प्रायश्चित्त - 15 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रायश्चित्त - 15

हॉस्पिटल मधे पोहोचल्यावर ती तडक रूमवर निघाली, पण मग सगळ्यांसाठी काहीतरी ऑर्डर करावं म्हणून मग आधी खालच्या फ्लोअरवर गेली.

ऑर्डर, आणि रुम नंबर सांगून लिफ्ट जवळ आली तर लिफ्ट साठी बरीच गर्दी होती. मग जिन्याने निघाली. दोन जिने चढून ओटी च्या फ्लोअरवर आली. तेव्हा केतकी तिथेच घुटमळताना दिसली.

“का गं, घरी नाही गेलीस?”

“नाही, आज आत्या नाही ना आली, मग डॅड मला सोडून कसा येणार?”

“ओह, मग आता?”

तिने नुसतेच खांदे वर केले.

“कुठय बाबा तुझा?”

“कांचन त्याला जराही सोडत नाहीय. हात धरून बस म्हणतेय.”

“नंबर पाठ आहे डॅडचा?”

“हो....”

“सांग”

तिने लगेच फोन लावला त्याला “मी केतकीला माझ्या रुममधे नेतेय. इथे एकटीच फिरतेय इकडे तिकडे.”

“अं हो. थॅंक यू. आज बहीण नाही आली माझी.”

“हं, म्हणाली केतकी.”

“कांचन मला हलू देत नाहीय.”

“हो.”

हसली शाल्मली मग.

“तुम्ही द्या तिच्याकडे पूर्ण लक्ष. केतकी श्रीशची छान गट्टी जमलीय. मला मदतच होईल तिची. डोन्ट वरी.”

“थॅंक यू, थॅंक यू सो सो मच अं .... मॅम.”

“शाल्मली....... “

“ओह, थॅंक यू शाल्मलीं.”

“ही किती मोठी मदत आहे तुमची मी सांगू शकत नाही तुम्हाला.”

शाल्मली ने बाय म्हणून फोन बंद केला.

‘गॉड ब्लेस हर ,’

केतकीचा बाबा मनातल्या मनात म्हणाला.

शाल्मली केतकीला घेऊन वर आली. पाठोपाठ ऑर्डरही आली. मग सगळ्यांचं मिळून खाऊ पिऊ झालं. अमेय अनुजची केतकीशी लगेच गट्टी जमली. तुझं नाव कायै? अनुज ने विचारलं. “केतकी”

“बाबांचं नाव ?”

“केतन”

“आडनाव?”

पोरांच्या गप्पा सुरूच राहील्या.

श्रीश जरा झोपेला आल्यासारखा झाला.

मग मंडळी निघाली.

“आत्या, तू श्रीशला घेऊन कधी येणार घरी?”

“येईन बेटा लवकरच.”

“मग केतकीला पण घेऊन ये. मला तिला माझा नवा गेम शिकवायचाय”

“हो का? बरं बरं आणेन”

मग निघाले सगळे.

शाल्मली लिफ्टपर्यंत सोडून आली.

आल्यावर नर्सकडून तिने श्रीशचं जेवण मागंवलं. तो खाऊन झोपलाच. केतकी पण पेंगुळली. शाल्मली तिला म्हणाली, “उद्या घरी गेलीस ना की एक एक्स्ट्रा ड्रेस घेऊन ये . घरी कोण असतं?”

“कोणीच नाही”

“मग? तू एकटीच राहतेस?”

“नाही . डॅड मला शेजारच्यांकडे सोडतो.”

“तुझे आजी आजोबा?”

“डॅडचे आई बाबा देवाघरी गेलेत ममाचे यु एस ला मामाकडे”

“ओह! मग जेवण वगैरे?”

“डॅडच करायचा, डबा आणायचा कधी कधी. पण मग कांचन पडली .....”

केतकी एकदम गप्प झाली.

“मला माहित आहे बेटा.”

“आज डॅड खूप खूश आहे आंटी. त्याने आम्हाला दोघींनाही जवळ घेतलं. आता तो रागावला नाहीय माझ्यावर.”

“तुझा डॅड तुझ्यावर कधीच रागावला नव्हता बेटा”

“होता. मी ममाचा हात धरला पण ती गेली ना बाप्पाकडे म्हणून”

“कोणी सांगितलं असं?”

“शेजारच्या आज्जीनी. त्या म्हणायच्या गुपचूप आत जाऊन बस किंवा झोप. कटकट केलीस तर डॅडला सांगेन. तो आधीच रागावलाय तुझ्यावर , आणखी रागवेल.”

“मला भीती वाटायची एकटीने त्या कोपऱ्यातल्या खोलीत बसायला आणि झोपायला.”

शाल्मलीला त्या पोरीसाठी भरून आलं मग.

तिने केतकीला जवळ घेतलं. मग म्हणाली, “हे बघ बाळा, डॅड तुझ्यावर बिलकुल नाही रागावलेला. पण अचानक सगळं त्याला एकट्याला करायला लागतंय ना ते झेपत नाहीय त्याला. आणि जेव्हा आपण नीट करू शकत नाही असं वाटतं तेव्हा चिडचिड होते बेटा माणसाची. कांचन अजून लहान आहे म्हणून मग जरा तुझ्यावर रागवलं जातं.”

“तुझी स्कूल ?”

“कांचन पडल्यापासून गेलेच नाही मी.”

“हं !.”

“पण जायला हवय ना? उद्या बोलू आपण डॅडशी. तुझी आत्या?”

“ती खूप लांब रहाते.”

“हं!”

मग तिने केतकीला दात घासायला सांगितले. पाणी दिलं प्यायला. शू करून यायला सांगितलं.

शाल्मलीने बेड जोडला. स्वत: मधे झोपली. श्रीशचं बॅंडेज निघालं होतं. त्यामुळे तो शांत झोपला. हातांना मात्र बांधून ठेवलं खाजवू नये म्हणून.

मग तिने केतकीला थोपटलं. आईविना पोर बिलगलीच तिला. तिचं सारखं जवळ येणं, चिकटून बसणं, हात धरणं यांचा अर्थ कळला अचानक शाल्मलीला. मन भरून आलं तिचं या पोरीसाठी.

शाल्मलीनेही तिला कुशीत घेतलं. थोपटत राहिली.

सकाळी शाल्मली उठली तेव्हा दोन्ही पोरं शांत झोपली होती.

दुसरा दिवस उजाडला तोच मुळी गुड न्युज घेऊन. श्रीशला उद्या डिसचार्ज मिळणार होता.

कांचन ला आज संध्याकाळीच आय सी यु मधून रुममधे शिफ्ट करणार होते.

शाल्मलीने सॅमशी फोनवर बोलून घेतले. पुढचे शेड्युल नर्सकडे पाठवतो. ती प्रिंट देईल म्हणाला.

मग हळूच म्हणाला, “मी’ येतेय नेक्स्ट वीक”

तिने मनापासून अभिनंदन केले.

मग ती श्रीशला घेऊन खाली आली. कांचनच्या रुम मधे डोकावली. तिच्या बऱ्याच नळ्या निघाल्या होत्या. तिची नजर बरीच स्थिर झाली होती. शब्द हळू हळू पण स्पष्ट येऊ लागले होते. आज तिला लिक्वीडस दिली होती थोडी. बाकी पॅरामिटर्सही ठीक होते. थोड्याच वेळात तिला रुममधे हलवणार होते.

शाल्मलीला केतकीचा बाबा केतन उत्साहाने सर्व सांगत होता. केतकी मग थांबली तिथेच.

शाल्मली वर आली. थोड्या वेळाने दारावर टकटक झाली. दार उघडलं तर केतकी दारात उभी. “आंटी, आम्ही इथेच आलो तुमच्या समोर.”

“हो का? अरे वा छान”

केतनही दारात आला मग. शाल्मली उठून श्रीशला घेऊन आली आणि कांचनच्या रुममधे गेली. कांचन आता सेटल्ड वाटत होती.

“किती दिवस रहावं लागेल अजून?”

“कमीत कमी ८, जास्तीत जास्त १५ असं म्हणाले डॉक्टर.”

“हं. केतकी तुझी शाळा कुठे आहे”

तिने सांगितलेलं ठिकाण माहित होतं शाल्मलीला.

“स्कूलबस आहे?”

“हो”

मग केतनला ती म्हणाली, “तुमची हरकत नसेल तर मी हिला माझ्याकडे नेते काही दिवस. सध्या महिनाभर रजा आहे माझी. शाळेत जाईल. स्कूलबसला तिथला देऊ पत्ता. फोनवर बोला रोज. मला सध्या दर दोन दिवसांनी श्रीश ला आणायचय इथे. तेव्हा येऊन भेटेल तुम्हा दोघांना. इथे उगाच इकडे तिकडे फिरत बसेल. तुम्हालाही दोघींवर लक्ष ठेवणं कठीण ”

केतनला काय बोलावं कळेना. “तुम्हाला त्रास नाही होणार?”

“मला शक्य आहे म्हणूनच विषय काढला.”

त्याने केतकी कडे पाहिलं. ती आर्जवाने पाहत होती.

“आठवड्यात सोडलं नाही तर १५ दिवसांवर जाईल.”

“प्रयोग करून पाहू. नाहीच जमलं तर बघू मग.”

“काय म्हणू? थॅंक यू हा शब्द फार तोकडा आहे.”

“नकाच म्हणू काही. मी संध्याकाळी जाताना घेऊन जाईन तिला. स्कूलबसचा नंबर द्या. तिच्या क्लासटीचरला सांगून ठेवा फोन करून. स्कूल बॅग?”

“मी पोहोचवायची व्यवस्था करतो.”

केतकीचा चेहरा फुलून आला. कित्येक दिवसांनी ती एवढी आनंदी दिसत होती. केतन पाहत राहिला. मग विचारात पडला. “काय केलं या बाईने असं की ही पोर परत हसायला लागली?” दुपारी कांचनला झोप लागल्यावर केतन जाऊन केतकीचे कपडे, युनिफॉर्म्स, स्कूल बॅग, बाकी सामान घेऊन आला.

संध्याकाळी केतकी कांचनला भेटून आली. डिसचार्ज झाला आणि तिघे निघाले. केतकीने निघताना कांचनला किसी दिली तेव्हा डॅडला पण दिली. केतनचे डोळे पाणावले.

पुढचे काही दिवस भराभर गेले. केतकीचं रुटीन सुरू झालं. दर दोन दिवसांनी हॉस्पिटल वाऱ्या. शाल्मली घरून हळू हळू कामात लक्ष घालू लागली. एकदा ऑफिसचे सगळे जण भेटून गेले. प्रशांत म्हणाला, “कामाचं टेन्शन नको घेऊस सध्या.” दिनेश ही म्हणाला “मॅम काही अडलं तर मी करेनच फोन.”

ती ही निश्चिंत झाली मग.

मंडळी बाहेर पडली तेवढ्यात आई घाईघाईने आत आली. तिच्या हातात एक पाकिट होतं.

“काय आहे हे आई?”

“हे बघ, शंतनूचं पत्र आहे. बघ उघडून पटकन. श्रीशला त्याने खेळणं पाठवलं तेव्हाच आशा वाटली होती गं. आता तर श्रीश बराही होईल. मग परत तुम्ही एकत्र याल अशी खात्रीच वाटत होती मला आणि तुझ्या बाबांना.”

शाल्मलीने आईला हाताला धरून खाली बसवले. मग म्हणाली, “आई शंतनू आला होता हॉस्पिटलमधे. खूप बदललाय तो. आधीपेक्षा चांगला माणूस बनू पाहतोय. त्याने अधिक चांगलं बनावं असं मलाही वाटतं. पण तुला वाटतंय तसं नाही काही होणाराय.

त्याला श्रीशला ऐकू बोलू येऊ लागलं तरी लावलेली मशीन्स, ते थोडं निराळं बोलणं हे सहन होणार नाही म्हणाला. माझं अंग आक्रसतं म्हणाला. पण प्रामाणिकपणे हे सांगितलं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तो श्रीशचा सगळा खर्चही करेन म्हणाला. पण मी नाही ऐकलं. मला पैसा नकोय त्याचा. मीच त्याला घटस्फोटासाठी अर्ज करायला सांगितला. त्याला साथीची गरज आहे आई. म्हणून मोकळं करतेय या बंधनातून.”

आई पाहतच राहिली. “अगं, डोकं फिरलय का तुझं? कुठल्या स्वप्नांच्या दुनियेत वावरते आहेस? एकटी बाई म्हणजे समाजातल्या लांडग्यांना आयतच फावतं. आम्ही किती दिवस पुरणार आहोत? दादाला त्याचा संसार आहे. हे असं पोर पदरी. कोण स्विकारणार तुला?”

“आई.......!”

“सत्य स्विकारलं नाही म्हणून नाहीसं तर होत नाही ना?”

“आई, अगं शंतनू परत एकत्र येऊ नाहीच म्हणत आहे. लक्षात येतंय का तुझ्या? तो फक्त खर्च उचलायला तयार आहे जे तो आधीही म्हणत होताच. आठवतंय ?”

आई, पाहत राहिली नुसती.

“हे बघ आई, मी ही शंतनूवर मनापासून प्रेम केलय. पण म्हणून मी माझ्या मुलाला सोडून राहावं हे तुम्हालाही नव्हतं ना पटलं, म्हणून घेऊन आलात ना परत? तुम्हाला आशा होती तो बदलेल. मला अटकळ आली होती त्याच्या स्वभावाची. असो.” तुम्ही मला भरपूर शिकवलंय आई. तुझ्या नातवाला काही कमी नाही पडू देणार मी. जरा वेळ लागेल मला बस्तान बसायला एवढंच. पण करेन मी , विश्वास ठेव.”

आई कितीतरी वेळ तशीच बसून राहिली मग. शाल्मलीला माहित होतं, हे सगळं पचनी पडायला वेळ लागणार होता. तिनेही विषय नाहीच वाढवला मग.

केतकी आलीच तेवढ्यात शाळेतून. तिची चिव चिव सुरू झाली. आज हॉस्पिटलला जायचं होतं. मग निघाली तिला आणि श्रीशला घेऊन. श्रीशची शस्त्रक्रिया होऊन दोन आठवडे झालेत. इंम्प्लांट शरीराने स्विकारलाय. पुढच्या आठवड्यात परत दाखवायचं आणि मग ॲक्टिवेशन कधी करायचं ते ठरवू असं सांगितलं. सॅम दिसत नव्हता कुठे. “मॅम डॉक्टर बाहेर गेलेत पण तुम्हाला थांबायला सांगितलय ते येईपर्यंत” नर्सने निरोप दिला. केतकी आधीच कांचनकडे गेली होती.

शाल्मलीही मग तिकडे गेली. कांचन कॉटवर पाय पसरून बसली होती टी व्ही पाहत . श्रीश आल्यावर तिचीही कळी खुलली. प्लास्टर काढलेलं दिसत होतं हाता पायाचं. छोटा वॉकर होता जवळ ठेवलेला. “आंटी, आज मला चालवणार आहे फिजीओ आंटी.” तिने उत्साहाने सांगितलं. “हो का? अरे वा. चला मग हा तुझ्या आवडीचा खाऊ खा मग पटकन.”

गोड खाऊ बघून आणखीनच कळी खुलली तिची. “केतकी डॅड कुठय?”

“बाहेर गेलाय औषधं आणायला”

“ओके”

“तुझ्या टीचरचा निरोप सांगितलास का?”

“ओह.... विसरले.”

“आता आठवणीने सांग आला की.”

“हो सांगते.”

केतन आलाच तेवढ्यात.

मग केतकी म्हणाली “डॅड, मी ॲबसेंट होते ना त्याचं लेटर मागितलय टीचरने.” “आणि कांचनसाठी लेटर आणि मेडिकल सर्टीफिकेट” शाल्मली म्हणाली .

“हो ते पण.”

“ओह, पाठवतो मी लगेच उद्या. तुम्ही केव्हा येणार आता?”

“पुढच्या आठवड्यात बोलावलय.”

“अच्छा! कांचनला दोन दिवसात डिसचार्ज देऊ म्हणाले.

“अरे वा.”

“मी त्याच दिवशी केतकी ला घेऊन जाईन.”

शाल्मली काहीच बोलली नाही.

“काय झालं?”

“केतकी विषयी बोलायचं होतं तुमच्याशी. महत्वाचं आहे फार.” मुलं खेळण्यात गुंतलेली पाहून शाल्मली म्हणाली.

केतन अस्वस्थ झाला. “काही म्हणाली का ती तुम्हाला?”

“नाही हो. ती काय म्हणणार. बघू बोलू एखाद दिवशी.”

“नाही एखाद दिवशी नको. मी फोन करू का?”

“नाही फोनवर नको.”

“उद्या जमेल थोडा वेळ काढायला तुम्हाला? कांचनची फिजिओ जवळ जवळ दोन तास चालते. तसंही आत नाही सोडत नातेवाईकांनां. शेवटची पाच मिनिटं बोलावतात. तुम्ही तेव्हा येऊ शकलात तर..... मी खूप कष्ट देतोय तुम्हाला पण ...... “

“ठीक आहे , प्रयत्न करते.”