देवयानी विकास आणि किल्ली - भाग ४ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ४

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

 

भाग 4

भाग   3 वरून  पुढे  वाचा ................

 

“ते जाऊ दे, ते एवढं महत्वाचं नाहीये. पण मला प्रश्न पडला आहे की हा रजा मुराद कोण आहे? ते तर सांग.” – विकास.

“आधी आज काय वेगळं होतं ते सांग. मग रजा मुराद.” – देवयानी. 

“आता काय सांगू तुला? तुला माझा राग येईल आणि मग बोलणार नाहीस, त्या पेक्षा हा मुद्दा सोडून बोलू ना.” – विकास.

“मग आता बोलण्यासारखं काहीच नाहीये. गुड नाइट.” आणि देवयानीनी फोन ठेवून दिला.

विकास कडे चडफडत बसण्या पलीकडे हातात काहीच नव्हतं. त्यांनी पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला पण तिने उचलला नाही. बहुधा सायलेंट वर केला असावा. शेवटी तो पण झोपायच्या तयारीला लागला. केंव्हा तरी झोप लागली त्यामुळे उठायला उशीर झाला. जाग आली तेंव्हा आठ वाजले होते. तो घाई घाईने उठला आणि सर्व आटोपून साडे नऊ पर्यन्त ऑफिस ला जायला तयार झाला. त्याला वाटलं होतं की देवयानीचा फोन येईल किंवा मेसेज तर येईल. पण पुन: पुन्हा फोन तपासून सुद्धा हाताला काही लागलं नाही. शेवटी देवयानीचा विचार झटकून तो ऑफिस ला निघाला. दिवस भर कामाच्या रगाड्यांत इतका गुंतून गेला की देवयानीची आठवणच आली नाही. संध्याकाळी आठाच्या सुमारास नेहमी प्रमाणे  मेस च्या वाटेवर असतांना फोन वाजला, देवयानीचा कॉल होता. बाइक रस्त्याच्या कडेला घेई पर्यन्त फोन बंद झाला. विकास पांच मिनिटं थांबला. आणि किक मारून मेस कडे निघाला. त्याला एकदा वाटलं की कॉल बॅक करावं पण त्यांनी तो विचार बाजूला सारला. तिची इच्छा असेल तर करेल पुन्हा फोन. तसंही ती आता मुंबईला असेल. भेट तर होणारच नाहीये.

मेस मध्ये जेवून घरी परतल्यावर उशिरा रात्री पुन्हा तिचा कॉल आला. या वेळेस मात्र त्यानी तत्परतेने उचलला.

“हॅलो”

“काय करताय?”- देवयानी.

“काही नाही.” – विकास

“जेवणं झालं?” – देवयानी

“झालं! असले निरर्थक प्रश्न का विचारते आहेस? कुठे आहेस? मुंबईला?” विकास वैतागला

“हो. आज सकाळीच पोचले. तुला फोन करणार होते पण अरे, लगेचच ऑफिस ला जावं लागलं. संध्याकाळी तुला फोन केला होता पण तेवढ्यात कॉल आला मग घ्यावा लागला.” -देवयानी म्हणाली. 

“कोणाचा कॉल आला?” – विकास

“बॉसचा, अजून कोणाचा? खडूस आहे. अगदी घरी जायच्या वेळेसच काही तरी कारण काढून बोलावतो.” देवयानी चिडक्या स्वरात बोलली. 

“अग खडूस असतात, म्हणूनच अशी माणसं बॉस बनतात. ते क्वॉलिफिकेशन आहे. तू मनावर घेऊ नको.” – विकास.

“उशीर झाला आहे, घरी सोडू का” असं विचारत होता.- देवयानी

“स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. पोरगी पटली तर उत्तमच.” विकास म्हणाला 

“तू पण असंच करतो?” – देवयानी

“छे, मी मुलींच्या वाऱ्याला पण उभा राहत नाही. तुझा अनुभव काय सांगतो?”

“ते दिसलंच मला त्या दिवशी, म्हणून तर मला तू आवडलास.” – देवयानी. 

“काय म्हणालीस? अहाहा! पुन्हा एकदा म्हण न.” विकास चा आग्रह

“आकाशवाणी एकदाच होते.” असं म्हणून दिलखुलास हसली.

तिच्या हसण्यात विकास बुडाला. शेवटी म्हणाला-

“आता काय करावं ?” -विकास

“म्हणजे ?” -देवयानी

“तू पुण्याला असतीस तर धावत आलो असतो हे ऐकायला. आय मिस यू.” विकास तक्रारीच्या स्वरात बोलला.

“Me too. माझी खूप इच्छा होती अजून एक दोन दिवस पुण्याला राहण्याची. तुझ्या सहवासात. पण नाही शक्य झालं.” – देवयानी 

“एक कर, तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते. तू ये या शनिवारी पुण्याला.” विकासनी सोल्यूशन दिलं.

“या शनिवारी नाही जमणार. मोठा धोबी घाट आहे. कपडे धुतले नाही तर सोमवारी ऑफिस ला जायला सुद्धा कपडे असणार नाहीत. पुढच्या शनिवारी येते. चालेल?”

“एक आठवडा भर वाट पहावी लागेल, पण चालेल. बरं ते जाऊ दे. काल फोन का कट केलास? किती वेळ मला झोप आली नाही.” विकास ची तक्रार 

“हेच तर मला ऐकायचं होतं. मजा आली ऐकून.” - देवयानी 

“तुझी थट्टा झाली पण माझा इकडे जीव जात होता त्याचं काय ?” – विकास

“मला पहायचं होतं की तुम्ही मला मिस करता की नाही ते.” – देवयानी 

“झालं समाधान ?” – विकास

“हो sss” आणि मग तिला हसू आवरेना.

मग रोजच रात्री फोन कॉल्स सुरू झाले. दोघांनाही एकमेकांशी बोलल्या शिवाय राहवत नव्हतं. गुरूवारी रात्री तिचा फोन आला तेंव्हा विकास म्हणाला.-

“परवा  केंव्हा येते आहेस ? मी अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकतो. मस्त फिरू, बाहेरच जेवू मजा करू. तुझ्या सहवासात फूल दिवस घालवायची किती दिवस आतुरतेने  वाट पहातो आहे. स्टेशन वर येऊ का घ्यायला ?” विकास म्हणाला

“ऐक ना, एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे. पहिले काय सांगू ?”

“आधी बॅड  न्यूज. मग गुड न्यूज. स्वीट डिश नंतर.” – विकास

“ओके. मी या शनिवारी पुण्याला येऊ शकणार नाही.” देवयानी 

“औँ, का? तुझी इच्छा नाहीये का मला भेटायची? ठीकच आहे.” त्याचा स्वर एकदम बदलला. हिरमुसला तो. गप्प बसला.

“अरे असा चिडू नकोस रे माझ्यावर. मला रडायला येईल तू असा रागावलास तर.” देवयानीचा स्वर थोडा हळवा झाला.

“मग काय करू? काय काय ठरवलं होतं करायचं, तू आल्यावर. पण तू बोळा फिरवलास. आता कळलं की असं करण्यात तुला मजा येते. तू एंजॉय करते मला त्रास देऊन.” विकास चिडला 

“नाही रे. पण  ऐक न, आता गुड न्यूज देते.” – देवयानी 

“नको. तू येणार नाहीस म्हंटल्यांवर, मग कुठलीच बातमी गुड असणार नाही माझ्या करिता” – विकास 

“अरे ऐक तर. मग उद्या मी येणार नाही, हे तू विसरून जाशील.” – देवयानी 

‘बरं सांग. ऐकतोय  मी.” विकासनी तह केला 

“मी कायमचीच पुण्याला येणार आहे, असं म्हंटलं तर तू काय म्हणशील?” देवयानीने बॉम्ब शेल टाकला. विकासला सावरायला थोडा वेळ लागला.

“काय सांगतेस काय? वेल्कम म्हणेन. पण एकदम अचानक? मुंबईची नोकरी सोडणार आहेस का?” विकास चा प्रश्न

“अरे पुण्याच्या कंपनीत माझी निवड झाली आहे. मी उद्या जाऊन एक महिन्याची नोटिस देणार आहे. म्हणून आता महिनाभर येता  येणार नाही.” – देवयानी

“असं कसं? चेष्टा करतेस का माझी? अशी एकाच इंटरव्ह्यु मध्ये ऑफर मिळाली? तुझ्या रुपावर भाळला की काय इंटरव्ह्यु घेणारा?” – विकास.

“काही तरीच काय? तू समजतो आहेस, तसं काही नाहीये. जवळ जवळ दोन महीने ऑन लाइन चालू होतं. फायनल साठी पुण्याला बोलावलं होतं. त्या दिवशी तू जर माझ्या सुटके साठी धावुन आला नसतास, तर इंटरव्ह्यु देताच आला नसता, आणि मग मात्र ही नोकरी हातची गेली असती.” देवयानीनी डीटेल मधे सांगितलं.

“या नोकरीवर इतकी आशा लावून बसली होतीस?” – विकास

“आधी नव्हती. पण  आता परिस्थिती वेगळी आहे.” – देवयानी

“आता काय वेगळं आहे ?” – विकास

“तू.” – देवयानी.

“मी?” विकास आश्चर्याने म्हणाला

“तू आहेस ना. तू पुण्याला आहेस मग मी मुंबईला राहून काय करू ?” – देवयानी  

“ए, हे तर खूपच झालं.” – विकास

“आता याच्यात आश्चर्य वाटण्या सारखं काय आहे?”- देवयानी

“विडियो कॉल करू दे आणि मग पुन्हा म्हण की मी मुंबईला राहून काय करू. मला बघू दे की जरा माझ्या मैत्रिणीचा लाजरा चेहरा.” विकासने डिमांड ठेवली. 

देवयानी अजूनच लाजली पण हे विडियो नसल्यामुळे विकासला दिसलं नाही. बिचारा.

“हे बघ आता मी सांगीतलं तुला की काय वेगळी परिस्थिती झाली आहे ते. आता तुझी पाळी. आता तू सांग.” – देवयानी 

“मी काय सांगायचय ?” विकास गोंधळला

“आठव. आणि आठवल्यावर सांग. आता मी ठेवते. गुड नाइट” देवयानीनी फोन ठेवला 

विकास विचारच करत होता, त्याला समजेना की काय आठवायला सांगते आहे ते. आणि तेवढ्यात तिने फोन ठेवूनच दिला. ही अशीच करते. अर्धवट बोलून फोन कट करते आणि मग भुंगा छळत राहतो रात्रभर. काय म्हणावं या पोरीला? एक्स्पलॉईट करते. माहीत आहे न की मी तिच्यावर जीव लावून बसलो आहे ते. आता उद्या फोन करेल तेंव्हा अर्धवट  फोन कापणार नाही, याचा सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. तिच्याकडून कबूल करूनच घेऊ. हे मनाशी ठरवल्यावर मग जरा तो शांत झाला.

दुसऱ्या दिवशी रात्री फोन आल्यावर आधी त्यांनी तिच्याकडून कबुली घेतली की अर्ध्यातच फोन कापणार नाही म्हणून.

“पण ही वाईट सवय तुला लागलीच कशी?” – विकास

“तूच लावली.” देवयानी 

“मी? आणि ती कशी काय?” विकास

“मी फोन कापला की तुझा चेहरा कसा  झाला असेल याची मी कल्पना करत झोपते. मस्त मजा येते.” देवयानी चेष्टेच्या सुरात बोलली 

“हात जोडले तुझ्या पुढे.” विकासची शरणागती 

“अरे गंमत म्हणून. पण आता प्रॉमिस करते. नाही करणार असं. मग तर झालं? ए, तू मला माझ्या नवीन नोकरी बद्दल काहीच कसं नाही विचारलं?”- देवयानी

“अग तू फोन चालू ठेवलास तर मी काही विचारीन ना. तुला तर सॉलिड घाई असते कापायची.” विकासनी तक्रार केली.

“आता नाही कापणार. तू विचार न.” – देवयानी 

“हां आता कसं. आता सांग सर्व डीटेल मध्ये. पण काय आहे न प्रत्यक्ष तू समोर असतांना ऐकण्यात जास्त मजा आली असती.” विकास आपली अडचण सांगितली.

ओके. असं म्हणून तिने कॉल बंद केला.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.