पेरजागढ- एक रहस्य.... - २८ कार्तिक हजारे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पेरजागढ- एक रहस्य.... - २८

२८.भ्रमंती....


मी आकाशच्या मागोमाग जाऊ लागलो.जसजशी गुंफेची पायरी चढत होतो. आतमधला गर्द अंधार पुसट पुसट डोळ्यात साठवू लागला.कसं आहे?आपण जेव्हा उजेडात असतो ना दारातून घरातलं सगळं काही अंधारच वाटते.पण आपण जसजसं दाराच्या आत पाऊल टाकतो तेव्हा सगळं काही वेळाने स्पष्ट होत जाते.गुंफेत वावरायला फार कमी जागा होती.अगदी गुंफेच्या तोंडाशी येता एक दाराशी असलेली घंटी समोर होती.आकाशने तिला वाजवताच गुंफेमध्ये बरीच हालचाल चालू झाली.ती हालचाल होती वटवाघळांची.आतमध्ये वटवाघळे कळपाने होते.आणि ते सारखे आतबाहेर येरझारा मारत होते.त्यामुळे कानांशी त्यांचा आवाज, शिवाय त्यांचा समोरून मागाहून येणे जाणे थोडं फार भयानक वाटत होतं.

गुंफेच्या आत जाताच उजव्या बाजूला काही चित्रफीत दिसल्या.आणि काही दगडांच्या मुर्त्या दिसल्या.आकाश माझ्याकडे बघून हसत होता.मी त्याला म्हटलं...

"अरे असं काय हसत आहेस?"

"अरे याच त्या बहिणी!! आंबाई- निंबाई.इथे या जंगलात या गुंफेत त्यांचा वावर होता.त्यांच्याच श्रद्धेने आज इथलं सत्व कायम आहे."

त्यांच्या दगडांत उमटलेल्या छवीकडे बघत मी पुन्हा हात जोडले.

"जर या दोन बहिणी इथे आहेत तर मग सातही बहिणी कुठल्या ना कुठल्या गडावर असतीलच."

"अर्थातच...मला मिळालेल्या माहितीप्रमाणे पूर्वी या सातही बहिणी एकत्र राहायच्या.त्या सात्विक असल्या कारणाने आणि या संपूर्ण पेरजागडाचा परिसर माहित असल्यामुळे त्या केव्हाही आणि कुठेही जायच्या.बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की त्यांचं वास्तव्य सगळ्यात जास्त त्याच गडावर असायचं.म्हणून त्याला सात बहिणीचे नाव देण्यात आलं.पण नंतर प्रत्येक बहिणीस वाटू लागलं की आपला स्वतंत्र घर हवाय.त्यांच्यात ज्येष्ठ असलेल्या बहिणींशी तशी त्यांनी सांगड घातली.आणि तसेपण वाढत्या माणसाच्या वास्तव्याने त्या बऱ्याच जणांच्या चर्चेत पण येत होत्या.आणि त्यांना परत माणसांत जायचे नव्हते.प्रचंड वाद त्या दिवशी बहिणींच्या आपापसात झाला.आणि प्रत्येकी आपापल्या वाटेनी निघून गेल्या.त्यातल्या आंबाई निंबाई या सगळ्यात लहान बहिणी होत्या.त्यांच्या इथल्या वास्तव्याने या गडाला त्यांचंच नाव देण्यात आलं.पण काही बहिणींचा निवास व वास्तव्य अजूनही सापडलेले नाही.त्यातील फक्त एक मुक्ताई सोडून."

"म्हणजे तुला त्या सगळ्या बहिणींची नावे पण माहीत असतील ना."

"हो ना...१. आंबाई २. निंबाई ३.उमाई ४.गौराई ५.मुक्ताई ६. पवराई ७.भिवराई...अशा या सात बहिणी आहेत.पण सांगितल्याप्रमाणे इतर बहिणींचा वास कुठे आहे हे अजूनही ज्ञात नाही."

"असं काय? बरं अजून काय बघायचे आहे?"

अरे विषयात ओघळता मूळ मुद्दाच विसरलो आपण.या गुंफेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.या गुंफेच्या तळाशी एक पाण्याचा जलस्त्रोत आहे.तो कधीही आटत नाही वा कधीच कमी होत नाही.अगदी बारमाही असतो.बरेचसे श्रद्धाळू त्या पाण्याचा वापर श्रद्धानुरुप करतात.उन्हाळ्यात ज्या जनावरांना ते जलस्त्रोत माहित असते ते बरेच जनावरे या गुंफेत येतात.चल तुला दाखवतो.

मी आकाशच्या मागोमाग जाऊ लागलो.समोर अतिशय निरुंद गुंफा होत गेली होती.आणि शिवाय काळोखही वाढू लागला होता. चमगादडांचा आवाज सारखा सारखा येत होता.कारण आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात त्यांचा पेहराव होता.आम्ही जसजसे आत जात होतो.तसतशी ती उडून आत जात होती.आणि सारखं गुंफेच्या आत बाहेर भरारी मारत होती.बऱ्याच प्रमाणात त्यांची विष्ठा गुंफेत इतस्ततः पसरली होती.ज्यामुळे त्या गुंफेला असे भयाण रूप मिळत होते.

जवळपास पाच ते सात मीटर आत गेल्यावर एक छोटासा द्वार दिसला.जिथून पुढे पाणी असण्याची दाट शक्यता होती.आमचा दोघांचा वावर तिथे अशक्य होता.त्यामुळे आकाश माघारी वळला.आणि मोबाईलची टॉर्च माझ्याकडे देत मला सामोरी जायला सांगितले.

टॉर्चला सामोरी करत मी त्या द्वाराच्या आत प्रवेश केला.समोर असं काहीच दिसत नव्हतं.त्यामुळे मी टॉर्च खाली फिरविली.तळाशी पांढरट असं स्वच्छ पाणी दिसत होतं. गुंफेच्या ते इतक्या आत असूनही बऱ्याच तळाशी होतं.ज्यामुळे ते पाणी घ्यायला बरंच वाकावे लागायचे.पण ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं.कारण चमगादडांच्या वास्तव्याने त्यांच्या विष्ठेची घाण तिथे असते.

आकाश म्हणाला...हे एक श्रद्धास्थान आहे पवन. इथलं पाणी बरेच श्रद्धिक लोक तीर्थरूपी म्हणून वापरतात.या गडाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे पवन.सुरुवातीला ऐकून मीपण थोडा खचलो होतो पण जे नैसर्गिक आहे.त्याला आपण बदलू शकत नाही.म्हणून मी गप्प बसलो.हळूहळू मी मग गुंफेच्या बाहेर आकाशच्या मागोमाग उतरू लागलो.

गुंफेतून उतरल्यावर उजव्या बाजूलाच एक अरुंदशी पाऊलवाट होती.जी जंगलाच्या आतमधुन उंच डोंगरावर जात होती.रस्त्यावर सागवानाचे उंचच इंच वृक्ष फुलांनी बहरलेले होते. थोडं अंतर पार केल्यावर दगडांच्या कप्प्या दिसू लागल्या.जिथे एका दगडावर आकाश उभा राहून कोपऱ्यात बोट दाखवत होता.

एक साप हळूहळू त्या दगडांमध्ये आत जात होता.ज्याच्या शेपटीकडील काही भाग थोडा थोडा दिसत होता.काही वेळाने तो साप दिसेनासा झाला.त्याच्या शेपटीकडील भाग जेव्हा इतका मोठा होता तर तो असेल किती मोठा? मी एक प्रश्नार्थक मुद्रा आकाशकडे केली.माझे भाव त्याला कळले आणि तो सांगू लागला की ...ती एक "चिटिण" आहे.( चिटिण म्हणजे अजगर.विदर्भात अजगरासाठी प्रचलित असलेला शब्द.)

फार वर्षापूर्वी इथे एक गुंफा होती.ज्यात एक विशालकाय भुजंग राहायचा.ज्याला गावकरी "चिटिण" म्हणायचे.आणि ती गुंफा चिटिण गुंफा म्हणून ओळखली जायची.तो विशालकाय भुजंग फार कमी लोकांनी बघितलं आहे.जे आतापर्यंत हयातही नसतील.काही लोक हिम्मत करून त्या गुंफेच्या बऱ्याच आत पण जायचे.यात कुणाच्या जीवाला धोका होऊ नये आणि परत कुणी गुंफेत जाऊ नये, म्हणून ट्रस्टच्या काही सदस्यांनी ही गुंफा काही दगडे टाकून बंद केली.

मी काही वेळ त्या गुंफेकडे बघत राहिलो.त्या गुंफेचे काही छिद्र अजूनही उघडेच होते.काही वेळाने तिथून निघून मग आम्ही गडावर निघालो.सध्या पावसाळी दिवसाचे वाढत्या झुडपांनी कुणी गडावर चढत नाही.त्यामुळे त्या अरुंद पाऊलवाटेला जागोजागी झुडूपांचे अडथळे येत होते.त्या झुडूपांना पार करत आम्ही उंच माथ्यावर आलो.पूर्वीपेक्षा मानवी हस्तक्षेपामुळे जंगल फार तुटक झाले होते.त्यामुळे दूरपर्यंतचा सपाट परिसर डोळ्यांना दिसत होता.आणि इकडे कानपा पर्यंतचा परिसर दिसत होता.डाव्या बाजूला सूर्यप्रकाशामुळे जातेपुर मधील तलाव थोडासा दिसत होता.पण सगळ्यात अप्रतिम वाटत होतं ते पर्वतरांग' कारण हाईवे वरून जाताना कानपा ते नवतळापर्यंत असणारी पर्वतरांग ती सरळ नव्हती.तिचे मध्यंतरी बरेच तुकडे होऊन पडले होते.ज्यामुळे चढ उतार आणि तुटक अशी बरीचशी बाजू होती.शिवाय बऱ्याचशा जागेवरून दरडसुद्धा कोसळली होती.ज्यामुळे कित्येक गुंफाची निर्मिती झाली होती.

डोळ्यांना प्रकृतीचे सुख अनुभवत आम्ही समोर चालत होतो.समोर एका मंदिराचे बांधकाम झाले होते.ज्यात शिवशंकराची स्थापना होती.आणि बाजूलाच लहान आणि मोठे दोन नंदी येऊन बसले होते.ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनीच त्याची निर्मिती केली होती.पुढे एका झाडाखाली शेषनागावर स्थित श्रीविष्णूची पण प्रतिमा उभारली होती.निसर्गाची रचना पण काय छान असते.श्री विष्णूच्या प्रतीमेसमोर एक नागमोडी वृक्ष उभा होता.मुळापासून वर निघून परत जमिनीच्या जवळ येऊन परत आकाशात उंच गेला.त्याची प्रतिमा अगदी एखाद्या नागासारखी वाटत होती.आणि बाजूलाच एक सुरुंग होता.तो नेमका कशाचा होता,माहिती नाही.पण रोजच्या वावराने आजूबाजूला पाऊलवाट जरा स्पष्ट दिसत होती.मग समोर काहीच नाही असं आकाशने म्हणताच मी माघारी वळलो.

इतक्या कडेला या दोन बहिणी येऊन राहू शकतात. असं मला कधीच वाटलं नव्हतं.पण जितके तुकडे या पर्वत रांगेचे होते.त्याच तुकड्यांमध्ये त्यांचे अस्तित्व असू शकते' असा माझा अंदाज होता.त्यामुळे नकळतच मनात विचारांचा ओघळ चघळत मी आणि आकाश पायथ्याशी आलो.

"तू फार उत्तम स्थळ दाखवलंस आकाश! आणि माहिती पण छान दिलीस."

"इट्स मी प्लेझर."(ओठंवर मिश्किल हास्य आणत.)

"अरे बरंच काही असतं सभोवती,पण आपण त्याकडे लक्ष देत नाही हा आपला गुन्हा असतो.जसं वर्षावर्षांनी माणूस बदलतो तसं गडपण बदलतो. माणसासारखंच त्यालाही मन आहे,त्यालाही जीव आहे. त्यांचंही आयुष्य आहे.तुला हाकामारी आठवते का?"

"अरे कोण हाकामारी,मी तर पहिल्यांदाच नाव ऐकतो आहे."

" तू पहिल्यांदा हे नाव ऐकतो आहेस आणि मी जे नाव फार प्रमाणात विसरण्याचा प्रयत्न करतो आहे."

"का बरं असं?"

"अरे माझ्या बुजुर्ग मंडळींचा फार परिचित असलेला प्रदेश आहे हा.त्यांचे बरेच अनुभव अगदी लहान असतानापासून ऐकतो आहे.आता आता कुठे त्या गोष्टी लुप्त व्हायला लागल्या आहेत."

" मला जरा सविस्तर सांगशील काय? काय प्रसंग होते ते?"

सविस्तर असं काहीही नाही रे.आजोबा म्हणायचे की तो एक चेटक प्रकार आहे म्हणून,पूर्वी एक रुपयाच्या मजुरीसाठी बारा गावच्या शिवारांना तुडवावे लागायचं.इथे खैरीचा माणूस असला तरी कोरंबीसारख्या जंगलात जावं लागायचं.त्यावेळेस आजूबाजूच्या बऱ्याच महिला सरपण गोळा करायला जंगलात जायच्या.जंगलात गेल्यावर कसं आहे? वाळलेल्या काटकीसाठी एक एक महिला अंतरा अंतरावर जायची.आपण एकटेच आलो नाही ना या अंतरावर म्हणून मग एकमेकांस हाक मारायच्या.तर अशाच पद्धतीची ती हाकामारी होती.

पूर्वी शासनाची काहीही अंमलबजावणी नव्हती या जंगलावर.ज्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिकारी यायचे.वाघाची सुद्धा हिम्मत होत नसे एखाद्या शेळीला खाण्यासाठी.रस्ते न रस्ते,पायवाटा अशा रमलेल्या असायच्या.पण शेवटी भीती ती भीतीच असायची.अशा वेळेस ही हाकामारी साद द्यायची.तिचा संकेत ज्याला कळाला तोच साक्षीदार,अन्यथा स्वतःचा स्वतःच जिम्मेदार.

तिचा आवाज ऐकणारे आजही बुजुर्ग अस्तित्वात असतील.पण तिला बघितल्याचे मात्र कुणाच्याही अनुभवात नाही.तिचं बोलणं म्हणजे ती बरोबर असल्याचा साद होता. धान कांडलेस का? भाजी रांधली का? फक्त तिचा हा आवाज.काहीजण तिच्या आवाजाला घाबरायचे सुद्धा, म्हणून तिचे नाव बऱ्याच लोकांनी हाकामारी असे ठेवले होते.

"अच्छा...पण या हाकामारीबद्दल आत्ता कळणार कसे? म्हणजे कुणी तिला बघितलं पण नाही म्हणतेस."

"अरे ही त्या काळातील गोष्ट.ती फक्त माझ्या ऐकिवात आहे.म्हणून मी ती विसरण्याचा प्रयत्न करतो आहे.आणि आता सत्वच इतके नाहीसे झाले आहे, तर ती आता कुठे असणार?कारण इतक्यात हाकामारीचा असा कोणताही प्रसंग कानावर आला नाही."

"आयला अजून काय काय दडलंय या जंगलात? काहीच समजत नाही. दर वेळेला वेगळंच काही कानावर येते.आणि दर वेळेला वेगळंच काही डोळ्याला दिसते."

" अरे अवतीभोवती काय आहे? हे जाणायला आयुष्य पुरेसे होऊन जाते.त्यामुळे जे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे तेच ध्यानात घेतले तर चांगले होईल. बरं चल निघुयात नाहीतर आपल्यालाच दिवस पुरेसा उरणार वाटते."

"हो....हा ....हा..."

घाईघाईने मग गड उतरू लागलो.शिवाय मला पण गावाकडे निघायचे असं वाटत होतं.पण आकाश मात्र त्या बाबतीत फार हुशार होता.मी गावाकडे निघणार हे मनोमनीच त्याने जाणले असावे.त्यामुळे माझी अख्खी वेळ त्याने इथेतिथेच घालवून नेली.