पेरजागढ- एक रहस्य.... - २६ कार्तिक हजारे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पेरजागढ- एक रहस्य.... - २६

२६. पवनची सुटका आणि आकाशची भेट ..

तीन वाजून गेले होते आणि मी तिथेच अडकून बसलो होतो.इथे थांबण्यापेक्षा हातपाय हलवलेले बरे असे समजून मी चालण्यास सुरुवात केली.काही झाडांना सारत, वाकत,बागत एखादी पायवाट शोधण्याचा प्रयत्न करत होतो.तोच समोर पाण्याचा खळखळ असा आवाज कानावर आला.जवळपास ओढा किंवा नाला असावा या आशेने मी जरा पावले तेजीने मापली.

पावसाळी दिवसांत इथून तिथून पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तयार होतात.पुढे घसरणीला लागून त्यांचा एका ओढ्यात रूपांतर होतो.आणि परत त्यांचा रूपांतर एका नाल्यात होतो.आणि पुढे जाऊन हाच नाला एखाद्या तलावाला जाऊन मिळतो.जोपर्यंत त्याचे रूपांतर ओढ्यातून नाल्यात होत असते तोपर्यंत इतरही जागून छोटे छोटे ओहोळ त्याला येऊन मिसळत असतात.ज्यामुळे त्या नाल्यांतूनही पाण्याची बरीच पातळी वाहत असते.

मी जेव्हा झाडीच्या बाहेर आलो.एक छोटासा ओढा तिथे खळखळ वाहत होता.मी हलकेच बॅग बाजूला काढली आणि त्या ओढ्यात उतरलो.दोन्ही हातांची ओंजळ करून आधी त्या ओढ्यातले पाणी चेहऱ्यावर शिंपडले आणि चेहरा ताजातवाना केला.नंतर त्याच ओंजळीने पाणी पिले.वेगवेगळ्या मृदेंतून पाझरत आलेला पाणी,खरंच त्याची चव फार अक्षम्य वाटली मला.मी आवडीने अजून ओंजळभर पाणी पिण्यासाठी हात पाण्यात पसरले,पण या वेळेस पाणी साफ नव्हतं,अगदी लालसर रंगाचं पाणी हातात जमा झालं होतं.मी ओढ्याच्या वर लक्ष केंद्रित केले.पुढे पुढे तर ओढा लाल लाल होऊन वाहायला लागला होता.

हे असं कसं होऊ शकतं? म्हणून मी त्या ओढ्याच्या वरच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली.जवळपास पन्नास ते सत्तर मीटर चालून झाल्यानंतर एका झाडीतून तो लाल रंगाचा ओढा वाहतोय असं दिसून आलं. वर ती झाडी पण हलत होती. असं वाटत होतं की कुणीतरी रक्ताळून तिथे तडफडतोय.मी जरा घाबरतच हळू हळू पाऊले टाकत त्या झाडीपाशी आलो.झाडी रुंद असल्यामुळे बाहेरून आतमधलं काहीच दिसत नव्हतं.आणि ते जे काही होतं ओढ्याच्या वरच्या बाजूस होतं.

त्यामुळे अलवार पाऊले टाकत मी जराशी झाडी बाजूला सारली आणि काळजात एकदम धस्स झालं.तिथे एक सांबर मरून पडला होता.पण अद्याप मेलेला नव्हता.कारण त्याचे तडफडणे आणि त्याच्या डोळ्यातील वाहणारे ते जिवंत गरम अश्रू सांगत होते.ती शिकार होती वाघाची.बाजूलाच बसून एक पट्टेदार वाघ त्याचे लचके तोडून मजेने खात होता.हे सगळं कॅमेरात रेकॉर्ड करून टीव्ही वर दाखवलेलं असतं तर काहीच वाटलं नसतं पण हे सगळं प्रत्यक्षात माझ्या डोळ्यासमोर मी हे बघत होतो.बिचारा सांबर काही वेळाने शांत होऊन गेला.त्याला बघून माझ्या हृदयात कालवाकालव झाली होती.

पण इतक्यात वाघाला माझ्या तिथे असण्याची शंका आली असावी.लचके तोडून खात असताना तो उभा झाला.आणि त्याने अशी एक डरकाळी दिली की सबंध रान दणाणून गेला.माझी पार घाबरगुंडी उडाली.आता इथे जर मी काही क्षण थांबलो तर...विचार करायचा वेळच नव्हता.मी हळुहळू आवाज न करता त्या झाडीतून दिसेनासा झालो.

बॅग उचलली आणि त्या ओढ्याओढ्याने जाऊ लागलो.कारण मनामध्ये अजून एक आस शिल्लक होती की हा ओढा नक्कीच घोडाझरी तलावाला जाऊन मिळेल.कधी दगडांतून तर कधी काटक्यातून आडीमोडी अशी वळणे घेत तो ओढा एका मोठ्या नाल्याला लागला.मग मी पुन्हा नाल्याने चालण्यास सुरुवात केली. तोच जवळपास कुणाचीतरी चाहूल लागली.मी जरा बारकाईने तिकडे लक्ष वेधले.दोन ते तीन इसमाच्या बोलण्याचा आवाज कानाशी येत होता.

घाईघाईने मी त्या नाल्याला सोडून परत त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो.काही झाडे पार करताच मी त्यांच्या मागे निघालो. असं अचानक मला मागाहून बघताच ते सुद्धा जरा घाबरले होते.पण त्यांना काय माहित? दिवसभरात माझ्यासोबत इथे काय घडले आहे ते?आणि अख्ख्या दिवसभरापासून त्यांना बघून मला किती हायसं वाटलं असेल.त्यातील दोन बुजुर्ग होते आणि एक विसितला तरुण मुलगा होता.मला बघताच एक बुजुर्ग म्हणाला...

"अरे कोण तू?आणि असं अचानक कुठून आलास?किती घाबरलो होतो आम्ही माहित आहे काय?"

(क्षणभर त्यांना बघून आनंदाच्या भरात ओठांवर शब्दच येत नव्हते.)" परत त्याने विचारले..."

" अरे कोण तू? आणि जंगलाच्या इतक्या आत कसा आलास?"

( शेवटी घाबरलेल्या परिस्थितीत मी त्यांना सगळं पूर्णपणे सांगितलं.)

" ते तिघेही एकमेकांकडे बघत राहिले आणि म्हणाले."

अरे फार नशीबवान आहेस तू.दोनदा मृत्यूच्या तावडीतून वाचलास.पहिल्यांदा जिथे तू भटकलास तो चकवा होता.फार काही नसतं केलं त्याने पण जोपर्यंत तुझं जीव आहे.तोपर्यंत जंगल भरपूर फिरवलं असतं, आणि तेही विविध कलाकृत्या दाखवून.आणि मग दिलं असतं एखाद्या पाण्याच्या स्त्रोतात ढकलून जिवे मरण्यासाठी. पण मग त्यातून उभरलास तर वाचलास नाहीतर कुठे जाऊन बळी गेला असतास देव जाणे.पण दुसऱ्यांदा जिथे वाचलास ना ते खरे भाग्य तुझे.कारण चक्क तू त्याच्याच घरातून आलास.त्याच ओढ्याला त्याची गुंफा आहे.आम्ही किंवा इतर कुणीही ज्यालाहे सगळं माहीत आहे चुकूनसुद्धा त्या भागाला जात नाही.
बरं आम्ही मासेमारी करायला जातो आहे.तू बरोबरच चल.हा मुलगा मग परतेल घरी,त्याच्याबरोबरच मग येशील घराकडे.मी होकार देत त्यांच्याबरोबर चालू लागलो.ती नागभिडची मासेमारी करणारी लोक होती. घोडाझरीच्या पहिल्या ते दुसऱ्या खोरापर्यंत जी काही पाण्याची पातळी या जंगलात येते.तिथे ते मच्छीमारी करून पोट भारतात.आत्ता जाळ मांडला की रात्रीचे दहा ते बारा वाजेपर्यंत परततात.आणि मग पुन्हा सकाळी जातात.रोजच्या जाण्यायेण्यामुळे त्यांना जराही भीती वाटत नाही.कारण शेवटी प्रश्न पोटाचा असतो.

त्यांच्या मागे मागे मी जात होतो.ती लोकं सांगत होती की जंगलात जायचं असेल तर काही युक्तिवाद जवळ असायला हवा.पायवाटेने बऱ्याचदा माणूस चुकतो. त्यासाठी पायवाट लक्षात असायला हवी, म्हणून आजूबाजूच्या झाडांची फांदी तोडत जायची आणि पायवाटेवर ठेवत जायची.म्हणजे परतताना ती फांदी बघून आपण पायवाट चुकलेलो नाही असं प्रतीत होते.किंवा जोराने ओरडायचं म्हणजे जंगलात असलेले गुरेढोरे वगैरे किंवा जंगलात काही कामानिमित्त गेलेले लोक त्या आवाजाला प्रतिसाद देतात.आणि त्या आवाजाने अंतरा अंतरातली भीती नाहीशी होते.अशा बऱ्याच युक्तिवाद त्याने मला सांगितले.

ती मासेमारी करणारी लोक मला मिळाली हे एक माझं भाग्यच होतं.कारण घोडाझरी तलावाच्या दुसऱ्या खोऱ्याशी त्यांनी त्यांचा जाळ लपवून ठेवला होता आणि आता पहिल्या खोऱ्यावर ते जाणार होते.त्या जाळासाठी म्हणून ते इकडे आले होते हाच एक संयोग माझ्यासाठी प्राणदाता ठरला होता.त्यांनी बाजूच्या झाडीतून त्यांचा जाळ व इतर सामान घेतले आणि आम्ही सगळे घोडाझरीच्या पहिल्या खोऱ्याकडे निघू लागलो.

दरवर्षीच्या मानाने यंदा पाऊस जरा जास्तच पडला होता.तलावाचा जितका परिसर असतो यावेळी अतीवर्षामुळे तो परिसर भरून जंगलात पाणी लोटला होता.कित्येक झाडाच्या बुंध्याशी त्या सापासारख्या लाटा येऊन आपटत होत्या.किनाऱ्यावर बसुन सागरासारखा आनंद मी त्या लाटांकडून घेत होतो.खळखळ वाहणाऱ्या त्या लाटा वाऱ्यासवे धमाल बागडत होत्या.समोर पाच ते दहा मिटरवर एक बेलाचा झाड होता.पाण्यातून हळुवार पाय टाकत मी त्या झाडापाशी गेलो.

जंगलात असलेलं कोरंबी हे गाव दिसत नव्हतं पण घोडाझरीच्या तलावाचा दुसरा खोर अगदी जवळच दिसून येत होता.त्याबरोबरच शिव टेंपल डोंगराचा काही भाग आणि सगळ्यात मुख्य म्हणजे भावाच्या डोंगराचा शेवटचा टप्पा अगदी स्पष्टपणे दिसत होता.बाकी नजरेला पुरत नव्हता इतका पसरलेला होता तो घोडाझरी तलाव.पंचेचाळीस क्युसेस याची जलाशय क्षमता दाखविली होती पण दरवेळेस ती वाढतच असते.आजच्या प्रवासाच्या दरम्यान घोडाझरीचे खोर पार करून मी भावाच्या डोंगरीच्या शेवटच्या टप्प्यावर जाईन असे मला वाटले होते.पण हा प्रवास एकट्यासाठी कधीच संभव नव्हता.हे नुकत्याच झाल्या काही घटनांवरून तर आत्ता बघितलेल्या अंतरावरून मला कळत होतं.कारण घोडाझरीच्या खोराने जरी का मी जायचं ठरवलं असतं तरी वाघ,अस्वल,रानडुकरे अशा हिंस्त्र शवापदांचा बराच वावर होता.त्या नैसर्गिक स्थानाचे काही फोटोज् काढून मी किनाऱ्यावर आलो.

पुढे मच्छीमारी करणाऱ्या गृहस्थांनी टायर ट्युबच्या साहाय्याने जाळ तलावात न्यायला सुरुवात केली.आणि मी त्या तरुण इसमासोबत परतीच्या प्रवासाला लागलो. परतीला जाताना मी त्याच वाटेला लागलो ज्या वाटेने मी इकडे येण्यास सुरुवात केली होती.जेव्हा त्या लग्नसराईच्या आवाजाने मी जंगलात भरकटलो होतो. तिकडे लक्ष गेली तेव्हा ती वाटच मला दिसली नाही. ज्या वाटेने मी भरकटत गेलो होतो.असे बरेचशे रस्ते चुकवत तो तरुण इसम मला नेत होता.शेवटी गप्पांच्या ओघात आम्ही जंगलाच्या बाहेर केव्हा आलो, हे मला कळलंच नाही.शिवटेंपलच्या खालच्या उतारापासून त्याची आणि माझी शेवटची भेट झाली. आणि आम्ही आपापल्या वेगवेगळ्या वाटांनी निघालो.

बसस्टॉपवर ट्रॅव्हल्सवर सारखे सारखे नागपूर म्हणून ओरडत होते.सायंकाळी बराच वेळपर्यंत ट्रॅफिक चालू असते. त्यामुळे मला जायचं काहीच टेंशन नव्हतं.पण जीवनाने आज ही एक अद्दल मात्र घडविली होती.घाईने कोणताच निर्णय घेऊ नये हे आज मला पुरेपूर पटले होते. ट्रॅव्हलची ये जा चालूच असते त्यामुळे सगळ्यात आधी मी बाजूच्याच हॉटेल्समध्ये गेलो.चहाची ऑर्डर करून एक थंड बिसलेरी मागवली आणि पिऊ लागलो.अचानक मागाहून कुणीतरी हाक मारल्याचं ऐकायला आलं..

पवन....

"मी मागे वळून बघितलं.त्याला बघून जरा हायसं वाटलं.पण मला काही बोलू द्यायच्या आधीच परत त्यानेच विचारलं..."

"अरे पवन ...तू इथे कुठे आलास? आणि इथे असूनही मला काहीच माहिती नाही...साधं एक कॉल नाहि की मेसेजसुद्धा नाही."

"आकाश...तू इथे...अरे फार घाईघाईत मी इथे आलोय.त्यामुळे मला तुला सांगायला वेळ मिळालाच नाही. अँनिवे बराच झाला तू भेटलास ते...कारण आता काही वेळात मी निघणारच होतो."

"काय म्हणालास..? तू निघणार आहेस.काय गम्मत करत आहेस का माझी?"

" माझ्याकडे बघून वाटते तरी का आकाश.मी तुझ्याशी कधी गम्मत करेन म्हणून."

एव्हाना चेहऱ्यावरचे ते अनाकलनीय भाव बघून त्यालाही माझ्याबद्दल उत्सुकता जाणवली होती.पण शेवटी त्याच्याच आधाराने का होईना मला राहण्यास भाग पडले.मैत्रीचा एक नवा उदाहरण त्यानेच जागृत केलं होतं.एकमेकांसोबत घरादारांशी सज्ज असणं,वेळोवेळी भेटीगाठीला तडफडणे याला तो कधीच भाव देत नव्हता.मित्र कसा आहे? त्याच्या असण्यातही तो संकटग्रस्त तर नाही.अशा बऱ्याच पद्धतीने तो बघायचा.गरजेला प्रत्येक मित्राचा पाठींबा असते.पण या मित्राचा नेहमी पुढाकारच होता.ज्याने सुरुवात केली होती माझ्यासोबत, शेवटी त्यालाच मी कसा काय विसरलो होतो? कळतच नव्हते.हा तोच मित्र आहे ज्याने पहिल्यांदा मला नागभिड मध्ये बोलावणे केले होते.ज्याने विदर्भातली माया मला लावली होती.वडीलांसारखा मला न्यायला बसस्टॉपवर आला होता.तोच तो आकाश.

मला वाटते नागभिडवरून घरी जाईपर्यंत तरी आकाशसोबत मी काहीच बोललो नसेल.आणि हे सुद्धा कदाचित तो जाणून असेल.त्यामुळे शक्यतोच तो मला हाक मारायचा.त्या दिवशी नेहमीसारखाच जेवण झाल्यावर आम्ही फिरायला निघालो.हॉटेलमध्ये पान घेतला आणि थुंकत थुंकत मधल्या गल्लीने शिवमंदिराकडे आलो.रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायत तर्फे दिलेले काही बाक होते.त्यावर जाऊन बसलो.मला इथे एकांतात आणण्याचे कारण मी सगळं जाणून होतो.त्यामुळे आकाशच्याच बोलण्याची वाट बघत होतो.शेवटी त्यानेच सुरुवात केली.

"ऐक पवन...कृपया रागाला येऊ नकोस...पण मला तुझ्यात फार बदल जाणवतो आहे पवन..."

"असं काही नाही आकाश...तू उगाच माझ्यावर संशय करतो आहेस."

"मी कधीच संशय करीत नाही पवन,तथ्यानुरुप बोलतो.आणि माझे तथ्य कधी खोटे होत नाही.तू नेहमी स्वतः फोन करून मला खुशहाली कळवत असायचास.तासनतास मोबाईलवर सगळी सुखदुःख रिती करत असायचास.पण जेव्हापासून तू मला भेटून गेला आहेस, तेव्हापासून एकदाही तुझं कॉल मला आलं नाही.तुला मनमोकळेपणाने हसताना सुद्धा बघितले नाही. असं काय आहे? जे तू माझ्यासोबत लपवत आहेस पवन."

"अरे असं काही नाही आकाश...तू उगाच आपलं काहीही नको समजू...इतक्यात जरा कामाचं डिप्रेशन होतं त्यामुळे मी तुला वेळ देऊ शकलो नाही.बस इतकेच."

"माझ्या नजरेला नजर देऊन सांग पवन.हे सगळं खरं आहे.कारण खरं बोलताना नजर कधीच लपत नाही.हे बघ जर का तू मला एक जिवलग मित्र मानत असशील तरच सांगशील.अन्यथा मी फोर्स करणार नाही.याउलट कधी विचारणार देखील नाही."

"काही वेळ शांतता होतीच.पण माझी नजर त्याच्या नजरेचा प्रतिकार सहन करत नव्हती.शेवटी ती मैत्री होती.पण झालेल्या गोष्टी नाकारता येत नव्हत्या.त्यामुळे डोळे केव्हा पाणावले काही कळलंच नाही.आणि त्यातच आकाशाचा मायेचा हात माझ्या खांद्यावर पडला...अत्यंत मृदू स्वरात तो म्हणाला..."

"काय झालं पवन...मलाही नाही सांगणार...या मैत्रीला इतकं कमजोर समजतोस तू?"

"तीच तर भीती आहे आकाश.मित्र मैत्रीचे उदाहरण प्रात्यक्षिक करून निघून जातात.आणि मी मात्र काहीच करू शकत नाही.मला परत कुण्या मित्राला नाही गमवायचं आकाश.जिवंत चार उदाहरण अजूनही डोळ्यासमोर आहेत.त्यात पुन्हा एक भर...नको रे बाबा..."

" मित्र जीव देण्याइतपत जर खरा असेल ना तर मीच काय? कुणीही देईल पवन.आणि जे घडतं ते सगळं घडण्यासाठी घडत असतं,त्यात आपण काहीच अडवणूक करू शकत नाही.त्यामुळे तू आधी शांत हो...आणि सगळं मला सांग."

" परत एकदा आकाशला मी पंढरपूरपासून ते पेरजागडचा आजपर्यंतचा प्रवास कथन केला.त्यांच्यासारखेच इतर मित्रांनी मैत्रीसाठी कसं जीव दिलाय हे पण सांगितले.आणि अजून तरी मला पुन्हा काय करायचे आहे हे पण सांगितले.हे सगळं ऐकून झाल्यावर आकाश अवाकच झाला.आणि म्हणाला..."

"आता तुला साथ द्यायची जबाबदारी माझी पवन.इतरांनी दिलेल्या उदाहरणात मग मीच कशाला मागे राहू पवन.मग ठरलं तर...तुझ्या पावलासोबत एक पाऊल आता माझा पण असेल."

आधी आढेवेढे घेत मी त्याला होकार दिला.आणि दोघेही मग घराकडे परतलो.शिवाय आज झालेल्या प्रवासामुळे बऱ्याच प्रमाणात थकवापण अंगात जाणवू लागला होता.त्यामुळे निद्राधीन व्हायला आज अधिक वेळ लागला नव्हता.

सकाळची ट्रॅव्हल्स पकडुन शहराकडे रवाना झालो. खरंतर त्याही दिवशी आकाश मागे लागलाच होता पण पुढच्या तयारीसाठी मला अजून सावध व्हायला' वेळेची कमतरता नको हे सगळं तो जाणून होता.पण त्याने असं एकटं त्याला न सोडून जाण्याचे वचनही मागून घेतले होते.आयुष्यात पैसा,प्रसिद्धी मी जरी कमावलो नसेल तरी जीवाला जीव देणारे मित्र मात्र भरपूर कमवले.आता फक्त वाट होती त्या नवीन प्रवासाची.