Ketki books and stories free download online pdf in Marathi

केतकी!

सरस्वती विद्यालयाच्या (मुलींची शाळा ) तीन माजली इमारतीच्या पायऱ्यांत, पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता. त्यात ती, चार दिवसाखाली आलेली नवीन मुलगी, गालावर गोड खळी असलेली, केतकी, पण होती. नवीन असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारश्या ओळखी झाल्या नव्हत्या, तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा एकात होती.
"मग? मग काय झालं?" पिंकीने विचारले.
"मग, ना, मला त्या अंधाऱ्या कोपऱ्याची खूप भीती वाटू लागली!" मंजिरी सांगत होती.
"का? तेथे काही होत का?"
"काय माहित? मला कस दिसणार? तिथं अंधार होता ना! पण काहीतरी डोकं -हात असल्या सारखं वाटत होत!"
"बापरे! मग?"
"मग आईने लॅम्प लावला. त्या कोपऱ्यात काहीच नव्हतं! मला अंधाराची खूप भीती वाटते! लहानपणा पासून!"
केतकीने नेमका धागा पकडला. सगळ्या पोरी किती उछुकतेने ऐकतात आहेत? मोठ्ठाले डोळे करून. या पोरींना 'भुताच्या' गोष्टी सांगितल्या तर? काय हरकत आहे? खूप फ्रेंड्स मिळतील! आत्ता आपल्याशी, फारस कोणी बोलत नाही. काही जणी तर, त्यांच्या ग्रुप मध्येपण, येऊ देत नाहीत! आपला चांगलाच भाव वधारले. शाळेत एकदम फेमस होऊन जावू! अन आपल्या इतक्या भुताच्या गोष्टी, कोणाला ठाऊक असणार आहेत?
"मंजिरी, तुला अंधारात भूत बसलंय, असे वाटले असेल!" केतकीने त्यांच्या चर्चेत आपला सहभाग नोंदवला.
"हो, असच असेल! माझी गावाकडची आजी पण म्हणते, कि अंधारात भूत असतात!" पिंकीने केतकीला सपोर्ट केला.
"ये, यार, व्हॉट 'भूत' मीन्स?" नकट्या ज्योसनेने विचारले. हि इंग्रजी मेडीयम वाली!
" 'भूत', म्हणजे ना घोस्ट!" शबरीने ज्योसनेची शंका दूर केली.
" छट! खोटं! माझी मम्मी म्हणते कि भूत-बीत काही नसत! ती सगळी आपलीच इमॅजिनेशन असते!" स्नेहा ने मात्र विरोधी सूर लावला.
"हो! हो! माझे पप्पा पण सेमच बोलतात!" टीना म्हणाली.
"सगळी मोठी माणस, मुलाना भीती वाटू नये म्हणून असेच सांगत असतात! अन आपण मात्र अंधारात जात नाहीत! त्यांना पण भुतांची भीती वाटत असते!"
"कशावरून?" रोजीने शंका काढली.
"आग, तुला ठाऊक नाही. माझी काकू, तुझ्या, माझ्या मम्माच्या वयाची, चांगली मोठी, तिलाच भूत लागलं होत! मग 'भूत' नसत कस म्हणायचं?" केतकीच्या या प्रश्नाने सगळ्याच जणी गप्प बसल्या.
"बापरे! खरच! तू पाहिलंस?" पिंकीच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हते.
"मग? होच मुळी! मी गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत, तिकडे कोकणात गेलेली होते, तेव्हा पाहिलय!"
"म्हणजे, नक्की काय झाल्त?" सुषमाने विचारले.
आता केतकी सावरून बसली. तिच्या मनाप्रमाणे घडत होत. सगळ्यांच्या नजरा तिच्या कडेच होत्या. आता सारी सूत्रे हाती तिच्याकडेच होती.
" म्हणजे, काकूला भूत लागल्याचं, आजीनं घरात सांगितलं. कारण काकू काही बाही बडबडायची, स्वतःलाच बोलायची. कधी हसायची तर कधी रडायची! हाती लागेल ते फेकून मारायची. एकदा तर तिने आजीला, 'मर,म्हातारे!' म्हणून लोटाच फेकून मारला होता! 'तिला आपली माणसे आता ओळखू येत नाहीत!' आजी म्हणायची. आज्जी, बरोबरच म्हणत होती! कशी ओळखू येणार माणसे? तिच्या अंगात भूत शिरलं होत ना? परक्या भुताला, आपली माणसे कशी ठाऊक असणार?"
"मग?" पिंकीने विचारले.
केतकी पुढे सांगणार तोच, लन्च संपल्याची बेल झाली.
"केतकी, राहिलेलं उद्या सांग हं! उद्या असेच आणि येथेच बसुयात." पिंकीने आग्रहाची विनंती केली. केतकीने होकारार्थी मान हलवली. सगळ्याजणी आपापल्या वर्गाकडे निघाल्या.
शाळा सुटल्यावर नेहमी प्रमाणे, केतकी, तिच्या पप्पाच्या स्कुटरवर बसून घरी निघाली. उद्या ग्रुपला काय काय सांगायचं, कस सांगायचं, या विचारातच ती गुंग होती.
०००
दुसरे दिवशी पिंकी, सकाळपासूनच कधी इंटरव्हल होते, याची वाट पहात होती. लंच मध्ये झटपट डब्बा खाऊन, ती कालच्या 'पायरी ग्रुप'ला सामील झाली. आज केतकीला सगळ्यांच्या मध्यभागी बसवलं होत.
"केतक्या, ते भूत काकूला कस सोडून गेलं ग?" पिंकीने कालची लिंक पुन्हा ओपन केली.
"मग, आज्जीनं एक ढेरपोट्या, दाढीवाला, हरीबाबा नावाचा मांत्रिक आणला होता." केतकीने सुरवात केली.
"व्हॉट, 'मांत्रिक'?" त्या नकट्या ज्योसनेने विचारले.
"आग, मांत्रिक म्हणजे, ते 'घोस्ट हंटर्स'!" पुन्हा शबरीनेच तिच्या शंकेचे निरसन केले.
"मग, न, त्या हरीबाबान, एक हळदीचे मोठ्ठे सर्कल काढले. त्यात काकूला बळे बळेच बसवले. तो तिला सारखा विचारायचा. ' कोण आहेस तू? तुला काय पाहिजे?' पण काकू काहीच उत्तर देत नसे. नुसतंच 'हूSSS, हूSSS' करायची. मग तो चिडून, हातातल्या कडू लिंबाच्या फांदीने तिला मारायचा!!"
" व्हॉट, 'फांदी?' " ज्योसनीने पुन्हा डिस्टरब केलं.
"तू गप ग 'जो'! फांदी म्हणजे 'ब्रांच'. केतकी तू सांग ग पुढे. गेलं का ते भूत?"
" काय ठाऊक? मग आम्ही सुट्ट्या संपल्याने माघारी आलो ना!"
" पण काय ग केतक्या, तू पाहिलंस का कधी भूत? तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी!" पिंकीने विचारले.
"मी न? नकोच! तुम्ही सगळ्यांना सांगाल! मी नाही सांगत!"
" प्रॉमिस, आपल्या या ग्रुपच्या बाहेर हि गोष्ट जाणार नाही!"
" हो!हो! कोणी नाही सांगणार!" सगळ्याजणींनी एकच कल्ला केला.
"बर,बाई मग सांगते! एका. मी दोनदा पहिली भूत! म्हंजे आत्ता कळतंय ते भूत होत म्हणून. पण पहात होते तेव्हा नव्हतं कळलं!"
"कधी? अन कुठं?"
" माझं आजोळ पण कोकणातच आहे. रत्नागिरी पासून जवळच एक खेडेगाव. तेथे आज्जीच कौलारूच घर आहे. त्या घराच्या मागच्या अंगणात, एक विहीर आहे. रहाट असलेली!"
"व्हॉट 'रहाट' मीन्स?" ज्योसनेने पुन्हा आडकाठी आणली.
"गप बे, साली हि 'जो' न येडचाप आहे! 'रहाट' म्हणजे, विहिरीतलं पाणी काढायचं व्हील! केतकी नको तिच्याकडे लक्ष देऊ! तू कन्टीन्युव कर!" पिंकीने ज्योसनाला झापलं.
" रात्री मी आजीजवळ झोपलेली होते. विहरीत कोणी तरी, मोठ्ठा दगड टाकल्यावर, पाण्याचा जसा आवाज होईल ना?, तसा मला आला. मी एकदम जागी झाले. अंथरुणातून हळूच उठले. अन खिडकीचे दार किलकिले करून बाहेर पाहिलं. तर विहिरीच्या कट्ट्यावर एक बाई, मोकळे केस सोडून बसलेली!. तेव्हड्यात आजीला जाग आली. तिने पटकन ती खिडकी लावून घेतली! तोंडावर बोट ठेवून 'बोलू नकोस!' म्हणून खूण केली. पुन्हा मला जवळ घेऊन झोपी गेली. सकाळी उठल्यावर मला तीन सांगितलं कि विहिरीवर बसली होती, ती 'हडळ!' होती!"
तेव्हड्यात इंटरव्हल संपल्याची बेल वाजली. सगळ्याजणी उठल्या.
" व्हॉट इज हाडळ?" ज्योसनाने पिंकीला थोडे थांबवून विचारले.
"हाडळ? ना? 'लेडी घोस्ट!', त्या पेक्षा आरसा बघ! तिथे दिसेल तुला ती!" पिंकी वैतागली.
०००
केतकी तिच्या पप्पांच्या स्कुटरवरून शाळेत आली, तर पिंकी शाळेच्या गेट जवळच उभी होती.
"केतक्या, तू कोणाच्या स्कुटरवरून शाळेत येतेस?" पिंकीने विचारले.
"ते न माझे पप्पा आहेत! पण का ग?"
"काही नाही. पण ते न एकदम 'कूल' वाटतात. चार्मिंग! शारुख सारखी क्युट डिम्पल पण त्यांच्या गालावर पडते!"
"ये! असं नाही म्हणायचं त्यांना! नजर लागेल ना? पण खरच मी खूप लकी आहे, असे पप्पा मला मिळालेत! ती डिम्पल न आमच्या दोघात कॉमन आहे! तुला ठाऊक आहे का पिंके? ते मला न डॉक्टर करणार आहेत!"
" हाऊ स्वीट! केतक्या, मी तुझी येथे मुद्दाम वाट पहात उभी आहे. "
"का ?"
"मी आमच्या शेजारी, एक खुप्प म्हातारे आजोबा रहातात, त्यांना ते 'हाडळ!' विचारलं बर का? ते पण तू म्हणालीस तेच म्हणाले! बाई मेली कि ती 'हाडळ' होते! म्हणजे 'भूत' असतात तर!!"
"मग? मी काय तुम्हाला खोटं सांगत होती का काय? यार, तुम्ही माझे फ्रेंड्स आहेत ना? मैत्रीत कोणी खोटं बोलत का?"
प्रार्थनेची घंटा वाजली तशी, 'चल, लंच मध्ये बोलू' म्हणून, दोघी प्रार्थने साठी रांगेत उभ्या राहिल्या.
०००
एकंदर केतकीच्या 'भूत' कथननाने चांगलीच ग्रीप घेतली होती. तिचे फ्रेंड्स सर्कल वाढत होते. श्रोता वर्ग वाढत होता.त्याच बरोबर खुन्नस पण वाढली होती. केतकी आल्याने, स्नेहाचे महत्व कमी होत होते. ती केतकीचा द्वेष करू लागली होती. तिचा ग्रुप केतकीने नकळत हायजॅक केला होता!
आज केतकीने स्पेशल 'गोष्ट' सांगायची ठरवली होती. ठरल्या वेळी, ठरल्या ठिकाणी, म्हणजे लंच अवर्स मध्ये पायऱ्यांवर सगळ्या जणी जमल्या होत्या.
"आज ना, मी तुम्हाला एक जम्माडी गम्मत सांगणार आहे. माझ्या पप्पांची या गावात बदली झाली, तेव्हा आम्ही, एका भाड्याच्या घरात राहायला आलोत. हे घर गावापासून थोडस दूर आहे, पण छान आहे. आजूबाजूला खूप झाड आहेत. वडाची, पिंपळाची तर खूप आहेत. चार दोन पडकी घर पण दूरवर आहेत. तेथे मला खेळायला खूप आवडत. अश्या पडक्या वाड्यात आणि घरात 'भूत' असतात, असं माझी आई आज्जी, मला लहानपणी सांगायची. इतके दिवस मी नाही विश्वास ठेवला, पण गेल्या शनिवारी, हो त्या दिवशी शनी अमोश्या होती म्हणे, मला ते भूत दिसलं!" केतकीने शेवटी, काल पासून विचार पूर्वक तयार केलेला, बॉम्ब गोळा टाकला.
सगळी कडे चिडी -चूप.
"ऑ!! म्हणजे? कस? काय? दिसलं?" पिंकी सगळ्यात आधी भानावर आली.
"मी त्या दिवशी, वडाच्या पारंब्याला धरून झोका खेळत होते. म्हणजे नेहमीच खेळते, आज खेळताना एक काळ मांजराचं पिल्लू माझ्या पायात आलं. मी दचकले. कारण त्याच्या तोंडाला लाल, लाल काही तरी लागलेलं होत!"
"रक्त!?" पिंकीचे डोळे मोठ्ठे झाले होते.
"असेल हि. पडक्या घरातला एखादा उंदीर गट्टम केला असेल. पण मी घाबरून घराकडे धूम ठोकली. तेव्हा ते पिल्लू तेथेच झाडाखाली बसलेलं होत. मी घरात आले, अन पहाते तर काय? ते काळ पिल्लू आमच्या सोफ्यावर आरामात बसलंय! मी आईला हाक मारली, आणि ते दाखवलं. 'वेडाबाई, हे पिल्लू सकाळ पासून घरातच फिरतंय! तू पाहिलेलं, काळ्या मांजराचं पिल्लू वेगळं असेल, आणि हे वेगळं आहे. आग, दोन सारखी पिल्लं असतात कि!' मी पुन्हा सोफ्यावरल्या पिल्लाकडे पाहिलं, ते तेच होत, कारण त्याच्या पण तोंडाला रक्त लागलेलं होत!! मी आईला पुन्हा हाक मारली, त्या मांजराच्या तोंडाला लागलेल रक्त दाखवण्या साठी, पण ते पिल्लू तोवर, जम्प मारून, खिडकीतून पळून गेलं! ते मांजराचं काळ पिल्लू भूत होत!"
" केतकी! आम्ही ऐकून घेतोय म्हणून, तू फारच फेक फेकी करायला लागली आहेस! इट्स बॅड!" स्नेहाने आज राडा करायचा पक्का निर्णय घेतला होता.
"तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय?" केतकीने धडक स्नेहाला विचारले.
"हो!" स्नेहा ठामपणे म्हणाली. दोघींची जुंपणार अशी ग्रुपला शंका येऊ लागली.
"मग, या सगळ्या जणी येत्या शनिवारी, दाखवते प्रत्यक्ष 'भूत'!" केतकीपण इरेला पेटली. कसल्या येतायेत या भित्र्या पोरी! उगाच आपली खुन्नस.
"चॅलेंज! तू 'भूत'दाखवणार?" स्नेहा ने विचारले.
"हो! चॅलेंज! तुमचेच डेरिंग आहे का?"
"ठीक! आम्ही, या येथे असलेल्या सगळ्या जणी येतोय, सॅटर्डेला! दे तुझ्या घरचा पत्ता!"
या तर खरेच यायला निघाल्यात! आता काय करावं? असे काही होईल असे केतकीला वाटलेच नव्हते.
"अरे यार, असं काय करताय? पहा तुम्हाला भीती वाटली तर माझी जिम्मेदारी नाही!"
"तू नको त्याची काळजी करू! आम्ही आमच्याच रिस्कवर येणार! शनिवारी शाळा सुटली कि आम्ही वह्या पुस्तक घरी ठेवून, पाच वाजता तुझ्या घरी येतो!
"बघा हू, घाबरायचं असेल तरच या!" केतकीने शेवटचा प्रयत्न केला. पण तो दुबळा पडला.
"अरे, जारे, भूत दाखवणारी! आता तर आम्ही येणारच! तयारीत रहा, आणि तुझ्या 'भूता' पण तयार ठेव!" केतकीच्या डोळ्या पुढे हात नाचवत स्नेहा म्हणाली अन ताड ताड निघून गेली.
केतकीच्या डोळ्यात पाणी आले. हे भलतंच झालं! आता सगळंच मुसळ केरात जाणार. इतक्या दिवसांची मेहनत, ते फ्रेंड सर्कल माती मोल होणार होत! पण एक बरे झाले होते. या गोंधळात स्नेहा आपल्या घराचा पत्ता घ्यायला विसरली होती! आज बुधवार, तीन दिवस शाळेला बुट्टी मारली कि झालं!
०००
पाचवीच्या वर्गाचा क्लास टीचर सध्या सुटीवर असल्याने, रक्षिताकडे त्या वर्गाच्या क्लास टिचरचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता.
रक्षिताने हेडमिस्ट्रेसच्या केबिनच्या दाराला नॉक केले.
"या, या आत या!" हेडमिस्ट्रेस दातार मॅडम म्हणाल्या.
रक्षिता आत गेली.
"हू, काय काढलास रक्षिता?"
"काही तरी तुमच्या कानावर घालायचं आहे!"
"बोल."
"माझ्या वर्गात म्हणजे, पाचवीच्या वर्गात काही तरी गडबड आहे!"
"नेमकं काय आहे?" कपाळाला आठ्या घालत दातार मॅडमनी विचारलं. हि रक्षिता न, पाल्हाळ लावणारी आहे. पटकन मुद्याचं सांगायची नाही.
"मुली लंच अवर्स मध्ये, शाळेच्या पायऱ्यांत घोळका करून काही तरी कुजबुजत असतात."
"आग रक्षिता, मुलींचं वाढत वय असत, असतील बोलत मनातलं आपसात."
" तस नाही मॅडम, ते मी समजू शकते! पण हे वेगळंच आहे! आधी इंटरव्हल मध्ये, डब्बे खाऊन पोरी ग्राऊंडवर हुंदडायच्या, हल्ली तस दिसत नाहियय!"
" रक्षिता, तुला नेमकं काय सुचावायचं आहे?"
"ती नवीन आलेली मुलगी, केतकी, एकटी एकटी असायची, ती आता मुलीच्या गराड्यात असते!"
"मग?"
"मी असं ऐकलंय कि ---"
" हे पहा रक्षिता, मला खूप काम आहेत! तू तुझा प्रॉब्लेम सांगणार नसशील तर, तू तुझ्या वर्गावर जा! तुला फक्त दोनच मिनिटे देते, काय सांगायचं असेल ते सांगून टाक! युवर टाइम स्टार्टस नाऊ!" दातार मॅडम खरेच वैतागल्या.
रक्षिताला फारसा फरक पडला नाही. हे तिला नेहमीचच होत!
"मी असं ऐकलंय कि, ती केतकी, मुलींना भूताच्या गोष्टी सांगत असते आणि आपली फ्रेंड्स सर्कल वाढवतीयय!"
"वाढवेना, तुला काय प्रॉब्लेम आहे?"
"तस नाही, गेल्या चार दिवसापासून शकुंतला शाळेत आली नाही!"
हि रक्षिता किती इरिलेव्हंट बोलतीयय?
"त्याचा इथे काय संबंध?"
" आहे! शकुंतलेची आई माझी मैत्रीण आहे! मी तिला फोन करून विचारलं!"
"काय म्हणाली?"
"म्हणाली, शकू खूप घाबरली आहे! ती एकटी अजिबात रहात नाहियय! अंधाराची तिला खूप दहशत वाटत आहे! आपल्या घरात 'भूत' आहे! हा घोषा तिने लावलाय!"
दातार मॅडम आता मात्र गंभीर झाल्या. अशी भीती कोवळ्या वयात मनात घर करू लागली, तर मुलीच्या भविष्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो! हे त्यांना जाणवल.
"बापरे! असे असेल तर, प्रकरण गंभीरच आहे!"
"खरी बातमी तर पुढेच आहे! या शनिवारी, काही मुलींना तिने घरी बोलावले आहे! ती त्यांना 'भूत' दाखवणार आहे!"
"खरे कि काय? मला काय वाटलंय, आपल्या शिक्षिकापैकी कोणीतरी त्या मुलीनं सोबत केतकीच्या घरी जावं! तिच्या आई वडिलांन देखत तिची समजूत काढावी. 'अशी भुताची भीती दाखवत जाऊ नकोस.' हे सांगावं." दातारांनी आपला विचार मांडला.
"मलापण असच वाटतंय!" रक्षिता म्हणाली.
" कोणाला बरे पाठवावं? खरे तर मीच गेले असते, पण मला नेमकं शनिवारी समीरला आणायला एरपोर्टला जायचंय! रक्षिता तूच का नाही जात मुलीनं सोबत? मुली तुझ्या सहवासातल्या आहेत. तू सोबत असशील तर त्यांना, आधारहि वाटेल!"
"ठीक आहे! जाते मी!"
०००
रक्षिताने मग सगळा प्लॅन ठरवला. शनिवारी शाळा सुटली कि, पिंकी, टीना, शबरी, स्नेहा, सगळ्या मुलींनी आपापली दपत्तर घरी ठेवून पुन्हा शाळेत जमायचं. मग रुक्षता मॅडमच्या ओम्नी व्हॅन मधून केतकीच्या घरी जायचं. पिंकीला हे केतकीला कळवायचं होत, पण केतकीकडे मोबाईलच नव्हता!

रक्षिताने ऑफिस मधून केतकीच्या घरचा पत्ता घेतला. मुलींना घेऊन ती केतकीच्या घरी पोहंचली. घर बैठे होते. जुने असले तरी सुस्थितीतले. आजूबाजूला एक दोन पडकी घर होती. घराला तारेचे कम्पाऊंड होते, त्याच्या काटेरी तारा जुन्या अन बऱ्याच जागी तुटलेल्या होत्या.

घराच्या दाराजवळ नेम प्लेट होती. ती मात्र घराच्या मानाने तरुण वाटत होती.
केतकर्स,
-केशव
-कावेरी
-केतकी.
हेच केतकीचे घर.
रक्षिता मॅडमनी घराची बेल वाजवली. रक्षिताच्याच वयाच्या तरुणीने दार उघडले. सात आठ शाळेच्या मुली आणि त्यांची मास्तरीण, हे तिने तर्काने ताडले. पण या येथे कशाला आल्यात?
"कावेरी, कोण आहे ग?" घरातून पुरुषी आवाज आला.
"केशव, अरे कुठली तरी शाळेची ट्रिप दिस्तेयय!, तूच ये ना!"
कावेरी पेक्षा दोन तीन वर्षांनी मोठा असलेला तरुण दारात आला. कावेरी आणि केशवच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्न चिन्ह, रक्षिताला दिसत होते.
"नमस्कार, मॅडम! काही काम होत का?" केशवने दोन्ही हात जोडून नमस्कार करत रक्षिताला विचारले.
"तुम्ही केतकीचे आई - बाबा का ?" रक्षिताने विचारले.
"हो. पण --- तुम्ही?"
"मी रक्षिता! केतकीची क्लास टीचर, आणि या तिच्या वर्गातील क्लासमेट आहेत!"
केशव आणि कावेरी कसलीही प्रतिक्रिया न देता, आवक होऊन दारातल्या त्या घोळक्याकडे पहात होते.
"आज न केतकीने, आम्हाला घरी बोलावल होत! कोठे आहे ती? बोलावता का तिला जरा?"
कसली येतीयय ती? बसली असेल कोठे तरी तोंड लपवून! खोटारडी कुठली! म्हणे 'भूत ' दाखवते स्नेहाच्या मनात येउन गेलं.
केशव आणि कावेरी दारातून बाजूला झाले. त्यांनी रक्षिताला घरात येण्याची खूण केली. रक्षिता पाठोपाठ तो मुलींचा घोळका घरात आला. आणि रक्षिता जागीच खिळून उभी राहिली! समोरच्या भिंतीवर केतकीचा गालावर खळी असलेला गोड हसरा फोटो होता, आणि त्याला चंदनाचा हार घातलेला!
"तुम्हीच सांगा, कसा बोलावू केतकीला ?" काळजाला घर पडणाऱ्या आवाजात केशवने रक्षिताला विचारले.
"आम्हाला मूल नाही म्हणून, आम्ही केतकीला दत्तक घेतली होती! दोन वर्षा खाली अल्पश्या आजाराने गेली! हसत खेळत पोर, नजरे समोरून अजूनही हालत नाही! अनाथालयाच्या रेकॉर्डला केतकी सोबत 'हिला डॉक्टर करायचंय!' या अर्थाची चिठ्ठी होती म्हणे, इतकच "
रक्षितची तर वाचाच खुंटली! मग काल पर्यंत शाळेत येणारी केतकी कोण? ती तशीच माघारी फिरली. चिडीचूप झालेल्या पोरी, कश्याबश्या गाडीत बसल्या. व्हॅन शाळेकडे परत फिरली.
रक्षितच्या मागच्या सीटवर बसलेल्या मुलींचा संवाद तिच्या कानावर पडत होता.
"टीना, तुला एक गम्मत सांगू का?" पिंकी सांगत होती.
"काय?"
"त्या घरातला माणूस केतकीचे पप्पा नव्हते! ती रोज ज्यांच्या सोबत स्कुटरवर येते, ते वेगळेच आहेत, क्युट! केतकी सारखी त्यांच्या पण गालावर डिम्पल आहे! आणि यांच्या दारात स्कुटर पण नव्हती! मी मुद्दाम पाहिलं ना!"
रक्षितच्या अंगावर सरसरून काटा आला! म्हणजे केतकी अन तिला शाळेत सोडायला येणारे तिचे पप्पा दोघेही ----------.

पिंकी वाट पाहातीयय, पण त्या नंतर केतकी कधीच शाळेत आली नाही!!

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED