संतश्रेष्ठ महिला भाग १७
या परंपरेतील पुढील नाव आहे संत सखुबाई
ज्यांनी स्वत:ला सर्वात प्रिय परमेश्वराच्या चरणी शरण गेले आहे
त्यांचा महिमा अपार आहे.
असे लोक खरे भक्त असतात आणि अशा भक्तांना सांभाळण्यासाठी
देवाला अनेक लीला कराव्या लागतात.
त्यासाठी देव अत्यंत नीच काम करायलाही तयार होतात .
ते आपल्या प्रिय भक्तांसाठी काहीही करण्यास तयार असतात.
महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठी कऱ्हाड नावाचे एक गाव आहे,
तेथे एक ब्राह्मण राहत होता.
त्याच्या घरात ब्राह्मण, त्याची बायको, मुलगा आणि सुन असे राहत होते .
ब्राह्मणाच्या सुनेचे नाव 'सखुबाई' होते .
जितकी अधिक निष्ठावंत, आज्ञाधारक, सौम्य, नम्र, आणि साधी मनाची अशी सखुबाई होती
तितकीच तिची सासू अधिक दुष्ट होती .
गर्विष्ठ, अत्याचारी व कठोर मनाची होती.
नवरा आणि मुलगा देखील तिच्या शब्दाबाहेर नव्हते .
सकाळपासून रात्रीपर्यंत सखुबाई घरची सर्व कामे करायची .
शरीराच्या सामर्थ्यापेक्षा जास्त काम ती करीत असे .
तरीही तिला उपाशी ठेवले जात असे.
शिवाय इतके काम करूनही तिला सासूसासऱ्यांच्याच्या अत्याचार व लाथा बुक्क्यांना तोंड द्यावे लागत असे.
हे सर्व तिच्या पतीला सांगुन त्याची सहानुभूती मिळवणे हे सुध्धा तिच्या नशिबात नव्हते.
कधीकधी सासूने दिलेल्या शिव्या तिच्या हृदयाला टोचण्या देत असत .
परंतु तिच्या नम्र स्वभावामुळे ती क्षणात सर्व गोष्टी विसरत असे.
. असे असूनही या दु:खाला ती देवाचा आशीर्वाद समजून घेत असे .
आणि तिला नेहमी कृतज्ञता दर्शवून आनंद वाटे की माझ्या स्वामीने माझ्यावर अशी विशेष कृपा केली
ज्याने मला असे कुटुंब दिले आहे की
आनंदाच्या अथवा दुख्खाःच्या क्षणी मला त्याचा विसर पडू शकत नाही .
मनातुन व्यथित असली तरी परमेश्वर भक्तीत ती लीन राहण्याचा प्रयत्न करीत असे .
पण सततच्या कामामुळे आणि सासु सासऱ्यांच्या अत्याचारामुळे
तिची तब्येत खराब होऊ लागली .
एके दिवशी तिच्या शेजारणीने तिची तब्येत पाहिली आणि म्हणाली ,
"तुझ्या माहेरामधुन कुणीही तुझी खुशाली विचारायला किंवा तुला भेटायला असे येत नाही .
त्यांना तुझ्या या अवस्थेविषयी काही माहित आहे की नाही ?
सखुबाई म्हणाली , "माझे माहेर पंढरपूर आहे,
आणि माझे आई-वडील विठ्ठल रुक्मिणी आहेत.
एक दिवस, ते माझ्या दु:खापासून मुक्त करण्यासाठी मला त्यांच्याकडे बोलावून घेतील .
अशी माझी खात्री आहे .
असेच एके दिवशी घरगुती काम संपवून सखुबाई कृष्णा नदीचे पाणी भरण्यासाठी गेली ,
तेव्हा तिला दिसले की भाविकांचे लोंढेच्या लोंढे पंढरपुरास जात आहेत,
ते नाम कीर्तन करत आहेत.
टाळ मृदुंग वाजवीत पताका खांद्यावर घेऊन वारकरी नाचत नाचत चालले आहेत .
एकादशीला पंढरपूरला मोठा सोहळा असतो.
हे सर्व बघुन तिलाही पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा झाली .
पण आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून परवानगी मिळणे अशक्य आहे हे जाणून
ती घरच्या कोणाचीच परवानगी न घेता या वारकरी लोकांसोबत पंढरपूरला निघाली.
हे एका शेजारच्या माणसाने बघितले .
व त्याने ही गोष्ट सखुबाईच्या घरी जाऊन तिच्या सासूला सांगितली .
आईच्या सांगण्या वरून सखुबाईच्या नवऱ्याने तिला ओढत ओढत घरी आणले .
सखुबाईने खुप गयावया केले ,मला जाउदे अशी विनंती केली .
मला पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे आहे असेही सांगितले
ती परत घरातून बाहेर जाऊ नये म्हणून सासूने तिला एका खांबाला दोरीने बांधले.
आता मात्र सखुबाई खुपच निराश झाली .
सखूबाईचे मन मात्र पंढरपूरला विठ्ठलाच्या पायाजवळ राहिले .
ती विठ्ठलाचे नामस्मरण करीत राहिली
आणि रात्रंदिवस देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करीत राहिली,
“ देवा माझ्या दृष्टीस तु पडशील काय?”
तुझी कृपा माझ्यावर कधी होईल ?
खरेतर देवा मला तुझ्या पायाशी बांधून घ्यायचे होते, पण हा नवा बंध माझ्याभोवती कसा आला?
मला मरणाची भीती नाही पण फक्त एकदाच तुझी भेट घ्यायची आहे .
तुझ्या पायाचे दर्शन हवे आहे .
देवा तुम्ही माझे आई, वडील, भाऊ, आवडता मित्र सारे काही आहात,
देव भक्ताने केलेली खरी प्रार्थना ऐकतो असे म्हणतात.
जरी खरी प्रार्थना वेगवान नसेल तरीही ती त्याच्या कानापर्यंत पोहोचतेच असे म्हणतात .”
अशी आर्त विनवणी सखुबाई मनातल्या मनात करीत होती .
ही तीची हाक ऐकून विठ्ठलाला तिची तळमळ जाणवली .
मग भगवंताने एका स्त्रीचे रूप धारण केले आणि तिच्याकडे आला आणि म्हणाला
“सखुबाई मी तुझ्या जागी स्वतःला बांधुन घेईन,काळजी करू नकोस.
तु पंढरपूरला जाऊन देवदर्शन करून ये .”
असे बोलून देवाने तिच्या दोऱ्या सोडल्या .
आणि तिला पंढरपूरला पोचवले .
इकडे सखु बनलेल्या भगवंताला रोज सासु सासरे शिव्याशाप देत .
ते सर्व भगवंत चुपचाप सहन करीत होते .
ज्यांच्या केवळ नाम स्मरणा मुळे मायेची बंधने तुटतात .
ते स्वतः मात्र भक्तांची सगळी बंधने स्वीकार करतात .
सखु बनलेल्या भगवंताना बांधुन ठेवून आता दोन आठवडे होऊन गेले होते .
सखुबाईची अशी दशा पाहून तिच्या पतीचे हृदय कळवळले .
त्याने सखुबाईची क्षमा मागितली व स्नान करून भोजन करण्यास सांगितले .
सखूच्या रूपातील भगवंत स्नान करून स्वयंपाकाला लागली .
आज सखु बनलेल्या भगवंताने बनवलेले भेाजन करून सर्वांची पापे धुतली गेली .
इकडे सखूबाई मात्र हे पूर्ण विसरून गेली की तिच्या जागी दुसरी बाई बांधली गेली आहे .
पंढरपुरात ती इतकी रमून गेली होती की तिने ठरवून टाकले की जोपर्यंत
तिचे प्राण या शरीरात आहेत तोवर ती तेथेच राहील .
एके दिवशी भगवंताचे ध्यान करीत असता तिची समाधि लागली
आणि शरीर अचेतन होऊन जमिनीवर पडले .
गावातल्या लोकांनी तिला मृत समजून तिचे अंतिम संस्कार करून टाकले .
इकडे माता रुक्मिणीला काळजी वाटली कि माझे स्वामी सखुबाईच्या जागी बांधलेले आहेत .
ते परत कसे येणार .
मग रुक्मिणी स्मशानात पोचली आणि तिने सखुच्या अस्थी एकत्रित करून तिला जिवंत केले .
तिला सर्व गोष्टींचे स्मरण करून देऊन कऱ्हाडला परत जायची आज्ञा दिली .
कऱ्हाडला पोचल्यावर जेव्हा खरी सखु सखुच्या रूपातील प्रभुला भेटली तेव्हा तिने त्यांची क्षमा मागितली .
घरी पोचल्यावर सासुसासऱ्यांच्या स्वभावात परिवर्तन झालेले पाहून तिला खुप आश्चर्य वाटले .
दूसऱ्या दिवशी एक ब्राह्मण सखुच्या मरणाची बातमी घेऊन आला .
आणि तिथे सखूबाईला काम करताना पाहून त्याला फार आश्चर्य वाटले .
त्याने सखुच्या घरच्यांना सांगितले की
‘‘तुमची सुन तर पंढरपुरात मरण पावली होती .
तिचे पति म्हणाले ’’ सखु तर पंढरपूरला गेलीच नव्हती .
तुमची काहीतरी चुक होते आहे .
काहीतरी गैरसमजुतीने तुम्ही हे बोलत आहात .
जेंव्हा सखुला विचारले तेंव्हा मात्र तिने सर्व घडलेले सांगितले .
ते ऐकुन सर्वांना आपल्या कुकर्मांचा पश्चाताप झाला .
आता सर्वजण म्हणू लागले की आपल्या घरी तर साक्षात् "लक्ष्मीपती" आले होते .
आम्हीच फार नीच आणि भक्तिहीन आहोत .
आम्ही त्यांना न ओळखता बांधून ठेवले
आणि नकळत त्यांना फार फार क्लेश दिले.
किती नीच होतो आम्ही ..!!
तिघांनाही पश्चात्ताप झाला होता .
आता तिघांचे हृदय शुद्ध झाले होते .
आणि त्यांनी आपले त्यानंतरचे सारे आयुष्य प्रभु भक्तीत घालवले .
अशाप्रकारे, देवाच्या दयाळूपणामुळे
सखूच्या घरच्या लोकांना तिची किंमत समजली .
तिला आपल्या सासू सास-याचे आणि पती-देवाचे प्रेम परत मिळाले.
यानंतर सखुबाई आयुष्यभर भगवंताची सेवा करत राहिली आणि तिने
उरलेले आयुष्य देवाचे नामकरण, ध्यान, भजन इत्यादींमध्ये घालवले.
अशी ही आपल्या भक्तीमुळे संतपदाला पोचलेल्या साध्या सुध्या सखुबाईची कथा .
क्रमशः