पुनर्भेट भाग ८ Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुनर्भेट भाग ८

पुनर्भेट भाग ८

ऑफिस मध्ये जाऊन मोहनला भेटावे आणि हे सारे सांगुन पैशाची काय व्यवस्था होते का ते पहावे

असे तिला वाटले .पण ती ऑफिसमध्ये आली होती हे सतीशला नुसते समजले जरी असते

तरी तिची खैर नव्हती ..

आणि शिवाय त्या दिवशीच्या मोहनच्या बोलण्यात सतीशने ऑफिसच्या मित्रांकडून पण बरेच

पैसे उसने घेतले आहेत हे समजलेच होते .

त्यामुळे तो मार्ग तर आता बंदच झाला होता .

दिवस चाललेच होते ,प्रत्येक दिवस रमासाठी कठीण जात होता .
त्य गुंडांनी दिलेली मुदत कधीच संपली होती
पण भीतीची टांगती तलवार अजुन तशीच होती .
पैशाची काय व्यवस्था झालीय समजत नव्हते .
काही विचारावे तर सतीशचा आरडा ओरडा सुरु व्हायचा .
काकाकाकूंना तर हे सांगण्यात अर्थच नव्हता .

ती माणसे परत येऊन काय करतील याचा नेमच नव्हता .
आणि एके रात्री परत सतीश घरी आलाच नाही .
सकाळी उठल्यावर रमा त्याचा शोध घेण्यासाठी निघतच होती ..
इतक्यात ऑफिसची काही माणसे सतीशला शोधत घरी आली .
मोहन पण होता त्यांच्यासोबत .
तिने मोहनला सांगितले की तीच ऑफिसमध्ये सतीशला शोधायला निघाली होती .
तेव्हा मोहन म्हणाला ऑफिसमधले कालच्या काही व्यवहारांचे पैसे
काल सतीशकडे दिले होते .
साहेबांनी ते पैसे ताबडतोब बँकेत भरायला सांगितले होते .
मात्र ते पैसे बँकेत जमा झालेलेच नव्हते आणि
आणि सतीश पण ऑफिसला आला नाही ,त्याचा फोनही बंद येत होता
म्हणून सगळे त्याला शोधायला त्याच्या घरी आले होते .
रक्कम थोडीथोडकी नव्हती ,दोन लाखाच्या आसपास होती.
सतीश घरी नव्हता आणि रमाला पण तो कुठे गेलाय हेच माहित नव्हते .
त्यामुळे सतीश परत आला की कळवा इतके सांगुन तूर्त तरी ऑफिसची माणसे
निघून गेली .
ऑफिसची माणसे पैशाच्या अफरातफरी मामल्यात घरी येतात हे बघुन रमाला
मेल्याहून मेल्यासारखे झाले .
कुठे हुडकणार होती रमा सतीशला ..?
दिवसेदिवस नवे नवे प्रोब्लेम समोर येत होते .
रमाची विचारशक्तीच जणु नाहीशी झाली होती .
दोन तीन दिवस झाले तरी सतीशचा पत्ता नव्हताच .
खरे म्हणजे ही गोष्ट काकाकाकूंना सांगायला हवी होती .
मागच्या वेळेस तो असा घर सोडुन गेला तेव्हा तिने ही गोष्ट त्यांच्यापासून
ऑफिसच्या कामाला गेला आहे असे सांगुन लपवली होती .
पण आता असे शक्य नव्हते .
ऑफिसमध्येच पैशाचा अपहार झाल्याने ही गोष्ट त्या छोट्या गावात लगेच
सर्वांना समजायची शक्यता होती .
अशा विचारात असताना अचानक मोहन तिला भेटायला ऑफिसमध्ये आला .
त्याला पाहून तिच्या काळजात धस्स झाले .
आता आणखी काय ऐकायला मिळते आहे कोण जाणे .
तिने साहेबांची परवानगी घेऊन लौकर ऑफिस सोडले .
मोहन आणि ती दोघे जवळच्या एका लहान हॉटेलमध्ये गेले .
मोहनने सतीशची खबरबात विचारली .
रमाकडे काही उत्तर नव्हतेच ..
मग सतीशने तिला सांगितले पैशाचा मामला असल्याने
प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याची शक्यता आहे .
सतीश गायब असल्याने अजुन त्यावर कारवाई नाही झालेली .
पण आणखी एकदोन दिवसात जर तो आला नाही तर कठीण होणार आहे .
निदान ही रक्कम जरी भरून टाकली तर बरे होईल
हे ऐकुन रमा ओक्साबोक्शी रडू लागली .
मोहनने तिला कसेतरी शांत केले .
रमाने घडलेले सारे सांगितले.
तिच्याजवळ काहीच पैसे नव्हते ,ईतकी मोठी रक्कम ती कुठून आणणार होती ?
मोहनला तिची दया आली .
खरेच खुप मोठा बाका प्रसंग आला होता रमावर
मग त्यानेच रमाला सुचवले की तो स्वतः हे पैसे कोठून तरी उसने घेऊन सध्या देईल .
सध्या प्रश्न मिटेल .
पोलीस कारवाई पण केली जाणार नाही .
पण नंतर हे पैसे व्याजासहित फेडायला लागतील ते ती कशी फेडू शकेल ?
या प्रस्तावाने रमा थोडी चकित झाली .
पण निदान आत्ताच्या परिस्थितीतून तरी सुटका होईल .
तिने मोहनला सांगितले की उद्या ती यावरचा निर्णय विचार करून सांगेल.
मोहनने हे मान्य केले पण निर्णय मात्र उद्याच हवा हे ही सांगितले .
प्रकरण गंभीर होण्याच्या आत मिटवायला हवे होते .
रमा घरी परतली .
विचार करीत राहिली कसे कसे हे जमवता येईल ?
काका तर काहीच मदत करू शकणार नाहीत .
त्यांचेच कसेबसे भागते आहे .
रमाला तसा पगार बरा होता .
लहान गावात छोट्या ऑफिसमध्ये एका क्लार्कला असा कितीसा पगार असणार ?
पण बाहेरून कुठून पैसे उसने घेण्यापेक्षा
ऑफिसमधून कर्ज मिळते का विचारावे ,परतफेड पगारातून करता येईल .
रक्कम थोडी मोठी होती पण बरेच दिवस ती नोकरीत असल्याने
साहेब तिला व्यक्तीशः ओळखत होते .
ते तिला असे कर्ज देतील असा तिला विश्वास होता
आता हा प्रकार काकांना सांगायला लागणार होता .
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती मेघनाला आणायला गेली .
तिने गेल्या गेल्या काकुला सांगितले ती जेवायला थांबणार आहे .
सतीशची चौकशी केल्यावर तो बाहेर गेला आहे असे सांगितले .
जेवताना तिने सांगितले सतीशकडून ऑफिसमध्ये काही पैशाचा घोळ झाला आहे .
आणि सतीश पण कोठे बाहेर गेलाय माहित नाही .
पण हे पैसे मात्र लगेच फेडायला लागणार होते.
हे ऐकुन काका चकित झाले .
काकु तर रडायला लागली .
हे सगळे काय असे विचित्र घडले याचे त्या दोघांना फार वाईट वाटले .
काका स्वतःलाच दोष देऊ लागले असा कसा हा माणूस ?
बायकोला आणि मुलीला संकटात टाकून निघून गेला .

ह्या स्थळाची नीट चौकशी न केल्याबद्दल त्यांना वाईट वाटले .
रमाच्या आईवडिलांच्या माघारी तिचे कल्याण करण्याऐवजी
त्यांच्या हातुन तिच्या आयुष्याचे नुकसान घडले होते.
काय उत्तर देणार होते ते तिच्या स्वर्गीय मातापित्यांना ..
आता तर काकुंसोबत काकांच्या पण डोळ्यातून अश्रू वाहायला लागले .
रमाने कसेतरी दोघांना शांत केले .
यात तुमची काहीच चुक नाही दोष असेल तर माझ्या नशिबाचा आहे .
असो... जे झाले ते झाले आता पुढला विचार करायला हवा.
मोहनने दिलेला पर्याय सांगुन ,त्या पैशाची ती ऑफिसमधून कर्ज घेऊन व्यवस्था
करेल असेही सांगितले .
काकु चटकन उठून आत गेल्या..
आतल्या खोलीतुन एक पितळी डबा घेऊन बाहेर आल्या .
रमाच्या हातात डबा देऊन त्या म्हणाल्या ,
हे बघ पोरी यात तुझ्या काकांची एक पूर्वीची अंगठी आणि माझ्या चार बांगड्या आहेत .
आमच्याकडे शिल्लक ही अशी आता शेवटची पुंजी आहे .
तुझ्या लग्नाच्या वेळेस हे मोडून खर्च करणार होतो .
पण तेव्हा सारा खर्च जावईबापूंनीच केला होता त्यामुळे हे तसेच राहिले .
हे जुने दागिने आहेत .
याची किंमत मला माहित नाही ,पण तुझ्या गरजेला नक्कीच पुरे पडतील “
आणि मला म्हातारीला तरी हे दागिने घालून कुठे जायचे आहे ?
याचा उपयोग तुझ्या अडचणीच्या वेळेस होतो आहे हे खुप चांगले आहे .
हे घे तुझ्या ताब्यात ..
ते दागिने पाहून आणि काकांचे बोलणे ऐकुन रमाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले .
“काकु ,अग एवढेच तर शिल्लक आहे तुमच्याकडे .
ठेव तुमच्या अडचणीला भविष्यात लागले तर
मला नको ग हे “
आपल्या वृद्ध काकाकाकुंच्या कडून अशी आर्थिक मदत घ्यायची ..
तिच्या मनाला ही कल्पनाच सहन होत नव्हती
ती फक्त खाली मान घालून बसून राहिली .

क्रमशः