Shamya - The Bekuf books and stories free download online pdf in Marathi

शाम्या - द बेकुफ!

" सुरश्या, उद्या तुझ्या कडे नगरला येतोय." एक दिवशी अचानक फोन आला.
" हॅलो, पण कोण बोलतंय?" असं बेधडक बोलणारा माझ्या माहितीत कोणी नाही.
" शरम नाही वाटत असं विचारायला? अजून तसाच आहेस डॅम्बीस! "
शंकाच नाही, बेकूफ शाम्याचं असणार!
" कोण, शाम्या तू? किती दिवसांनी भेटतोयस? पण तू कुठे आहेस? कसा येणार आहेस? बसने, रेल्वेने कि .....
"माझी गाडी घेऊन येतोय. बाकी सगळं भेटल्यावर, पैले तुझा पत्ता सांग."
" प्रेमदान चौकात ये, तेथे सिग्नला थांब, अन मला रिंग दे, मी येतो न्यायला."
"बाय!" त्यानं फोन कट केला.
प्री -डिग्रीला शाम्या माझ्या सोबत होता. बी. एस. सी. पर्यंत कॉलेजात हुंदडून एम.एस.सी साठी, औरंगाबादला गेला. त्यानंतर म्हणजे, बारा- पंधरा वर्षा नंतर भेटत आहे. माझा फोन नम्बर कसा मिळवला कोणास ठाऊक? पण श्याम्या असले चमत्कार करू शकतो!

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ च्या सुमारास ' सिग्नल जवळ आलोय ' असा शाम्याचा फोन आला. मी लगबगीने चौकात गेलो. कोठेच दिसेना. मी फोन काढला.
" श्याम्या कुठयस?"
" सिग्नल जवळ!" शाम्या कधीकधी वस्तुनिष्ठ उत्तर देतो.
" मी पण तिथेच आहे, तू दिसत नाहीस!, कोणत्या सिग्नला आहेस?"
"मला काय माहित?'
"बेकूफ, गाडीची खिडकी उघड, समोर एखादी पाटी असेल तर वाच. "
" तोफखाना पोलीस!"
श्याम्यान एकदम कन्डम माणूस. भलत्याच सिग्नलला थांबलाय!
"शाम्या तसेच उघड्या खिडकीतून मुंडक बाहेर काढ, समोर दिसेल त्याला प्रेमदान चौक विचार अन ये " मी आता वैतागलो होतो.
"सुरश्या, समोर ना एक गाढव आहे! अन त्याला बोलता येत नाही!"
"मग एखाद बोलणार गाढव बघ!,नीट पत्ता एकत नाहीस अन भलतीकडेच जातोस.".
वैताग साला ..... मी फोन कट केला. दहा -पंधरा -वीस मिनिट झाले. शाम्याचा पत्ता नाही! पाच मिनिटाचा रस्ता आहे, एव्हाना यायला पाहिजे होता. कुठं तडमडलंय कोणास ठाऊक? पुन्हा फोन लावला .
" श्याम्या कुठयस?"
"हे काय, तुझ्या डाव्या बाजूलाच आहे! पांढऱ्या अल्टोत!" शाम्याच्या मक्ख उत्तराने माझा पार उकळू लागला.
" बेकूफ, बाहेर ये." मी ओरडलो.
गाढवी रंगाच्या सफरीत पायात स्लीपर घातलेला श्याम्या, तीन जागी चेमटलेल्या अल्टो तुन पाय उतार झाला.
" तू नको, म्हणला अस्तास तर आलो नसतो! फुकट ताटकळत ठेवलास!" तो मलाच म्हणाला.
"मी? कस काय?"
" तू माझ्या कड पाहिलंच नाहीस! मी गाडीतून तुला किती हातवारे केले! पण तुझं सगळं लक्ष 'रंगीत' स्कुटया कडेच!"
मी कपाळाला हात मारून घेतला. ह्या माकडाच्या गाडीच्या खिडक्यांना स्क्रीन लावलेत. याला बाहेरच दिसत, पण मला बाहेरून आतलं दिसत नाही! हे त्याच्या लक्षात आले नाही. ( आणि आले असते तरी, त्याने ते मान्य केले नसते!) वर मलाच डाफरतोय! श्याम्या न असाच आहे!
शाम्याचे नगरला नेहमीच येणे जाणे सुरु झाले. मग त्याने नगरलाच सेटल व्हायचे ठरवले. मलाही आनंद झाला.

शाम्या नगरला आला आणि येथेच रमलाय. घर -बीर घेतलय. चार दिवसाखाली त्याचा घरी गेलो होतो.
" कशाला आलास? फोन करायचा. मुडक्याच्या टपरीवर धडकलो असतो. पण तू कसला चेंगट? फोनचा रुपया वाचवलास!, घरापर्यंत तंगडतोड केली असशील!," दार उघडत शाम्या बरळला.
" अरे तस नाही, या बाजूला आलो होतो, म्हणलं तुला भेटून जावं, अन हे काय? थोबाडाला पांढरी माती का लावलीस?"
"अडाणी तो अडाणीच राहिलास!, अरे, याला मुलतानी मातीचा फेस पॅक म्हणतात! सुभ्याच्या पोरीचं लग्न आहेना दोन दिवसांनी, त्याचीच तयारी चालू आहे! कपडे तयार आहेत, उद्या फक्त कलप केला कि झाले!"
लग्न म्हणलं कि आमच्या शाम्याच्या अंगात सनसरते! आता या वयात म्हणजे बासष्टीत काय करायचंय याला फेस पॅक अन कलप! पण गडी ऐकत नाही! कलप केल्यावर, ना शाम्या विचित्र दिसतो. जुन्या देवद्वारच्या लाकडी पाटाला, चकचकीत नवा सन्मायका लावल्यावर, तो जसा देखणा, दिसण्या ऐवजी दीनवाणा दिसतो तसा शाम्या दिसतो! पण हौस!
"काय सुरश्या, माणसांनी कस अपटुडेट रहावं."
" पण श्याम्या, तुला नाय बर दिसत.".
" तुला, बर दिसत नाही ना? मग मला ते छानच दिसत असणार! तुला कुठे माझं 'चांगलं 'बघवत!"
श्याम्या न असाच आहे. आडमुठ.

कॉलेज मध्ये असल्या पासून शाम्याला लग्नच आकर्षण आहे. त्याच कारण त्यातले बँड वाले! श्यामला जुन्या गाण्याचे प्रचंड वेड आहे. आम्ही शाम्याच्या खोलीवर एकत्र अभ्यास करायचो. साधारण रात्री अकराच्या सुमारास हा डुकल्या घ्यायला लागायचा. ' सुरश्या,डोळ्यावर झापड येतीय, चहा कर ना.' म्हणायचा. मग आम्ही फरफऱ्या स्टोव्ह वर चहा करायचो. चहा पिल्यावर हा फडताळातून बुलबुल तरंग काढायचा. ( हल्ली हे वाद्य दुर्मिळ झालंय.) गच्चीवरच्या मुंडेरीवर बसून श्याम्या त्या बुलबुलतरंगावर झकास गाणी वाजवायचा. त्यावर त्याने वाजवलेले 'रमया वस्तावया ' काय किंवा ' खोया खोया चांद' काय, मूळ गाण्या पेक्ष्या गोड वाटायचे. ती निवांत वेळ, निरव शांतता, लख्ख चांदणं, आणि बुलबुलतरंगावर तरंगणारे सूर! तेव्हा पेक्षा हि आज त्या आठवणींची नशा औरच वाटते. पण शाम्याने कधी चार - चौघात आपले 'हुन्नर ' दाखवले नाही. असो.

भडक निळ्या रंगाचा, बटबटीत जरीकाम असलेला, बंद गळ्याचा गुढग्या पर्यंत पोहंचणारा कोट, खाली चुडीदार विजार /पायजमा घालून, हा सुभ्याच्या पोरीच्या लग्नाला, कार्यालयाच्या कर्मचाऱ्याच्याहि आधी हजर होता. मी नवाच्या सुमारास गेलो तर हा गुलाबदाणी घेऊन मुख्य दारात स्वागताला उभा!
" शाम्या, अरे लग्न दहाचे तू इतक्या लवकर का उभा आहेस?"
" आत्ता पाहुणे येतील. आपण आपलं तयारीत असावं. सुभ्या कुठं कुठं पहाणार? तसे हि त्याच्या कडे माणूस बळ कमीच आहे. बर, ते जाऊदे माझा ड्रेस कसा आहे?"
"शाम्या, तुझे कपडे ना एकदम भारी असतात!" शाम्याची कळी खुलली. हे मात्र एकदम खरे आहे. याचे कपडे खरच भारी -म्हणजे किमतीला -असतात, पण याला ते शोभत नाहीत. आमच्या काळी सिनेमातला एक ततंगडा हिरो भलताच फार्मात होता. त्याला मारे राजकुमाराचे, पोलीस इंस्पेक्टरचे तगडे रोल मिळायचे.पण भिकार पर्सनॅलिटी मुळे, राजकुमाराच्या कपड्यात तो बँडवाल्या सारखा अन पोलिसांच्या कपड्यात गुरख्या सारखा दिसायचा! तस काहीस आमच्या शाम्याच आहे. पाच फुटी उंची, अधिक जम्बो ढेरी, त्यावर हा 'हेवी ' ड्रेस! शाम्या एकदम ' कार्टून ' दिसत होता. त्यावर कहर पायात, दोन पट्ट्याची स्लीपर! मी त्याला बरेचदा सांगून पहिले. पण हा ऐकत नाही. वर मलाच, 'तुला माझे बरे बघवत नाही! ' म्हणतो.

लग्नाचा दिवसभर शाम्या मांडवभर नाचला. भटजीची 'डिमांड ', पूजेत बसलेल्या सुभ्यास काय हवे नको ते पहाणे, व्याही, पै-पाहुणा, सगळं जातीने पहात होता. त्याला जेवणाची सुद्धा शुद्ध नव्हती. सर्व कार्य उरकले. मुलगी सासरी जायला निघाली. सारेजण तिला निरोप देण्यासाठी सजवलेल्या गाडी जवळ जमले होते. तेथे नव्हता तो, फक्त शाम्या! मी रिकाम्या मांडवात आलो. शाम्या एका खांबाआड पाठमोरा बसून हुंदकेदेत रडत होता!
"शाम्या, सावर स्वतःला. वेड्या सारखा रडतोयस काय? आत्ता लोक परत येतील. 'का रडतोस?' विचारलंतर, काय सांगणार आहेस?" मी हलकेच त्याचा पाठीवर हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.
" आज माझी अलकी असती, तर याच वयाची असती रे ... " त्याला पुन्हा हुंदका आला. मी फक्त त्याच्या पाठीवर हात ठेऊन होतो. बेकूफ खूप हळवं आहे! पण आत्ताचे त्याचे वागणे सहाजिकच होते.

शाम्याला एक मुलगी होती. तशी ती उशिराच झाली होती. श्याम्याचा तिच्यावर खूप जीव होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला पोलिओ झाला! ती फार दिवस जगणार नाही, हि वस्तुस्थिती डॉक्टरांनी आधीच सांगितली होती! गोबऱ्या गालाची गोड अलकी मी खूपदा पहिली होती. (म्हणजे जेव्हा श्याम्या कडे जायचो तेव्हा ) तिला खरडून इकडे तिकडे सरकताना पाहून मला सुद्धा काळजात चर्रर्र करायचे! तीच बोलणं, टीव्हीतल्या नकला, तिचा रुसवा, तिची तडफड, ------ तीच फुलणाऱ्या वयाचा, आणि कमी होणाऱ्या आयुष्यचा प्रत्यक्ष क्षण, श्याम्याने तिच्या सोबत घालवलाय!बायको मेल्यावर पोरी साठी, त्याने आठ -दहा वर्षाच्या सर्व्हिस वर पाणी सोडले होते! श्याम्या खरच 'बाप ' माणूस आहे! आज त्याची अलकी जिवन्त असती, तर सुभ्याच्या पोरी इतकी झाली असती. तीही उपवर झाली असती! श्याम्याच्या मनाची अवस्था मला जाणवत होती.
शाम्या शांत झाला. बेसिनवर तोंड धून आला.
"चल शाम्या चहा घेऊन येऊ, सोबत बन नायतर खरी." बेकूफ सकाळ पासून उपाशी आहे.
" सुरश्या, तुला न माझं ' चांगलं ' बघवत नाही, तस ' वाईट ' पण बघवत नाही. " घोगऱ्या आवाजात शाम्या पुटपुटला.
श्याम्या न असाच आहे!

------सु र कुलकर्णी ---. तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED