तर, आज खूप दिवसांतून वाचकांशी संवाद साधावा वाटला. आज जी परिस्थीती सगळीकडे बघायला मिळते ज्यामुळे, प्रत्येक जण एका वेगळ्याच मनःस्थितीला तोंड देत जगतोय, त्यावर मी काही लिहावं असं सहज वाटलं. मग काय होतं, घेतला फोन आणि बसले लिहायला. मला ही तेवढंच मनाला समाधान मिळेल आपल्याशी संवाद साधून.🤗
तर, परिस्थिती काय आहे? असा प्रश्न विचारल्यास "कोरोना" हेच नाव येतं. काय हो हा आजार? एका विषाणूमुळे उद्भवणारा. हो ना! बरं, जर आपल्याला माहित असेल की, विषाणू प्रसाराने आजार वाढतो मग का ना विनाकारणच बाहेर पडून आपलं अस्तित्व नको तिथे दाखवून द्यायचं? शासन म्हणतंय ना घरी बसा किंवा विनाकारणच बाहेर पडू नका. मग काही तरी अभ्यासपूर्ण बाबींवर गहण विचार करूनच म्हणत असेल ना! पण नाही, गरजेचं नसताना बाहेर पडता आणि मग पोलिसांना मनःस्ताप! अहो लाठ्यांचा मार कोणाला द्यावा वाटेल! पण, तुम्हीच त्यांच्यावर ती वेळ आणता हे ही तितकंच खरं! विनाकारण फिरणाऱ्यांचं सांगतेय उगाच प्रश्न नको.
आज प्रत्येक घरात कमीत - कमी एक कोरोना प्रादुर्भाव झालेली व्यक्ती सापडेल. इतकं प्रमाण वाढण्यामागे कारण, लोकांचा निष्काळजीपणाच म्हणावा लागेल! माननीय पंतप्रधानांनी देशात कोरोना विषाणू प्रवेश करतोय असा इशारा मिळाल्यावर, लोकं घाबरु नयेत वा त्यांचं मनोबल वाढावं म्हणून, थाळी बजाव आणि सांजवेळी दिप प्रज्वलनासारखे उत्साही कार्यक्रम स्वतःच्या घरात सुरक्षित राहून, करण्याचे आव्हाहन लोकांना केले होते. (याचा तितकासा काही फायदा होता असं वाटत नाही असो.... लोकांनी हेच फक्त मनावर घेतलं.....😓) मात्र भारतीय लोकांच्या अतिउत्साही स्वभावामुळे तो कार्यक्रम जोरा - शोरात पार पाडला गेला. कुठे - कुठे तर चक्क ढोल - ताशा पथक बोलावण्यात येऊन, त्यांचा गजर करण्यात आला. कोणी स्टेटस अपडेट म्हणून, इतरांना गोळा करून हे सर्व उद्योग करू लागला. लोकांना कदाचित नव्यानेच विषाणू माहीत झाला असेल किंवा असं केल्याने तो पळून जाईल हा आत्मविशवास बळावला असेल! त्यांचं त्यांनाच माहीत.
कोरोनाकाळी जितकी परीस्थिती बिकट होत आहे तितकीच माणुसकी ही जपली जात आहे असं आपण म्हणू शकतो. लोकांच्या हातचं काम गेलं, काही लोकांना आपलं उदरनिर्वाहाचं ठिकाण सोडून, गावी जावं लागलं! या सर्वांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू शासकीय पुरवठा दुकानांतून मोफत देऊ केल्या. काही सेलिब्रिटींनी स्व:खर्चाने कोणाला खायला तर कोणाला स्वतःच्या गावी पोहचवायला मदत केली हे कौतुकास्पदच! तसेच इतरही लोकं जे की, इतरांना मदत करत होते त्यांना सलाम. त्यातल्या - त्यात आपली महाराष्ट्र पोलीस सज्ज होतीच त्यांना 🙏😎 आदरपूर्वक धन्यवाद 😎🙏
नेहमी मला विचारण्यात येतं इन्फॅक्ट हा लेख मला ज्यांनी लिहायला सांगितला त्यांनी माझे कोरोना मधले अनुभव सामायिक करायला सांगितले. आता तुम्ही म्हणाल मला कोरोना झाला का!? तर, असं काहीही नाहीये. मी एकदम फिट आहे.😎 आमच्या घरी मात्र कोरोनाने एन्ट्री मारलीच. आमच्या मातोश्री पॉझिटीव्ह आल्या.
साधारण दोन महिन्यांआधी जेव्हा उपजिल्हा रुग्णालयातून मोफत लस वाटप करण्यात येण्याचा प्रचार करण्यात आला होता. तेव्हाच मी घरच्यांनी लस घ्यावी हा सल्ला दिला होता. पण, ते म्हणतात ना, अभ्यासपूर्ण माहितीसमोर चुकीच्या बातम्या वरचढ ठरतात! तसंच काहीसं झालं. मी लस घ्या सांगायचे पण, शेजारी - पाजारी लस किती हानिकारक, किती - तरी लोकांनी लस घेतल्यावर स्वतःचे जीव गमावले, लस घेतल्याने ताप येतो, अंग दुखतं या सगळ्या चुकीच्या अफवा पसरवण्यात पुढे होते. त्यामूळे, घरच्यांनी लसीकरण जाणीवपूर्वक टाळले. त्यानंतर मी मात्र स्वतः हार मानली. कारण, झोपेत असणाऱ्याला आपण उठवू शकतो, झोपेचं ढोंग करणाऱ्याला नाही. 😓
असेच मग दिवसामागं - दिवस जात होते. दिवसेंदिवस कोरोना हाहाकार माजवतच चालला होता आणि सध्या ते बंद व्हायचं नाव घेताना दिसत नाही. 😓 त्यात माझी परीक्षा! त्यामूळे मी दुसऱ्या शहरात राहायला होते. तिकडे फक्त आई - बाबा, लहान भाऊ! घरात हिंमतीने ऊभी राहणारी असा घरच्यांचा माझ्यावर विश्वास होता. म्हणून, आई रोज फोन करायची. तिच्या भीतीचे एक कारण म्हणजे, आमच्या परिसरात चांगली माणसं गेली. 😓 ज्यांचं वय नव्हतं अशीही एकामागे - एक जाऊ लागली होती. मग मनात भीती येणं साहजिकच! पण, मी नेहमीच आईला धीर देत राहायचे. काळजी घे काही होणार नाही, मास्क लाव, सॅनिटायझर वापर. महत्वाचं म्हणजे, डोक्यात कोरोनाचे विचारच येऊ द्यायचे नाहीत. त्याचं काय ना, खुद्द मानसशास्त्र सांगतं, जी गोष्ट तुम्ही डोक्यात घेतली मग त्यालाच अनुसरून आपलं शरीर प्रतिसाद देतं. आता हेच बघा ना आज सकाळी उठून तुम्ही असच बोलून बघा, "शीट मॅन, फिलिंग सो बोरिंग टुडे" नाही तुमचा अख्खा दिवस बोर गेला तर! नावाची खुशी नाही. मग नाव तरी काय ठेवणार तुम्ही. असो खुशीच बरं बॉ....😂
तर, आईला सांगून सुध्दा तिच्या मनात कोरोनाची खूप जास्त भिती होती. असणारच! रोज एकामागे - एक जीवं जी जात होती. रोज फोन असायचे! मी मात्र तिला धीर देत राहिले. कारण, जितका मेंटल सपोर्ट ह्या काळात आपण देऊ शकू तितका एखाद्याला दिला पाहिजे. (हो पण, चुकीचं करणाऱ्याला सोडता कामा नये. नाहीतर, तुमच्याशी वाईट करणाऱ्यालाच म्हणाल, "बे भाऊ कसा हाय?" असं नाही चालणार हां 😂)
असेच रोज फोन यायचे त्यात मग इकडे एक पॉझिटीव्ह, तिकडे दोन, अरे हद तर तेव्हा झाली जेव्हा आमच्याच शेजारी नवरा - बायको दोघे सोबतच पॉझिटीव्ह! मग काय आता आई शांत बसली असती तरच नवलं...! ती काही शांत बसेना. सरतेशेवटी तिने खूप सांगितल्यावर, लस घेण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे एक म्हण आहे, "मरता क्या नी करता" तसच लस घ्यावी लागणार हा विचार करून, आमच्या मातोश्रींनी लसीकरण केंद्राकडे प्रस्थान केले. (एकदाचे 😓) पण, त्यांना हलका सा खोकला असल्याने, नेमक्या लसीकरण केंद्रातच त्या खोकल्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी आधी कोरोना चाचणी करवून घेण्याचा सल्ला दिला.
साधारण दोन दिवसात त्या रिपोर्ट्स आल्या असतील. नको होतं तेच घडलं आई पॉझिटीव्ह आल्या. मला आताही आठवतं रोज फोनवर आईला धीर देणारी मी तुटत चालले होते. आईसोबत बोलून, माझा आत्मविश्वास कमी वाटू नये म्हणून, आवाजात खंबीरपणा आणून, बोलायचा प्रयत्न करत होते. शेवटी वेळ आपल्यावर आलीच असं ही वाटून गेलं. आई पॉझिटीव्ह आहे हे ऐकून सगळेच घाबरले होते. स्वतः आमच्या आई खूप अशक्त झाल्या होत्या. धड तोंडून शब्द ही पडेना. कोरोना पेक्षा, कोरोनाची भीती वरचढ ठरली. त्याच दिवशी भावाने आईला अमरावती हलवण्याचा निर्णय घेतला. कारण, नागपुरात ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हते.
लगेच त्यांना अमरावतीला ऍडमिट करण्यात आलं. ते ही दहा रुग्णालय पालथे घालून झाल्यावर! कारण, परिस्थीती खूप म्हणजे खूप जास्त वाईट आहे. कोणाला इंजेक्शन्स मिळत नाहीत तर कोणाला ऑक्सिजन बेड. मागे ऑक्सिजन लीक होऊन बावीस रुग्ण तरफडून जीव गेल्याची घटना आठवून, आजही डोकं सुन्न पडून, स्थब्ध झाल्यासारखं वाटतं. विचार येतो ज्यांच्या घरी एकच कमावणारा असेल त्यांचं कसं. एक बातमी ऐकून तर काळीजच तुटलं दोन लहान मुलांना आई - वडिल दवाखान्यात जात असल्याचं सांगून परतलेच नाही! का तर कोरोनाबळी 😓 काय झाली असेल त्या लेकरांची अवस्था. विचारही करवत नाही.
आमच्या आईला व्यवस्थित रुग्णालयात शिफ्ट केलं गेलं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तीन - चार दिवस देवाला हात जोडून, कधी न इतका विश्वास ठेवणारी मी प्रार्थना करू लागले! प्रार्थना करत होते की, आई लवकर बरी होऊ देत. काहीच दिवसांनी ती बरी झाली सुद्धा.😊 मनाला वेगळाच आनंद झाला. खूप मोठं ओझं जे काही दिवसांचं मनावर होतं ते कमी झाल्यासारखं वाटलं. आई बरी होऊन घरी आली ह्याचं समाधान मी मोजू शकत नव्हते.
आता आम्ही त्या काळात स्वतःला कसं सावरलं...
०१. जेव्हा माहीत झालं आईंच्या कोरोना रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आहेत. तेव्हा एकमेकांवर न चिडता शांत डोक्याने राहायचं ठरवलं. चिडक्या स्वभावाचा भाऊ जर हे करू शकतो मग मी तर इतकी सभ्य 🤭😌 करूच शकत होते.
०२. कोरोना पेशंटला असं वाटू देऊ नका की, ते कुठल्या तरी मोठ्या आजाराने ग्रस्त आहेत. हे मी जाणीवपूर्वक याचसाठी सांगतेय कारण, अर्धे लोकं आजारी आहेत म्हणून दुःखी नसतात तर, त्यांना आपण कशी वागणूक देतो यावरून, त्यांचा बरा होण्याचा कालावधी ठरतो.
०३. त्या काळात स्वतःला जितकं होईल नकारात्मक गोष्टींपासून लांब ठेवा. आपले छंद जोपासा अगदीच मी जपते तसे वा तुमचे काहीही असू शकतात. मग ते चित्र काढणं, वाचन करणं, मित्रांशी गप्पा (सकारात्मक), खेळ काहीही.
०४. जितकं होईल स्वतःला शांत ठेवा. चिडचिड, राग येणे स्वाभाविक आहे पण, एक गोष्ट कधी नोटीस केली आहे का? जेव्हा कधी आपण एखद्याचा मला खूप राग येत आहे असं म्हणतो नेमका तेव्हाच आपल्यातला पूर्ण राग आपण त्याच्यावर काढून मोकळे होतो.
०५. एकूणच ह्या लेखाचा सारच म्हणावा लागेल तो म्हणजे "धीर" फक्त सकारात्मक विचार ठेऊनच चालणार नाही तर, जे काही पुढे घडेल त्यासाठी स्वतःला सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, तयार ठेवावं लागेल.
तर अशा प्रकारे आम्ही स्वतःच्या भावनांना जास्त ऊफाळू
न देता, शांततापूर्ण वातावरण ठेवून, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आज आमच्या मातोश्री ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत.😊
विचार पूर्णतः व्यक्तिगत मांडले आहेत. नोंद घ्यावी.