देवयानी विकास आणि किल्ली - भाग २ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग २

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

 

भाग  2

भाग 1 वरुन  पुढे वाचा.

 

“हॅलो मी देवयानी बोलते आहे.”

“कोण देवयानी?”

“अहो असं काय करता, किल्लीचा प्रॉब्लेम, आज सकाळीच तुम्ही येऊन मला सोडवलं ना, तीच मी.” – देवयानी 

“अच्छा, तुम्ही होय. मला तुमचं नाव माहीत नव्हतं म्हणून कळलं नाही.” – विकास.  “मी आता मोकळी झाली आहे. येता का आत्ता? आपलं ठरलं होतं संध्याकाळी कॉफी घ्यायचं.” – देवयानी 

“अहो मी मात्र अजूनही कामातच आहे, काय करणार? नोकरी आहे ना. आत्ता जमणार नाही. बरं पण तुमचं इंटरव्ह्यु कसा  झाला?” – विकास.

“एकदम छान झाला. बहुधा ही नोकरी मिळेल असं वाटतंय.”- देवयानी. 

“अरे वा ! मनापासून अभिनंदन.” – विकास. 

“हा आनंद आता तुमच्या शिवाय कोणाबरोबर शेअर करू? इथे तुमच्या शिवाय माझ्या कोणीच ओळखीचं नाहीये. आज माझी मैत्रीण पण नाही गावात. तुम्ही या ना प्लीज.” – देवयानी.

“तुमचं म्हणण बरोबर आहे पण मला आत्ता येणं शक्य नाहीये. तुमचं, पुन्हा एकवार अभिनंदन.” विकास म्हणाला. अजूनही त्याच्या डोक्यात पोलिस इंस्पेक्टरचं वाक्य घोळत होतं.

“ठीक आहे. आता शक्यच नाही म्हणता आहात तर मी काय बोलू? बाय” – देवयानी

“बाय.” – विकास. 

आणि तो पुन्हा दुसऱ्या विजिट वर निघाला, दिवसभराचा व्हिजिट्स चा कोटा पूर्ण झाला. पण आज कुठल्याही कामात त्याचा जीव लागत नव्हता. यंत्रवत काम चालू होतं पण मन मात्र देवयानीच्या भोवतीच घोटाळत होतं. कामं संपल्यावर तो घरी जायला निघाला. रस्त्यात थांबून नेहमीच्या ठिकाणी चहा घ्यायला थांबला. तेवढ्यात फोन वाजला. आता सगळं आटपल्यावर कोणाचा फोन आलाय असा विचार करतच त्यांनी फोन पाहीला अनोळखी नंबर होता. त्याला वाटलं की देवयानीचा असेल म्हणून त्याने लगेच उचलला.

“हॅलो मी इंस्पेक्टर शीतोळे बोलतो आहे.”

“बोला साहेब, काय म्हणता?” – विकास.

“अहो सकाळी जी मुलगी आपल्याला भेटली होती, ती ..” – इंस्पेक्टर साहेब, सांगतच होते, पण मध्येच विकास बोलला.

“तिचं काय?” -विकास.

“ती मुलगी एकदम क्लीन आहे.” – पोलिस इंस्पेक्टर. 

“औँ, पण तुम्हाला तर खूप शंका, कुशंका होत्या.” – विकास.

“हो पण त्या  सर्व क्लियर झाल्या आहेत. मुलगी सरळ मार्गी आणि सज्जन आहे. बेळगावची आहे. इथे इंटरव्ह्युलाच आली होती, आमच्या माणसांनी खात्री करून घेतली. तिची मैत्रिण, जिचा फ्लॅट आहे ती पण बेळगावचीच आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तिच्या बरोबर कॉफी प्यायला जाऊ शकता.” – इंस्पेक्टर. 

“अहो साहेब, सकाळी पण मी तिला कामाचं कारण सांगून कटवलं, आणि आत्ता पण तिचा फोन आला होता की तिचा इंटरव्ह्यु छान गेला आहे आणि तिला हा आनंद माझ्या बरोबर शेअर करायचा आहे म्हणून, पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी तिला सॉरी म्हंटलं. कामच संपलं नाही असं कारण सांगितलं.” – विकास. 

“सॉरी बॉस. माफ करा. पण मग आता जेवायला घेऊन जा.” – इंस्पेक्टर.

“अहो एवढी ओळख नाहीये आमची. आजच तर सकाळी भेटलो आम्ही, आता काय करणार? – विकास.

सॉरी साहेब, पण तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती एवढंच. ठेवतो.” -इंस्पेक्टर.

विकास सॉलिड वैतागला. इंस्पेक्टर साहेबांनी पॉजिटिव माहिती तर दिली पण फार उशिरा. देवयानीला नाही म्हणून सांगितल्यावर. ते तर  सॉरी म्हणून मोकळे झाले, पण आता मात्र विकास चिडला. दिवस भरात एकही काम मना सारखं झालं नाही. आणि वरतून हा भुंगा. क्षण भरासाठी आली आणि दिवस भराचा ताप  देऊन गेली. डोळ्या समोरून तिचा चेहरा  हालत नव्हता. आजवर बऱ्याच  सुंदर मुली, रस्त्यावर, पार्क मध्ये, सिनेमा हॉल मध्ये दिसल्या होत्या, पण आजच्या सारखं कधी मन अडकलं नव्हतं. त्यानी घड्याळात पाहीलं. रात्रीचे आठ वाजले होते. काय करावं, तिला फोन करावा का? त्याचं काही ठरत नव्हतं. शेवटी त्यानी बाइक ला किक मारली आणि जेवण्यासाठी त्याच्या मेस कडे मोर्चा वळवला. पण मध्येच थांबला, गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. पुन्हा थोडा विचार केला आणि धीर करून देवयानीला फोन लावला.

“हॅलो मी विकास बोलतो आहे.”

“कोण विकास? मी ओळखलं नाही.” – देवयानी.

“मी विकास, संध्याकाळी तुम्ही मला फोन केला होता कॉफी साठी.” – विकास.

“अरे, सॉरी तुमचं नावच विचारायचं राहून गेलं, काम संपलं?” – देवयानी.

““हो, म्हणूनच तुम्हाला फोन केला.” – विकास.

“पण आता तर आठ वाजून गेलेत, आता कॉफी साठी उशीर झाला आहे.” -देवयानी  

“नाही, नाही मी फक्त एवढ्याच साठी फोन केला, की तुम्ही दोनदा कॉल केला होता, मग मला असं वाटलं की कॉल बॅक करावा म्हणून.” – विकास.  

“अहो फोन केलात हे छानच झालं, खूप कंटाळा आला होता, नुसतं बसून, बसून. करण्यासारखं काहीच नाहीये.” – देवयानी

“का हो टीव्ही नाहीये का फ्लॅट मध्ये.” – विकास.  

“नाही. आणि मला मोबाइल वर पाहायला आवडत नाही.” – देवयानी.  

“गंमतच आहे. आज काल तर सगळेच मोबाइल ला कवटाळून बसतात. तुम्ही वेगळ्याच दिसता आहात. आश्चर्य आहे.” – विकास.  

“तुम्ही आता कॉफी प्यायला चालले आहात का?” - देवयानी

“नाही मी जेवायला माझ्या मेस मध्ये चाललो होतो. काय करणार? लग्न होई पर्यन्त मेसच आमची अन्नपूर्णा.” – विकास.

“चांगलं असतं का हो मेसचं जेवण?” – देवयानी.

“माहीत नाही पण पर्याय नाही. रोज हॉटेल मध्ये जाऊन मसालेदार खाणं तब्येतीला चांगलं नाही ना. तुम्ही कधी मेस मध्ये जेवला नाहीत का?” – विकास.

“नाही मी आणि माझ्या दोन मैत्रिणी फ्लॅट मध्ये राहतो आणि आळी पाळीने घरीच बनवतो. मेस मधे कधी जेवलो नाही.” – देवयानी.  

“असं! मग या आमच्या मेस मध्ये चव घ्यायला. चवीत बदल होईल आणि तुमचं जनरल नॉलेज पण वाढेल.”- विकास.

“मी येऊ? मेस मध्ये जेवायला? तुमच्या बरोबर? मेस जवळ आहे का?- देवयानी

“तशी जवळच आहे. पण अहो मी गंमत म्हणून म्हणालो. इतकं सिरियसली  घेऊ नका.” – विकास.

“पण काय हरकत आहे? हा ही अनुभव घेऊन पहावा म्हणते मी.” – देवयानी.

आता विकासच्या अंगावर शहारा आला. आजच ओळख झालेल्या आणि ते ही खूप सुरेख, अशा मुलीला घेऊन मेस मध्ये जेवायला जायचं? लोक शिव्या घालतील, आपल्याला मूर्ख, बावळट, काय वाटेल ते म्हणतील.

“छे, हे कसं शक्य आहे ? त्यापेक्षा असं करू आपण, एखाद्या मस्त हॉटेल मध्ये जाऊ.” – विकास.

“नको मेस मध्येच जाऊ.” – देवयानी  

“अहो सगळे लोक हसतील मला त्याचं काय?” – विकास.

“का? काय कारण आहे? लोकांचा काय संबंध आहे?” – देवयानी.

विकास वैतागला. “आता कसं सांगू तुम्हाला?”

“हे सगळं तर ठीक आहे पण आपण जाणार कसे?” – देवयानी.

“मी येतो तुम्हाला घ्यायला. फक्त तुम्ही तयार होऊन खालीच या. आधीच उशीर झाला आहे. पण माझ्या जवळ बाइक आहे, कार नाही.” – विकास.  

“बाइक चालेल, किती वेळ लागेल तुम्हाला यायला?” – देवयानी.

“१० मिनिटं.” – विकास.

“ओके. मी तयारच आहे. तुम्ही लवकर या.”- देवयानी.  

विकास पोचला तेंव्हा ती वाट पहात खालीच उभी होती.

पांढरा शुभ्र अनार कली ड्रेस आणि त्यावर गोल्डन embroidery, तिच्यावर खूपच खुलून दिसत होता. पार्किंग मधल्या लाइट च्या खांबाखालीच ती उभी होती, आणि त्या प्रकाशात विकासला तर ती एखाद्या परी सारखीच वाटली. दोन मिनिटं तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे बघतच राहिला. देवयानीच्या लक्षात, त्याचं टक लावून बघणं आलं आणि तिच्या नकळतच तिने सुद्धा स्वत:वरून नजर फिरवली. आणि मग अतिशय निरागस असा  भाव चेहऱ्यावर आणून  म्हणाली,

“का हो चुकलं का काही? हा ड्रेस नको होता का घालायला?”

विकास गडबडला, “अरे नाही, उलट हा ड्रेस फारच खुलून दिसतो आहे तुमच्या वर.”

“मला वाटलं की एवढं टक लावून बघता आहात, तर काही चुकलं की काय. सगळं ठीक आहे न” – देवयानी.  

“नाही, माझ्या मनात विचार आला की परी, परी म्हणतात ती अशीच दिसत असेल  का, म्हणून बघत होतो.” – विकास नकळत बोलून गेला. आणि मग जीभ चावली.  

“मग कशी दिसते परी?” अजून देवयानीच्या चेहऱ्यावरचा भाबडे पणा कायम.

“परीला कधी मी पाहीलं नाही, परी असते की नाही हे पण माहीत नाही. पण जर  असलीच तर अशीच अगदी तुमच्या सारखीच  दिसत असेल. कन्फर्म.” – विकास.

त्याच्या या वाक्यावर देवयानीने चेहर्‍यावर जो भाबडेपणा धारण केला होता तो केंव्हा गळून पडला हे तिलाच कळलं नाही. तिच्या गालावर गुलाब फुलले आणि झकास लाजली. विकास हे सगळे भाव विभ्रम चकित  नजरेने बघत होता. हे सगळं सिनेमात घडतं पण आपल्या सोबत पण, प्रत्यक्षात अस काही घडेल, याची त्यानी कधीच कल्पना पण केली नव्हती. तो खुळाच झाला आणि एकटक बघतच राहिला.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.