देवयानी विकास आणि किल्ली - भाग ११ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ११

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 

 

 

 

 

भाग 11

भाग  10  वरून  पुढे  वाचा ................

 

देवयानीची आई हळूच गोविंद रावांच्या कानाशी  लागून म्हणाली की

“मावशीला पण इथे बोलवायला हवं. इथलं साम्राज्य पाहिल्यावर कदाचित तिचा पण विरोध मावळून जाईल. तुम्हाला काय वाटतं ?”

“तुझं म्हणणं बरोबर आहे कावेरी, पण जर तिने इथे येऊन भलतीच खुसपटं काढली तर प्रॉब्लेम होईल. आपण नागपूरला आहोत याचा विचार कर. सर्वांच्या समोर आपली शोभा व्हायला नको.” – गोविंद राव 

हे बघा, कावेरी बाई म्हणाल्या की

“हा संबंध तर पक्काच झाला आहे काकांनी आत्ताच शिक्का मोर्तब केलं आहे. आता मावशीच्या बोलण्याने काही फरक पडणार नाहीये. ती माझी मोठी बहीण आहे आणि तिला जर यांची कल्पना दिली नाही तर आयुष्यभर ती माझ्याशी बोलणार नाही” असं म्हणून त्यांनी यमुना बाईंकडे  पाहीलं. यमुना बाईंनी भगवान रावांकडे पाहिलं. आणि भगवानरावांनी गोविंद रावांकडे पाहून काय म्हणता या अर्थानी भुंवया उडवल्या. बॉल पुन्हा गोविंदरावांच्या कोर्टात.

“ठीक आहे तू म्हणतेस तसं. पण तिच्याशी बोलणार कोण ? आपल्याला काही हे जमणार नाही”– गोविंद राव 

मग देवयानीची आई सर्वांनाच उद्देशून म्हणाली  की

“माझी बहीण जरा आडमुठी आहे. तिचा या लग्नाला नाही पण नागपूर या शहराला विरोध आहे. नागपूर हे छोटसं खेडे वजा गाव आहे, अशी तिची आणि तिच्या नवऱ्याची पक्की धारणा आहे. मी तिला इथे बोलावून घेण्याच्या विचारात आहे. माझ्या मते ती दोघं जर इथे नागपूरला आली तर कदाचित नागपूर या गावाला असणारा तिचा विरोध मावळून जाईल. मी स्पीकर वर बोलते म्हणजे सर्वांनाच तिच्या स्वभावाची कल्पना येईल आणि ती इथे आल्यावर कसं बोलायचं यांची अडचण होणार नाही. तुम्हा लोकांचं काय मत आहे ?”

“एकदम बरोबर. कावेरी बाई तुमचं निदान अगदी अचूक ठरणार बघा. करा फोन. फक्त एकच करा स्पीकर वर टाकू नका. आणि तुम्ही आमच्या गेस्ट रूम मधे जाऊन बोला. म्हणजे संकोच वाटणार नाही. आणि आल्यावर आम्हाला सांगा डीटेल मधे.” यमुना बाईनी त्यांना पाठिंबा दिला.

“बरंय तसं करते,” आणि कावेरी बाई बाजूच्या रूम मधे गेल्या.

‘हॅलो ताई, मी कावेरी. इतका वेळ का लावला उचलायला ? काल तीन वेळा फोन केला पण तू घेतलाच नाहीस. असं का ?” – कावेरी बाई

“मी आत्ताही घेणारच नव्हते. पण हे म्हणाले की तिला जरूर असेल म्हणून इतक्या वेळा फोन केला. कितीही झालं तरी ती तुझी बहीण आहे. घे तो फोन, म्हणून घेतला. बोल आता काय प्रॉब्लेम आहे?” देवयानीची मावशी.

“अग, इथे तुझी मला फार जरूर आहे. खूप गोंधळ झाला आहे आणि मी अगदी एकटी पडली आहे.” – कावेरी बाई.

“अग  काय झालय ते तरी सांग, मी आत्ता लगेच तुझ्या घरी येते. मग सविस्तर सांग.” – मावशी

“अग नको, आम्ही आता बेळगाव ला नाहीये. – कावेरी बाई 

“मग? नागपूरला गेलात की काय?” – मावशी “

“हो.”

“कावेरी, अग त्या दिवशी तुला एवढं समजावलं तरी तुम्ही मूर्खासारखे नागपूरला गेलात? काय म्हणायचं तुला?” – मावशी

“म्हणूनच तर मला तुझी जरूर भासते आहे. आधी मी काय सांगते ते सगळं ऐकून घे म्हणजे तुला कळेल.” – कावेरी बाई.

आणि मग कावेरीबाईंनी सगळं सांगितलं. अगदी सविस्तर.

“एवढा घोळ तुम्ही लोकांनी घातलाच आहे आणि आता मला म्हणतेस की निस्तरायला माझी मदत हवी आहे म्हणून?” – मावशीनी तक्रारीच्या सुरा म्हंटलं.

“अग विकास बद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये मला,” कावेरी बाईंनी आपली कैफियत मांडायला सुरवात केली. “पण नागपूर चं काय ? या खेड्या मधे आपल्या मुलीला द्यायची? मला काही तुझ्या सारखं बोलता येत नाही. पण मी ठाम पणे सांगितलं की देवयानीची मावशी जो पर्यन्त हो म्हणत नाही, तो पर्यन्त काही पक्क करायचं नाही. तू येतेस का? येशील ना ?”

“अग इतक्या तातडीने मी कशी येणार? नागपूर काय जवळ आहे का?” – मावशी.

“त्याची चिंता तू करू नको. मी सुरेशला सांगून तुला विमानाची दोन तिकीट पाठवते. तो बेळगाव ते पुणे टॅक्सी ची पण व्यवस्था करेल. फक्त तू हो म्हण.” – कावेरी बाई आता चान्स घ्यायला तयार नव्हत्या.

“आता तू एवढा अग्रहच करते आहेस तर काढ तिकीट. आणि सांग मला. पण मी तिथे येऊन करू काय?” – मावशी.

मी तुला काही सांगायची काही आवश्यकता आहे का? तुलाच इथे आल्यावर सगळी परिस्थिती समजून येईल. तिकीट काढायला सांगू का?” – कावेरी बाई.

“सांग. आणि ठेव आता. लवकर काय ते सांग. बॅगा भराव्या लागतील. तेवढा वेळ दे.” – मावशी.

“ठीक आहे. ठेवते.” – कावेरी बाईंनी समाधानाने फोन ठेवला.

कावेरी बाई हॉल मधे आल्या आणि काय बोलणं झालं ते सविस्तर सांगितलं.

“अग आई,” सुरेश म्हणाला, “म्हणजे तू मावशीला उलटंच सांगितलं?”

“हो, त्या शिवाय ती इथे येणं शक्यच नव्हतं. तेंव्हा आता हा गड कसा जिंकायचा हे तुम्ही सगळे मिळून ठरवा. आणि सुरेश तू ताबडतोब उद्याची दोन तिकीट आणि बेळगाव ते पुणे टॅक्सी ची व्यवस्था कर.” कावेरी बाईंनी फायनल सांगितलं.

“आई, तू सगळंच काम अवघड करून टाकलंय आता जर मावशी ने खोडा घातला तर?” सुरेशनी शंका व्यक्त केली.

“असं काहीही होणार नाही. तिचा गैरसमज नागपूर या शहराबद्दल आहे, विकास बद्दल नाही. आणि नागपूर ला आल्यावर तिचा हा गैरसमज दूर होईल यांची खात्री आहे. नागपूर हे खेडं  नसून मुंबई, पुण्या सारखं मोठंच शहर आहे याची खात्री पटेल. मग सगळंच ठीक होईल. काळजी करू नका.” कावेरीबाईंचं उत्तर.

विकास तो पर्यन्त बूकिंग बघत होता, त्यांनी बूकिंग करून टाकलं. आणि टॅक्सी पण बूक करून टाकली. आता फक्त  मावशी येण्याचीच वाट होती. संध्याकाळी पाहुण्यांना जरा नागपूर फिरवून आणलं. नागपूरातले  रस्ते पाहून तर सगळे चकित झाले. मग सगळे तेलंग खेडी तलावावर गेले. तिथली चौपाटी बघून तर पाहुण्यांची बोलतीच बंद झाली. बरंच खाणं पिणं  झालं. सगळे खुश. घरी परतल्यावर बैठक बसली. मावशीला कस सांभाळायचं याचा प्लॅन तयार झाला. आणि मग बराच वेळ गप्पा झाल्या. जेवणं झाल्यावर पुन्हा गप्पांचा अड्डा. पाहुण्यांना हे सगळं नवीन होतं पण आवडलं. इतका मोकळे पणा त्यांनी पण कधी अनुभवला नव्हता. घर मोठं असल्याने झोपायची कसलीच अडचण झाली नाही. उद्या मावशी येणार मग काय  होईल याचाच विचार सर्वांच्या मनात होता. .

विमान नागपूरला लँड झाल्यावर बाहेर निघतांना शिडी नसून एअरो ब्रिज वरुन  डायरेक्ट एक्जिट  बघून मावशी चमकल्या. म्हणाल्या “अहो बघितलं का, हे तर मुंबई, पुण्या सारखंच दिसतंय.” बाहेर निघतांना एयर पोर्ट पाहून चकीतच  झाल्या आणि तोंडातून  उद्गार बाहेर पडला. “वा काय एयर पोर्ट आहे वा”

“अहो बघा न! नागपूर सारख्या खेड्याच एयरपोर्ट एवढं सुंदर ! विश्वासच बसत नाही. आणि स्वच्छता तरी किती आणि लोकं सुद्धा टीप टॉप दिसताहेत. कसं काय?” – मावशी नावलाईने उद्गारल्या.

“मॅडम तारीफ करू नका, इथे आपण भांडायला आलो आहोत हे विसरू नका. अहो एयरपोर्ट हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. इथले नितीन गडकरी केंद्रात मंत्री आहेत हे तू विसरली का? बाकी गाव आणि माणसं थोडीच बदलणार आहेत. बाहेर पडल्यावरच कळेल. सगळाच नकाशा समोर येईल. तू एयरपोर्ट ची शोभा बघून फसू नकोस. ही सगळी शोभा दिल्ली मेड असू शकते.” मावशीचे मिस्टर

“अहो काही तरीच काय ?” – मावशी.

“अग काहीतरीच नाही. आजकाल जग असच झालय. वरतून शोभा आतून कंगाल.” – काका म्हणाले. पण त्यांचाही स्वर जरा हलकाच होता.

यावर मावशी बाई  काही बोलणार होत्या पण त्या गप्प बसल्या.

काका सामान घेण्या साठी उभे असतांना मावशी इकडे तिकडे बघत उभ्या राहिल्या. काचेतून बाहेर कोण उभ आहे का ते बघत होत्या. त्यांना तर सुरेश दिसला नाही पण सुरेशने त्यांना  पाहीलं. तो दाराच्या पाशी समोरच उभा राहिला. त्यांना  यायला पांच दहा मिनिटं लागतील असा विचार करून विकास म्हणाला की गाडी घेऊन येतो. पण सुरेश म्हणाला की “थांब रे, आधी तुझी ओळख करून देतो मग जा.”

मावशी बाई बाहेर आल्या आणि सुरेशने आवाज दिला. मावशीचा जीव भांड्यात पडला. त्या काकांकडे वळून म्हणाल्या “बरं झालं बाई, सुरेश आला आहे घ्यायला.”

“अग तो येणारच होता. फोन वर बोलणं झालं नाही का आपलं.” – काका

सुरेश ने मग विकासची ओळख करून दिली. स्मार्ट विकास मावशीला एकदम आवडून गेला. आणि हसून त्यांनी त्याची पसंती पण दिली. विकासने सुटकेचा निश्वास सोडला. ‘चला एक पाऊल पुढे. असा त्यानी विचार केला.’ मग म्हणाला

“मी गाडी घेऊन येतो. तुम्ही इथेच थांबा. आलोच मी पांच मिनिटांत.”

विकास गाडी घेऊन आला. ती लांब लचक ऑडी पाहून तर मावशीचे डोळेच विसफारले आणि आनंद पण झाला. त्या आराम शीर  गाडीत बसून त्या बाहेर पाहात होत्या.

“अहो, परिसर किती उत्तम ठेवला आहे ना. आणि हा पुतळा कोणाचा आहे, केवढा उंच आहे.” – मावशी 

“एयरपोर्ट च नावच बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळे त्यांचा पुतळा इथे लावला हे एकदम परफेक्ट आहे.” – विकासणे माहिती पुरवली.

“अहो रस्ते सुद्धा किती सुंदर आहेत.” – मावशी 

“ह्या, हे एयर पोर्टचे  रस्ते आहेत. दिल्ली मेड.” काका अजूनही हार मानायला तयार नव्हते.

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.