Saint Woman Part 20 - The Last Part books and stories free download online pdf in Marathi

संतश्रेष्ठ महिला भाग २० - अंतिम भाग

संतश्रेष्ठ महिला भाग २०

यानंतरची श्रेष्ठ संत आहे रंगनायकी आंदाळ
आंदाळ ही बारा प्रसिद्ध आळवार संतांमधली एकमेव स्त्री-संत.
आंदाळ या शब्दाचा अर्थ आहे, देवावर सत्ता गाजवणारी, देवाची प्रियतमा !!!
आंदाळची भक्तीची वाट आत्यंतिक प्रेमाची आहे.
ते आहे एखाद्या कुमारिकेचे पहिले निष्कलंक प्रेम.
तिला तामिळ भूमीने “श्रीरंगाची प्रिया-रंगनायकी” म्हणून गौरवलं आहे.

श्री वेलीपुत्तूर हे तामिळनाडूमधलं एक लहानसं गाव आहे.
तिथे रंगनाथाचे एक प्राचीन मंदिर आहे.
या रंगनाथाची रोज सकाळची पहिली पूजा इतर देवस्थानांतल्या पूजेपेक्षा अगदी वेगळी केली जाते.
जवळच्या आंदाळच्या (जी तामिळनाडूची प्रसिद्ध संत-कवयित्री) मंदिरात तिची पूजा आधी केली जाते.
आणि तिच्या गळय़ातून उतरवलेला हार वाजतगाजत विधीपूर्वक
रंगनाथाच्या मंदिरात आणून तो देवाला अर्पण केला जातो.
देवाला अर्पण करण्यासाठी जे जे म्हणून असेल ते शुद्ध, ताजे , पवित्र असावे,
मानवी उपभोगानंतर ते देवाला वाहू नये,
असे भक्त-भाविकांनी आजवर मनोमन मानलेले असताना,
मोठय़ा श्रद्धेने हा आंदाळनं आदल्या दिवशी गळय़ात रुळवलेला हार देवाला कसा अर्पण केला जातो,
याचे कोणालाही नवल वाटणे साहजिक आहे.

यामागे आंदाळच्या प्रेममय भक्तीची कहाणी आहे.
चौदाव्या-पंधराव्या शतकांमध्ये रचल्या गेलेल्या दोन प्राचीन तमिळ काव्यकृतींमधून आंदाळच्या चरित्राचे पहिलेवहिले तपशील मिळतात.
आंदाळ बहुधा नवव्या शतकात होऊन गेली असावी.
इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत तामिळ भूमीवर नयनार आणि आळवार या संतसमूहांचा उदय झाला.
शिवभक्त अशा त्रेसष्ट नयनारांचा आणि विष्णुभक्त अशा बारा आळवारांचा प्रभाव
पुढच्या कित्येक शतकांच्या तिथल्या धर्मजीवनावर आणि साहित्यावरही गाजत राहिला.

आंदाळ ही बारा प्रसिद्ध आळवार संतांमधली एकमेव स्त्री-संत.
तामिळ विष्णू मंदिरांमधून आळवार संतांच्या मूर्तीना विशेष स्थान आहे.
त्यांची पूजा होते.
त्यांच्या जयंत्या तिथे आवर्जून साजऱ्या होतात.
ते प्रत्यक्ष विष्णूचे “अंश” समजले जातात.

आंदाळ भूदेवीची “अंश”मानली जाते.
ती विष्णुपत्नी आहे, देवप्रिया आहे.
देवी म्हणून तिची प्रतिष्ठा आहे.
ती विष्णुचित्त नावाच्या विष्णुभक्ताला तुळशीच्या बागेत सापडली.
एवढीशी तान्ही मुलगी.
त्यानं तिला आपली मुलगी म्हणूनच सांभाळलं, वाढवलं.
ती वयात आली तोवर विष्णुचित्ताच्या नित्यपूजेतला रंगनाथ तिच्या देह-मनाचा स्वामी होऊन गेला होता. देवपूजेकरिता रोज गुंफलेला हार ती आधी स्वत:च्या गळय़ात घालून पाही.
आपण देवाला आवडत्या रूपात दिसत असू का, हे ती आधी आरशात न्याहाळून बघे
आणि मग तो हार पूजेच्या तबकात ठेवत असे.

एक दिवस विष्णुचित्ताला अकस्मातच ही गोष्ट कळून आली आणि तो लेकीवर संतापला.
तिनं वापरलेला हार इतके दिवस आपण देवाला वाहत होतो या जाणिवेने तो मनात शरमलाही.
रात्री त्याच्या स्वप्नात श्रीरंग आला आणि त्याने मात्र विष्णुचित्ताची चिंता दूर केली.
‘मला तोच आंदाळने गळ्यात घातलेला हार आवडतो..
असे त्याने सांगितले “आंदाळ माझी प्रिया आहे” असेही सांगितले.

मग मात्र सगळे चित्र निराळे झाले .
आंदाळ संपूर्णपणे देवाची झाली.
एक दिवस लग्नासाठी वाजतगाजत ती देवाच्या गाभाऱ्यात आली आणि त्याच्याशी कायमची एकरूप झाली.

तिच्या आयुष्य कहाणीतला स्वप्नदृष्टान्ताचा आणि अखेर देवमूर्तीत विलीन होण्याच्या
चमत्काराचा भाग बाजूला ठेवू.
तसे चमत्कार नंतर अकमहादेवीबाबत, लल्लेश्वरीबाबत आणि मीरेबाबत घडलेले सांगतातच
पण या चौघींमध्ये आद्य आहे आंदाळ
आणि देवाला सर्वस्व अर्पण करणारी ती चौघींमधली एकटीच “कुमारिका” आहे.

तिच्या पदरचना तामिळ साहित्यात फार विख्यात आहेत.
‘तिरुप्पावै’ आणि ‘नच्चियार तिरुमोल्ली’ ही तिची दोन काव्ये.
‘तिरुप्पावै’ म्हणजे श्रीव्रत.
मार्गशीर्षांतल्या पहाटे महिनाभर नदीवर स्नान करण्याचे आणि नंतर श्रीरंगाची पूजा करण्याचं व्रत.
या व्रताची गाणी आंदाळनं रचली आहेत.
तिच्या प्रेमसाधनेचा तो पहिला टप्पा.
ईश्वराच्या निकट जाण्यासाठी निघालेल्या जिवाच्या प्रवासाची ती सुरुवात आहे.
भीती नाही, उत्कंठा नाही, दु:ख तर नाहीच नाही.
आनंदानं आपल्या तरुण मैत्रिणींबरोबर कृष्णाला शोधत ती निघाली आहे.
तो सापडणार आहे याच्या खात्रीनं निघाली आहे.
‘नच्चियार तिरुमोल्ली’ हा त्या प्रवासातला थोडा पुढचा मुक्काम आहे.
ईश्वराची भेट एकदा झाली आहे, साक्षात्कार झाला आहे.
पण कायमचा तो सापडलेला नाही.
म्हणून विरह आहे, दु:ख आहे, तगमग आहे, तरुण देहाच्या वासनांची सळसळही आहे.

आंदाळचं दुसरं नाव आहे कोदै.
कोदै म्हणजे मोहनवेल.
तिच्या रचनांमधून या मोहनवेलीचा फुलोरा दिसतो.
सगळय़ा मानवी भावनावासनांचा फुलोरा.
तोच तिने अतीव उत्कटतेनं श्रीरंगाला वाहिला आहे.

मला द्या ना ती त्याची पवित्र तुळस
शीतल, तेजस्वी, निळीजांभळी
माझ्या चमकत्या केसांत द्या तिला खोवून!
मला तो त्याच्या बासरीच्या मुखातून पाझरणारा
शीतल मध द्या ना आणून
द्या माझ्या चेहऱ्यावर लावून,
मला पुनर्जन्म मिळेल त्यातून !
मला आणून द्या त्या निष्ठुराची पायधूळ
द्या ती माझ्या देहाला माखून
मी जिवंत राहू शकावी म्हणून!

आंदाळची पदे अशी उत्कट आहेत.
कमालीची उत्कट आणि आर्त.
ती पक्ष्यांशी बोलते.
ती पावसाशी, पावसाळी मेघांशी बोलते.
ती समुद्राशी, समुद्राच्या लाटांशी बोलते.
तिच्या प्रेममय विश्वात सृष्टी विलक्षण जिवंत होऊन उठते.

आंदाळची भक्तीची वाट आत्यंतिक प्रेमाची आहे.
ते आहे एखाद्या कुमारिकेनं केलेलं पहिलं निष्कलंक प्रेम.
सर्वस्व ओंजळीत घेऊन केलेली ती मीलनासाठीची साधना आहे.
आंदाळ दुसरं काही बोलत नाही.
ती उपदेश करत नाही, की योगसाधनेसारख्या अवघड मार्गावर चालू पाहात नाही.
तिला फक्त प्रेम समजतं.
ती अंतर्बाहय़ प्रेमानेच भरून राहिली आहे.
जगाचा संपूर्ण विसर पाडणारे नव्हे, लौकिकाचा संपूर्ण विलय करून टाकणारे प्रेम.
अशा निरातिशय प्रेमातूनच तिला ईश्वर मिळाला आहे.

म्हणून आंदाळ प्रेम गाणारी, प्रेम समजावणारी, प्रेम जगणारी संत आहे.
तिला तामिळ भूमीनं श्रीरंगाची प्रिया-रंगनायकी म्हणून गौरवलं आहे !!!
आंदळचे काव्य आपल्याला बघायला मिळाले
कारण त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने .
हे सगळे साहित्य ऊर्जित अवस्थेत आणले .
हूपरसारखा एक मोठा ब्रिटीश विचारवंत तामिळनाडूत जाऊन बसला.
आणि त्याने या सगळ्याचे संकलन करून इंग्रजी भाषांतर केले .
हूपरने जर अलवार संतांच्या लिखाणाचे हे भाषांतर केले नसते, तर कुणाला काहीच समजल नसत .

प्रेम काय असतं? कसं असतं?
स्त्रीला प्रेम करण्याचं स्वातंत्र्य कसं असतं?
ते कसं उपभोगता येते ?
हे मीरेने तर नंतर सांगितले ,पण तिच्यापूर्वी आंदळने सांगितले होते .
आणि आंदळनंतर सूफी संत राबिया हिनेही सांगितले .
ईश्वराची बायको म्हणून आयुष्यभर जगणं ही काय सोपी गोष्ट आहे का?
याला एका विशिष्ट स्तरावर पोहचल्याशिवाय सहनच करता येत नाही
किंवा ती भूमिकाही पार पाडता येत नाही.
अशी होती ती लोकविलक्षण आंदळ
देवाची लाडकी भक्त ..!!

अशा विविध प्रांतातल्या अनेकविध धर्माच्या अनेक जातीच्या या संतश्रेष्ठ महिला .
ज्या काळात त्यांनी ही भक्तिमार्गाची वाट निर्माण केली .
तो काळ पाहता स्त्रीला तेव्हा समाजात कोणतेच स्थान नव्हते
अथवा फारशी किंमतही दिली जात नव्हती .
समाज काय म्हणतो याकडे लक्ष न देता अतिशय खडतर वाटेवरून
या सर्वजणी आपली मार्गक्रमणा करीत राहिल्या .
वेळप्रसंगी आपल्या जीवावर सुद्धा त्या उदार झाल्या .
किंबहुना आपल्या जीविताची त्यांनी कधीच काही फिकीर केली नाही .
परमेश्वर चरणी त्या लीन राहिल्या .
चाकोरीच्या पलीकडे जाऊन त्यांनी भक्तीसाठी जे केले त्याची समाजाकडून मान्यता पण मिळवली .
प्रसंगी नवरा अथवा घरच्यांचा सुद्धा विरोध त्यांनी सहल केला पण मागे हटल्या नाहीत .
त्यांचे मानसिक बळ थक्क करणारे होते .
यापैकी बऱ्याचजणी अशिक्षित होत्या .
काही गावकुसा बाहेरच्या होत्या .
त्या सर्वजणी कवी होत्या .
त्यांच्या जाणीव अतिशय तीक्ष्ण होत्या .
म्हणूनच त्या असे काही भक्ती विषयी किंवा अध्यात्मा विषयी लिहू शकल्या .
प्रथम त्यांना अव्हेरणारा समाज नंतर त्यांचेच गुण गाऊ लागला .
ही एक लोकविलक्षण गोष्ट आहे हे नक्की .
यांच्यामुळे समाजात भक्ती,जागृती आणि अध्यात्म वाढीला लागले .
समाज यासाठी त्यांचा कायम ऋणी राहील .

समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED