देवयानी विकास आणि किल्ली.
पात्र परिचय
विकास नायक
देवयानी नायिका
सुप्रिया देवयानीची मैत्रीण
लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर.
राजू सुप्रियाचा मित्र
शीतोळे पोलिस इंस्पेक्टर
भय्या विकासचा मोठा भाऊ.
अश्विनी विकासची वाहिनी, भैय्याची बायको
भगवानराव विकासचे बाबा
यमुना बाई विकासची आई
गोविंद राव देवयानीचे बाबा
कावेरी बाई देवयानीची आई.
मावशी आणि काका देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर
मनीषा विकासची बहिण
अंकुश मनीषाचा नवरा.
सुरेश देवयानीचा भाऊ.
विश्राम देवयानीचा चुलत भाऊ.
विनोद विकास चा चुलत भाऊ
प्रिया विकासची चुलत बहीण.
सेजल देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
पूर्णिमा देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
राजेश विकासचा मित्र.
भाग ३१
भाग ३० वरून पुढे वाचा ......
“राग येण्याचं काय कारण? आणि कोणावर?” – विकास.
“माझाच मला राग आला होता. मूडच गेला, मग सांगितलं की आजचा दिवस तुमचा दोघांचा आहे, तुम्ही दोघंच एंजॉय करा म्हणून.” – देवयानी.
“हे काय नवीन? एवढा कसला राग आला?” विकास अजूनही कन्फ्युजन मधे.
“माझाच मला राग आलाय, तुझा पण आलाय. तू तर काहीच करत नाहीयेस, नुसता आळशा सारखा बसून आहेस. मला बोलायचंच नाही तुझ्याशी.” – देवयानी.
“अरे, अरे, अरे, फोन कापू नकोस, तू प्रॉमिस केलय मला.” विकास घाई घाईने म्हणाला.
“माहीत आहे मला. नाही कापणार मी. पण बोलणार पण नाही. माझी खूप चीड चीड होते आहे. आणि तुला त्याचं काहीच नाही. तू मजेत आहेस. कोणा कोणा बरोबर एंजॉय करत असतो. तुला काय कळणार माझी अवस्था. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये.” देवयानी खूप चिडली होती.
“देवयानी अग, असं काय करते आहेस. मी काय करू सांग, करतो मी.” – विकास.
नो रीप्लाय
“देवयानी” – विकास.
नो रीप्लाय
मग विकास स्वत:शीच मोठ्याने बोलला.
‘ठेवला वाटतं देवयानीनी, आता काय करायचं? सुप्रियालाच फोन करतो, जरा मूड तरी हलका होईल.’
“काही जरूर नाहीये तिला फोन करायची. मी आहे अजून लाइन वर. तू काय तेवढ्याच चान्स ची वाट पहात होतास का?” देवयानी आता खरंच चिडली.
विकासला हसू आलं.
“हसतोस काय, मला त्रास होतो आहे आणि तू हसतो आहे, अरे बोल ना.” बोलता बोलता देवयांनीचा स्वर रडवेला झाला.
“अरे, अरे मेनके, विश्वामित्रची प्राप्ती झाली, कार्य सिद्धी झाली आहे, मग आता असे काय घडले की आमची ही त्रिलोक सुंदरी अशी भाव विभोर झाली आहे ? अरेरे, कोमेजून गेली आहे. हे सुंदरी, हा पामर आपल्याला पुनश्च आनंदी पहाण्यासाठी काय करू शकतो? कृपा करून निवेदन करशील का प्रिये?” विकासनी तीची फिरकी घेतली आणि ती अजूनच चिडली. म्हणाली.
“विकास, चावटपणा पुरे. चेष्टा मस्करी करण्याचा मुळीच मूड नाहीये माझा.”
“ओके थट्टा बंद. मूड ऑफ व्हायला काय झालय ते सांग.” – विकास.
“अरे काय चाललंय काय, आपल्या आयुष्यात? सगळ्या अडचणींची बिलं आपल्याच नावावर का फाडल्या जात आहेत?” – देवयानी.
“हूं, झालय खरं तसं.” – विकास.
“सगळ्या गोष्टी कशा आपल्याला दूर करण्यासाठीच घडताहेत की काय, असा संशय यायला लागला आहे आता.” – देवयानी.
“का ग असं बोलतेस. असा निराशेचा सुर नको लावूस. बी पॉजिटिव.” – विकास.
“मी काय सांगते ते ऐक म्हणजे तुझी पण खात्री पटेल.” – देवयानी.
“सांग. ऐकतोय मी.” – विकास.
“नंबर एक, तो शीतोळे इंस्पेक्टर, त्यांनीच सांगितलं होतं ना तुला की या मुलीला भेटू नकोस म्हणून.” देवयानीची पहिली तक्रार.
“हो,” विकास म्हणाला “अग पण प्रीकॉशन म्हणून त्यांनी सांगितलं तसं. आणि मला पण पटलं होतं त्या वेळेला. पण नंतर त्यांनीच सांगितलं ना की मुलगी चांगली आहे म्हणून.”
“नेमकं काय सांगितलं रे त्यांनी असं की तुझा विश्वास बसला?”- देवयानी
“तुला आठवतं का, सगळं झाल्यावर तू मला कॉफी प्यायला जाऊ म्हणाली होतीस ते?” – विकास.
“मला सगळं आठवतं आहे. त्यावर त्यांनी तुला म्हंटलं की स्टेटमेंट घ्यायचं आहे खाली चला. मग दिलं का स्टेटमेंट?” – देवयानी
“नाही. मला म्हणाले की फक्त तुम्हाला आमच्या बरोबरच खाली आणायचं होतं. मी विचारलं, असं का? तर म्हणाले की समजा त्या मुलीनी तुम्हाला म्हंटलं असतं की पांच मिनिटं हॉल मधे थांबा तर तुम्ही काय केलं असत? मी म्हणालो की थांबलो असतो. मग म्हणाले की पांच मिनीटा नंतर जर ती पोरगी अर्ध्या कपड्यात बाहेर येऊन किंचाळली असती, तर तुम्ही काय करणार होते? अग मी तर जागच्या जागीच हादरलो. मला म्हणाले पोलिस खात्या मध्ये अनेक विचित्र अनुभव येतात. सुंदर पोरी खतरनाक असतात. त्यांच्या जाळ्यात सापडू नका.” विकासनी तपशील दिला.
“मी खतरनाक वाटले त्यांना? मी तशी खतरनाक असते तर राजूची एवढी हिम्मत झाली असती का? नशीब माझं की त्यांनी मला सुंदर तरी म्हंटलं. पण मी खतरनाक पण आहे हे मला माहीत नव्हतं. हसू की रडू मी आता? तू सुद्धा मला सांगितलं नाहीस.” – देवयानी.
“नाही सांगितलं, कारण त्यांनीच नंतर माझी माफी मागीतली. बरं ते जाऊ दे तुझा हिशोब सांग. पुढे ?” – विकास.
“नंबर दोन माझी मावशी. तिने बराच घोळ घातला.” – देवयानी.
“अग पण नंतर तिला कळलं ना खरं काय आहे ते. आणि मग दिला की होकार.” विकास समजावणीच्या सुरात म्हणाला.
“अरे, हो पण किती मनस्तापss, आणि नाटकं तरी किती करावी लागली.” देवयानी.
“अग फायनली होकार तर दिला, मग आता काय? बरं पुढे” विकास.
“नंबर तीन, तारखेचा घोळ. एकदम डिसेंबर! काय हरकत होती लगेच लग्न लावून द्यायला. पण नाही दोन्ही बाजूंचं डिसेंबर वर एक मत.” – देवयानी.
“अग तू फक्त आपलाच विचार करते आहेस,” विकास म्हणाला. “लग्न म्हंटलं की सर्वच बाबीं विचारात घ्याव्या लागतात. त्या प्रमाणेच त्या लोकांनी विचार करून तारीख ठरवली. बरं पुढे?”
“नंबर चार, राजू चं प्रकरण. किती मनस्ताप झाला आपल्याला. काही सुमार होता का? अजूनही ते दिवस आठवले की अंगावर शहारा येतो. राजुचा असा राग येतो की बस.” देवयानीचा सुर पुन्हा चिडका झाला.
“अग झालं, निपटलं ते प्रकरण. जाऊ दे ना. पुढे बोल.” – विकास.
“नंबर पांच,” देवयानी पुढे म्हणाली. “बाबांना झालेला अपघात. काही कारण होतं का? सर्व कसं छान चालू होतं. पण नाही, दैवाला पाहवलं नाही, तारीख पुढे ढकलावी लागली. डिसेंबर वरुन एकदम मे.”
“अग होतं असं कधी, कधी. चिल. आयुष्य कधीच सरळ नसतं. थोडी फार वळणं असतातच.” – विकास.
“इतकी वळणं? एका पाठोपाठ? आणि तीही आपल्याच आयुष्यात? आणि आता तर कळसच झाला.” – देवयानी.
“आता अजून काय, मला वाटलं लिस्ट संपली.” – विकास.
“नाही, नंबर सहा. मी अमेरिकेत आणि तू तिथे. मी इथून तिथे येऊ शकत नाही. केंव्हा येईन ते सांगू शकत नाही. कदाचित डिसेंबर उजाडेल किंवा पुढचा मे सुद्धा, काही अंदाज बांधू शकत नाही. कोरोंना ने असा काही कहर मांडलाय की सगळेच अंदाज चुकताहेत. कोरोंना म्हणायचं आणि गप्प बसायचं. पण विकास या आत्ताच्या स्थितीला तूच आणि सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. मला सगळ्यात जास्त राग तुझा येतोय.” – देवयानी.
“ए, उगाच माझ्यावर बिल फाडू नकोस. मी काय केलय ?” – विकास.
“माझी मुळीच इच्छा नव्हती. मला अमेरिकेची नव्हे तर तुझी क्रेझ होती. पण तूच मला भाग पाडलंस.” – देवयानी.
“अग, असं कसं, केवळ एक महिन्या साठी जायचं होतं तुला, म्हणून मी म्हंटलं की जा.” – विकास.
“हो, पण मी म्हंटलं होतं की राजीनामा देते म्हणून. तू नको म्हणालास. आणि बघ आता काय घोळ होऊन बसला आहे ते. असं वाटतं आहे की आपलं लग्न होणं हे आपल्या नशीबातच नाहीये. तू कसा एवढा शांत राहू शकतोस? का तुला पण मी नकोशी झालीय? पीडा टळली असं वाटतं का तुला?” – देवयानी.
“देवयानी,” विकास म्हणाला “आता ती मुलगी पळून गेली आणि तुझा रिलीव्हर यायला वेळ लागला त्याला काय करायचं? असं काही होईल याची कल्पनाच आली नाही कोणाला.”
“ते ही चाललं असतं. महिन्या दोन महिन्यात सुरळीत झालं असतं सर्व. पण हा कोरोंना, ज्वालामुखी सारखा उद्रेक झाला आहे, आणि मी एकटी इथे फसली आहे. कोणीही जवळचं नाही. काय करू मी? कसं पॉजिटिव राहू मी? सांग ना.” देवयानी आता रडायच्या बेतात होती.
“देवयानी, हे बघ, शांत मनानेच परिस्थितीशी लढावं लागणार आहे. असं निराश होऊन कसं चालेल? फ्लाइट सुरू झाल्या की पहिल्या फ्लाइट ने भारतात परत ये. जरा धिराने घे. हात पाय गाळून कसं चालेल.” – विकास.
“कळतंय रे मला सगळं. तू माझ्या जवळ असतास ना तर सगळ्या संकटांना हसत मुखाने तोंड दिलं असतं. पण आता? आता इथे मी एकटी आहे रे.” – देवयानी.
“भारतात असतीस ना तर वाट्टेल ते करून तुला घेऊन गेलो असतो. मी तिथे नाहीये पण कायम तुझ्यासाठीच आहे. आणि हे बघ, अमेरिकेत अतिशय वेगाने आजार पसरतोय. तू घराच्या बाहेर जरूर असेल तरच बाहेर पड. घरातच रहा, सुरक्षित रहा. मी आजच राजेशशी बोलतो आणि त्याला पण सांगतो की जास्त बाहेर फिरू नका. अजून व्हॅक्सिन आलेली नाहीये. काळजी घ्या सगळे. ठीक आहे? मी उद्या पुन्हा फोन करीन.” विकास.
“काळजी घेतेच आहे रे मी.” – देवयानी
“एकदा हसऱ्या चेहऱ्याने गुड नाइट म्हण.” – विकास.
देवयानी हसली, “गुड नाइट.”
“गुड नाइट.”
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.