२५. पवन चकव्याच्या तावडीत....
मला त्या गडाबद्दल समजून घेण्यासाठी एक एकांत हवा होता.आणि इतक्या येरझारा घालून मी बऱ्यापैकी माहिती गोळा केली होती.घरी परतताना काकाने काही दिवस राहण्याची खूप विनंती केली होती.पण मी लवकरच परतणार म्हणून असं समाधानपूर्वक त्यांना सांगितलं होतं.त्यासाठी त्यांचे दोन ते तीन वेळा कॉल येऊन गेले होते. तितक्यात बहिणींचा लागलेला जिव्हाळा ,काकुंचे मायाळू प्रेम आणि असं बरंच काही होतं.जे मला कधीच परकं वाटत नव्हतं.अगदी आपल्यात घेतल्या प्रमाणे वाटत होतं.
दिवसेंदिवस एक माह चालला गेला होता.पण अजूनही मी तिथेच होतो.मृत्यूचे काहीच रहस्य माझ्या हातात आलं नव्हतं.मनामध्ये एक प्रकारचं संताप उसळ्या मारू बघत होतं.उगाच रिकाम्या खोलीत येरझारा टाकून मन कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करीत होतो.शेवटी काय चुकलं? कुठे कमी पडलो? अशी बरीच विधाने माझ्या मस्तकात धुमाकूळ करू लागली होती.शेवटी त्रासून मी बिछान्यावर आडवा झालो.
सध्यातरी मोबाईलच्या मॅपमध्ये की यूट्यूबमध्ये अशा बऱ्याच सोशल मीडियावर पेरजागड हा इव्हेंटप्रकारे सेव्ह झाला होता.अचानक मोबाईलवर यूट्युबची एक डिस्कवरी चॅनेलची नोटीफिकेशन आली.मी ती ओपन केली.एक वाघ रानम्हैसीच्या कळपांच्या मागे मागे धावत होता.जवळपास दहा मिनिटे ही आक्रमक झुंज चालू होती.ज्यात कधी वाघ रानम्हैसच्या मागे लागायचा,तर कधी रानम्हैस वाघाच्या मागे लागायची.मी पुन्हा उत्साहाने ती झुंज बघत होतो.कारण त्यामुळे कदाचित माझ्याही डोक्यात एक विचार डोकावून गेला होता.
बऱ्याचदा आपण बघतो.युद्ध कधीही बरोबरीने किंवा बरोबरीचा असावा लागतो.पण हा युद्ध स्वतःला जगविण्यासाठी होता.त्यामुळे दोन्ही हिंस्त्र प्राणी अगदी जीव पणास लावून खेळत होते.आणि युद्धात जिंकणे हे सगळ्यात महत्वाचे असते.मग युद्ध जिंकण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही.जेव्हा वाघाला वाटले की आपण समोरून युद्ध जिंकू शकत नाही.तेव्हा त्याने मागाहून हल्ला केला आणि रानम्हैसला जखमी केले.घायाळ झालेली म्हैस रक्तबंबाळ झाली आणि वाघाचे खाद्य झाली.यातून इतकंच कळतं की लक्ष्य गाठण्यासाठी भक्ष्याची कमजोर बाजू बघणे हे आवश्यकतेचे आहे.
पेरजागड चंद्रपूर,चिमूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यांमध्ये बसला आहे.ज्यामध्ये डोंगररांग आणि सपाटीचे मैदान आहेत.तेव्हा कुठे ना कुठे याची कमजोर बाजू असायलाच हवी असा माझा अंदाज होता.एकट्याची सुरुवात असल्यामुळे मी नागभिडच्या शिव टेंपल पासून सुरुवात करण्याचे ठरवले होते.जेणेकरून घोडाझरी तलावाच्या काठाकाठाने भावाची डोंगरी जिथे संपते तिथपर्यंत जाता येईल.असा माझा विचार झाला.
त्या वेळी केलेला तो माझा पहिला प्रयत्न होता,आणि अगदी घाईत घेतलेला निर्णय होता.कारण ती पावसाळ्याची वेळ होती.संपूर्ण जंगलाने हिरवा शालू अंगावर चढवला होता.जागोजागी पेट घेऊन उघडाबोडखा झालेला रान परत एकदा हिरवागार झाला होता.आणि पावसाळयाच्या त्या मौसमाने पायथ्याशी कित्येक झऱ्यांचा उगम दिसत होता.अगदी पायवाट सुद्धा हिरवाईने नटली होती. जवळपास कुणी असेल तरी झुडूपांमुळे दिसत नव्हते.
त्या वेळेस सुरुवात कुठूनतरी करायची आहे, या बहाण्याने मी एकटाच तयारीला लागलो. नागभिडच्या शिव टेंपलपर्यंतचा प्रवास कित्येकांच्या सहवासात होता.त्यामुळे एकटेपणाची जाणीवच कधी भासली नाही. थोडं फार मन बेचैन जरूर झालं होतं.ज्यामुळे बसमधूनसुद्धा वारंवार डोंगराकडे बघण्याचा प्रयत्न करत होतो.वारंवार मॅप ओपन करून त्यात काही बघण्याचा प्रयत्न करत होतो.
सरतेशेवटी मनाचा मनोरा खंबीर करत शिवटेंपलच्या पायथ्यापासी आलो.हिरवळीने नटलेले ते शिव टेंपल अगदीच प्रेक्षणीय वाटत होतं.वातावरणाच्या सफाईने सगळं काही शिखरापर्यंत अगदीच स्वच्छ दिसत होतं.आणि त्यातच दिसत होती डोंगरावर असलेली शिवशंकराची एक भव्य प्रतिमा.मध्येच सूर्याने पांघरलेली ढगांची शाल थोडीशी का होईना सैल सोडली आणि काही किरण त्या शिव प्रतिमेवर पडले.त्या प्रकाशकिरणाने प्रतिमा अगदी लख्खपणे दिसत होती.
मी हे सगळं पायथ्याशी राहून बघत होतो.एकदा वाटलं की, जावं प्रतिमसमोर.पण प्रवास लांबचा असल्यामुळे मी ते अव्हेरलं.पायथ्याशी राहूनच दोन्ही हातांनी मी शिवाला नतमस्तक झालो, आणि स्वार्थाचा एकही शब्द मुखावर न आणता मी वाट पकडली.
पावसाचं पाणी वसुधेचं अमृत असतं. कारण जेव्हा जेव्हा ते वसुधेला मिळतं.तेव्हा तेव्हा तिचा परत एकदा पुनर्जन्म होतो.ती सावरते,बहरते. लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत नवचैतन्य बहाल करते.एक नवा वेश,एक नवं रूप धारण करते.सगळे जखम,सगळ्या वेदना,सगळे वैर विसरून परत एकदा आनंद साजरा करते.
पायाशी बरीच भूतगांज्याची (पावसाळ्यात चढ उतारावर असणारी वनस्पती,गावकरी मधाचे छत उतरवायला ज्याचा वापर करतात.) रोपे येत होती.उन्हाने पिवळटलेला गवत पावसामुळे हिरवागार होऊन जमिनीला बिलगून बसला होता. पायवाटेला डांबून ठेवले होते त्यामुळे कसेबसे वाट काढत मी जंगलात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागलो.
जवळपास पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीत मी शिवटेंपलच्या मागील बाजूस उभा होतो.अगदी शांततेत. नागभिड सारख्या गजबजलेल्या शहराच्या पलिकडे ही शांतता असेल असे मी गृहीत धरले नव्हते.आजूबाजूला अगदी कुणीच नव्हते.आजूबाजूच्या गावातील बरेचसे मेंढपाळ तिथे शेळ्यामेंढया चरायला नेतात, ज्यामुळे अगदी सगळीकडे पायवाट रमलेली होती.अचानक पलिकडे असलेल्या झाडींमध्ये काही हालचाल मला आढळली.
थोडी भीती मनात साठलीच होती, पण तरीही मोजक्या पावलांनी दुरून दुरून मी ती हालचाल टिपण्याचा प्रयत्न करत होतो.पायथ्याशी बऱ्याच जागून पाण्यांच्या झऱ्यांचा उगम होत होता. ज्याच्यापाशी काही हरणे खेळकुद करत होती.मी मोबाईलवर त्यांची चित्रफीत काढणार इतक्यात व्हॉट्सॲपच्या मेसेजची टोन वाजली, आणि त्या आवाजाने सगळी हरणे जंगलाच्या आत पळून गेली. मी मोबाईल सायलेंट न करण्याचा पश्चाताप करीत परत तिथे आलो.जिथून मला वाट पकडायची होती.
आपण मॅप बघताना मॅपमध्ये पाहिजे तिथे बघू शकतो वा जाऊ शकतो,पण प्रत्यक्ष त्या जागेवर आल्यावर बऱ्याचदा कुठून जायचे व कसे जायचे? हा प्रश्न छळत असतो.रस्त्यांशी वादविवाद करत असताना जंगलातून एक इसम काही फांद्यांचं ओझं खांद्यावरून आणत असताना दिसले.( बहुतेक ते शेळ्यांचे खाद्य असावे.)त्यामुळे मी त्याच रस्त्याने जावं असं गृहीत धरलं.शिवाय शिव टेंपलवरून आपल्याला तो तलाव बघता येतं त्यामुळे तो जवळच असेल यातही काही शंका नव्हती.
पायवाटेने मी जसजसं चालण्यास सुरुवात केली. तसतसं अगदी पायवाट निर्मनुष्य होत जात होती.कधी सांबराचे खूर पायवाटेवरच्या चिखलात रुतलेले असायचे,तर कधी वाघाचे पंजे असायचे.या वेळेस कधी पानांची सळसळ नव्हती तर नव्हता पिंजलेल्या काटक्यांचा आवाज,अधूनमधून बारीकसारीक रिमझिम पाण्याचा वर्षाव होता,तर कधी थंड हवेचे झोके.मध्येच रानडूकराने विखुरलेले वासते( कोवळा बांबू) तर ढोरकांदे ( रानटी कांदा) पायवाटेवर असायचे.वाटेत काही जागा अतिशय घसरणीची होती.त्यामुळे हळू चालावं म्हटलं तरी पायातील चप्पलचा पिच पिच असा आवाज व्हायचा.
गोंगाटाच्या आणि शांततेच्या मध्यंतर फक्त शिवटेंपलचा डोंगर आडवा होता आणि बाजूला फक्त जंगल.काही अंतरापर्यंत त्या शिवप्रतिमेने स्वतःचं रूप दाखवलं होतं पण इतक्यात माघारी होऊन ती प्रतिमाही दिसेनाशी झाली होती.उलट तो डोंगरसुद्धा दूर दूर होत झाडांमध्ये लपल्यासारखा झाला होता.काही विरळ जागेंतून माथ्यावरील दगडे मात्र दिसायची.
जवळपास एखाद किलोमीटर चाललो असेन.काहीतरी ओळखीची जागा वाटली. समोरचा परिसर बघून क्षणभर वाटेवरच थांबलो.क्षणभर विचारांच्या अंती कळलं की काही दिवसाअगोदर व्हॉट्सॲपच्या माध्यमाने एक व्हिडिओ आला होता.ज्यात एका पट्टेदार वाघाला बरीच इसमे जमा होऊन मारहाण करीत होती.कारण तो व्हिडिओ तिथे मारहाण करीत असलेल्या घोळक्यातूनच एकाने काढलं होतं.तेच विरळ पण अर्धवट जंगल डोळ्याच्या समोर होतं.कारण कित्येकदा मी विचार करत होतो की नागभिडच्या कोणत्या ठिकाणचं हे व्हिडिओ असेल.आज पहिल्यांदा या बाजूला आल्यावर मला हे दिसून आलं.
हलक्या हलक्या पावसाची रिपरिप कानाशी गुंजतच होती.त्यामुळे कुणा पाखरांची कुजबुज नव्हती,तर कोणतं फुलपाखरू नव्हतं.काही वेळाने जंगल उभाट होऊ लागलं आणि पायवाटही अगदीच निरुंद झाली.कधी झुडूपातून तर कधी डेरेदार झाडांच्या खालून.पण घोडाझरी तलावाचा काही पत्ताच लागेना.बरेच चालल्यासारखे वाटत होते.त्यामुळे आपण रस्ता चुकलो की काय? ही भीती सारखी मनात दाटत होती.जनावरांचे ताजे ओले ठसे पायवाटेवर अगदी स्पष्ट दिसून येत होते.
कुणाला विचारावं म्हटलं तर जवळपास मी दोन किलोमीटर त्या जंगलामधून पायी प्रवास केला असेन.आणि त्या दोन किलोमीटरच्या प्रवासात एकही माणसाची मला भेट झाली नव्हती.मी एक एक पाऊल समोर तर वळवत होतोच पण त्या पाऊलात फक्त साहस किंवा जिज्ञासा उरलेली नव्हती.आता त्यात भीती पण दडलेली होती. संघर्षच नव्हता राहिला तर आता त्यात थरकाप दडलेला होता.आणि जगाचं नियम आहे भीतीने ग्रस्त झालेला माणूस फक्त अर्ध्या प्रयत्नाने पराभूत होतो.कारण ही भीतीच त्याला अर्ध्याहून जास्त पराभूत केलेली असते.
आणि मला वाटते त्या माझ्या पहिल्या प्रयत्नात त्याच भीतीने माझा घात केलेला असेल.मी जसजसं समोर जात होतो.पायवाट तितकीच मला दूर वाटत होती.दुपारचे बारा वाजून गेले तरी मी अर्धा टप्पा पार केला नव्हता त्यामुळे मी कुठेतरी कमी पडत आहे याची मला सारखी जाणीव व्हायला लागली होती.पण एक स्वर कानावर पडायला लागले होते.
गावखेड्यात कसं असतं? लग्न म्हटलं की सनई चौघड्याचे स्वर कानावर येतात.पूर्वीसारखं जरी आत्ता काही राहिलं नाही तरी बऱ्याच जुन्या रिती,परंपरा आजतागायत आहेत.त्यामुळे पूर्वीचे कलाकार जरी नामशेष झाले असले तरी त्यांचे स्वर मात्र प्रत्येक लग्नमंडपात ऐकायला मिळतात.
अगदी तसेच स्वर कानावर येत होते.सुरुवातीला ते स्वर अगदी बारीक बारीक कानामध्ये गुंजत होते.पण जेव्हा पूर्ण लक्ष मी त्या आवाजावर केंद्रित केले तेव्हा अगदीच स्पष्टपणे ऐकू येत होते.आणि ते पण इतक्या जवळ असल्यासारखे वाटत होते की जणू तासाभरात आपण तिथे जाऊन पोहोचतो की काय?ते स्वर,तो वाजा गाजा अगदीच स्पष्टपणे कानामध्ये शिरत होता.
पावसाची रिपरिप चालू होती.पण समोर मात्र पाय जात नव्हते. इतकं अंतर आपण चालून आल्यावरही आपल्याला तलावाचा लवलेशही दिसत नाही.याचा अर्थ आपण नक्कीच रस्ता चुकलोय.आणि जवळपास कोणत्यातरी गावाजवळ येऊन पोहोचलोय. असं वाटत होतं.पण एक विचार हाही मनात घर करुनच होता, की येणारा स्वर हा नक्की हा लग्नसराईचा आहे.पण गावखेड्यात लग्न म्हटलं की ते उन्हाळ्यात किंवा दिवाळीत असतात.आणि आता तर पावसाळा आहे. या पावसाळ्यात इतका लवाजमा असण्याची आवश्यकताच काय?
घोडाझरी तलावाच्या दिशेने जावं म्हटलं तर पाय वळतच नव्हते.राहून राहून सारखं मन त्या आवाजाकडे जाण्यास मग्न पाडत होते.आता तर तो आवाज त्या जंगलातही रमायला जायला लागला होता.आणि सारखं त्या आवाजामुळे मला वाटायला लागलं होतं की नक्की आपण रस्ता चुकलोय.
जंगलाच्या जवळपास कसारला हे एक गाव होतं तर त्याच जंगलाच्या आत कोरंबी हे अजून गाव होते. या दोन गावापैकी आपण नक्की कोणत्या गावापाशी वाट चुकून पोहोचलो आहोत हे मला जाणून घ्यायचं होतं.त्यामुळे मी आवाजाच्या दिशेने जायचं ठरवलं.
पायवाटेकडे जायचा रोख त्या आवाजाकडे केला.समोरच डोळ्यांना एक छोटीशी पाऊलवाट दिसली.जी जंगलाच्या आतमध्ये त्या आवाजाकडे जाताना दिसली.मी ती वाट पकडली.आणि त्या वाटेने जाऊ लागलो.उगाच त्या जंगलात भटकण्यापेक्षा कुण्या गावात गेलेलं तरी बरं असं वाटू लागलं. जसं जसं मी त्या आवाजाच्या दिशेने जात होतो.मनात एक समाधान आल्यासारखं जाणवत होतं की आपण कुण्या गावाशेजारी जात आहोत म्हणून.
पण काही वेळानंतर मला अजून वेगळंच काही भासायला लागलं. गेलं तासभर तरी मी चालत होतो.पण ती पायवाटसुद्धा संपत नव्हती आणि तो आवाजही.त्या आवाजातसुद्धा कसलाच फरक जाणवत नव्हता.मी क्षणभर थांबलो आणि एक छोटासा सुस्कारा देत सभोवार बघितलं.मी जशी नजर आजूबाजूला पसरवली.मला एक धक्काच बसला.
जेव्हापासून मी ही वाट पकडली होती.शिवाय वाटेच्या मी सभोवार बघितलेच नव्हते.आणि जेव्हा सभोवार बघितले तर माझी भीती आणखीच वाढली.ज्या वाटेवर मी उभा होतो ती एकच वाट तिथे नव्हती.जिकडे लक्ष जाईल तिकडे त्या वाटा विखुरलेल्या होत्या.गेलं तासभर मी कोणत्या वाटेनं चालत आलोय हे सुद्धा मला नीटसं सांगता येत नव्हतं.कारण येताना मी कोणत्याच झाडावर खुण केली नव्हती.झाडांकडे बघुनसद्धा एक विचित्र अनुभूती जाणवली.तिथे असलेला प्रत्येक झाड हा सरळ होता.मग तो बेहडा असो की आवडा,चार असो की धावडा.नजरेत येणारा कोणताच झाड वाकड्या स्वरूपाचा दिसत नव्हता.
मी कुठे आलोय?ही कोणती जागा आहे? प्रश्न सतावू लागले.मोबाईल काढला तर उतरतीचे दीड वाजले होते.मी घाईघाईने मोबाईलचं मॅप ओपन केला.पण लोकेशन काही दिसतच नव्हते.सारखं सारखं जागा बदलवत होते. नेमकं मी कोणत्या ठिकाणी अडकलो आहे.ती मूळ जागा मॅप दाखवायला तयारच नव्हता.मी वारंवार प्रयत्न करता होतो.आणि अचानक मोबाईलमध्ये गुंतलेलं असताना समोर काही हालचाल व्हायला लागली.
त्या गोंधळलेल्या परिस्थितीत भीती अनावर झालेली होती.ज्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत मी आजचा प्रवास निवडला होता.तोच प्रवास असं अर्धवट सोडून परतण्यासाठी बघत होतो.समोरच्या झाडावर बघितलं तर काहीच नव्हतं पण कुणीतरी त्याला गदागदा हलवण्याप्रमाणे हलवतोय असं वाटत होतं आणि एक विचित्र गुरगुरण्याचा आवाज कानाशी येत होता.आतापर्यंत येत असलेले स्वर पाण्याच्या सरीसोबत केव्हाच थांबले होते.
मी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होतो.जिकडे जावं तिकडे पायवाटा दिसत होत्या.उंचच उंच आणि सरळ वृक्षांची वृक्षवल्ली दिसत होती.पावसामुळे बऱ्याच जागी अडखडून पडता पडता सावरलो होतो.बऱ्याचदा असं वाटून यायचं की एखादं सावट माझ्या अंगावर येऊ पाहते आहे,कारण जसं जसं मी पळत होतो तसेच एखाद्या वानरासारखे या झाडावरून त्या झाडावर उडी मारल्याचा सारखा सारखा भास होत होता. न जाणे कितीवेळ मी असा जंगलात हुंडळत होतो,माहित नाही.पण धावू धावू त्या भर थंड मौसमातही तहान अगदी कासावीस झाली होती.आणि इतक्यात ते भासही फार मागे गेल्यासारखे वाटत होते.
त्यामुळे जरा उसासा टाकत एका मोहाच्या झाडाखाली बसलो. बॅग मधून पाण्याची बॉटल काढली.आणि तोंडाला लावली.हळूहळू धापापलेला छाता शांत होऊ लागला.अंगात एकप्रकारची नवी तरारी आली होती.चारी बाजूला जंगल दाटलेला होता पण आता मात्र पायवाटा दिसत नव्हत्या.आणि सरळ झाडे पण दिसत नव्हते,आणि ते लग्न सराईचे स्वरसुद्धा केव्हाच बंद झाले होते.फक्त समोर होतं..चारही बाजूने दाटलेले ते जंगल, आणि त्यात जंगली जनावरांसाठी सापडलेला आयता सावज मी!मी इथे का आलो असेन? कसा आलो असेन?आता जायचं तरी नेमकं कोणत्या दिशेने? काहीच कळत नव्हते.
वेळ जात होती कापरासारखी,मी मात्र चारी दिशेला न्याहाळत होतो आणि पावसाळी दिवसात पाहिजे तेव्हढा सूर्यप्रकाश विखरत नाही.कारण तेव्हा फक्त मेघांचं राज्य असतं.त्यामुळे आभाळ जेव्हा दाटून येते तेव्हा भर दुपारीही काळोखाचा भास देऊन जाते.आणि हे तर जंगल आहे.इथे काही वेळा जमिनीपर्यंत सूर्यप्रकाशसुद्धा पोहचत नाही.