पुष्पदरीतील झुंज.., आयुष्याशी Aaryaa Joshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुष्पदरीतील झुंज.., आयुष्याशी

यावर्षी व्हॅलीला जायचं तिचं नक्की झालं होतं.आईला चारधाम करण्याची इच्छा होती.पण एकदम सगळं जमणं कठीण वाटत होतं.त्यामुळे आईचं बद्रिनाथ होईल आणि आपला व्हॅलीला जाऊन ट्रेक आणि फुलांचा अभ्यास दोन्ही होईल अशा विचाराने तिने मावशीला आणि काॅलेजमधली घट्ट मैत्रीण अनुयालाही बरोबर न्यायची तयारी केली. चौघीच जाणार म्हणून बाबा काळजीत होते पण तिचा मित्र  राकेश त्याचदरम्यान त्याच्या ट्रेकिंग क्लबबरोबर आसपासच्या परिसरात फिरणार होता.त्यामुळे सगळंच जुळून आलं.

पहिला प्रवास सुखरूप पार पडला आणि मंडळी मजल दरमजल करीत घांगरियाला पोहोचली. आई आणि मावशी गोविंदघाटहून घांगरियाला घोड्यावरून येऊन हाॅटेलात दाखल झाल्या आणि ती म्हणजे स्वप्नजा आणि अनुया राकेशच्या समूहाबरोबर दिवसभराची खडी चढण चढून पोहोचल्या. दमून झोपल्या आणि पहाटे अंमळ चारच्या आसपासच उठून राकेशच्याय गटासह त्या दोघींनी पुष्पदरीची वाट चोखाळायला सुरुवात केली. ग्लेशिअरच्या वितळलेल्या बोचर्‍या पाण्याचे झरे,आकाशाशी स्पर्धा करणारे हिमालयाचे पर्वत, भोवतालची आच्छादित वनराजी आणि पुष्पदरी नाव सार्थ करणारी फुलांची आरास आणि गालिचे....


तिने टिपण साहित्य कॅमेरा सोबत घेतला होताच. स्वप्नजाला पी.एचडी नंतर पोस्ट डाॅक्टरेट करण्यासाठी पुष्पदरीतल्या विशिष्ट फुलाचा अभ्यास करण्याची तीव्र इच्छा होती.त्यासाठी तिच्या मार्गदर्शकांनी तिला प्रोत्साहन दिलं होतं.विशिष्ट काळात पण अगदी कमी काळासाठी उमलणारी हिमालयाच्या पुष्पदरीतली ही नाजूक वनस्पती अभ्यासणं हे आव्हानच होत.पण स्वप्नजाची जिद्द दांडगी होती.त्यामुळेच राकेश आणि अनुयाही तिला मदत करत होते.


मधल्या टप्प्यात आल्यावर बरोबरचा कोरडा खाऊ सगळ्यांनी खाल्ला.गार झर्‍याचं पाणी प्यायले. आता विरळ हवामानात श्वास घ्यायलाही त्रास होत होता पण एकमेकांचं मनोबल वाढवत हसत खेळत सगळे पुढे जात होते.निघण्यापूर्वी महिनाभर केलेला व्यायाम इथे उपयोगी पडतो अशावेळी!


अचानक.... अनुयाच्या लक्षात आल.... स्वप्नजा?????


तिने राकेशला हाक दिली... शोधाशोध आणि धांदल उडली....


इकडे फुलांचा सुगावा लाजल्याने भान हरपून स्वप्नजा पुढे जात राहिली.फोटो काढणं,सोबतच्या पिशव्यामधे जपून फुलांचे नमुने गोळा करणे यात तिलाही कळलं नाही की ती सर्वांपासून लांब वेगळ्याच वाटेने पुढे भरकटली होती.... आत आत उंच झाडांच्या  गर्द सावलीत  पोहोचली.....


आपण कुठे आलो आहोत याची तीव्रतेने जाणीव होण्यापूर्वीच ती जोरात किंचाळली... एक युवक निपचित अवस्थेत पदला होता... तो जिवंत होता की.....??? खरचटलेला... काट्याकुट्यांच्या रूतलेल्या खुणा... जखमी... कपडे फाटलेला,,, पाठीवर सॅक तशीच,.. बूट फाटलेले....


ती क्षणभर धीर करून सावरली. दबकत पण भेदरलेल्या धडधडत्या हृदयाने पुढे गेली..... तो जिवंत होता... श्वास मंदावला होता पण चालू होता श्वास.......


तिने क्षणाचाही विलंब न करता आपली सॅक, कॅमेरा उतरवला.त्याच्या तोंडावर पाणी मारलं बाटलीतलं सपासप... त्याच्या छातीवर चोळलं.... पण तो अजूनही निःशब्द होता....


दोन दिवस एक गिर्यारोहक वाट चुकलेला असून त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक संस्था हेलिकाॅप्टरने प्रयत्न करीत आहेत हे तिला ऐकून माहिती होतं.सगळ्याचं हळहळूनही झालं होत. पण हाच असावा तो,.,. पण तो गिर्यारोहक व्हॅलीत वाट चुकला नव्हता... मग हा इथे कसा आला????? विचारांच्या आवर्तात ती हेही विसरली की आपण स्वतःही वाट चुकलो आहोत आणि आपल्याला सगळे शोधत असणार... आता आपण दोघेही समदुःखी... हा अनोळखी गिर्यारोहक आणि आपण स्वतः.


अंधारायला लागलं.तिलाही दमल्यासारखं झालं.तेवढ्यात त्याचा थकलेला क्लांत अस्पष्ट हुंकार तिने ऐकला.


तिने त्याला पाणी पाजलं. त्याला कसंबसं बसतं करून त्याची सॅक काढली.उघडली आणि आता फर्स्ट एडचं सामान हाती लागलं.बिस्कीटचा पुडा आणि इलेक्टालचं पाकिटही!!! टाॅर्चही होता.


ती आता सावरली तोच हेलिकाॅप्टरची घरघर ऐकू आली.पण तिला ते दिसेना!!! त्यांना ते कसे दिसणार!! तिच्या पल्लवीत आशा क्षणात मावळल्या.


थकल्या मनाने आणि शरीराने ती लुडकली.शरीराच्या विधींचं भानही विसरून गारेगार झोप लागली तिला तिथेच त्याच्या शेजारी.


जाग आली तेव्हा उजाडत होतं. तो अजूनही अस्पष्ट पुटपुटत होता, तो जिवंत आहे अजून... तिने घाइघाईने बाटलीत इलेक्टाल भरून त्याला महत् कष्टाने पाजलं. स्वतः चार बिस्कीटं कोंबली. त्याच्या जखमा आपल्या स्कार्फने पूसून मलम लावलं. रूतलेले काटे तिला काढायला भिती वाटली पण प्रयत्न केला निकराने. गालावर अडकलेला काटा निघाल्यावर तो विव्हळला अस्पष्ट.पण तिला त्यामुळे हुशारी आली.डोळे किलकिले करून त्याने पाहिलं तिला पण पुन्हा निपचित झाला काहीसा मनोमन नकळत आश्वस्त होऊन.


आता तिला आपल्या शरीराची,मनाची!बुद्धीची जाणीव झाली.... दोघांचीही सुटका होणं हे आता महत्वाचं होतं.....


सुदैवाने हा विचार मनात येताच पुन्हा हेलिकाॅप्टरचा आवाज आला.... तिच्या डोक्यात वीज चमकली आणि तिने कॅमेरा उघडला.आकाशाच्या दिशेने लेन्स करून तिने क्लिकक्लिकाटच सुरु केला.त्या गर्द झाडीतून हा चकचकाट वर दिसावा वैमानिकाला ही तिची अपेक्षा.... आवाज वाढे आणि कमी होई.घिरट्या घालण्याच्या आजच्या प्रयत्नात तिची युक्ती वैमानिकाला दिसली.कुठूनतरी गर्द झाडीतून मधेच चकाकतय. एक प्रयत्न करून पाहू....


सफल शोध... वाढणार्‍या घरघर आवाजाने ती सूखावली.जोरजोरात ओरडू लागली. स्कार्फ हवेत हलवू लागली.कॅमेर्‍यातून क्लिक करत राहिली... मदतीचा दोर आणि एक सहाय्यक अंतिमतः त्या गर्द झाडीत उतरले. अनपेक्षित त्याला पाहून तिला हुंदकाच फुटला....


....... आता ते दोघेही गोविंदघाटच्या इस्पितळात होते.... सुखरूप.....


तोही शुद्धीवर आला आहे.नाजूक आहे प्रकृती पण सुखरूप आहे... भटकंती करताना वाट चुकला आणि पाय निसटून दरीत कोसळला.नशीब बलवत्तर म्हणून वाचला. मोडक्या आणि सुजलेल्या हातापायाने जिवाच्या आकांताने दरी चढून जीवाशी आणि आयुष्याशी खेळ खेळतच इथे आला.... एवढंच आठवलं त्याला.... दिशाज्ञान,भूगोल!नकाशे सर्वच थिटं पडलं होतं त्याच्यासाठी... पण देवाने स्वप्नजाच्या रूपात त्याला नवं आयुष्य भेटवल...


तो मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. अभियंता आहे. आता आयुष्य पूर्ववत होतं आहे. स्वप्नजाच्या रूपाने एक छान मैत्रीण त्याला मिळाली आहे..