संतश्रेष्ठ महिला भाग १३ Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संतश्रेष्ठ महिला भाग १३

संतश्रेष्ठ महिला भाग १३

संत तुलसीदासांना लिहलेल्या पत्रातून मीराबाई ने तुलसीदास यांना सल्ला मागितला की

मला माझ्या परिवाराकडून श्री कृष्णभक्ति सोडण्यासाठी जबरदस्ती केली जाते आहे .

परंतु मी श्री कृष्णाला आपले सर्वस्व मानलेले आहे .

ते माझ्या आत्म्यात आणि नसा नसात सामावलेले आहेत .

नंदलालाला सोडणे म्हणजे माझ्यासाठी देह त्याग करण्यासारखे आहे .

कृपया मला आपण मदत करा आणि काय करू यासाठी योग्य सल्ला द्या .

त्यावर महान कवि तुलसीदास यांनी या पत्राचे उत्तर असे दिले ..

“जाके प्रिय न राम बैदेही।

सो नर तजिए कोटि बैरी सम जद्यपि परम सनेहा।।

नाते सबै राम के मनियत सुह्मद सुसंख्य जहाँ लौ।

अंजन कहा आँखि जो फूटे, बहुतक कहो कहां लौ।।

अर्थात तुलसीदास यांनी लीहीले ज्याप्रमाणे
भगवान विष्णुच्या भक्तिसाठी भक्त प्रल्हादाने आपल्या पित्याला सोडले .

रामाच्या भक्तिसाठी बिभीषणाने भाऊबंदाना सोडले
बालीने आपल्या गुरुला सोडले ..

आणि गोपींनी आपल्या पतीला सोडले .

त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या नातेवाईकांना सोडुन द्या .

आपली श्री कृष्णावर असलेली अतुट भक्ती जे समजु शकत नाहीत किंवा

भगवान राम अथवा कृष्णाची आराधना करू शकत नाहीत .

अशा लोकांना सोडुन श्रीकृष्णाकडे जा .

नंतर लढाईत गुजरातच्या बहादूर शाहने चितोड ताब्यात घेतले.

या युद्धात चित्तौडचा शासक, विक्रमादित्य मारला गेला आणि शेकडो महिलांनी जोहार केला.

त्या समाजात मीराबाईंना बंडखोर मानले जात असे

कारण तिची धार्मिक प्रथा राजकन्या आणि विधवांसाठी स्थापित पारंपारिक नियमांशी सुसंगत नव्हती.

मीराबाईंनी चार ग्रंथांची रचना केली -
- बार्सी का मैरा
- गीत गोविंद टीका
- रागा गोविंद
- राग सोरथ पोस्ट

पुढे संत मीराबाईने वृंदावनात जाऊन अनेकांना श्रीकृष्णाच्या भक्तीसाधनेत रममाण करणारी

बहुविध पदे रचली.

तिला अनेक साधू-संतांचा सहवास लाभला.

रैदास, वल्लभसंप्रदायी विठ्ठलनाथ, तुलसीदास, जीवगोस्वामी इ. नावे मीरेचे दीक्षागुरू म्हणून घेतली जातात. तिच्या पदांत गुरू म्हणून रैदासाचे निर्देश अधिक आहेत.

निर्णायकपणे तिचा एकच विशिष्ट गुरू ठरविणे अशक्य आहे.

विविध भक्तीसंप्रदायांचा व साधनापद्धतींचा तिच्या संवेदनशील मनावर प्रभाव पडला असणे

व त्यांतून तिने त्या त्या व्यक्तींचा आदराने निर्देश केला असणे शक्य आहे.

तिच्या रचनांबाबतही निश्चित माहिती उपलब्ध नाही.

नरसीजी रो माहेरो, गीत गोविंदकी टीका, राग गोविंद, सोरठके पद,

मीराँबाईका मलार, गर्वागीत, राग विहाग आणि फुटकर पद ह्या तिच्या रचना म्हणून सांगितल्या जातात.

मीरेच्या भाषेचे मूळ रूप राजस्थानी असले, तरी तीत ब्रज व गुजरातीचेही बरेच मिश्रण आढळते.

ही भाषा जुनी गुजराती व जुनी पश्चिमी राजस्थानी वा मारू गुर्जर म्हणता येईल.

तिच्या रचनेत यांव्यतिरिक्त पंजाबी, खडी बोली, पूरबी इ. ज्या भाषांचे मिश्रण आढळते,

त्याचे कारण तिच्या पदांचा झालेला प्रसार व त्यांची दीर्घकालीन मौखिक परंपरा हे होय.

मीरेची पदे अत्यंत भावोत्कट व गेय असून ती विविध रागांत बद्ध आहेत.

त्यांतील स्त्रीसुलभ आर्तता, आत्मार्पण भावना, भावोत्कटता व सखोल अनुभूतीच काव्यदृष्ट्या अधिक श्रेष्ठ ठरते. ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर’ ही तिच्या अनेक पदांत येणारी “नाममुद्रा”होय.

ह्या पदांतील प्रमुख विषय भक्ती असला, तरी त्यांत वैयक्तिक अनुभव, कुलमर्यादा, गुरूगौरव,

आप्तांशी झालेले मतभेद व त्यांनी केलेला छळ तसेच आराध्यदेवता स्तुती,

प्रार्थना, प्रणयानुभूती, विरह, लीलामाहात्म्य, आत्मसमर्पण इ. विषयही आले आहेत.

भक्त, संगीतप्रेमी व काव्यरसिक ह्या सर्वांनाच ही पदे कमालीची मोहिनी घालतात.

कृष्णविरहाची पदे त्यांत संख्येने अधिक असून ती उत्कट व हृदयस्पर्शी आहेत.
नाभादास, प्रियादास, ध्रुवदास, मलूकदास, हरिराम व्यास इ. संतचरित्रकारांनी व संतांनी मीरेबद्दल अत्यंत आदराने गौरवोद्‌गार काढले आहेत.

मध्ययुगीन राजस्थानी, गुजराती व हिंदी साहित्यात संत कवियित्री म्हणून मीरेचे स्थान अनन्यसाधारण आहे.

भाषिक प्रदेशांच्या मर्यादा उल्लंघून भारताच्या कानाकोपऱ्यांत मीरेची भक्तिभावाने ओथंबलेली उत्कट पदे पोहोचलेली आहेत.

उत्तर भारतात सगळीकडे मीराबाई कृष्णभक्तिचा प्रसार प्रचार करीत त्या भजनं गात फिरल्या.

1538 च्या सुमारास त्या वृंदावनात आल्या असाव्यात.

मीरेची सगळी साधना कृष्णापाशी सुरू होते आणि कृष्णापाशी येवुन संपते.

तिची प्रेमभक्ती हे तिच्या साधनेचे बलस्थान होते.

पण तिने साधनेचे सर्व प्रकार अनुभवलेले दिसतात.

ते तिच्या कवनांमधून प्रकर्षाने जाणवत राहते.

योगसाधना, उपासना, ज्ञानसाधना अगदी टोकाची अशी वैराग्यसाधनादेखील तीने आपल्या प्रेमसाधनेच्या कसोटीवर, निकषांवर तपासून पाहीलेली असल्याचे जाणवत राहते.

एक गोष्ट तिच्या लक्षात आलेली होती की आपल्यासाठी महत्त्वाचे आहे ते गिरिधर नागर गोपाळाशी मिलन. मग त्यासाठी तिला काहीच वर्ज्य नव्हते.

त्यासाठी मीरा आजन्म साधनारतच राहिली.

घडी एक नहिं आवडे तुम दरसण बिन मोय

तुम हो मेरे प्राण जी कासूं जीवण होय

धान न भावै नींद न आवै बिरह सतावे मोय

घायलसी घूमत फिरूं रे मेरो दरद न जाणै कोय

ती म्हणते

"हे हरि, तुला पाहिल्याशिवाय एक क्षणभरही चैन पडत नाही मला.

तू माझे प्राण आहेस, तूच नसशील तर या जगण्यात काय अर्थ आहे.

तहान्-भूक विसरली.

निद्रेने साथ सोडली , त्यात हा नित्य तुझा विरह.

वेड्यासारखी अवस्था झालेय पण कुणाला माझी व्यथा कळतच नाही."

मीरेची कृष्णाशी असलेली “बांधिलकी” तेव्हा कधी कुणाला कळलीच नाही.

तिची कृष्णाविषयीची निरलस वृत्ती, निरपेक्ष भक्ती, ते निरागस प्रेम, ती जगावेगळी निष्ठा

हे सर्व कोणी समजून घेऊ शकले नाही .
पुराणानुसार मुक्तीचे चार प्रकार सांगितले जातात.

सलोकता, समीपता, सरुपता आणि सर्वात श्रेष्ठ अशी 'सायुज्यता'.
उदाहरणच द्यायचे झाले तर कैलास लोकात अथवा वैकुंठात राहायला मिळणे ही झाली सलोकता.
तिथे राहून शिवाच्या अथवा श्रीविष्णुंच्या सान्निद्ध्यात राहून त्यांची सेवा करण्याची संधी मिळणे ही झाली समीपता.

कायम ईश्वरा च्या जवळ राहिल्याने एक वेळ अशी येते की त्रयस्थ माणसाला हा देव आणि हा भक्त असे वेगवेगळे भेद कळतच नाहीत.

दोघेही सारखेच वाटायला लागतात ही झाली सरुपता......

आणि खुप कमी भाग्यवंताना लाभते ते म्हणजे परमेश्वरातच मिसळून जाण्याची, त्याच्याशी एकरुप होण्याची क्षमता...

ती सायुज्यता ! हे भाग्य लाभलेले दोनच संतश्रेष्ठ होवून गेले एक मीराबाई आणि दुसरी कान्होपात्रा !
मीरेच्या कवनांमधून सर्व प्रकारचे रस डोकावतात.
मुळातच प्रेमभक्ती हा तिच्या उपासनेचा, साधनेचा मुळ पाया असल्याने

राग, मोह, विरह, वैराग्य आणि श्रुंगार असे बरेचसे रस तिच्या कवनांनधून ओसंडुन वाहताना दिसतात.

तुम्हरे कारण सब सुख छांड्या

अब मोहिं क्युं तरसावौ

बिरहबिया लागी उर अंतर

सो तुम आय बुझावौ

हे कृष्णप्रिया, तुझ्यासाठी सगळ्या सुखांचा त्याग केला तरी तू असा का त्रास देतोयस मला.

विरह व्यथेने जळणारी या मीरेची ही अवस्था तडफड तुझ्या लक्षात येत नाही का?

ही सगळी तळमळ, हा दाह शमवण्याची क्षमता फक्त तुझ्या स्पर्शातच आहे रे !

श्रुंगाररसातून देखील मीरेची भक्ती, तिची निष्ठाच जाणवत राहते.

अब छोड्या नहिं बनै प्रभुजी हंसकर तुरत बुलावौ

मीरा दासी जनम जनम की अंग सूं अंग लगावौ

आता क्षणाचाही दुरावा सहन नाही होत.

बस्स तू एकदा हंसून तुझ्याजवळ बोलाव.

ही मीरा जन्मो-जन्मीची तुझी दासी आहे....

अंगाला अंग भिडू दे आता!

राजघराण्यात वाढलेल्या मीराबाईचा काळ हा तत्कालिन मोघल आणि हिंदुंच्या संघर्षाचा काळ होता.
कायम लढाया, हल्ले, कापाकाप्या यांचे ते दिवस होते.

सतत होणार्‍या मोघलांच्या स्वार्‍या, राजस्थानातील स्थानिक राजसत्तांची होणारी परवड ती आपल्या डोळ्यांनी पाहात होती.

पण एवढे हल्ले होवूनही राजस्थानातील हिंदू राजे मुघलांविरुद्ध कंबर कसण्याच्या ऐवजी
आपली परस्पर वैर-वैमनस्ये विसरायला तयार नव्हते.

एकेक राज्य उध्वस्त होत चाललं होतं

पण एकत्र येवुन सगळी शक्ती मुघलांविरुद्ध एकवटण्याची राजस्थानातील विखुरलेल्या हिंदु राजांची तयारी नव्हती.

हे सगळे भोगत, अनुभवत असलेल्या मीरेच्या संवेदनशील मनावर विलक्षण परिणाम होत होता.

ऐहिक गोष्टींची “नश्वरता” आणि “व्यर्थता” तिला बरोबर कळली होती.

म्हणून तिने स्वतःला बहुदा कृष्ण साधनेत, प्रेम साधनेत गुंतवून घेतले.

प्रेमसाधना वाटते तशी आणि तेवढी सोपी नाही .

इथे भक्ताला आपल्या प्रिय ईश्वराच्या भेटीची “आस” असते.

ईश्वरप्राप्तीसाठी तो तळमळतो.

प्रभुचा तो दुरावा त्याला सहन होत नाही.

परमेश्वर अगदी कसुन परीक्षा घेतल्याशिवाय कुणालाही आपली “समीपता” देत नाही.

एखाद्या ज्योतीप्रमाणे, धुपाप्रमाणे प्रभुसाठी जळत राहण्याची तयारी ठेवावी लागते.

अत्यंत कोवळ्या वयात मीरेने कृष्णाला आपला पती मानले आणि

त्यानंतरचं तिचं सगळं आयुष्यच कृष्णमय होवून गेलं.

क्रमशः