देवयानी विकास आणि किल्ली - भाग १३ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग १३

देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 

 

 

 

 

भाग १३

भाग  १२   वरून  पुढे  वाचा ................

“न चालायला काय झालं. आम्ही केव्हाही तयारच आहोत. आमची दोन्ही मुलं अमेरिकेत असल्याने ते काही साखर पुड्याला येतील असं वाटत नाही.”- मावशी

“मावशी, पण लग्नाला त्यांनी यायलाच हवं हं.” देवयानी चहा घेऊन आली होती, चहा देता देता ती मावशीला म्हणाली.

“तूच बोल बाई त्यांच्याशी. या परदेशातल्या लोकांचं आम्हाला काही कळत नाही.” मावशीनी देवयानीच्या पारड्यात चेंडू टाकला 

देवयानी हसली. “बोलीन ना. नक्कीच बोलीन.”

रात्री जेवणं आटोपल्यावर विकास चे  काका काकू, अंकुश वगैरे मंडळी आपापल्या घरी गेली.

दुसऱ्या दिवशी गुरुजींना बोलावलं होतं ते आले. त्यांनी दोन तीन मुहूर्त काढून दिले.

आता त्यानंतर हॉल ची व्यवस्था. भगवान रावांच्या ओळखी बऱ्याच होत्या. त्यामुळे हॉल मिळण्यात काहीच अडचण आली नाही. पुढच्या महिन्यातली 15 तारीख सर्वानुमते ठरली. जवळ जवळ 1000 लोकांची लिस्ट बनली. लग्न बेळगाव ला करायचं ठरल्या मुळे सर्वच लोकांना साखर पुड्यालाच बोलवायचं ठरलं. देवयानीच्या घरच्या लोकांना इतके पाहुणे म्हंटल्यांवर जरा अवघडल्या सारखं झालं. पण भगवानरावांनी सांगितलं की

“इतक्या वर्षा पासून आम्ही इथे राहात आहोत, आणि आमचा व्यापारी वर्ग आहे त्यामुळे एवढे होणारच. या लोकांना लग्नाला बोलावता यायचं नाही, त्यामुळे आत्ता बोलवावं  लागेल.”

हे ऐकल्यावर गोविंद रावांनी मान डोलावली. ”बरोबरच आहे” असं म्हणाले.

दुसऱ्या दिवशी बेळगाव ची मंडळी प्रस्थान करती झाली.

लग्नाचा मुहूर्त पण काढून झाला होता. डिसेंबर ची 14 तारीख ठरली. बराच वेळ असल्याने हॉल बूकिंग ची समस्या येणार नव्हती.

देवयानी आणि विकास ने पण मुंबई आणि पुण्याची वाट धरली. आता साखर पुड्याची सगळी जबाबदारी भैय्या वर  पडली. आणि त्यानी आणि अश्विनीने ती उत्तम प्रकारे पार पाडली. बेळगाव च्या पाहुण्यांसाठी हॉटेल मधे रूम्स घेतल्या होत्या. कारण यांच घर पाहुण्यांनी भरून जाणार होतं. देवयानीची मैत्रीण सुप्रिया हिच्या साठी पण हॉटेल मध्येच व्यवस्था केली होती.

साखर पुड्याचा दिवस उजाडला. सर्व तयारी कंप्लीट झाली होती पण तरीही धाव पळ सुरूच होती. कितीही तयारी केली असली तरी ऐनवेळेवर काहीतरी राहूनच जातं. किंवा अचानक ध्यानी मनी नसतांना विघ्न उभं राहत. आज सुद्धा तसंच झालं. गुरुजींना छातीत दुखायला लागलं म्हणून अॅडमिट करावं लागलं. गुरुजींच्या मुलांचा दुपारी 3 वाजता तसा फोन आला. आता काय करायचं ? सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडला. देवयानी कडचे लोकं तर हवालदिल झाले. त्यांच्या ओळखीचं इथे कोणीच नव्हतं. पण लवकरच हा तिढा सुटला. गुरुजींच्याच बरोबर नेहमी काम करणारे दुसरे गुरुजी होते त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की काय परिस्थिती झाली आहे हे त्यांच्या नेहमीच्या गुरुजींच्या मुलाने सांगितलं आहे, तेंव्हा तुमची काही हरकत नसेल तर मी साक्षीगंधाला येऊ शकतो. भैय्या ने त्यांना ताबडतोब हो म्हंटलं आणि साखरपुड्याची वेळ सांगितली.

नंतर मात्र काहीही विघ्न न येतं साखरपुडा उत्तम प्रकारे पार पडला. रीसेप्शन वगैरे आटोपून घरी यायला रात्रीचा एक वाजला. सगळेच थकून गेले होते.

साखरपुडा तर आटोपला. विकासच आणि देवयानी चं पण रुटीन सुरू झालं.

नोटिस पीरियड संपल्यावर देवयानी पुण्याला आली आणि नवीन नोकरी जॉइन केली. लग्न होई पर्यन्त सुप्रिया कडेच राहणार होती. सुप्रियाची अजून एक शांती लक्ष्मी नावाची रूम मेट होती. ती पण बेळगावचीच होती. आणि देवयानी तिला थोडी फार ओळखत होती. देवयानी इंटरव्ह्युला आली होती तेंव्हा ती नेमकी बेळगावला गेली होती. ती असती तर देवयानी अडकली नसती आणि विकासची आणि देवयानीची गाठ पडलीच नसती. तिची पण काही हरकत नव्हती. सहा आठ महिन्यांचा तर प्रश्न आहे अस ती म्हणाली.

आता काय, दोघेही पुण्यातच, मग काय जेंव्हा दोघांच्या वेळा मिळायच्या तेंव्हा  भेट व्हायचीच. विकासने आता देवयानीला बरोबर घेऊन घर सजवायला सुरवात केली. तिच्या आवडीचे पडदे, स्वयंपाकघर तिच्या आवडी आणि गरजे प्रमाणे करून घेतलं. शेजाऱ्यांशी तिची ओळखी करून दिली. त्यांनाही देवयानी आवडली. ड्रॉइंग रूम पण सजली. मग एक दिवस रविवारी सर्व शेजार्‍यांना संध्याकाळी जेवायला बोलावलं. देवयानीनीच सगळा स्वयंपाक स्वत: केला. सर्व शेजार्‍यांनी तोंड भरून तिची तारीफ केली. दिवस कसे छान जात होते.

सुप्रिया आणि लक्ष्मी जवळ जवळ पांच वर्ष पुण्यात होत्या.. त्यांचं त्यामुळे मित्र मंडळ बरंच मोठं होतं.आता त्या मंडळीत देवयांनी पण सामील झाली. तिच्या सौंदर्याची सगळ्यांनाच भुरळ पडली होती. देवयानीनी सगळ्यांशी जितक्यास तितके असेच संबंध ठेवले होते. एरवी बाहेरच भेटणारे, पण आता सुप्रियाच्या मित्रांच्या घरी चकरा वाढल्या होत्या. देवयांनी जेंव्हा मोकळा वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा विकासच्या फ्लॅट वर जायची. विकास असो व नसो. घर आणखी कसं सजवता येईल आणि कुठलं सामान आवश्यक आहे या बद्दल शेजारच्या काकूंना बोलावून त्यांच्याशी चर्चा करायची. आता त्या सोसायटी मधल्या जवळ जवळ सगळ्याच बायका तिला ओळखायला लागल्या होत्या. आणि सर्वांना तिचा निगर्वी स्वभाव फारच आवडला होता.

देवयांनीला कळत होतं की सुप्रियाच्या मित्रांना  तिच्याशी ओळख वाढवायची आहे, त्यामुळे ती जरा दूरच  राहण्याचा प्रयत्न करत होती बाकीचे मित्र समजूतदार होते, ते ही देवयानीकडे आकर्षित झाले होते पण मर्यादा राखून होते. पण सुप्रियाचा एक मित्र राजू, तो धारवाडचा होता. तो देवयानी पायी पागल झाला होता. इतक्या वेळा चकरा मारून देवयांनी केवळ एक दोनदा भेटली होती आणि जूजूबी  बोलून लगेच फ्लॅट वर निघून गेली होती. त्यामुळे राजू बराच नाराज झाला होता. सुप्रियाने आणि बाकीच्या मित्रांनी पण त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. देवयानी भेटावी म्हणून तो रात्री उशिरा घरी यायला लागला. एक दोनदा असं झाल्यावर देवयानीनी आणि सुप्रियाने त्याला स्पष्टच सांगितलं की आता यापुढे तू घरी यायचं नाही. देवयानीचं लग्न ठरलेलं आहे आणि तू आता तिचा नाद सोड.

एक दिवस संध्याकाळी हा राजू, देवयानीच्या ऑफिस च्या बाहेर तिची वाट बघत उभा होता. देवयानी बाहेर पडली तेंव्हा संध्याकाळचे साडे सात  वाजले होते. बाहेर पडल्या पडल्याच राजू ने तिला हाक मारली. देवयानीनी स्कूटी थांबवली आणि वळून पाहिले की कोण हाक मारताय म्हणून. राजुला बघितल्यावर तिची मुद्रा जरा त्रासिक झाली.

“हाय देवयानी” – राजू 

“हाय राजू, इथे कसा काय ?” – देवयानी

“तुझीच वाट पहाट थांबलो होतो.” – राजू

“कशाला ?” – देवयानी

“थोड तुझ्याशी बोलायचं होतं.” – राजू 

“बोल.” देवयानी त्रासिक मुद्रेने म्हणाली.

“आपण कोपऱ्यावरच्या कॉफी शॉप मधे जावूया का ?” – राजू

“अरे इथेच बोल ना. मला जरा घाई आहे.” – देवयानी

“प्लीज, जरा महत्वाचं आहे.” – राजुने विनंती केली.

“ओके. पण लवकर सांग. मला आधीच उशीर झाला आहे.” – देवयानी

कॉफी शॉप मधे गेल्यावर देवयानी म्हणाली की

“हं बोल आता.”

“अग  कॉफी तर येऊ दे पिता पिता बोलू.” – राजू 

“NO. ताबडतोब बोल नाहीतर मी निघते. मला उशीर झाला आहे.” देवयानीनी निक्षून सांगितलं.

“तुला त्या विकासलाच भेटायची घाई झाली आहे ना ? माहीत आहे मला. पण देवयानी, मला तुझ्या विषयी  खूप वाटत. मी प्रेम करतो तुझ्यावर. माझ्याशी लग्न कर मी तुला खूप सुखात ठेवीन. तुला नोकरी करायची पण जरूर पडणार नाही. अग सात पिढ्या बसून खातील इतकी श्रीमंती आहे आमच्या घरात. त्या विकासला काय एवढा गूळ लागला आहे की त्याच्या साठी तू वेडी झाली आहेस. सोड त्याला. आणि माझ्याकडे ये.” राजुने एका दमात सांगून टाकलं.

“राजू, झालं तुझं बोलून,” देवयानी म्हणाली “आता मी काय सांगते ते ऐक. माझा विकास बरोबर साखरपुडा पण झाला आहे आणि हे तुला पण माहीत आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हे लग्न होणारच. आता संपत्ति बद्दल बोलायचं तर मला पैशाचा मोह नाही. दुसरं म्हणजे, तुझ्या विषयी माझ्या मनात कुठलीही भावना नाही. तेंव्हा तू आता माझा नाद सोड. हे मी तुला शेवटचं निक्षून सांगते आहे. बाय.”

“अग कॉफी ? ती तरी पिऊन जा.” राजुचा शेवटचा प्रयत्न.

“तूच पी.” असं बोलून, देवयानी उठून गेली. ती सरळ विकासच्या फ्लॅट वर गेली.

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.