Santashrestha Mahila Part 16 books and stories free download online pdf in Marathi

संतश्रेष्ठ महिला भाग १६

संतश्रेष्ठ महिला भाग १६

समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक या वारकरी झेंड्याखाली गोळा झाले.

ही समतेची गुढी पेलताना त्यांनी छळ सोसला, अवहेलना झेलली

पण खांद्यावरची पताका खाली पडू दिली नाही.

यांत नामदेव शिंपी होता, येसोबा खेचर होता, गोरा कुंभार होता, नरहरी सोनार होता,

कुणबी तुकोबा होता, सेना न्हावी होता, सावता माळी होता,

दासी जनी होती, गणिका कान्होपात्रा होती...

पण या सगळ्या मांदियाळीत वेगळं होतं ते चोखामेळा आणि त्याचं कुटुंब !

महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला.

आधीच महार आणि त्यात बाई, म्हणजे सोयराबाईचं जगणं आणखी एक पायरी खाली!

नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता नेता

या बाईनं सांगितलेलं जगण्याचं तत्त्वज्ञान अचंबित करतं.

अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग

मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया

असा नितांत सुंदर अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईचं स्थान तात्कालिन संतांहून तसूभरही कमी नाही.

त्यातल्या बहुतांश अभंगांमधून ती स्वत:चा उल्लेख चोख्याची महारी असा करते.

चोखोबाची बायको असं अभिमानानं म्हणवून घेत असली तरी तिनं स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे. सोयराबाईच्या अभंगांमधून डोकावणारं तत्त्वज्ञान सोपं आहे.

त्यात जड शब्द नाहीत.

भाषा साधी, सोपी आणि रसाळ आहे.

अभंग आधी स्वत:साठी आणि मग जनांसाठी..

आत्मशुद्धी ते परमात्मा.. असा तिचा प्रवास आहे.

शूद्रांच्या सावलीचाही विटाळ होऊन सवर्ण आंघोळ करून शुचिर्भूत होत तो काळ....

सातशे वर्षांपूवीर् सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना

कुणी देहाच्या विटाळाबद्दल 'ब्र' काढायचा विचारही केला नसता

पण ही बाई थेट प्रश्न विचारते.

देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?

देहासी विटाळ म्हणती सकळ

आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध

देहीचा विटाळ देहीच जन्मला

सोवळा तो झाला कवण धर्म

सोयराबाईच्या कुटुंबाचा समाजानं भरपूर छळ केला.

आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणवले गेले .

मारही खाल्ला.

सोयराबाईंच्या अभंगातून ही वेदना शब्दाशब्दांमधून ठिबकत राहते...

हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले

परी म्या धरिले पदरी तुमच्या

आता मोकलिता नव्हे नित बरी

थोरा साजे थोरी थोरपणे

विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या बडव्यांनी चोखोबाला कोंडून मारलं.

कपड्यांची लक्तरं झाली...चामडी लोळवली.

हा बहाद्दर पायरीशी उभा राहून थेट विठोबाला 'जोहर मायबाप जोहार' म्हणत सवाल करता झाला,

सोयराबाईनेही विठ्ठलाला साकडे घातले.

आमची तो दशा विपरित झाली

कोण आम्हा घाली पोटामध्ये

आमचं पालन करील बा कोण

तुजविण जाण दुजे आता

देवाला कितीही भेटावेसे वाटलं तरी महारांचे स्थान पायरीपाशीच
देव तिला भेटायला जातो, तिची लुगडी धुतो, तिला जात्यावर दळायला मदत करतो.

तिच्या केसांना तेलपाणी करण्यासाठी, आंघोळीच्या वेळी पाणी घालायला देव धावतो.

एकदा ती देवळात गेली तेव्हा तिने देवाचे दागिने चोरले असा तिच्यावर बडव्यांनी आरोप करून तिला सुळावर चढवायचे ठरवले.

कारण तिने बडव्यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती.

अशी दंतकथा आहे की पाउस पडल्यावर सुळाला कोंब फुटले होते

नामदेवादी संतांनी समतेचा धर्म सांगणार्‍या ज्या विठोबाला शरण जा, असं चोखोबाला सांगितलं, त्या विठोबाचं प्रत्यक्ष दर्शन सनातन्यांनी त्याला घेऊ दिलं नाही.

विठुरायाच्या मुखदर्शनासाठी सदैव महाद्वाराशी तिष्ठत उभ्या असणार्‍या चोखोबाला

सतत हाकलून देण्यात आलं.

त्यानं पुन्हा येऊ नये म्हणून त्याच्यावर नाना आळ घेऊन त्याला जबर मारहाण करण्यात आली.

कधी विठोबाचा हार चोरला म्हणून,

तर कधी स्पर्श करून देव बाटवला म्हणून

त्याला अगदी बैलांना बांधून ओढण्याची शिक्षा देण्यात आली.

या छळाचं अत्यंत हृदयद्रावक वर्णन चोखोबांनी आपल्या अभंगातून केलंय.

धाव घाली विठू आता चालू नको मंद।

बडवे मज मारिती काय केला अपराध।।

विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला।

शिव्या देती मजला म्हणती देव बाटविला।।

शेवटी तर त्या दांडग्यांनी देवळापाशी घुटमळणार्‍या ओढाळ चोखाबाची उचलबांगडी करून

त्याला नदीच्या पल्याड नेऊन सोडला.

इथून हालायचं नाही, अशी सक्त ताकीद दिली.

भरल्या डोळ्यांनी चोखोबांनी तिथूनच देवाला हात जोडले,

नेत्री अश्रूधारा उभा भीमातीरी।

लक्ष चरणावरी ठेवोनिया।।

का गा मोकलीले न येसी देवा।

काय मी केशवा चुकलोसे।।

असं स्वत:च्या अवस्थेचं वर्णन केलंय.

परमेश्वरही 'बहुतांचा' !

पायी तुडवल्या जाणाऱ्यांचं सोयरसुतक त्याला कुठे?

त्याला दीनांची चाड नाही.

हा राग व्यक्त करीत सोयराबाई विठोबालाच खडसावते.

कां बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले

आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि

घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे

ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी

मग चोखोबांनी इथं एक थोर गोष्ट केली.

तिथल्या शेतातच झोपडी बांधून तिथं दगडी दीपमाळ उभारली.

ही दीपमाळ म्हणजे, विरहाचं, बंडाचं, ज्ञानाचं, जागृतीचं, आत्मभानाचं प्रतिकच जणू.

आषाढीला पंढरपूरला येणारी सर्व संतमंडळी मग चोखोबाला भेटायला

त्याच्या या दीपमाळेच्या झोपडीत जाऊ लागली.

वारकरी संतांचा चोखोबाच्या घरी नेहेमीच राबता होऊ लागला .

एकदा चोखोबाच्या घरी स्नेहभोजनाला जमलेला संत मेळा पाहून देवालाही राहवलं नाही.

तेही या पंगतीत सहभागी झाले.

स्वत: बनवलेलं जेवण सोयराबाईंनी आग्रह करून वाढलं आणि जेवणारे सारे तृप्त होऊन गेले.

सोयराबाईंच्या अभंगात जगण्यातलं वास्तव फार रोखठोकपणे येतं.

सुखात हजार वाटेकरी असतात दु:ख तुमचं एकट्याचं असतं,

हे तिनं फार साजऱ्या शब्दांत सांगितलंय

अवघे दु:खाचे सांगाती दु:ख होता पळती आपोआप

आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि

तिच्या अभंगांमधून नाममहात्म्यही पुन्हा पुन्हा येतं.

तिचे बरेचसे अभंग या भोवतीच आहेत.

सुखाचे नाम आवडीने गावे

वाचे आळवावे विठोबासी...

सर्व संतांच्या अभंगांत गोड आहेत, ते चोखोबांचे अभंग आणि त्याहूनही गोड आहेत

ते सोयराबाईनं लिहिलेले अभंग.
आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी रांधणारी,

घर-संसार सांभाळणारी गृहिणी आहे...

अपत्यासाठी आस लावून बसणारी आई आहे...

नवऱ्याची वाट पाहणारी स्त्री आहे.

साक्षात विठोबाला ती जेवायचं आवतण देते.

विदुराघरच्या कण्या आणि दौपदीच्या थाळीतलं भाजीचं पान गोड मानणारा देव

गावकुसाबाहेरच्या येसकराच्या घरी जेवेल याची तिला खात्री आहे.

भेदाभेद आणि विटाळाच्या वास्तवाची होरपळ सोयराबाईच्या कुटुंबानं आयुष्यभर सोसली.

ती त्यांच्या अभंगांमधून संयमितपणे येते.

सोयराबाईने आपल्यानंतर आपल्या मुलाकडे कर्ममेळ्याकडे हा वारसा समर्थपणे सोपवलेला दिसतो.

आयुष्यभराची अवहेलना, पराकोटीचं दारिद्य, पावलापावलावरचा अपमान

हे व्यक्त करण्यासाठी अभंग हे एकमेव माध्यम त्यांच्याकडे होतं.

कर्ममेळ्याने आपल्या आईच्या कुशीतून हा विदोहाचा वसा घेतला. हा पहिला विद्रोही कवी होता .

आई बापाच्याही पुढे जात त्याने विठ्ठलाशी वाद घातला...

आमुची केली हीन याती

तुज का न कळे श्रीपती

जन्म गेला उष्टे खाता

लाज न ये तुमच्या चित्ता

असा रोकडा सवाल विचारत स्वत:च्या श्रद्धास्थानाशी भांडण मांडण्याचे बाळकडू

त्याला सोयराबाईनं दिलं.

चोखोबाचं श्रेय त्याला थोडंफार तरी मिळालं.

सोयराबाईच्या मात्र पदरी आली ती उपेक्षाच!!!

मुक्ताई तिच्या भावंडांसोबत आपसूकच मोठी झाली.

जनाई नामदेवांसह थोडीफार माहीत झाली.

बाकीच्या स्त्रीसंतांच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली.

ज्या समाजात ती जन्माला आली, ज्यांच्यासाठी तिनं विद्रोहाचा पहिला आवाज दिला,

त्या समाजानेही तिची उपेक्षा केली..
काळाच्या पडद्याआड गेलेल्या सोयराबाई सारख्या स्त्रियांची आयुष्यं,

त्यांनी सोसलेले कष्ट आणि अवहेलना शब्दातीत आहेत.

जे आपल्याला वाचवतही नाही ते या मंडळींनी कसं सोसलं असेल?

इतकं असूनही कुठे कटुता नाही. फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेमच!!!

समतेचं तत्वज्ञान रुजवणा-या वारकरी पंथानं अनेक वास्तव चमत्कार घडवलेत.

त्यातला एक अदभुत चमत्कार म्हणजे संत सोयराबाई.

उपेक्षित आणि दारिद्र्यात जीवन जगणार्‍या या माऊलीनं लिहिलेले अभंग ऐकले किंवा वाचले

तरी आपल्याला जीवन धन्य झाल्याचा अनुभव येतो.

सर्व संतांच्या अभंगाहून गोड आहेत, ते चोखोबांचे अभंग.
आणि त्याहूनही गोड आहेत ते त्यांच्या पत्नीने, संत सोयराबाईनं लिहिलेले अभंग.
अर्थात यामागे प्रेरणा आहे ती चोखोबांचीच.

मंगळवेढ्यात चोखोबांच्या कुटुंबाने अस्पृश्यांच्या वाट्याला आलेली सर्व उपेक्षा काकणभर अधिकच सहन केली. अशा वेळी कुटुंबप्रमुखाला म्हणजेच चोखोबाला जगण्याचं बळ दिलं ते पंढरीच्या विठुरायानं.

आणि पत्नी सोयराबाईनं.

तिनं चोखोबाच्या संसारात कष्ट तर उपसलेच पण चोखोबाच्या विठ्ठल भक्तीतही ती सोबत राहिली.

त्याही पुढे जाऊन तिने चोखोबांप्रमाणेच अभंगरचनाही केली.

त्यातून वारकरी पंथाची समतेची शिकवण ती आवर्जून सांगत राहिली.

गावकुसाबाहेर राहणार्‍या चोखोबांच्या कुटुंबाला वारकरी संतांचा सहवास लाभला

. साहजिकच पंढरीचा विठुराया त्यांचा सोबती झाला.

त्यांची सुख दु:खं जाणून घेणारी प्रेमळ मायमाऊली बनला.

संत ज्ञानदेव, नामदेवांच्या संगतीत चोखामेळ्याला पांडुरंग भक्तीची गोडी लागली.

आणि या कुटुंबाचं जीवनच बदलून गेलं.

सोयराबाईचे अभंग आपल्याला हलवून सोडणारे आहेत. डोळ्यात अंजन घालणारे आहेत.

वेशीबाहेरच्या या माऊलीचं हे सारं शब्दवैभव अचाट करणारं आहे.

या अशा संत स्त्रियांनी अभिमान वाटेल असा इतिहास दिला,

वर्तमानात जगण्याचं बळ दिलं आणि भविष्याची सोनेरी वाट दाखवली.

म्हणूनच हे चोखयाची महारी तुला माझे शतशः नमन!शतशः नमन!!

उदारा पंढरीराया नको अंत पाहू

कोठ वरि मी पाहू वाट तुझी....

सातशे वर्ष उलटून गेल्यावरही तिची प्रतीक्षा संपलेली नाही.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED