस्त्रे, भूषणेही तशीच होती परंतु, नेसवलेल्या पितांबरावर मात्र ताक सांडलेले दिसत होते.
प्रत्यक्ष विठ्ठल खरोखरच सगुण रूपात संत चोखोबांच्या घरी जाऊन जेवला,
हे पाहून पुजाऱ्यांसह सर्वांनीच त्या थोर संत चोखोबांचे पाय धरले.
नाही उरली वासना।तुम्हा नारायणा पाहता।।
उरला नाही भेदाभेद।झाले शुद्ध अंतर।।
विटाळाचे होते जाळे।तुटले बळे नामाच्या।।
चौ देहाची सुटली दोरी।म्हणे चोखाची महारी।।
अवघा रंग एक जाला।रंगी रंगला श्रीरंग।।
मी तू पण गेले वाया।पाहता पंढरीच्या राया।।
नाही भेदाचे ते काम।पळोनि गेले क्रोधकाम।।
देही असोनि तो विदेही।सदा समाधिस्थ पाही।।
पाहते पाहणे गेले दुरी।म्हणे चोखाची महारी।।


एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते
त्याचा शोध घेते.
स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते.
देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत
भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते.
हे सगळंच अचाट आहे.

क्रमशः