देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३८ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३८

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   ३८        

भाग  ३७  वरून  पुढे  वाचा ......

 

एवढं सांगून झाल्यावर पूर्णिमा थांबली. नुसत्या आठवणीनी सुद्धा तिला धाप लागली. सेजल पुढे झाली आणि तिने पूर्णिमाला जवळ घेतलं. आणि थोपटलं. म्हणाली,

“देवाचे आभार मान. चांगली माणसं भेटली तुला. नाही तर काय झालं असतं याचा विचारही करवत नाही. पण काळजी करू नकोस, आता तू सेफ आहेस.” मग नंतर कोणीच बोललं नाही. सेजल आणि देवयानी काही न बोलता किचन मध्ये गेल्या. जेवणाची व्यवस्था तर करावीच लागणार होती.

पण देवयानीच्या लक्षात आलं की पूर्णिमा धावतच बाहेर पडल्या मुले तिच्या जवळ सामान काहीच नव्हतं.

“पूर्णिमा, अग तुझं सामान?” देवयानीनी विचारलं. “पर्स, पासपोर्ट, लॅपटॉप, कपडे हे सगळं कुठे आहे?”

“ते सगळं रूम वरच राहीलं. आता ते आणावच  लागणार आहे. पण आता मला राजूची भीती वाटते. राजू जर बदला घेण्याच्या मूड मध्ये असेल तर काय करायचं मी?” पूर्णिमा म्हणाली. जरा घाबरलीच होती.

“सेजल,” देवयानी म्हणाली, “तू आणि राजेश शनिवारी म्हणजे परवा पूर्णिमा बरोबर तिच्या रूम वर जाऊ शकाल का ? तिचं सामान तर आणावं लागणार आहेच ना.”

“हो खरंय, विचारते मी राजेश ला.” मग सेजलने राजेश ला फोन लावला.

“राजेश काय करतो आहेस ?”

“काही नाही. का ग?” – राजेश.

“जेवायला येतोस का?” – सेजल.

“आत्ता?” – राजेश.

“हो.” – सेजल. 

“येतो ना. तू बोलावणार आणि मी नाही कसं म्हणणार? येतो मी.”- राजेश म्हणाला. 

देवयानीनी मान डोलावली. पूर्णिमा दरवाजात  उभी होती. ती सर्व ऐकत होती. तिचा आवाज भरून आला, म्हणाली

“इतकी कशी ग मी मूर्ख! तुमच्या सारख्या मैत्रिणींना काय वाट्टेल ते बोलले. सॉरी यार. शेवटी, तुमचाच आधार वाटला म्हणून मी परत इथेच आले. खरंच सॉरी. राजेश येईल का ग आपल्या बरोबर?”

“येईल. तू नको काळजी करू.” सेजल म्हणाली. “तो आता इथेच येतो आहे. तू तर ऐकलं आहेस ना ?”

थोड्या वेळाने राजेश आला. त्याला पूर्णिमाची सगळी कहाणी सांगितली. तो सुद्धा ऐकून हतबुद्ध झाला. तो पूर्णिमा ला म्हणाला

“तू एवढं जिवापाड प्रेम केलं त्याच्यावर आणि तो कसं वागला बघ. शेवटी हिरा कळायला पारखीच लागतो. तू काळजी करू नकोस. अग मी एकटाच नाही, अजून दोघा जणांना घेऊन येईन बरोबर. रीलॅक्स.” – राजेश. 

तो असं म्हणल्यावर तिघी जणींच्या डोक्या वरचं ओझं उतरलं. राजेश निघून गेल्यावर मग देवयानी म्हणाली की “मी नागपूर ला फोन लावते आहे.” बराच उशीर झाला होता पण फोन लावल्या शिवाय देवयानीला चैन पडणं शक्य नव्हतं.

“हॅलो देवयानी, कशी आहेस?” – अश्विनी.

“कशी दिसते आहे मी वहिनी, तुम्हीच सांगा.” असं म्हणून देवयानीनी एक झकास स्माइल दिलं.

“आली, आली पूर्वीची देवयानी आली.” अश्विनी खूप उत्साहाने म्हणाली. “आता काळजी नाही. विकास जेंव्हा तुझा असा हसरा चेहरा बघेल ना, तेंव्हा तो लगेच उड्या मारायला सुरवात करेल.  थकवा बिकवा एकदम गूल. तूच त्याचं खरं औषध आहे, देवयानी. बाकी सब झूट.”

“काय हे वहिनी! इतकं काही नाहीये.” देवयानी असं बोलली खरी, पण तिच्या गालावर चढलेली लाली सर्व काही सांगून गेली.

“अरे, काय लाजली आहे देवयानी. हुररे असं म्हणत, ग्रँड परफॉर्मेंस देवयानी, वाह कया बात हैं. देवयानी, अजून एकदा होऊन जाऊ द्या.” हे अंकुश बोलला. अंकुश आणि मनीषा मुद्दाम आले होते, देवयानीशी बोलायला.

आता देवयानीला कॅमेऱ्या समोर बसणं कठीण झालं. तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. आणि हळूच थोडी दूर सरकली. तिकडे नागपूरला हास्य कल्लोळ उडाला. अंकुश मनीषाला म्हणाला,

“काय मनीषा, अगदी प्रॉपर वेळेला आलो आहे ना आपण.” – अंकुश. 

“हो हो, करेक्ट आहे. टाइमिंग एकदम परफेक्ट. देवयानी, अजून एकदा. वन्स मोर.”

हा सगळा  संवाद देवयानी ऐकत होती, आणि अजूनच लाजून चूर होत होती. वन्स मोर वर नागपूरला पुन्हा एकदा हसण्याचा गडगडाट झाला. आता देवयानीला पण गप्प बसणं कठीण झालं. आणि तिला पण हसू फुटलं. आणि ती पण खळखळून हसायला लागली. तिचा हसण्याचा आवाज ऐकून अंकुश ओरडला, “समोर या, समोर या.” देवयानीनी लॅपटॉप सरकवला. आता ती सर्वांना दिसत होती. तिला असं  निर्झरा सारखं निर्मल हसतांना  बघून सगळ्यांना जो आनंद झाला त्याला तोंड नव्हती.

असा प्रचंड गोंधळ बराच वेळ चालला. मग सगळे शांत झाल्यावर देवयानी म्हणाली की

“मला कोणी तरी अपडेट देणार का? नाही तर तेच राहून जायचं.”

“करेक्ट आहे. करेक्ट आहे.” भैय्या म्हणाला. “देवयानी, दोन डोस दिल्या गेले आहेत, आणि आज विकासच्या प्रकृती मध्ये बरीच सुधारणा दिसली आहे असं डॉक्टर म्हणत होते. आज रात्री आणि उद्या रात्रीचा डोस झाल्यावर वेगाने सुधार होईल असं म्हणत होते.”

“तुम्ही केंव्हा भेटणार त्याला?” – देवयानी.

“नाही ग ते शक्य नाहीये. सध्या तरी डॉक्टर सांगतात तेच खरं. पण डॉक्टरांच्या म्हणण्या नुसार, त्याची प्रकृती आता सुधारते आहे तेंव्हा काळजी नाही. तेंव्हा रीलॅक्स. आजच्या सारखीच आनंदी रहा. आणि हसत रहा. ओके?” – भैय्या.

“ओके. ठेवते मग आता. बाय.” – देवयानी.  

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे सेजल आणि देवयानी लॅपटॉप घेऊन बसल्या होत्या. पूर्णिमा जवळ लॅपटॉप नव्हता त्यामुळे ती नुसतीच बसली होती. कपडे सुद्धा सेजल चे उसने घेतले होते. थोड्या वेळाने बॉस चा पूर्णिमा ला फोन आला. तो फार चिडला होता. दोन दिवस पूर्णिमा कामावर आली नव्हती आणि तशी सुट्टीची सूचना पण दिली नव्हती. बॉस वर कामाचं लोड खूप होतं, आणि त्यात पूर्णिमा गैरहजर. तो सॉलिड चिडला होता आणि पूर्णिमाला खूप झापत होता. आता पूर्णिमा रडायलाच लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून सेजल आणि देवयानी धावत बाहेर आल्या.

“काय झालं ग ? का रडते आहेस ?” देवयानीनी विचारलं. पूर्णिमाने काही न बोलता फोन कडे बोट दाखवलं आणि ओठांची हालचाल करत बॉस असं म्हंटलं.

देवयानीनी विचारलं. “अग तू सांगितलं नाहीस का कुठल्या परिस्थितीतून तू जात आहेस ते?”-

पूर्णिमाने नकारार्थी मान हलवली.

“अग मग सांग न.” – देवयानी. 

“ठेवला बॉस नी फोन. खूप चिडला आहे माझ्यावर.” – पूर्णिमा. 

“अग त्याचं बरोबरच आहे. तू सांगायला पाहिजे ना.” – देवयानी.

“अग मला सांगायला त्यानी वेळच दिला नाही. फोन उचलल्यावर जो तोफखाना सुरू केला तो फोन ठेवे पर्यन्त.” पूर्णिमानी रडतच सांगितलं.

“हं. मला ब्रेक मिळाला की मी बोलते बॉस बरोबर.” सेजल म्हणाली.

मध्ये थोडा ब्रेक मिळाल्यावर सेजल बॉस शी बोलली. बॉस ला पण खूप वाईट वाटलं पूर्णिमाची झालेली परवड ऐकून.

“आता कशी आहे ती?” – बॉस.

“तशी ठीक आहे.” सेजल म्हणाली. “ पण मनाने खूप खचली  आहे. तिला सावरायला थोडा वेळ लागेल सर.”

“ओके. दिला वेळ. पण मी काय म्हणतो, की तिला सांग की इंडियात परत जाण्यासाठी प्रयत्न कर म्हणून. इथे आता तिचं मन कामात लागणार नाही. आपल्या माणसात गेली तर लवकर भानावर येईल.” – बॉस 

“हो. सर, मला पण पटतंय तुमचं म्हणण. सांगते तिला.” – सेजल. 

संध्याकाळी सगळे काम संपवून चहा पित असतांना सेजल नी पूर्णिमाला बॉस काय म्हणाला ते सांगितलं.

पूर्णिमा काहीच बोलली नाही.

काय झालं पूर्णिमा, तू बोलत का नाहीये.”- सेजल.

“काय बोलू मी? ज्या वेळी मी राजू कडे राहायला गेली त्याच वेळी आईने सांगितलं” पूर्णिमा दुखावल्या स्वरात म्हणाली “की आता तू आम्हाला विसर. घरी वापस येण्याचा विचार पण करू नकोस.” –

“का ग? आईच असं म्हणाली? विश्वास नाही बसत.” – सेजल. 

“तिची काहीच चूक नाहीये ग. माझ्या धाकट्या दोन बहि‍णी आणि एक भाऊ आहे. मोठी बहीण कोणा बरोबर तरी, बिन लग्नाची राहते, हे कळल्यावर त्यांची लग्न होतील का, अशी आईला भीती वाटते आहे.” पूर्णिमा म्हणाली.

“हं. आहे खरं. आपल्याकडे अशी परिस्थिती आहेच. आणि आमच्या मते ते बरोबर पण आहे. लग्न कसं, देवाच्या, अग्नीच्या साक्षीने झालं पाहिजे असेच संस्कार आपल्यावर आहेत.” सेजल बोलली.

“हो ग, पण मला ते आत्ता पटतेय. त्या वेळी मी राजूच्या प्रेमात पूर्ण अडकून गेली होती. मला काही दिसतच नव्हतं. या देवयानीनी तिच्यावर राजू मुळे आलेला प्रसंग पण सांगीतला होता, मला सावध करण्याचा प्रयत्न केला होता देवयानीने, पण मी तिच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. आता त्याची फळं भोगतेय. काय करू ग मी आता. इथे माझं मन थाऱ्यावर राहणार नाही आणि माझ्या देशात मला पाय ठेवायला जागा नाही.” पूर्णिमा बोलता बोलता रडायला लागली. देवयानी आणि सेजल दोघींच्या कडे याचं सोल्यूशन नव्हतं. त्या गप्प बसल्या.

 

क्रमश: ........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.