Gandh darvalla books and stories free download online pdf in Marathi

गंध दरवळला..

तुळशीबागेचा भरगच्च रस्ता... भर गणेशोत्सवाच्या तोंडावर गर्दीने रस्ते फुलले होते...
फुलबाग तर माणसांनी खचाखच भरुन वाहत होती.
तो ती गर्दी ओलांडून पुढे आला आणि मंडईच्या चौकात येऊन उभा राहिला.
त्याच्या हातात उदबत्तीचे पुडे होते... दहाला एक .. पंचवीसला तीन... घरच्या गणपतीसमोर सुगंध पसरावा...
कुणी त्याच्याकडे लक्ष देईना... भर दुपारी उपाशीपोटी तो फिरत होता..
समोर म्हातारी आजी दिसत होती.... घरी वाट पाहणारी... एवढे पन्नास पुडे विकले गेले तर शंभर रूपये मिळतील.दोन तीन दिवसाचा किराणा नेता येईल... पोटात दोन घास जातील...
संध्याकाळ कलत आली... गर्दी वाढत होती पण त्याच्याकडे फारसं लक्ष जाईना.... कुणाचंच....
त्याचा चेहरा आणखीनच कासावीस झाला... डोळ्यात नकळत पाणी जमा झालं... समोरच्या स्टाॅलवर विक्रीला माँडलेल्या गणपतीच्या मूर्तींकडे त्याने आशेने पाहिल.... दोन दिवस कोरा चहा पितो आहे... आज तरी पोटात जाऊदे काही आमच्या देवा.....
जोरजोरात वाजणार्‍या हाॅर्नने तो भानावर आला . बाजूला सरकताना क्षणात भोवळ येऊन खाली पडला... पिशवीतल्या आणि हातातल्या सुगंधी पुड्यांचा सडा पडला.....
ड्रायव्हर उतरला आणि त्याने दोन लोकांच्या मदतीने त्याला उचलून बाजूला ठेवला...
मनोहर गाडीतून पाहत होता. रस्त्यात पडलेले उदबत्तीचे पुडे त्याने पाहिले... आपल्या कंपनीचे पुडे... तोटा दाखवायला कमी प्रतीच्या उदबत्त्या आपण तयार करतो..... त्याच विकतो आहे हा मुलगा.....
तो गाडीतून उतरला त्याने मुलाला गाडीतून आपल्या डाॅक्टरांकडे नेलं... पोलिसांकडे कळवलंही...
शंकरने डोळे उघडले आणि तो आजीच्या नावाने ओरडू लागला.... 
मनोहरने पोलिसांकरवी त्याची वस्ती शोधून काढली होती दरम्यान आणि त्याच्या म्हातार्‍या आजीलाही तो घेऊन आला. ती म्हातारी शंकेने आणि भीतीने कासावीस होत बाहेर थांबली होती.इतक्या महागड्या रूग्णालयात ती प्रथमच आली होती....
मुलीचा मुलगा शंकर.त्याचे वडील दारू पिऊन पिऊन गेले आणि आई कुणाचातरी हात धरून मुंबईला पळून गेली. हे लेकरू तिच्या पदरी... पूर्वी अंगाला मालिश करायची बाळबाळंतिणीच्या... हातोटी होती तिची अनुभवातून आलेली...नंतर थकली तसा हातातला जोरही कमी झाला... मग घरकामं करू लागली...
धुणीभांडी करून वाढवला तिने शंकरला. शंकर तेरा वर्षाचा झाला आणि छोट्या मोठ्या वस्तू विकू लागला रस्त्यात... पोलिस हटकायचे... एकदा बाल सुधारगृहातही जाऊन आला....
आता तो पंधरा वर्षांचा झाला तरी हाल संपेनात...एकमेकांच्या आधाराने दोघे जगत होते...
मनोहरने शंकरला वस्तीत सोडला दुसर्‍या दिवशी.... घरी आला तो विचारातच...
बायकोने विचारलं पण त्याने उत्तर नाही दिलं...
चार दिवसांनी त्याने बायकोला हकीकत सांगितली... ती ऐकून त्याच्या आईनेही उत्सुकतेने कान टवकारले..
दुसर्‍या दिवशी मनोहरच्या कंपनीचे विश्वासू सहकारी शंकर आणि आजीला घ्यायला वस्तीवर गेले. त्यांनी आजीला मनोहरचा संदर्भ दिला.आजीच्या मनात शंकांचं काहूर माजलं होतं पण मनोहरच्या सहकार्‍यांनी तिला आश्वस्त केलं....
एका सोसायटीच्या आऊटहाऊसमधे शंकर आणि आजी आपली दोन बोचकी आणि चार पातेली एक डाव दोन शिवलेल्या गोधड्या घेऊन हजर झाले....

आजीला भेटायला चार दिवसांनी मनोहर आला...
तोवर मिळालेल्या दिल्याशाने आजी आणि शंकर थोडे सावरले होते.
आजीला भेटायला मनोहर आज त्याच्या आईला घेऊन आला होता.....
ओळखलस का पार्वती????? आपलं नाव मनोहरच्या आईच्या तोंडून ऐकून आजी चक्रावली....
अग मी सुमन.इनामदारांची सून. हा अपुर्‍या महिन्यांचा माझा जन्मलेला मनोहर... त्यावेळी इतक्या सोयीही नव्हत्या.पण आम्ही पुण्यातले घरंदाज त्यामुळे याला वाढवू शकलो.हाडाचा नुसता सापळा होता हा.... तू याला आणि मला तेल लावायला अंघोळ घालायला यायचीस...
आम्ही तर आशाच सोडली होती... पण तुझ्या तरूणपणात तू अनुभवातून मनोहरला तेल मालिश केलंस,फुलासारखं हाताळलंस आणि हे बाळ आज इतकं मोठं झालं पहा....
म्हणजे मनोहर सुमनवहिनीचा आणि माधवरावांचा मुलगा... मथुमावशींचा आणि साहेबरावांचा नातू... खूप उपकार तुमचेच आहेत आमच्यावर सुमनवहिनी...
मी तर काम केलं माझं तेव्हा पण हे खरं की पोटच्या गोळ्यासारखा तळहाताच्या फोडासारखा सांभाळला...
अग हे बारकुडं अपुरं बाळ कधी धष्टपुष्ट होईल वाटलही नाही... जगण्याचीही आशा सोडली होती.... पण नंतर सहा महिन्यात बाळसं धरलं... तुझ्या हाताच्या जादूने कसा तजेलदार झाला.
सुमनवहिनी तुमचा चेहरा घेऊन आला म्हणून तर नाव मनोहर ठेवलं नाव त्याचं.
पण तुम्हाला माझ्या आणि शंकरबद्दल?????
अग त्यादिवशी मनोहरला घरी यायला उशीर झाला.चार दिवसांनी त्याने बोलण्याच्या ओघात सूनबाईला शंकर आणि तुझा फोटो दाखवला मोबाईलवर काढलेला...
मीही पाहिला कुतूहलाने आणि पाहतेस तर तूच.....
शंकर कुणाचा....? मालनचा का???
हो वहिनी.....
आता शंकर घरी शिकतो मनोहरच्या बायकोजवळ... अभ्यास करून पुढच्या वर्षी जूनमधे शाळेत घालायचा आहे त्याला. दहावी नाही पण आठवीत तरी...
या धामधुमीत गणेशोत्सव संपला...
शंकर मंडईत गेला... गणपतीला हात जोडले...
गणपतीने त्याच्या आयुष्यात असंख्य सुवासांच्या उदबत्त्यांचा "गंध" पसरवला होता....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED