प्रायश्चित्त - 19 - अंतिम भाग Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रायश्चित्त - 19 - अंतिम भाग

ही हॉटेल रूमवर पोहोचली तेव्हा दार उघडच होतं. अख्खा रुमभर खेळणी पसरली होती. साईड टेबलवर हॉट चॉकलेटचा रिकामा ग्लास, फळांचा रिकामा डबा होता.

बेडभर शंतनू पसरला होता आणि त्याच्या छातीवर श्रीश पालथा झोपला होता.

हे दृश्य तिच्या मनात परत एकदा हजारो भावनांचा कल्लोळ उठवून गेलं. घशात बारीकसा हुंदका दाटला. पटकन एक फोटो काढून घ्यावा असंही मनात आलं. काय जाणो शंतनूचं मन परत बदललं आणि गेला सोडून बाळाला तर क्षणभर का होईना पण त्याने प्रेम केलं तुझ्यावर असं सांगायला पुरावा झाला असता.

तिनं खरंच ओल्या नजरेनेच एक फोटो काढला. हळूच जाऊन त्या प्रेमाच्या कोषात विरून जावं आपणही ही भावना अनावर होऊन गेली पण तिने स्वत:ला कसंबसं सावरलं.

‘नाहीच संपणार का कधीच ही ओढ शंतनू बद्दलची? तो इतका ताळतंत्र सोडून वागला. इतकंच नव्हे तर त्याने आपल्या स्त्रित्वाचा घोर अपमान केला परस्त्री बरोबर.......’

‘तरीही हे असं आकर्षण? ही ओढ? का पण? मी असं वागले असते तर? माफ करू शकला असता मला?’

‘शंतनूच कशाला इतर कोणताही पुरूष माफ करू शकेल?’

‘केतन ने केलं, केलं का खरंच? की ती गेल्यावरची उपरती आहे ही?’

‘नियम , कायदे, यांची धाव बुद्धीपर्यंत. भावना कुठे ऐकतात त्यांचं?’

‘पण भावना आहेत म्हणून जग सुंदर आहे.’

अचानक बेडवर हालचाल झाली आणि शंतनू जागा होऊन आपण त्याला निरखताना आपल्याला निरखतोय हे लक्षात येऊन शाल्मली चपापली. पटकन तिथून बाजूला जात तिने खेळ आवरायला सुरवात केली.

शंतनू म्हणाला, “याला जरा उचल. म्हणजे मी उठून आवरतो. हा जागा होऊन रडेल म्हणून मी हललोच नाही आणि मग मलाही झोप कधी लागली कळलंच नाही. मग हा पसारा तसाच राहिला.” तो खजिल होत म्हणाला.

तिने श्रीशला उचलून खाली बेडवर झोपवले. जरा चाळवला पण लगेच झोपला परत.

मग शंतनू उठला. अंग अवघडलं असावं.

“श्रीशने दूध, फळं सगळं खाल्लं. हात धुवून भरवलं मी. खूप खेळलो मग आम्ही. मजेत होता. अजिबात रडला नाही. मग असा अंगावर येऊन पडला, दंगामस्ती करता करता मिनिटात झोपूनच गेला गं.”

शाल्मली लहान मुलाच्या उत्साहाने बोलणाऱ्या शंतनू कडे पाहत होती.

‘माणूस खरंच इतका पूर्णपणे बदलतो? की हा आव आणतोय? लहान मुलांना खरं खोटं प्रेम स्पर्शातून कळतं म्हणतात! खरंच कळतं का? माझ्या मनातलं संशयाचं भूत बहुधा कधीच नाही जाणार का?’

“तुझं कसं झालं लंच?”

“छान!”

“सहजच बोलावलं होतं की काही विशेष?”

शाल्मली ने एकदा स्थिर नजरेनं पाहिलं. मग म्हणाली

“मला लग्नाबद्दल विचारलं त्यांनी!”

बराच वेळ शांतता.

मग घोगऱ्या आवाजात शंतनू म्हणाला “तू काय सांगितलस?”

“विचार करून सांगते म्हटलं”

“हं!” एक मोठा सुस्कारा सोडला त्याने

नजरेत वेदना होती

पण तो पुढे म्हणाला, “तुझ्या आयुष्यात हा माणूस आनंद आणणार असेल तर मी श्रीशची पूर्ण जबाबदारी घेईन शाल्मली.”

अत्यंत कडवट स्वरात ती म्हणाली “श्रीशशी संबंध नाकारला म्हणून लग्नाच्या नवऱ्याचं घर मी क्षणात सोडलं , विसरलास? मग आता श्रीशची जबाबदारी न स्विकारणाऱ्या माणसाबरोबर लंचला तरी जाईन असं वाटलच कसं तुला?तो श्रीशची संपूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे.”

मगाचचा उत्साहाने उफाळणारा शंतनू नाहीसाच झाला एकदम. खांदे पडले. हलक्या हातांनी काही न बोलता त्याने पसारा आवरायला सुरवात केली. सगळं झाल्यावर बेडवर बसला आणि श्रीशच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला त्याने.

“मी दोन आठवड्यांची सुटी घेतलीय. मग डायरेक्ट इथल्याच ऑफिसला रुजू होईन. तोपर्यंत रोज मला श्रीशला भेटू देशील? श्रीशच्या इम्प्लांट ॲक्टीवेशनला मला येऊ देशील ना?”

तिला मनातून खूप वाईट वाटलं मग. उगाच खोटं बोललो असं वाटलं. पण दुसरं मन म्हणालं “ही डीजर्वज इट.”

“हो भेट तू त्याला रोज. इम्प्लांटची डेट मंगळवारी ठरेल. कदाचित योग्य वाटलं तर त्याच दिवशी करतील.”

“मी येतो तुम्हाला घेऊन जायला.” शंतनू उत्साहाने म्हणाला.

——-

त्यानंतरचे चार दिवस रोज दुपारी तो श्रीशला घेऊन जाई. संध्याकाळी परत आणे. बऱ्याचदा मग शाल्मली त्याचाही स्वैपाक करूनच ठेवी. जेवण करून परत जायचा.

केतकीला समजाऊन तिने तिच्या घरी नेऊन सोडले. केतन कांचनच्या रुममधे घेऊन गेला सर्वांना. दारातच केतकी त्याच्या डॅड म्हणत गळ्यात पडली तेव्हा तो ही खूश झाला एकदम. शंतनू आला होता तिच्यासोबत केतकीला सोडायला. कांचन खूश झाली केतकी ला पाहून. दोघीनी एकमेकिंना गळामिठी दिली.

“केतकी , मंगळवारी येतोय आम्ही तुला न्यायला.”

“हो हो, आंटी मी तू दिलेला नवा ड्रेस घालणार. श्रीशलाही तोच घाल आपण घेतलेला. कांची, आंटीने तुलाही दिलाय सेम ड्रेस.”

मग मुली रमल्या एकमेकीत.

“मी तुम्ही सांगितलेलं सगळं लक्षात ठेवलय. कांचन बरोबर बोलणं सुरू केलय. तिच्यात आणि माझ्यात ही फरक पडतोय असं वाटतंय. पण तुमची मदत लागणार आहे आम्हा तिघांनाही.”

“होईल सगळं ठीक. काळजी न करता पुढे जा.” ‘याचीही प्राथमिकता माझ्यासारखीच त्याच्या मुली आहेत.’शाल्मली मनात म्हणाली.

“युवर वाईफ इज ॲन एंजेल मि. शंतनू .”

“आय नो”

——-

मंगळवार उजाडला. सकाळपासून शाल्मली अस्वस्थ होती. शंतनू सकाळीच आला होता. पण आज तोच इथे थांबणार होता. तिची अस्वस्थता त्याला जाणवत होती.

मग तो म्हणाला, “शाल्मली, येईल आपल्या श्रीशला ऐकू, मला खात्री आहे. तुझी मेहनत अशी वाया नक्की नाही जायची.”

तेवढ्यात गॅलरीत चिमणा चिमणीची जोडी चिवचिवत आली. शंतनूच्या हातात बिस्कीट होतं ते बोलता बोलता त्याने बारीक तुकडे करून कट्ट्यावर ठेवलं. मग आत जाऊन पसरट भांड्यात पाणीही आणून ठेवलं.

शाल्मली महत् आश्चर्याने हे सगळं पाहत होती. शंतनूच्या ते लक्षात आलं. तो म्हणाला “तू खूप प्रयत्न केलास मला माणूस बनवण्याचा, तू गेल्यावर हळू हळू लक्षात यायला लागल्या गोष्टी.”

“आपल्या घरातल्या तुझ्या टांगलेल्या कुंड्यांमधे आता बरीच चिमणा चिमणीची बिऱ्हाडं आहेत. कामाच्या बाईला सांगून आलोय रोज दाणा पाणी द्यायला. मी सामान हलवायला जाईन तेव्हा येशील? तुझी बाग परत फुलवलीय मी बरीचशी. हात मातीत घातल्यावर कसं वाटतं ते माहीताय मला आता. तुला नक्की आवडेल ती बघायला.”

काही न बोलता शाल्मली आत गेली. जाता जाता तिने हळूच डोळे पुसले.

शंतनू परत यायला लागला त्याने तिचे आई वडील खुशीत होते. तिने हे फक्त श्रीश पुरतं आहे हे स्पष्ट केलं होतं आणि त्यावर त्या दोघांनीही तिला काही म्हटलं नव्हतं.

‘प्रशांत परत भेटला कसा नाही हिला’ असा विचार शंतनूला पडला होता. पण तो खूशच होता त्यामुळे.

दुपारीच निघाले तिघे. आधी केतकीला घेऊन मग पुढे जायचे होते.

चारला हॉस्पिटल ला पोहोचले. प्रथम प्राथमिक तपासणी केल्यावर लगेचच ॲक्टीवेशन करावं असं मत दिलं. लॅबमधे नेलं नर्सने.

मग ऑडीओमेट्री एक्सपर्ट आणि त्यांचे साथीदार आले. त्यांनी संपूर्ण पद्धत समजाऊन सांगितली. श्रीश ला मुळात कधीच ऐकण्याचा अनुभव नाही. त्यामुळे त्याला ऐकू आलंय की नाही हे कदाचित पहिल्या अटेंम्प्ट मधे समजणार नाही. दुसरं असं की हे इम्प्लांट सगळेच आवाज टिपणार. त्यामुळे त्याला गोंगाट ऐकू येणार त्यामुळे ही त्याला भेदरल्यासारखं होईल.

आपण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज चे साऊंडस् त्याला वेगवेगळे ऐकवणार. तेव्हा आजुबाजूचे आवाज येऊ नयेत म्हणून आपण या लॅब मधे या टेस्ट करतोय.

आता आपण सध्या अगदी गप्प बसायचय. मॅम तुम्ही त्याला मांडीवर घेऊन बसा. तो शांत बसणं महत्वाचं.

मग श्रीशच्या डोक्यामागे एक एक चकती कानांच्या वर लावण्यात आली आणि कानामागे छोटी युनिटस लावली. त्याने अंगठा दाखवला. मग सगळ्यांना गप्प राहण्याची खूण केली. शंतनू ने केतकीचा हात धरला.

मग आतून काचेतून अंगठा दाखवला गेला. बराच वेळ काहीच झालं नाही. बाहेरच्या टेक्निशियनने परत ॲडजस्टमेंटस केल्या. परत तेच सगळं, आतून अंगठा. काही परिणाम नाही. शाल्मलीचा धीर खचत चालला. शंतनूच्या ते लक्षात आलं. केतकीला त्याने कानात काही सांगितलं. ती शाल्मलीच्या जवळ जाऊन तिच्या हातावर हात ठेऊन उभी राहिली. परत सगळ्या ॲटॅचमेंटस तपासल्या गेल्या. मग परत आतून बाहेरून अंगठे. श्रीश कानाच्या मागे लावलेले मशीन्स, चकत्या काढून टाकण्याच्या प्रयत्नात होता. शाल्मली ने त्याचे हात धरून ठेवल्यामुळेही तो चुळबुळत होता. मग परत परत सगळ्या ॲडजस्टमेंटस होत राहिल्या. शाल्मलीचा धीर एका क्षणी पूर्ण खचला. डोळे भरून येतील असं वाटायला लागलं तिला. नकळत नजर शंतनू कडे गेली. तो बघत होताच तिच्याकडे. नुसता जवळ आला. श्रीशला जरा शांत केलं. डोक्यावर हात ठेऊन उभा राहिला तिच्या नि श्रीशच्या. परत अंगठे दाखवणं झालं. आतून खूण आली नि तत्क्षणी श्रीश ने उसळी मारली. पुन्हा पुढच्या वेळी तसच. टेक्निशियन ने हसत हसत शाल्मली आणि सगळ्यांना खूण केली. शाल्मली ला कळेना. परत परत दर वेळी श्रीश उसळू लागला. बराच वेळ असं झाल्यावर मग मेन एक्सपर्ट बाहेर आला. त्याने शाल्मलीला खूण केली. तिला आधीच सांगितल्याप्रमाणे तिने हळूच श्रीश अशी हाक मारताच त्याने गर्रकन वळून मागे बघितले तिच्याकडे. शाल्मलीच्या डोळ्यातून घळाघळा पाण्याच्या धारा वाहू लागल्या. मग केतकी, शंतनू सगळ्यांनी हळू आवाजात मारलेली हाकही त्याला ऐकू जातेय याची खातरजमा झाली. तो मजेने आवाजाच्या दिशेने वळून वळून पाहू लागला, हसू लागला.

शाल्मली शंतनूची नजरानजर झाली. त्याच्याही डोळ्यात तोच आनंद होता जो तिच्या होता. काहीतरी तुटलेलं परत जुळलं असा भास झाला तिला. त्याला फक्त श्रीश हा आवाज कळत होता. त्याचं ते नाव आहे हे शिकवायचं होतं.

मग त्याला हॉस्पिटल मधून एक चक्कर मारून आणायला सांगण्यात आलं. तो कदाचित रडेल ही कल्पनाही देण्यात आली. गोंगाट सहन होणार नाही कदाचित म्हणाले.

पण आता शाल्मलीला त्याची काळजी नव्हती.

तिचं बाळ ऐकू लागलं होतं. त्याचा बाबा त्याच्या बरोबर होता.

सध्या शाल्मली आणि शंतनू वेगळेच राहत आहेत. पण रोज भेटतात. रात्रीचं जेवण एकत्र घेतात. शंतनूने नुकताच नवा फ्लॅट घेतलाय. तो शाल्मलीला हरप्रकारे मदत करतोय. दोघं चांगले मित्र आहेत.

सॅमने त्याला परत शाल्मलीला प्रपोज करायला सुचवलय. पण त्याचा धीर होत नाहीय. आहे ती मैत्रीही जायची.

पण आज तो ठरवूनच आलाय. आज त्याच्या फ्लॅटवर जेवण्याचा वार आहे. त्याने पूर्वतयारी करून ठेवलीय. थोडे पदार्थ बाहेरून आणलेत.

आता कुठल्याही क्षणी येईल शाल्मली.

बेल वाजलीच. शाल्मली श्रीशला घेऊन आत आली. “बाबाबाबा बाबाबाबा” श्रीशची बडबड सुरू झालीय. शंतनू ने त्याला घेतला तिच्याकडून. “तू चहा घे तोपर्यंत याला दूध देतो. फ्रिजमधे तुझ्या आवडीची सुरळी वडीपण आहे.”

“ओह, ग्रेट.”

“शाल्मली बरेच दिवस तुला विचारायचं विसरतोय, तू तुझ्या बॉसला काही उत्तर दिलस की नाही?”

“बॉस ? उत्तर?”

“अगं, विसरलीस की काय? लग्नाबद्दल विचारलं होतं ना तुला? तू विचार करून सांगते म्हणाली होतीस.”

शाल्मलीचा चेहरा गोरा मोरा.

“हं, ते?”

“हं, तेच.”

ती नजर टाळतेय.

“मी ‘नाही’ सांगितलं.”

शंतनू जवळ येऊन उभा आहे तिच्या.

“का?”

ती गप्प.

तो तिला आपल्या बाजूला वळवतो.

“मला परत एक संधी देशील? मी तो घाणेरडा, शंतनू नाही राहिलोय गं. बदललोय. तूच बदलंवलं आहेस मला. मला परत तुमच्यात सामिल करून घे.” “बाबाबाबा” श्रीश मागून येऊन पाय पकडून उभा. शंतनू त्याला उचलून घेतो. डोळ्यात प्रचंड आर्जव त्याच्या.

“तुझ्या इच्छेविरूद्ध कधीच काही करणार नाही.”

शाल्मलीचे डोळे पाणावलेले, पण ती अशी लगेच नाही तयार होणाराय.

“नको.”

“का पण?”

“आधी तू श्रीशला नाकारलंस. आणि नंतर स्नेहलबरोबर..., आता नाही कधीच एकत्र येऊ शकत आपण.”

“स्नेहलचं काय?”

“स्नेहलचं काय?” संतापून शाल्मली ओरडली.

“हो, स्नेहलचं काय?” शंतनू ही ठामपणे म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ स्वच्छ दिसत होता.

“त्यादिवशी रात्री तुला फोन केला तेव्हा तिने कसा उचलला? आणि म्हणाली, झोपलेत ते, उठवते, मग तू फोन बंद केलास.

अगं, काहीही काय बोलते आहेस? कधीची ही गोष्ट?

त्या दिवशी जेव्हा मी तुमच्या अनुवांशिकतेबद्दल विचारायला फोन केला तेव्हा.

तेव्हा तर मी मीटिंगमध्ये होतो. माझा फोन स्नेहलकडे होता. बाहेर आल्यावर मी तुझा कॉल पहिला आणि फोन केला तुला.

मग ती असं का म्हणाली?

हम्म ! आता माझ्या लक्षात येतंय सगळं.

काय लक्षात येतंय?

मग शंतनूने तिला स्नेहलविषयी सगळं सांगितलं. शाल्मली, मी बाकी कितीही वाईट असेन, पण मी खोटं नाही बोलत, माहित आहे तुला.

शाल्मली विचारात पडली. शंतनू खोटं नव्हतं बोलला कधीच. त्याने तिला घडलेले सगळे प्रसंगही सांगताना तो कुठेच काही खोटं सांगतोय असं नव्हतं वाटलं.

नाही कधीच एकत्र येऊ शकत आपण तरीही.”

शंतनूचा चेहरा पडला.

“का नाही विचारणार?”

“का?”

“मला दोन मुलं हवीत आणि मुलगी नक्की हवीय. मग मी बेढब होईन.”

“मला माफ कर शाल्मली मी ते सगळं बोललो होतो. नालायक माणूस होतो जगायला. ससेहोलपट झाली तुझी आणि आपल्या बाळाची. मला जन्मभर खेद राहणार त्याचा. पण मला एक परत संधी दे. सोनं करेन मी त्याचं.”

ती भरल्या डोळ्यांनी पाहत राहिली. शंतनूने तिला आणि श्रीशला एकदमच जवळ घेतलं.

“आ....यी आ....यी, “ श्रीश एकदम म्हणाला.

प्रचंड आनंदाश्चर्याने शाल्मलीने त्याच्याकडे नि मग शंतनूकडे पाहिले. “तो मला आई म्हणाला.”

“काय टाईमिंग आहे माझ्या मुलाचं. आठवडा झाला प्रयत्न चाललेत आमचे.” शंतनू ने मोठी शाबासकी दिली त्याला.

“थॅंक यू! थॅंक यू!” शाल्मलीचं रडू परत सुरू.

“आता अश्रू नकोत शाल्मली. खूप झाले ना?”

तिघांचा त्यांचा असा कोष आज पूर्ण झाला!!

समाप्त

——- मधू शिरगांवकर