देवयानी विकास आणि किल्ली - भाग ७ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ७

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

भाग ७

भाग ६ वरून  पुढे  वाचा ................

विकासला पण ते पटलं. त्यांनी देवयानीला फोन लावला. तिला काय चर्चा झाली ते सांगितलं. आणि म्हणाला “आता तू आई, बाबांशी बोल आणि ठरवा काय ते. आणि मला सांग. देवयांनीला पण ते पटलं.” ती म्हणाली-

“मी आत्ताच आई बाबांशी बोलते आणि तुला कळवते. ठेवते फोन.”

तासा भराने देवयानीचा फोन  आला.

“बाबा म्हणतात की तुझ्या बाबांशीच बोलतो म्हणून.”

“ओके. मग आता बाबांना देतो.” – विकासने बाबांना फोन दिला.

दोघांच अर्धा तास बोलणं झालं.

“काय झालं बाबा?” विकासने विचारलं.

“दोन्ही कुटुंब पुण्याला भेटणार असं ठरलं आहे. मी सांगितलं की तुम्ही डेट ठरवा. आम्ही येऊ. आमची काही अडचण नाही. ते कळवतो म्हणाले. बाकी माहिती विचारत होते ती दिली. मी पण त्यांना विचारलं. की काय करता  तर ते म्हणाले की ते इन्कम टॅक्स मध्ये आहेत. स्वत:चं बेळगावला घर आहे. धाकटा मुलगा डॉक्टर होतो आहे. शेवटच्या वर्षाला आहे. बरेच नातेवाईक बेळगावलाच आहेत, बाकी मुंबई, पुणे, कोल्हापूरला आहेत. झालं. अजून काय माहिती पाहिजे? आता भेट झाल्यावरच सविस्तर बोलू.” विकासच्या बाबांनी काय बोलणं झालं ते सविस्तर सांगितलं.

रात्री देवयानीचा फोन आला, खूप खुशीत होती. म्हणाली

“विकास, गड जिंकला मी. बाबा म्हणताहेत की माणसं चांगली दिसताहेत. पुढच्याच आठवड्यात भेटू. बाबा उद्याच जाऊन सुट्टी केंव्हा मिळते ते बघणार आहेत. मग कळवतील. उद्या मी पण मुंबई ला जाणार आहे.”

आणि मग त्यानंतर रात्री १२ वाजे पर्यन्त त्यांचं बोलणं चाललं. विकास पण सॉलिड खुष होता. आता सर्व अडसर निघाले होते.

दोन तीन दिवस असेच गेलेत. दोघांच  बोलणं रोजच होत होतं.

चौथ्या दिवशी देवयानी म्हणाली की “बाबांची रजा मंजूर झाली आहे, आणि पुण्याच्या ऐवजी ते लोक नागपूरलाच  येण्याचा प्लॅन करताहेत.”

“हे तर फारच छान झालं. त्या निमित्तानी नागपूरच्या बद्दल जे गैरसमज आहेत, ते तरी निघून जातील. चांगला चार दिवसांचा प्रोग्राम बनवा, म्हणजे सगळीकडे फिरवता येईल. आणि अगोदर कळवशील म्हणजे मला सुट्टी घेऊन जाता येईल. तुला येणं जमणार आहे का?” विकासनी विचारलं.

“प्रयत्न तर करतेच  आहे. पण तुला माहीतच आहे की बॉस खडूस आहे म्हणून. आणि आता तर माझं लग्न ठरतंय म्हंटल्यांवर तर जास्तच  चवताळला आहे.” देवयानी म्हणाली.

“मग?” – विकास

“मग काही नाही. सुट्टी नाही दिली तर सरळ निघून येणार. काय करेल? नोकरी तर सोडलीच आहे. जे होईल ते पाहिल्या जाईल.” – देवयानी 

“ग्रेट. चालू दे. चिंता की कोई बात नही. हम हैं, आपके साथ.” – विकास  

दुसऱ्या दिवशी सकाळीच देवयानीच्या बाबांचा विकासच्या बाबांना फोन आला. आणि पुन्हा सविस्तर बोलणं झालं. ते कार घेऊनच येणार होते. रविवारी पोचतील असं म्हणाले.

“आमच्याच घरी उतरा, घर मोठं आहे काळजी करू नका. सर्व व्यवस्था होऊन जाईल.” विकासचे बाबा, भगवानराव म्हणाले.

“अहो मी आणि माझी बायको, मोठा भाऊ आणि वहिनी, आणि माझा मुलगा आणि पुतण्या असे आम्ही सहा जण आहोत. तुम्हाला अडचण होईल. आम्ही हॉटेल वरच थांबू.” गोविंद राव म्हणजे देवयानीचे बाबा म्हणाले.

“अहो नो प्रॉब्लेम, आमच्या घरात सहा पाहुणे आरामात सामावतील. चिंता करूच नका. जरा वर्‍हाडी पाहुणचाराचा अनुभव तर घेऊन बघा. ठरलं तर मग. नागपूरच्या जवळ आल्यावर फोन करा म्हणजे आम्ही तुमचं वेशीवरच स्वागत करू.”  भगवान रावांचा आग्रह.

“अहो इतकं काही करायची आवश्यकता नाहीये. आम्ही सरळ घरीच येऊ.” गोविंदराव संकोचाने म्हणाले. 

भगवानरावांनी दोन वर्षांपूर्वीच मनीष नगर मधे एक बंगला बांधला होता. खाली प्रशस्त हॉल, किचन, आणि दोन बेड रूम्स, त्या पैकी एकात भगवानराव आणि त्यांची पत्नी. आणि दुसरी गेस्ट रूम. वरच्या मजल्यावर चार बेडरूम्स होत्या. विकासच्या मोठ्या भावाची एक रूम, बहीणींसाठी एक , आणि एक दोन गेस्ट रूम. साधारण दिवाळीच्या वेळेस पूर्ण घर भरून जायचं.

घर इतकं मोठं असल्याने सहा पाहुणे आले तर कसं करायचं हा प्रश्न नव्हता. अजून तीन चार दिवस होते तेवढ्या वेळात घर ठीक ठाक करा असं सगळ्यांना सांगून ते दुकानात निघून गेले.

संध्याकाळी ऑफिस मधून  आल्यावर देवयानीनी घरी फोन केला. बाबांनी सांगितलं की “ते लोक शनिवारी सकाळी काकांच्या इनोवा ने निघणार आहेत. रविवारी पोचतील त्या हिशोबानी तू पोहोच.”

“ओके मी शनिवार च्या फ्लाइट चं बूकिंग करते.” – देवयानी 

“अग, आम्ही शनिवारी निघून रविवारी पोचणार आहोत. तू शनिवारी जाऊन काय करतेस? तू पण रविवारीच  निघ.” गोविंद राव म्हणाले.

“मी एक दिवस मुद्दाम अगोदर जायचं म्हणते आहे. कारण तुम्ही आल्यावर मला बोलण्याचा फारसा स्कोप असणार नाही. जर मी एकटी गेली तर मला एक अख्खा दिवस मिळेल, त्या लोकांशी संवाद साधायला. तुम्ही तुमच्या परीने बघालच, पण मला जर आयुष्य त्या लोकांबरोबर काढायच आहे, तर माझ्या परीने सुद्धा बघायला नको का?” देवयानीनी आपल्या एक दिवस अगोदर जाण्याचं स्पष्टीकरण दिलं.

“असं म्हणतेस? मोठी झाली लेक माझी. स्वतंत्र विचार करते आहे. ठीक आहे पटलं मला. पण सांभाळून. परक्या गावात जाते आहेस. म्हणून काळजी वाटते.” गोविंद रावांनी आपली काळजी बोलून दाखवली.

“बाबा विकास असेल तिथे, आणि मी त्यांच्या बरोबर विडियो वर दोन तीन वेळा बोलले आहे. खूप चांगले लोक आहेत. तुम्ही काळजी करू नका.” – देवयानी

देवयानीनी सकाळची सात ची फ्लाइट पकडली. विकासची सव्वा आठ ची फ्लाइट होती. म्हणजे देवयानी जवळ जवळ एक तास आधी पोचणार होती. ती जरा काळजीतच होती. पण विकास शांत होता. तो म्हणाला

“काळजी आजिबात करू नको देवयानी, भैय्या येईल तुला घ्यायला. मी तुला भैय्या चा  फोटो पाठवतो. तू आत्ता जो ड्रेस घातला आहे त्याच ड्रेस मधला सेल्फी पाठव. मी तुला भैय्या चा फोन नंबर पाठवतो. म्हणजे एयरपोर्ट वर उतरल्यावर तू त्याला contact करू शकशील.” विकासनी तिला धीर दिला

मग त्यांनी भय्या ला फोन करून त्यांची सुद्धा जे कपडे घालून जाणार आहे त्याच कपड्यातला सेल्फी पाठवायला सांगितलं. एवढं करून तो सिक्युरिटी चेक करायला गेला.

देवयानीची फ्लाइट लेट  झाली. आणि विकासच अगोदर पोचला. भैय्या आलेला नव्हता. त्याला कळलं होतं की विमान उशिरा येणार आहे म्हणून. विकासनी मग त्याला फोन केला. १५ मिनिटांनी तो आला. आणि मग दोघे देवयानीची वाट बघत बसले. १५-२० मिनिटांतच देवयानीच विमान आल. विकास असल्याने कसलीच अडचण आली नाही

देवयानी प्रथमच घरी येणार होती त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. विकास ची बहीण नागपूरातच होती त्यामुळे ती आणि तिचा नवरा पण आला होता. सगळेच घराच्या पोर्च मधे वाट बघत होते. देवयानी कार मधून उतरली आणि सगळे बघतच राहिले. फोटोत पाहीली, त्या पेक्षाही प्रत्यक्षात देवयानी सर्वांनाच खूपच सुंदर वाटली. इतकी सुंदर मुलगी विकासच्या प्रेमात पडली याचं, आश्चर्य सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसत होतं. तसा विकास सुद्धा दिसायला देखणा होता आणि अंगा पिंडानी चांगला मजबूत होता पण स्त्रीचं सौंदर्यं सर्व गोष्टींवर मात करतं हेच खरं. सगळ्यांनीच तिचं आनंदाने उस्फूर्त स्वागत केलं. तिचं औक्षण केलं. आणि मग तिला घरात घेऊन गेले. देवयानीच मन भरून आलं. सगळे तिच्याकडे कौतुकानी बघत होते. विकासनी  मग तिची सगळ्यांशी ओळख करून दिली.

वहिनींनी देवयानीला म्हंटलं की “प्रवासातून आली आहेस. फ्रेश हो मग आपण चहा आणि नाश्ता करू. आम्ही सगळेच तुझ्यासाठी थांबलो आहोत.”

विकासच्या घरात तोलून मापून बोलणारं  कोणीच नव्हतं. सगळाच वऱ्हाडी खाक्या. सर्वांच मोकळेपणाचं वागणं बघून देवयानी पण लवकरच खुलली. तशी ती मुळातच बडबडी होतीच, आता इथे काय सगळेच तसे. गप्पा टप्पा मधे घर दणाणून गेलं. चहा नाश्ता  झाला. मग थोड्या वेळाने भगवानरावांनी दुसऱ्या चहाची फर्माईश केली. सर्वांनीच एकदम हो हो चहा पाहिजे म्हणून गलका केला. अश्विनी लगेच उठली चहा करायला. त्या बरोबर देवयानी पण उठली आणि म्हणाली

“वहिनी, तुम्ही बसा. मी करते चहा.”

“अग, तू कशाला, तू पाहुणी आहेस आणि आत्ताच प्रवास करून आली आहेस. बस जरा.” – अश्विनी 

पण मधेच अंकुश म्हणजे विकासच्या बहि‍णीचा नवरा  म्हणाला की

“वहिनी चहा आणि पोहे पण करू द्या तिला. आता वधू परीक्षा म्हंटली की चहा पोहे हवेतच न. करू दे की तिला. बघूया तरी काय आणि कसं करते ते.”

“काय भाऊजी तुम्ही पण! मला सगळा  स्वयंपाक येतो. म्हणत असाल तर उद्याच पुरणपोळी करून घालते तुम्हाला.” देवयानीचा जबाब 

विकासनी  तिच्या या उत्तरावर खुश होऊन टाळ्या वाजवल्या.

“बरं चल देवयानी तुला चहा साखरेचे डबे दाखवते.” – अश्विनी 

देवयानीनी चहा चांगलाच केला होता आणि सर्वांनी त्यांची तारीफ पण केली.

पुन्हा गप्पा. मग थोड्या वेळाने अश्विनी वहिनी म्हणाल्या

“देवयानी अग तुझ्या घरचे निघाले असतील ना, बघ न विचारून कुठवर आलेत ते.”

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.