देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३३ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३३

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   ३३    

भाग  ३२   वरून  पुढे  वाचा ......

 

“तू घरी केंव्हा जाणार आहेस? आत्ता तू रस्त्यात आहेस. तू घरी गेल्यावर आपण बोलूया का?” – देवयानी.

“घरी जायला रात्र होईल. – विकास. 

“ठीक आहे न, तू आठ वाजता कॉल कर. मी उठलेली असेन त्या वेळेला.” – देवयानी.

“अग काय घडलं ते शॉर्ट मध्ये सांग ना.” -विकास.

“नको. खूप बोलायचं आहे. तू रात्रीच फोन कर. ठीक आहे?” – देवयानी.

“ओके. बाय.” – विकास.

रात्री नऊ वाजता विकासने  कॉल केला.

“हूं, बोल आता.”

“इंटरव्ह्यु झाला.” देवयानी म्हणाली “तू म्हणालास ते बरोबर होतं. त्यांनी टेस्ट रीपोर्ट मागितला.”

“बघ मी म्हंटलं होतं ना, सरकारी काम आहे.” – विकास. 

“हो रे. रीपोर्ट जवळ होता. तो दाखवला. मग माझे डिटेल्स विचारले. कशासाठी भारतात जायचं आहे ते विचारलं.” - देवयानी.

“मग काय कारण सांगितलं?” – विकास.

“जे खरं आहे तेच. माझं लग्न आहे असं सांगितलं.” – देवयानी. 

“मग?” – विकास.

ते म्हणाले की priority list बनते तेंव्हा, medical emergency, student, diplomats, आणि ज्या कामा करता तुमचं भारतात जाणं आवश्यक असतं ते काम, अश्या प्रकारे लिस्ट बनते. मग मी म्हंटलं की

“माझच लग्न असल्यामुळे मी तिथे असणं आवश्यक आहे.”

“मग? काय म्हणाले ते?” – विकास.

“म्हणाले की बरोबर आहे, तुम्ही eligible आहात, पण ही emergency  नाहीये म्हणून बाकी priorities लक्षात घेतल्यावर तुमचा  नंबर लागेल. मग मी विचारलं की केंव्हा साधारण नंबर लागेल? तर म्हणाले की बहुधा ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. आता ते मला allotment झालं की मेल करणार आहेत.” -देवयानी

“ऑगस्ट म्हणजे अजून दोन महीने.” – विकास. 

“हो पण इतके दिवस गेले तसे ते पण जातील.” – देवयानी.

“ओके. अजून काय म्हणतेस ?” – विकास.

“अरे, आज गंमतच झाली.” देवयानी म्हणाली “ऑफिस मध्ये बॉस ला सर्व सांगितलं तर तो म्हणाला की त्याचा एक मित्र आहे त्यांनी त्यांचे वडील हॉर्ट च्या ऑपरेशन साठी अॅडमिट असल्याचं खोटच सर्टिफिकेट जोडलं होतं त्याचा लगेच नंबर लागला. तू ही असं कर म्हणजे तुला लगेच जाता येईल.”

“बापरे, काय सांगतेस?” – विकास.

“हो पण मी बॉस ला सांगितलं की जन्म भर इथे राहावं लागलं तरी चालेल पण असं खोटं सर्टिफिकेट देणार नाही.” – देवयानी म्हणाली.

“करेक्ट आहे. अग पण तू एक करू शकतेस. मी पाठवू का असं सर्टिफिकेट? तू सांग होणारा नवराच अॅडमिट असल्याने मला जाणं आवश्यक आहे.” – विकास.

“विकास, आता मारीन हं तुला. का असा छळतोस मला, आधीच रडकुंडीला आले  आहे मी. वर तू असं काही तरी विचित्र बोलतोस ?” – देवयानी.

“ओके. ओके, नाही बोलणार, अग गंमत केली मी. नाही करणार आता.” -  विकास.  

“जाऊ दे रे तुला कुठलीही गोष्ट गंभीर पणे घेताच येत नाही का? काही तरी अभद्र बोलतोस नेहमी. जाऊ दे, इतका चांगला मूड होता, घालवलास. ठेवते मी आता मला उशीर होतो आहे. बाय.” – देवयानी.

असेच आठ दहा दिवस गेले. देवयांनीला इतकं काम होतं की त्यांचं बोलणंच झालं नाही. कामातून मोकळी झाल्यावर एक दिवस देवयानीनी रात्री फोन केला.

 

फोन विकासच्या आईने उचलला.

“हॅलो, देवयानी मी यमुना बोलते आहे.”

“आई, तुम्ही? केंव्हा आलात? सर्व ठीक आहे ना? विकास कुठे आहे?”

“अग आम्ही इथेच आहोत नागपूरला.” – यमुनाबाई.

“मग विकास आला आहे का नागपूरला? मला काही बोलला नाही.” – देवयानी.

“तो आला आहे पण अग तो म्हणाला की तुला खूप काम आहे म्हणून तुमचं काही बोलणंच इतक्यात झालं नाही म्हणून. तू काय म्हणतेस ? कुठवर आलं तुझं मिशन इंडिया?” – यमुनाबाई.

“चालू आहे त्यांची procedure असते.” देवयानी म्हणाली. “ती  करणं चालू आहे. तुम्ही सगळे कसे आहात? सर्व ठीक आहे न? नागपूरला तर आत्ता खूप उन्हाळा असेल ना?”

“हो. बाहेर खूप गरम आहे पण घरात काही जाणवत नाही. मागच्या मे मध्ये तर तू होतीसच की इथे. साखरपूडा झाला तेंव्हा, तुला माहितीच आहे.” – यमुनाबाई.

“हो, आठवतंय. आई, जरा विकास ला देता का?” – देवयानी.

“अग विकास बाहेर गेला आहे.” यमुनाबाई म्हणाल्या. “मित्रांच्या बरोबर. उशीर होईल घरी यायला असं सांगून गेला आहे. आणि वेंधळ्या सारखा मोबाइल घरीच विसरून गेला आहे.”

“लॉक डाऊन असतांना बाहेर गेला आहे? आश्चर्य आहे. ते ही मोबाइल न घेता कसा गेला? आई, तुम्ही लोकांनी कसं जाऊ दिलं?” – देवयानी.

 

विकासची आई विचार करत होती की कसं सांगावं या पोरीला की विकास पॉजिटिव आला आहे आणि अॅडमिट व्हावं लागलं म्हणून. देवयांनीला काही सांगू नका असं सांगून गेला होता. कसं कोण जाणे पण तेवढ्यात फोन कटला आणि आईंना सुटल्या सारखं वाटलं.

फोन कटला. देवयानीनी दोनदा पुन्हा प्रयत्न केला पण लागला नाही. देवयानी विचार करत होती की असं काय काम निघालं की विकास लॉक डाऊन चालू असतांना नागपूरला गेला असेल? आणि वर मोबाइल घरी ठेवून कसा बाहेर गेला हा? तिला हे सर्व पचायला जड जात होतं. तिने मग सेजलला सांगितलं. सेजलला सुद्धा  आश्चर्य वाटलं. पण ती काही बोलली नाही. तेवढ्यात राजेश आला आणि ती त्याच्या बरोबर निघून गेली. देवयानी पुन्हा एकटीच.

दुसऱ्या दिवशी सुद्धा देवयानीच्या मनाला स्वस्थता नव्हती, विचार करकरून थकली, आणि शेवटी रात्री दहा वाजता विकासला फोन लावला.

“हॅलो देवयानी, मी अश्विनी बोलते आहे. कशी आहेस तू?”

“मी ठीकच आहे. पण विकास का फोन वर येत नाहीये? त्याला बरं नाहीये का? मला खूप काळजी वाटते  आहे. विकास आला आहे न तिथे?” – देवयानी.

“आहे. विकास आला आहे नागपूरला.” – अश्विनी. 

“तो जर नागपूरला आहे तर फोन वर का येत नाहीये? तुमच्या जवळ का आहे त्याचा फोन? काल आईंनी घेतला होता, आज तुम्ही, असं का? वहिनी मला खरं खरं सांगा. माझी शप्पथ आहे तुम्हाला.” देवयानी आता गोंधळली होती.

“अग आता तुला काय सांगू, शपथ घालून माझी अडचण केलीस बघ.” अश्विनी म्हणाली. “अग सर्वानुमतेच असं ठरलं होतं की तू तिकडे दूर, दहा हजार मैलांवर, आधीच तिकडे तुझी फरफट चाललेली आहे. मग अश्या परिस्थितीत तुला अजून टेंशन येईल, म्हणून सांगितलं नाही. विकास पण म्हणाला की तुला सांगू नका म्हणून.” 

“अहो पण काय नका सांगू, असं म्हणाला?” देवयानी कापऱ्या आवाजात म्हणाली. “वहिनी माझ्या पासून काही लपवू नका. त्याला माझ्याशी बोलायचं नाहीये का? त्याच्या मनातून मी उतरली आहे का? माझ्याशी बोलण्याचा त्याला त्रास होतो आहे का? लग्नाचा विचार बदललाय का, वहिनी सांगा, गप्प नका राहू. इकडे माझा जीव जायची वेळ आली आहे.”

“देवयानी, तुझी अवस्था मी समजू शकते, अग असं काहीही नाहीये. उगाच भलते सलते विचार मनात आणू नकोस. तुमचं लग्न होणार आणि तू आमच्या घरात येणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. तुझी भेट होत नाहीये म्हणून विकास किती व्याकूळ झाला आहे, हे आम्हाला दिसतच आहे. नको असे भलते सलते विचार मनात आणू आणि टेंशन तर मुळीच घेऊ नकोस.” अश्विनीनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. 

“अहो पण मग झालय तरी काय?” – देवयानी.

“इथे आल्या, आल्याच  त्यांच्या अंगात सडकून ताप भरला. एकदम १०२ पर्यन्त चढला, आणि खोकला पण बराच वाढला होता. थकवा पण इतका आला होता की काही विचारू नकोस.” – अश्विनीनी माहिती दिली. 

“मग?” – देवयानी म्हणाली. एक अशुभ शंका तिच्या मानायला चाटून गेली.

“मग काय? आम्ही सगळेच घाबरून गेलो होतो. विकासला कधी आम्ही आजारी पडतांना आजवर पाहीलच नव्हतं. मग  डॉक्टर कडे नेलं तर ते म्हणाले की टेस्ट करून घ्या. मग टेस्ट केली, आणि जे नको होतं तेच झालं. तो पॉजिटिव निघाला. त्याला काल हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलं आहे.” – अश्विनी.

क्रमश: .........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.