Prayaschitta -17 books and stories free download online pdf in Marathi

प्रायश्चित्त - 17

शाल्मली बाहेर पडली आणि तिने शंतनूचा नंबर फिरवला.

शाल्मली ने दोन तीन वेळा शंतनूचा नंबर फिरवला पण बिझीटोन आला.

मग ठेवला फोन पर्समधे तर लगेच वाजायला लागला. शंतनूचाच कॉल.

“हॅलो, मी शंतनू ”

“हो बोल. तुझाच नंबर ट्राय करत होते बिझी लागला.”

“तुलाच लावत होतो”

“ओह, बोल ना.”

“ते पेपर्स मिळाले?”

“हो. आजच.”

“वाचलेस?”

“नाही.”

“का?”

“गडबड होते जरा. आता घरी जाऊन डिव्होर्स पेपर्सवर सह्या करून लगेच कुरियर करते.”

“हं!”

“तू का फोन करत होतीस?”

शाल्मली ला पटकन शब्द सुचेनात.

दोन क्षण शांततेत गेले.

“बोल ना”

“शंतनू, मी तुला एवढंच सांगायला फोन केला की तू तुला हवं तेव्हा श्रीशला भेटू शकतोस जेव्हा तुला इच्छा होईल, किंवा असं म्हणू, जर तुला इच्छा होईल. तुझा तो हक्क आहे आणि मी तो तुझ्यापासून हिराऊन घेणं योग्य नाही.”

बराच वेळ पलिकडे शांतता पसरली.

“हॅलो??”

“हं, हॅलो,” शंतनू चा ओला आवाज फोनवर परत आला. “मी, नंतर बोलू?”

“हं, ठीक आहे.”

“गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज पण .....”

“कळतंय मला शंतनू .मला सांगायचं ते सांगितलं मी.”

“ऐक प्लीज....”

“शंतनू बस पकडतेय.”

“बरं”

———-

शाल्मली घरी पोहोचली. समोरच शंतनूचं लेटर दिसलं. तिने उघडून वाचायला सुरवात केली.

दोनपानी विल होतं. डिव्होर्स पेपर्स नव्हतेच.

‘माझी सर्व स्थावर आणि जंगम संपत्ती, जी पुढे नमुद केली आहे, माझी पत्नी शाल्मली आणि माझा मुलगा श्रीश यांच्या मालकीची आहे. त्या दोघांना जेव्हा वाटेल तेव्हा ते दोघे किंवा माझा मुलगा सज्ञान होईपर्यंत माझी पत्नी शाल्मली यावर हक्क बजाऊ शकतील. त्यांना कोणीही आडकाठी करू नये यासाठी मी कोर्टाच्या साक्षीने हे इच्छापत्र बनवले आहे.’बाकी सर्व दोन पाने भरून शंतनू ची सर्व प्रॉपर्टीचे डिटेल्स त्यात लिहीले होते. तिला माहित असलेल्या आणि बऱ्याच माहित नसलेल्या संपत्तीची त्यात नोंद होती. तिला काहीच कळेना. परत एनव्हलप पाहिलं उघडून. तेवढेच पेपर्स होते.

काय करावं तिला कळेना. तिने परत शंतनू ला फोन लावण्याचा प्रयत्न केला. लागला नाही. कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचा मेसेज वाजला. “काय आहे याच्या मनात? जीव घाबरा झालाच तिचा जरा. नुकतच केतनकडून त्याच्या बायकोविषयी ऐकलं होतं तेच परत परत मनात घर करून राहिलं.

“शंतनूने जीवाचं बरं वाईट करून घ्यायचा विचार तर… परवा भेटला तेव्हा बदललेला वाटला आपल्याला. पण हे असं?”

परत परत फोन करून पाहिला दर वेळी कव्हरेज च्या बाहेर.

तेवढ्यात फोन वाजला तिचा.

शंतनू ......“हॅलो? अरे केव्हाचा फोन करतेय,”

“हं, नेटवर्क नसेल. मी ड्राइव्ह करत होतो.”

“ओह, ओके. “शाल्मली ने सुटकेचा श्वास सोडला.

“मी....मी येतोय. आताच. मला फक्त एकदा बोलायची संधी दे.”

“बरं.”

शंतनूला ती इतक्या लवकर तयार होईल याची मुळीच अपेक्षा नव्हती.

“कुठे .... येऊ?”

“घरीच ये. मी आईच्या शेजारीच फ्लॅट भाड्याने घेतलाय.”

“बरं. पाऊण तासात पोहोचेन.”

“बरं”

केतकी आली तेवढ्यात शाळेतून. मग तिने तिचे खाणे पिणे झाल्यावर तिला अमेय अनुजकडे खेळायला पाठवले. श्रीश अजून झोपला होता. मी येईन न्यायला तोपर्यंत खेळ असं सांगून सोडून आली केतकीला. आईला म्हणाली, महत्वाचं काम उरकते श्रीश झोपलाय तसा. झालं की हिला नेते.

घरी जाईपर्यंत शंतनूचा फोन, “फ्लॅट नंबर विसरलो विचारायला.”

तिने सांगितला. ५ मिनिटात बेल वाजली.

शंतनू आत आला. अवघडून बसला. तिने पाणी दिलं. चहा आणि खायला आणलं.

चहा घेतला. मग म्हणाला,

“मी फार स्वार्थी माणूस होतो आणि अजूनही आहे हे मला कळतंय. पण मला बदलायची इच्छा आहे, तसा मी मनापासून प्रयत्नही करणार आहे.शाल्मली मी ही तुझ्यावर प्रेम केलय पण ते मर्यादित होतं हे मला अधिकाधिक कळतंय आता. माझ्या जीवनाकडून काही खास अपेक्षा होत्या. त्या पुऱ्याच होण्याची, पुऱ्या करण्याची मला सवय होती. श्रीशच्या जन्मापर्यंत तसंच सगळं घडतही होतं. अचानक त्याचं व्यंग समोर आल्यावर मी हडबडलोच. नेहमी सगळं स्वत:च्या मनाप्रमाणे घडण्याची किंवा घडवण्याची सवय लागलेल्या मला हे ही पटकन मनासारखं घडवण्याची घाई झाली आणि मी ताळतंत्रच सोडलं. तुला श्रीशपासून तोडण्याचा अमानुष निर्णय घेतला. मला माफ करणं तुला शक्य नाही हे माहित आहे मला. पण आता आलो नसतो तर परत कधीच ....श्रीशचं ऑपरेशन यशस्वी होईलच. व्हावंच. पण त्याआधीचा श्रीश बघायचाय मला. अनुभवायचाय. परवा शांत झोपलेला त्याचा चेहरा गेल्यापासून सतत डोळ्यासमोर येतोय. कुठय तो?”

“झोपलाय.”

“हं. मी थांबू इथे? की खाली जाऊन थांबू? उठला की बोलव वाटल्यास.”

“नाही, त्याची गरज नाही. थांब इथेच. आलेच मी.”

१५ मिनिटं ती स्वैपाकघरातच होती. रात्रीच्या जेवणाची तयारी करत. तेवढ्यात श्रीश जागा झालाच.

मग तिने त्याला वॉशरूम मधे नेले. तोंड वगैरे धुऊन परत आणलं

मग बाहेर घेऊन आली. शंतनू पटकन उठून उभा राहिला.

श्रीशने त्याच्याकडे टक लावून पाहिलं. आणि मग नेहमीसारखं खुदकन हसला.

शंतनू पाहतच राहिला. त्या निर्व्याज दैवी हास्याने जणू त्याच्या आत्म्याला गदगदा हलवले. ‘या बाळाला तू झिडकारलस? एका हास्याने त्याने जळजळणाऱ्या तुझ्या मनाच्या डागण्यावर गुलाबपाणी शिंपडल्यासारखी शीतलता दिली बदल्यात काहीच न मागता!!’

तो काही पावलं पुढे झाला आणि मग थांबला जागीच. ‘येईल आपल्याकडे?’

मग शाल्मली त्याला घेऊन पुढे आली. शंतनूने बिचकतच हात पुढे केला तर श्रीश लगेच आला त्याच्याकडे. त्या सुकुमार बालस्पर्शाने त्याचं सर्व अंग रोमांचित झालं. ‘का नाही म्हणालो आपण या स्वर्गीय आनंदाला? किती यातना दिल्या या मुलीला जी जीव ओवाळून टाकत होती आपल्यावर. ती ही अशीच बदल्यात कधीच, काहीच अपेक्षा न ठेवणारी. मूर्खासारखं पैशानी विकत घेऊ पाहत होतो हा स्वर्ग?’

त्याने श्रीशला अगदी जवळ घट्ट धरले. त्याचा बाळगंध रंध्रारंध्रात भरून घेतला. नकळत डोळ्यांवाटे अश्रू वाहू लागलेले त्याचे त्यालाही कळले नाहीत.

शाल्मली हे सगळं काहीशा आश्चर्याने पाहत राहिली. तिला त्यांची ती भावसमाधी भंग करावीशी वाटेना. चूक शंतनूचीच होती पण तरीही तो आणि श्रीश या परमानंदाला मुकले होतेच हे तर खरंच होतं.

मग श्रीश जरा वळला तसा शंतनू भानावर आला. श्रीश आता वळून त्याच्याकडे पाहत होता. आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी तो शंतनूला निरखत होता. मग त्याची बाळबोटे शंतनू च्या चेहऱ्यावर फिरली. शाल्मलीच्या गळ्यात हुंदका दाटून आला. शाल्मलीच्या डोळ्यात पाणी दिसलं की श्रीश असाच हात फिरवायचा तिच्या चेहऱ्यावर.

शंतनूने परत त्याला घट्ट मिठीत घेतले. श्रीशचे हातही नकळत त्याच्या गळ्याभोवती गुंफले गेले. किती वेळ तो तसाच थांबला.

मग शंतनूने त्याला मांडीवर घेतले आणि तो खुर्चीत बसला. “मी याच्यासाठी काही खेळणी आणलीत देऊ का?”

शाल्मलीने फक्त मान हलवली. स्वत:च्या आवाजावर विश्वास नव्हता तिचा. ‘हे असं चित्र श्रीशच्या जन्माआधी किती वेळा मनात रंगवलं होतं आपण?’

श्रीशला जवळ बसवून शंतनू त्याला ती रंगीत ट्रेन फिरवून दाखवण्यात दंग झाला होता. श्रीश टाळ्या पिटून हसत होता.

शाल्मली त्या दोघांना सोडून आत गेली. तिने भाताचे तांदूळ वाढवले. पोळ्याही जास्त केल्या.

तेवढ्यात केतकी, अमेय अनुज सगळेच पळत पळत आले. दारात एकदम थबकले.

मग अमेय एकदम ओरडला , “शंतनूकाका, तू कधी आलास?’

“अय्या लाल ट्रेन .... बॅटरी वर चालणारी....”

ह्या मुलांना पाहून श्रीश चेकाळलाच. जोरजोरात उड्या मारून हसू लागला. मुलांना मग परत परत ट्रेन चालवून दाखवली शंतनूने.

मग सगळे एकदमच जेवले. मुलं जायला निघाली. “शंतनू काका, तू आता इथेच राहाणारेस?’

“नाही. शंतनूकाकाला ऑफिस आहे ना? तो परत जाणाराय. अमेय, अनुज, माझं एक सिक्रेट ठेवाल?”

“काय आत्या?”

“शंतनूकाका इथे आल्याचं तिथे नाही सांगायचं कोणालाच, ठेवाल हे सिक्रेट? आजोबांना बरं नाहीय ना? मी नंतर योग्य वेळ पाहून सांगेन.”

“ओके आत्या.”

“थॅंक यू”

शंतनू फक्त शाल्मलीला निरखत राहिला. ‘किती तारेवरची कसरत करावी लागली असेल तिला स्वत:च्या स्थितीबद्दल सांगताना.

मुलं घरी गेली.

“मी ही निघतो. उद्या येईन परत, चालेल?”

तिने होकारार्थी मान हलवली.

“तुझ्याशी बोलायचं होतं.”

केतकीसमोर तिला कोणताच विषय नको होता. “उद्या बोलू.”

“हं. ही मुलगी?”

“हॉस्पिटल मधे ओळख झाली. हिच्या बहिणीला अपघात झालाय मोठा. वडील तिच्याजवळ अडकलेत. हिची शाळा बुडत होती, माझीही रजा होती, मग घेऊन आले इथेच. मोठी गोड पोर आहे. श्रीश बरोबर एकदम गट्टी जमलीय.”

“हिची आई?”

शाल्मली ने नकारार्थी मान हलवली.

“ओह, कठीण असेल सगळच मग.”

“खाली येतेस दोन मिनिटं?”

शाल्मलीने श्रीशला उचलले, “केतकी चल काकाला सोडून येऊ.शंतनूने श्रीशला घ्यायला हात पुढे केले, तिनेही दिला त्याच्याकडे.”

सगळे खाली आले. कोपऱ्यावर गाडी लावली होती. “काका, श्रीशच्या चिनला हात लाव, त्याला खूप आवडतं.”

शंतनू ने श्रीश च्या हनुवटीला हळूच बोट लावलं तर खदखदून हसला.

“अरे, खरंच की. मला श्रीशच्या अजून गमती सांगशील केतकी?”

“हो........”

“उद्या सांग नक्की. आठवून ठेव. काय?”

“हो हो.”

मग कारमधे बसवलं त्यांना शंतनूने. रमलीच दोघं तिथे. डेक सुरू केला. गाणं लागल्यावर केतकी हाताने श्रीशला ठेक्यावर हातवारे करून दाखवायला लागली. तर तोही खिदळायला लागला.

कारजवळ काही क्षण उभे राहून शंतनू आणि शाल्मली ही मजा पाहू लागले.

मग एकदम शंतनू म्हणाला, “मी ट्रान्सफर घेतोय नोकरीतून या शहरात.”

शाल्मली ने जरा चमकून पाहिले.

“तू जेवढी मुभा देशील तेवढं श्रीशच्या सहवासात राहीन. तुला तुझ्या नोकरीत भरभराट करताना थोडा जरी माझा हातभार श्रीशला सांभाळण्यासाठी लागला तरी मला खूप बरं वाटेल. मी करंटेपणाने श्रीशला झिडकारलं आणि तुलाही मुकलो.

“मी तुझी वाट पाहीन शाल्मली. जन्मभर. पण म्हणजे मी तुझ्या आनंदाच्या आड नाही येणार.श्रीश जरा माझ्या सवयीचा होईपर्यंत मला इथे यावं लागेल. तेवढी मुभा दे. नंतर मी नेत जाईन त्याला माझ्याकडे.त्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझा सहभाग असेल. प्रत्यक्षात असेल. नुसता पैशाने नव्हे. तू मला माफ नाही करू शकणार, कदाचित कधीच. मी चूक नाही गुन्हा केलाय. माफ कर म्हणण्यासारखंही माझं वागणं नव्हतं. त्यामुळे माफीचा भार नाही टाकत मी तुझ्यावर. माझ्यासारख्या माणसाशी संबंध जोडून वाटोळं झालं तुझ्या आयुष्याचं. पण हे तू बदलू शकतेस. तुझ्या आयुष्यात आनंद परत यावा ही माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या या शब्दांवर विश्वास ठेवणं किती कठीण आहे तुला हे मी जाणतो. पण आता माझ्या कृतीतून मी तो विश्वास परत मिळवेन. तुझं प्रेम मी कायमचं गमावलय, निदान विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करेन.”

मग तो गप्प बसला.

शाल्मलीला काही सूचेना.

राग, संताप, उद्वेग, सगळ्या नकारात्मक भावनांनी गर्दी केली तिच्या मनात.

कारचं दार उघडून खसकन श्रीशला कडेवर घेतलं तिने. केतकीलाही हाताला धरून बाहेर काढलं. एकही शब्द न बोलता तरातरा चालत घराकडे निघाली.

शंतनू पाहत राहिला तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे. तिचा राग, तिरस्कार प्रचंड परिणामकारक होता त्याच्यासाठी. कुणीतरी चाबकाचे फटकारे ओढावेत तसं वाटत होतं त्याला. आपली लायकीच ती आहे मग दु:ख सहन करावं लागलं तर तक्रार कशाची असंच मन म्हणालं त्याचं.

पडलेल्या खांद्यांनी गाडीत बसला आणि रात्र घालवण्यासाठी एखादं हॉटेल शोधू लागला.

शाल्मली घरी आली. आपली एवढी चिडचिड का होतेय तिचं तिलाही कळेना.

केतकी ला लगेच कळलं आज हिचा मूड नाही. गुपचूप झोपून गेली. तिला झोपलेलं पाहून श्रीशही लगेच झोपला.शाल्मली मात्र टकटकीत जागी राहिली. तळमळत.

‘काय हवय आपल्याला नक्की?’ तिचं तिलाच कळेना.






इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED