देवयानी विकास आणि किल्ली.
पात्र परिचय
विकास नायक
देवयानी नायिका
सुप्रिया देवयानीची मैत्रीण
लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर.
राजू सुप्रियाचा मित्र
शीतोळे पोलिस इंस्पेक्टर
भय्या विकासचा मोठा भाऊ.
अश्विनी विकासची वाहिनी, भैय्याची बायको
भगवानराव विकासचे बाबा
यमुना बाई विकासची आई
गोविंद राव देवयानीचे बाबा
कावेरी बाई देवयानीची आई.
मावशी आणि काका देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर
मनीषा विकासची बहिण
अंकुश मनीषाचा नवरा.
सुरेश देवयानीचा भाऊ.
विश्राम देवयानीचा चुलत भाऊ.
विनोद विकास चा चुलत भाऊ
प्रिया विकासची चुलत बहीण.
सेजल देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
पूर्णिमा देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
राजेश विकासचा मित्र.
भाग २८
भाग २७ वरून पुढे वाचा .......
“हॅलो विकास, मी तुला एक फोटो पाठवते तो पहा मग आपण बोलू.”
विकासनी whatsapp उघडून फोटो पाहीला आणि आपसूकच तोंडातून निघून गेलं की “अरे वा ! मस्त आलाय की फोटो.” आणि त्यानी जीभ चावली. क्षणातच केवढी मोठी घोडचूक त्याच्या हातून झाली, हे त्याच्या लक्षात आलं. पुढच्या वादळाची कल्पना येऊन, तो काही सारवा सारव करणार होता, पण देवयानीनी त्याला वेळच दिला नाही. म्हणाली.
“मस्त आहे ना फोटो! वाटलंच होतं मला.” आणि तिने फोन कट केला.
विकासला जाणवलं की आता वादळाची सुरवात झाली आहे आणि त्यामुळे आणखी किती काळ सर्व फोन लाइन्स बंद किंवा आउट ऑफ रेंज राहतील याचा अंदाज लावणं अवघड असणार आहे. विकासची मती गुंग झाली. किती काळ देवयानी असहकार पुकारणार आहे याची त्याला काहीच कल्पना येत नव्हती.
तीन दिवस विकास सतत फोन करत होता. अमेरिकेत दिवस असतो म्हणून तो रात्र रात्र जागून फोन करत होता. पण देवयानी फोन उचलत नव्हती. त्याला वाटलं की नशीब चांगलं म्हणून देवयानीनी त्याचा नंबर ब्लॉक केला नाही. म्हणजे अजून आशा आहे. आणि म्हणून तो दिवस रात्र प्रयत्न करत राहिला. आपल्या मनाला समजावत राहिला की आज ना उद्या देवयानीच्या हृदयाला पाझर फुटेल आणि ती फोन उचलेल. आणि ती फोन वर आल्यावर कसं आणि काय बोलायचं याचा विचार करत राहिला. असेच सहा सात दिवस उलटून गेले. देवयांनीला अजूनही पाझर फुटला नव्हता.
पण देवयानी सुद्धा मलूल होती. कोणाशीच बोलत नव्हती. यंत्रवत तिची सगळी कामं चालली होती. शेवटी एक दिवस संध्याकाळी सेजल तिच्या खनपटीलाच बसली. खोदून खोदून विचारत तिनी देवयानीला हैराण करून सोडलं. शेवटी देवयानी कोसळली आणि तिने रडत रडत सर्व कथा सांगितली. सेजलला सुप्रियाचा रागच आला. जिवाभावाची मैत्रीण असं कसं वागू शकते? तिने मग देवयांनीला शांत केलं आणि सांगितलं की “आता विकास चा फोन आला तर घे. अग तू त्याच्या बद्दल आज पर्यन्त जे काही सांगितलं आहेस त्यावरून तरी तो इतका उथळ नक्कीच वाटत नाहीये. तो फोटो छान आहे असं म्हणाला, मला विचारशील तर फोटो खरंच छान आला आहे. पण हे मत फोटो बद्दल आहे, सुप्रिया बद्दल नाही असा विचार का नाही करत तू ?”
रात्री विकासचा फोन आलाच नाही. देवयांनीला सेजलचं बोलणं पटलं होतं आणि त्यामुळे तिला फार अपराधी असल्या सारखी जाणीव होत होती. ती सेजलला रडव्या स्वरात म्हणाली की
“विकासचा फोन आलाच नाही तर काय करायचं ? मी काय करू ?” – देवयानी.
“तू फोन कर. सिम्पल. भांडण तू केलस, अबोला तू धरला आहेस. आता तूच संपव सगळं.” – सेजल.
देवयानीनी फोन लावला, बराच वेळ घंटी वाजत होती. देवयानीनी दोन तीन वेळा try केला पण नो आन्सर. देवयानी रडकुंडीला आली. तिने सेजल कडे पाहीलं.
“देवयानी, गेले काही दिवस तो दिवस रात्र तुला फोन करत होता पण तू उचलला नाहीस. आता कळलं का, की नो आन्सर झालं की कसं वाटतं ते? फोन करत रहा. कदाचित आज रविवार असल्यामुळे उठला नसेल. पाच दहा मिनिटांनी पुन्हा फोन लाव.” सेजल ने देवयांनीला धीर दिला.
देवयानीला ते पटलं नाही पण तरीही ती थांबली आणि दहा मिनिटांनी पुन्हा फोन लावला. उत्तर नाही. देवयानी आता रडायच्या बेतात होती. इतक्यात मेसेज ची रिंग वाजली. सेजल म्हणाली अग बघ, कदाचित त्याचाच मेसेज असेल. देवयानीनी मान हलवली. नको, त्याला बोलायचं नसेल तर मी पण आता बोलणार नाही. मग सेजलनीच तिच्या कडून फोन घेतला. मेसेज विकासचाच होता. सेजलनी तो मोठ्याने वाचला.
‘फोन कट करणार नाही असं प्रॉमिस करत असशील तरच मी बोलेन.’
सेजलनीच ‘प्रॉमिस’ असा उलट मेसेज केला. आणि देवयांनीला सांगितलं की आता कर फोन, तो उचलेल आणि मग जे काही शिल्लक असेल ते सर्व भांडून घ्या आणि मिटवा हा दुरावा. पण आधी वॉशरूम मधे जाऊन ये. काय अवतार करून घेतला आहे स्वत:चा, तो सावर, पाणी पी आणि मग कॉल कर. देवयानीने मान हलवली, आणि फ्रेश झाल्यावर मग थोडा विचार करून विडियो कॉल लावला.
देवयानीनी विकासला बघितलं आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. किती तरी दिवसांपासून विकासने दाढी केली नव्हती, फोन करण्याच्या नादात, अपुरी झोप आणि खाण्या पिण्या कडे लक्ष नसल्यामुळे, डोळे खोल गेले होते, तारवटले होते. चेहरा भकास दिसत होता, उमदे पणाची रया लुप्त झाली होती. एखाद्या मोठ्या आजारातून उठल्या सारखा, थकलेला, निस्तेज, असा विकास दिसत होता.
“अग आईग, विकास, काय झालं तुला? बरं नाहीये का?डॉक्टरला दाखवलं का?
अरे अशी स्वत:ची आबाळ नको करूस. नागपूरला जातोस का? का मीच येऊ?” देवयानी कळवळून बोलली.
“अग काहीच झालेलं नाहीये मला. मी एकदम फिट आणि फाइन आहे.” – विकास.
“काही तरी बोलू नकोस. मी पाहते आहे तुला. असा विकास मी कधीच पाहीला नव्हता. काय होतेय तुला?” - देवयानी.
देवयानीला हुंदका आवरता आला नाही. ती रडायलाच लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून सेजल धावत आत आली.
“अग काय झालं? का रडते आहेस तू?” सेजलनी विचारलं.
देवयानीनी काही न बोलता मोबाइल सेजलच्या हातात दिला. म्हणाली
“विकास बघ कसा दिसतोय. मला सहन होत नाहीये. तो काही सांगायला तयार नाहीये.”
सेजलला सुद्धा विकासला बघून धक्काच बसला. तिला सुद्धा सुचेना की काय बोलावं ते.
“काय झालाय तुला? कसला आजार आहे? ट्रीटमेंट चालू आहे का? डॉक्टर काय म्हणाले? आठ, दहा दिवसांपूर्वी तर सगळं ठीक होतं. मग आता अचानक काय झालं?” सेजलनी एका मागोमाग प्रश्नांचा वर्षावच केला.
“अग मला काहीही झालेलं नाहीये. मी एकदम ठीक आहे. जरा दाढी करायची राहून गेली म्हणून तुम्हाला असं वाटतंय. अजून काही नाही.” विकासचं उत्तर.
“दाढी केली नाही म्हणून, डोळे खोल जातात? चेहरा निस्तेज होतो? असं असेल तर सर्व सरदार लोकांना दाढी असते, ते असे दिसतात? उगाच काहीतरी बोलू नकोस. खरं सांग ना. मला काळजी वाटते रे. प्लीज.” देवयानी काकुळतीने म्हणाली.
“अग काही नाही, विटामीन D3 रोज घ्यायचं असतं पण गेले आठ दहा दिवस नाही घेतल. म्हणून असेल कदाचित.” नाईलाजाने सांगावं लागतंय असा चेहरा करून विकास बोलला.
“अरे, असं कसं? गोळ्या संपल्या का? आणल्या का नाहीस? आणि अचानक विटामीन ची कमतरता कशी झाली?” देवयानीनी घाबरून काळजीने विचारलं.
“कुठून आणू? इथे मिळत नाहीयेत. मग?” – विकास. चेहरा गंभीर.
“असं कसं होईल? पुण्याला मिळत नाहीत हे शक्यच नाही. तू आणायला विसरला असशील.” देवयानीनी अविश्वासाने म्हंटलं.
“नाही, मी रोज प्रयत्न करतो आहे पण मिळत नाहीयेत.” विकास अजूनही गंभीर.
“मग कुठे मिळतात?” – देवयानी.
“अमेरिकेत.” – विकास.
“मग मला सांगायचं नाही का? इथून पाठवले असते.” – देवयानी आता चिरडीला आली होती.
“अग त्यासाठीच तर तुला फोन करत होतो पण तू कसली, फुरंगटून बसली होतीस. मग काय करणार?” – विकासनी स्पष्ट केलं.
“ओह माय गॉड, सॉरी, सॉरी. आत्ता सांग मला, मी पाठवते इथून.” – देवयानी.
“ठीक आहे घे लिहून.” – विकास.
सेजल पेन आणि कागद घेऊन आली.
“हं. सांग.” – देवयानी.
“लीही. विटामीन D3.” – विकास.
“अरे नीट औषधाचं पूर्ण नाव सांग ना.” – देवयानी.
“ओके. D3 म्हणजे, देवयानी 3, देवयानी, देवयानी, देवयानी. सध्या तरी हे औषध फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे. आणतेस ना मग?” आता विकासचा स्वर मिश्किल झाला होता.
देवयानी क्षणभर नुसतीच बघत राहिली, मग डोक्यात लख्ख प्रकाश पडला. रडायलाच लागली. रडता रडताच म्हणाली
“इतकं प्रेम करतोस माझ्यावर! मीच वेडी, तुझ्यावर चिडले. माफ करशील ना रे मला?” देवयानी रडत रडतच बोलली.
“अग, अग तू रडू नकोस, नाही तर असं करूया का, मी ठेवतो आता आणि अर्ध्या तासाने फोन करतो, तो पर्यन्त तू रडून घे मनसोक्त. ओके?” विकासनी फिरकी घेतली.
आणि देवयानी रडता रडता हसायला केंव्हा लागली ते तिचं तिलाच कळलं नाही. सेजल हळूच खोलीच्या बाहेर गेली.
देवयानी, रडता रडताच हसायला लागली आणि विकासला खूप बरं वाटलं सगळे ढग विरून गेले होते आणि आभाळ स्वच्छ झालं होतं. तो दोन मिनिटं थांबला देवयानीला शांत होऊ दिलं आणि मग म्हणाला –
“देवयानी, मला म्हणालीस तू, की काय अवस्था करून घेतली आहेस म्हणून, पण तुझं काय झालं आहे हे मला दिसतंय. डोळे रडून रडून सुजलेले, चेहऱ्यावरची रया पार गेलेली, नेहमी हसतमुख आणि तरतरीत दिसणारी देवयानी, आज कोमेजून गेली आहे. सौन्दर्यवती देवयानीच्या चेहऱ्यावर उदासीची छटा, हे काय आहे? माझ्यावर रागवलीस आणि स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेतलीस? असला वेडेपणा करायची खरंच काही जरूर होती का?” विकासच्या स्वरात काळजी होती.
देवयानीनी मान हलवली. काही बोलण्याचं तिच्यात त्राणच नव्हतं. ती त्याच्याकडे नुसती बघतच राहिली.
“अग आपण दोघंही फक्त आणि फक्त एकमेकांसाठीच जन्मलो आहोत, म्हणूनच तर इतक्या अकल्पितपणे आपली गाठ पडली आणि सगळ्या अडथळ्यांना दूर करून आपण इथ वर पोचलो आहोत. परमेश्वराने आपल्या गाठी वरच बांधल्या आहेत. प्लीज पुन्हा असा गैरसमज करून घेऊ नकोस.” विकासनी समजावलं.
क्रमश:.......
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.