प्रायश्चित्त - 12 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

प्रायश्चित्त - 12

“श्रीशला ऐकू येईल ना आंटी आता.” तिने हसून मान हलवली. केतकी सतत तिच्या अधिक जवळ सरकून बसतेय असं तिच्या लक्षात आलं. तिनेही मग केतकीच्या खांदायांवर हात टाकत तिला आपल्या जवळ घेतली. दोघीही अशा बसून राहिल्या.

थोड्या वेळाने नर्सने तिला आत बोलावले. सॅम मास्क तोंडावरून गळ्यात अडकवत बाहेर आला.

“ऑपरेशन व्यवस्थित झालं. काळजीचं काहीच कारण नाही. शाम श्रीशची भूल उतरली तरी झोपेल बराच वेळ तो. तशी औषधं दिलेली असतात. रिकव्हरी मधेच राहिल संध्याकाळपर्यंत. थोड्या वेळाने नर्स सांगेल तुला मग बघून ये. ओके? “त्याने तिच्याकडे नजर रोखत विचारलं.

“हो!” तिला त्या नजरेचा अर्थ बरोबर कळला. जणू तो म्हणत होता “शाम, तू रडतेस? शोभत नाही तुला.” तिला यावर रागारागाने काही बोलावसं वाटलं जे “हो” च्या ठसक्यात बरोबर उमटलं. लहानपणी शामला चिडवल्यावर जशी समाधानाची लहर सॅमच्या चेहऱ्यावर उमटायची तशीच आत्ताही उमटली. तिला आणीच राग आला मग. आई झाला असतास तर कळलं असतं असं अगदी म्हणावसं वाटलं तिला. मग तो आत गेला. आपण त्याला थॅंक्स पण म्हटलं नाही. तिच्या बऱ्याच उशीरा लक्षात आलं. खजील झाली मनातून. बाहेर आली. केतकी तिची वाट पाहत तिथेच बसली होती. ती जवळ जाऊन बसली तिच्या. “केतकी, डॉक्टर म्हणाले छान झालय ऑपरेशन. आता बघायला सोडतील आत. तू येतेस आत?” तिने जोरजोरात नाही नाही अशी मान हलवली. शाल्मलीला फार आश्चर्य वाटलं. ती म्हणाली “बरं बरं, ठीक आहे.”

“मी बघून येईन आणि तुला सांगेन, चालेल?”

केतकी बारीक हसली. “काय चाललं असेल या चिमुरडीच्या मनात?”

नर्स आलीच बोलवायला. शाल्मली आत गेली. श्रीश झोपलाच होता. संपूर्ण डोक्याला बॅंडेज होतं. हाताला सलाईन. हात हलवू नये म्हणून टेप्स ने बंदिस्त. “माझं बाळ, किती सहन करायचं या चिमुकल्याने? आणि का?”

शाल्मली जवळ गेली. हळूवार हाताने तिने त्याच्या नाजूक शरीरावरून हलकेच हात फिरवला. कपाळावरूनही फिरवला. हात त्याच्या पाठीवर तसाच ठेऊन उभी राहिली.

मग नर्स म्हणाली “थोडा वेळ थांबा हवं तर. मग जा.” ती कृतज्ञतेने हसली.

जरा वेळाने नर्स म्हणाली डॉक्टर येतील बघायला.

मग ती बाहेर आली परत एकदा बाळाला हलकेच गोंजारून. डोळ्यांना तर काही म्हणण्यातच अर्थ नव्हता. सारखे वाहत होते.

नर्स म्हणाली “तुम्ही रुमवर जाऊन विश्रांती घ्या. काही लागलं तर आम्ही बोलवू.”

“नाही, मी इथेच बसेन.”

“मॅम आता दोन तास आत नाही सोडता येणार. इन्फेक्शन्स होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी लागते.”

“हो हो, ते ठीक आहे”

“शिवाय नंबर आहे तुमचा माझ्याकडे.”

“ओके.”

बाहेर आल्यावर तिला एकदम गळून गेल्यासारखं वाटलं. मग आठवलं सकाळपासून पोटात काही अन्न नाही. ती केतकीला म्हणाली चल आपण कॅंटीनमधे जाऊन येऊ. “येतेस? तू जेवलीस का?” तिने नाही म्हटलं. “चल मग. थांब तुझ्या वडिलांना सांगून ये.” केतकी ने आयसीयु च्या दिशेने पाहिले पण ते कुठे दिसत नव्हते. “आत असतील का?” केतकी म्हणाली “हो.”

“चल मग विचारून ये.”

“नाही, नको, आत नको.”

“का गं? चल मी येते.” केतकी ने पटकन हात सोडवून घेतला.

“नाही आत नको” भेदरलेल्या चेहऱ्याने ती म्हणाली.

शाल्मली ला काय करावे कळेना. “न्यावं तरी कसं नि एकटं सोडून जावं तरी कसं?”

मग ती सरळ आयसीयु च्या दाराशी गेली. काचेतून आतली क्युबिकल्स दिसत होती. समोरच केतकी चा बाबा एका बेडजवळ स्टुलवर पाठमोरा बसला होता. दोन मिनिटं शाल्मली घुटमळली. मग सरळ आत गेली. त्या क्युबिकलच्या दारात गेली. बेडवर साधारण तीन वर्षाची मुलगी, नाका तोंडात नळ्या, डोक्याला मोठं बॅंडेज, हाताला सलाईन, पायाला प्लास्टर अशा अवस्थेत होती. तिचा एक हात तेवढा मोकळा होता आणि केतकीचा बाबा तो हातात घेऊन काहीतरी पुटपुटत होता.

“कांचन बाळा, डोळे उघडून बघ गं एकदा माझ्याकडे. रागव माझ्यावर. मार मला. पण प्लीज एकदा बघ माझ्याकडे. तुझी ममा अशीच न बोलता निघून गेली. आता तू पण बोलत नाहीस.”

डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं.

काय करावं अशा वेळेस कोणीही? शाल्मली तशीच थांबली काही क्षण. मग पुढे झाली. शांतपणे म्हणाली, “केतकीचे बाबा, कांचन होईल बरी लवकर.” त्याने मान वर करून पाहिले.

“माझ्यामुळे झालय हे सगळं. मी नाही धरू शकलो तिचा हात वेळेवर. तिने खूप विश्वासाने पुढे केला होता हात. तिला खात्री होती की तिचा डॅड नक्की धरणार तिला. पण जेव्हा तिचा तोल गेला आणि लक्षात आलं तिच्या की डॅड ने नाही धरला हात तेव्हा मागे पडताना तिच्या डोळ्यात प्रचंड अविश्वास होता माझ्याबद्दल. डॅड ने फसवलं असा.” तो एवढा सहा फुटी माणूस स्फुंदून स्फुंदून रडू लागला. हळू हळू तो शांत झाला. शाल्मली म्हणाली “तुम्ही जे सांगताय त्यावरून तो अपघात होता हे स्पष्ट दिसतंय . होईल कांचन बरी.”

त्याने मान हलवली. ती पुढे म्हणाली “मी केतकी ला घेऊन जाऊ का जरा वेळ? कॅंटीनमधे जाऊन येतो.”

त्याने एकदा तिच्याकडे पाहिले आणि मग होकारार्थी मान हलवली.

तिने पुढे होऊन कांचनच्या सलाईन लावलेल्या हातावरून हलकेच बोटं फिरवली.

मग ती बाहेर जाण्यास निघाली.

दोघी कॅंटीनमधे आल्या. केतकीने शाल्मलीचा हात घट्ट पकडला होता. तिने आत्तापर्यंत दोन वेळा “डॅड हो म्हणाला?” असं विचारलं होतं.

“सॅंडविच, कॉफी आणि मिल्कशेक” असं घेऊन त्या एका टेबलवर येऊन बसल्या.

शाल्मलीने सॅंडविच तिच्यापुढे धरलं. तिने एक तुकडा उचलला. भराभर खाल्ला. खूप भूक लागली असावी. मग तिने दुसराही घेऊन खाल्ला. शाल्मलीने मिल्कशेक पुढे केलं , ते ही अर्ध गटागट प्याली. मग जरा भूक शमली तिची. शाल्मलीने मग आपलं सॅंडविच खायला सुरवात केली.

“केतकी, बेटा तू श्रीशला भेटायला का नाही आलीस?”

“मला भीती वाटते!”

“कसली भीती ? सलाईनच्या सुईची?”

“आंटी, मी ममाला बघायला गेले आणि तिने माझा हात हातात घेतला. मी तिला म्हटलं ममा घरी चल ना,तर ती रडायला लागली आणि मग तिने माझा हात सोडून दिला. ती झोपलीच गाढ. आजी म्हणते ती देवाघरी गेली. मी कांचनला पण भेटायला जात नाही आत. तीही गेली तर? ममा देवाघरी गेली तर डॅड पण चिडका झाला. सारखा ओरडतो माझ्यावर.”

केतकी एकदम गप्प झाली. आपण नको ते बोललो असं जाणवलं त्या चिमुरडीला. केतकीने तिच्या हातावर थोपटले. मग म्हणाली “अगं, कांचनला बरं नाही म्हणून घाबरलाय तो. पण कांचन बरी झाली ना, की होईल डॅड पण बरा. आज संध्याकाळी श्रीशला रुममधे शिफ्ट करतील. मग तू ये त्याच्याशी खेळायला उद्या सकाळी. चालेल?”

“हो आंटी.”

मग शाल्मलीने अजून एक सॅंडविच पॅक करून घेतले.

दोघी परत वर आल्या ओटी जवळ. केतकीचा बाबा आयसीयुच्या बाहेर उभा होता. शाल्मली ने केतकी कडे सॅंडविच दिले आणि बाबाला दे अशी खूण केली. केतकी गेली आणि तिने सॅंडविच पुढे केले. नकळत त्याने वळून पाहिले . शाल्मली ने हाताने खूण केली आणि ती वळून ओटी जवळच्या खुर्चीत बसली.

केतकी परत थोड्या वेळाने येऊन शाल्मलीला खेटून बसली. यावेळेस काही वेळ न दवडता तिच्या खांद्यावर हात ठेऊन तिला जवळ घेतले. लांबून केतकीचा बाबा हे पाहत राहिला.

मधे शाल्मली जाऊन परत श्रीशला पाहून आली. तो जरा हालचाल करत होता. पण अजून झोपेतच होता. पुढच्या तासाभरात तो जागा होईल आणि मग त्याला घोटभर पाणी पाजू असं नर्स म्हणाली.

अर्ध्या तासातच श्रीश जागा झाला. शाल्मली लगेच आत गेलीच. तिने त्याला जवळ घेतले. तो प्रचंड भेदरला होता. डोक्याला बांधलेलं काढून टाकू पाहत होता. कानही दुखत असतील . सॅम आलाच. “आता चार चमचे पाणी, परत अर्ध्या तासाने रीपीट, असं दोन तास. मग लिक्विडस चालतील. रात्री अगदी मऊ भात वगैरे दे. डाएटिशियनला नोट पाठवतोच आहे मी. पेन किलर्स आहेत दिलेली. तरी जरा कुरकुरेल. रात्री शक्यतो हात स्ट्रॅप करा सिस्टर. आता रुम मधे हलवू. मी रात्री येईन परत पहायला. काही लागलं तर फोन आहेच. ओके?”

शाल्मलीने मान हलवली.

“डोन्ट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन.”

पुढचे सगळे सोपस्कार पार पडून रुममधे हलवायला पुढचा एक तास गेला. श्रीश प्रचंड कुरकुरत होता. मधूनच रडत होता. बॅंडेज काढून टाकण्याचा प्रयत्न करत होता. रुममधे आणल्यावर परत त्याला पाणी पाजलं. ते मात्र लगेच प्याला.सिस्टर्स नी भराभर त्याचा बेड डोक्याच्या बाजूने एलेवेट केला. आधीच्या उशीखाली अजून एक उशी ठेऊन मग त्याला असं झोपवलं जेणेकरून डोकं वरच्या दिशेने राहिल .

फाईलमधे ऑपरेशन नंतर घ्यायच्या काळज्या अशा शिर्षकाचा कागद होता तो शाल्मलीने नीट परत वाचून काढला. आंतरजालावर तिला ही माहिती मिळाली होतीच. पण तरी डॉक्टरांनी काही अजून वेगळं लिहीलय का हे ती तपासून पाहू लागली.

काही दिवस चक्कर येऊ शकते, मळ मळ होऊ शकते, क्वचित नाकातून, किंवा घशात रक्त येऊ शकतं.

वेदना, ऑपरेशन झाल्या दिवशी जास्त असतात आणि हळू हळू कमी होत जातात. नाक शिंकरणे, शिंकणे यामुळे काही वेळेस आतली जखम बरी होण्यास वेळ लागतो. एक एक सूचना वाचता वाचता नकळत शाल्मलीचा मेंदू ॲक्शन प्लॅन बनवू लागला.

चक्कर येउ शकते: सतत जवळ थांबायला हवं, चालतो म्हणून हट्ट करू लागला तर हात धरूनच.शिंका येऊ नाही द्यायच्या म्हणजे सर्दी नकोय व्हायला. गार वारं, थंड पेय, आईसक्रीम, बंद. काही दिवस कुरकुर चिडचिड करू नये म्हणून सतत नवनवे बैठे खेळ, सततचा सहवास... घरून काम करायचं तर फक्त रात्री. नवीन एक दोन खेळणी आणावीत. पाहता पाहता मसुदा तयार झाला डोक्यात.

श्रीशच्या जवळच बसून राहिली. औषधांचा अम्मल, दमणूक यामुळे तसा श्रीश ग्लानीतच होता. मधून मधून कुरकुरत रडत होता तेवढंच. घरी फोन करून कळवलं. बाबांचं बी पी कमी येईना म्हणून त्यांना ॲडमिट करावं लागलं होतं,जवळच्याच हॉस्पिटल मधे. त्यामुळे दादा तिकडे अडकला. तुला काही कळवत बसलो नाही मी, म्हणाला. काळजी करू नकोस आता बरय म्हणाला.

बिचारे आई बाबा, किती विनाकारण त्रास त्यांच्या डोक्याला. शिवाय मुलगी कितीही शिकली, स्वत:च्या पायांवर उभी असली, तरी ती एकटी राहतेय ही बोच त्यांना कायम त्रास देतेय, हे न कळण्याइतकी शाल्मली असमजदार नव्हती. तिची शंतनू बद्दलची घृणा कित्येकपट वाढली. पण तेव्हाच हेही वाटलं, की शंतनू फक्त एकदा जाऊन त्यांची माफी मागेल, तर ते लग्गेच त्याला माफ करतील. त्यापेक्षा इथेच भेटून कायमचा सोक्षमोक्ष लावावा. ‘हं, बी रेडी शाल्मली.’ तिने लगेच फोन उचलला. शंतनू ला लावणार तेवढ्यात दारावर टकटक आणि पाठोपाठ सॅम, शिकाऊ डॉक्टर्स, नर्स असा ताफा आत आला. शाल्मली बेडवरून उतरून उभी राहिली.

सॅम ने श्रीशला चेक केलं. नर्स ला काही इन्स्ट्रक्शन्स, बस, निघाले सगळे. सगळे बाहेर गेल्यावर दारातून वळून म्हणाला ‘बाकी राऊंड संपवून येतो.’

तो गेल्यावर श्रीशसाठी रुम टेंपरेचरचं दूध पाठवलं होतं, ते मात्र तो अधाशासारखं प्याला. मग त्याला जरा गाढ झोप लागली.

शाल्मलीने फोन उचलला आणि शंतनूला कॉल केला.

शंतनूने दोन रिंग मधे उचलला.

काही क्षण दोघेही गप्प बसले. मग शाल्मली म्हणाली “आपण भेटूया.”

तो म्हणाला “कधी आत्ता?”

“नाही उद्या दुपारी.”

“ठीक आहे येतो. ......... थॅंक्स!”

शाल्मलीने फोन कट केला.

रात्री सॅम काही मिनिटं येऊन गेला. परत एकदा तिला आश्वस्त करून गेला.

“इतर पेशंटसना दुसऱ्या दिवशी डिसचार्ज देतात. पण श्रीशचं ड्रेसींग काढलं की मगच जा घरी.”

“ओके, तू म्हणशील तसं” “पुढचे टप्पे तुला माहीत आहेतच. पुढचा आठवडा दोन वेळा दाखवून जा. मग एव्हरी वीक एकदा. चार आठवड्यांनी इंम्प्लांट ॲक्टीव्हेट करता येईल असं वाटतं. नाहीतर ६ आठवड्यांनी नक्कीच. ती खरी वेळ जेव्हा आपल्याला नक्की कळू शकेल रिझल्ट या ऑपरेशनचा. बाकी काळजा कशा घ्यायच्या माहीत आहेच तुला.”

रात्र जवळपास जागूनच काढली शाल्मलीने. श्रीशही अस्वस्थ होता. वेदनेचा त्याला त्रास होतच होता. शाल्मली सतत त्याच्या उशाशी बसून होती. पहाटे जरा श्रीश शांत झोपला. शाल्मलीचाही डोळा लागला मग.

सकाळी परत श्रीशचं ड्रेसींग बदलण्यात आलं. समीर जातीने हजर होता. त्याने जखम तपासली. सगळं ठीक आहे असं म्हणाला. मग परत ड्रेसींग केलं.

“आज वरण भात खाऊ दे त्याला. दुपारी परत एकदा ड्रेसींग बदलेल नर्स”

तो दिवस गडबडीत गेला. श्रीशला सतत सांभाळणं, त्याने बॅंडेज ओढू नये म्हणून काळजी घेणं, सतत बेडवरून उतरून बाहेर जायचा हट्ट, क्षणभर उसंत नव्हती तिला.