त्या रात्री! suresh kulkarni द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

त्या रात्री!

' निंद न मुझको आये ---' हेमंतकुमारचे जडशीळ आवाजातले, वामनरावांच्या आवडीचे गाणे, कारच्या स्पीकर मधून झिरपत होते. त्यांनी स्टेयरींग वरील हाताचे मनगट किंचित कलते करूनघड्याळावर नजर टाकली. रात्री एकचा सुमार असल्याचे घड्याळ दाखवत होते. आजच गेटटुगेदर नेहमी पेक्षा ज्यास्तच भन्नाट झाले होते. ते मस्त 'लाईट ' मूड होते. त्यात उघड्या खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळका, समोर स्ट्रीट लाईट आणि साइन बोर्ड्सच्या सप्तरंगात उजळलेला रास्ता. रास्ता कसला? त्याच्या साठी पायघड्याच घातल्या होत्या! फक्त त्यांच्या साठीच! निर्मनुष्य मोकळा मार्ग! पोटात गेलेली ती J&B स्कॉच व्हिस्की आता, ती त्यांच्या मेंदूला गुदगुल्या करत होती!

वयाच्या साठीकडे झुकलेले वामनराव तसे मोठे शिस्तीचे भोक्ते. नियमित वागणे, मृदू बोलणे. मुलगी, स्वाती (जर्मनीत), मुलगा, शेखर आय.आय.टी. (फायनलला ), पुण्यात कोथरूड सारख्या भागात स्वतंत्र बांगला. एकंदर ते एक 'आदर्श जेष्ठ नागरिक ' होण्याच्या बेतांतले, उच्च माध्यम वर्गीय गृहस्थ.

चार वर्षाखाली त्यांचा वर्ग मित्र आगस्ती, पोटासाठी जगभर फिरून पुण्यात, रिटायर्ड लाईफ एन्जॉय करायला सेटल झाला. त्या धडपड्याने वामन्या, आणि देविदासाला पुण्यातून खोदून काढले! जुने वर्ग मित्र तीस -पस्तीस वर्षांनी भेटले. तेव्हाचे गरीब मित्र आता चांगलेच स्टेबल झाले होते. मग काय? चार -दोन महिन्यात त्यांचे गेटटुगेदर सुरु झाले.

आज सुद्धा वामनराव अशाच एका गेटटुगेदर पार्टीतुन ते परतत होते. 'पुराने यार, पुरानी यादे. ' आज उषाचा विषय निघाला होता. तिच्या आठवणीने ते कातर झाले. तिच्या आठवणींची झिंग स्कॉचच्या किकला सरपास करून गेली होती! तिचा पत्ता माहित असता तर ' बिना पंख उड आते रे ---' अशी परिस्थिती त्याची झाली होती! कारण उषा होतीच तशी!

रात्रीचा तो रस्ता शांत आणि निर्मनुष्य होता. चौका चौकातील सिग्नल्सचे, फक्त पिवळे दिवे, उघड झाप करत होते. 'पहा आणि जा.' असा संकेत देणारे. तशी वामनरावांना घरी जाण्याची घाई नव्हती. वासंती मुलीकडे, जर्मनीला गेली होती. शेखर 'मित्राची(कि मैत्रिणीची?) बर्थडे पार्टी आहे, बहुदा सकाळीच येईन.' सांगून गेला होता. त्यामुळे घरी ते एकटेच असणार होते. पण मोकळा रस्ता, मस्ताड वातावरण आणि उषाची आठवण, कम्बाइन्ड इफेक्ट झालाच. त्यांनी गाडीची स्पीड वाढवली. म्हणजे साठीची सत्तरवर आणली! वामनराव गाडी चालवण्याच्या बाबतीत एकदम कोटेकोर! गेल्या साधारण तीस- एक वर्षांपासून ते कार चालवत होते. कधी त्यांनी स्पीड लिमिट ओलांडली नाही. कधी चुकीचे ओव्हरटेक केले नाही. कधी अडमधडाम लेन क्रॉस केल्या नाहीत! ट्रॅफिकचा एकहि नियम आजवर नियम त्यांनी मोडला नव्हता. मग ट्राफिक पोलीस असो कि नसो! आणि म्हणूनच आजवर कधी, त्यांच्या गाडीने साधा ओरखडा सुद्धा पाहिलेला नव्हता!

स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात सडकेवरल्या, पांढऱ्या पिवळ्या पट्ट्या उठून दिसत होत्या. या स्ट्रीट लाईटच्या उजेडाच्याहि वर 'सुहानी रात ' आपला वेगळाच, जलवा दाखवत होती. उंच गेलेल्या इमारतीच्या फटीत अडकलेला चन्द्र, आता आकाशात मुक्त विहारात होता. चंद्राला पाहून वामनरावांना, पुन्हा उषाचा नशील्या डोळ्याचा, निरागस टक लावून पहाणारा चेहरा नजरे समोर आला. 'उषे, कुठे आहेस?' त्यांच्या मनाने पुन्हा तिला साद घातली. ती जणू त्या चंद्रबिंबातून त्यांना खुणवत होती. 'हि, काय मी येथेच आहे!' त्यांनी पुन्हा एक्सलेटरवर पाय रोवला. स्पीडोमीटर शंभरीत आला. उषेला 'वेगा'चे भयंकर वेड होते. 'वामन्या, कसली बैल गाडी सारखी बाईक चालवतोय्स? जरा स्पीड वाढीव कि!' म्हणायची.
"एस! उषे ये! बघ! माझी गाडी आता एकशेवीसच्या स्पीडवर आहे! उषे, कुठं आहेस तू ? ये ना! आत्ता! तुला वेगात गाडी चालवलेलं आवडत ना? या--या क्षणी तू माझ्या बाजूला तू हवीस! तुझी खूप आठवण येतीय!"

एकशे वीसचा प्रचंड वेग, उषेची आठवण, यात गुंतलेल्या वामनरावच्या मेंदूने काहीतरी बिघडल्याचा इशारा दिला. पण तोवर उशीर झालाच होता! वेगात एक बाईकवाला आडवा आला, त्याचा चेहरा हेल्मेटखाली झाकलेला होता. फाडकन आवाज झाला. गाडीच्या बोनेटला काहीतरी धडकले होते. तो बाइकवाला सात-आठ फूट हवेत फेकला गेला. त्याची बाईक, आडवी पडून घसरत, फुटपाथच्या कठड्यापाशी स्थिरावली. तो उडालेला बाइकवाला, रोडवर आपटला आणि पुन्हा, त्यांच्याच गाडी खाली आला, आणि गाडी त्याच्या अंगावरून, पुढे निघून गेली!

वामनराव खाड्कन भानावर आले. बापरे! अपघात झाला कि काय? त्यांनी मिरर मध्ये पहिले, रस्त्यावर तो बाईक स्वार निपचित पडलेला दिसत होता. डोक्यावरचे हेल्मेट दूर गारंगळत जात होते. मेला कि काय? धडधडत्या काळजाने आणि जिवाच्या आकांताने त्यांनी गाडी पिटाळली. ते संभाजी पुलाचा कॉर्नर ओलांडून आले. त्या स्पॉट पासून शक्य तितक्या दूर जायला पाहिजे, हि एकच भावना, त्या क्षणी त्यांच्या मनात होती!

त्यांनी कसे बसे घर गाठले. कार ग्यारेज मध्ये पार्क केली. बंगल्याचे दार उघडून ते आत आले आणि त्यांनी समोरच्या सोफ्यावर अंग टाकून दिले. अजून त्यांचे हातपाय लटपटत होते. असे काही घडेल हे त्यांना कधीच अपेक्षित नव्हते. साधा लेनचा नियम न मोडणाऱ्या, आपल्या सारख्या माणसाकडून इतकी मोठी गल्लत झालीच कशी?

थोडे सावरल्यावर त्यांनी कपडे बदलून, नाईट सूट घातला. घामेजलेल्या चेहऱ्यावर गारपाण्याचे हबके मारले. तेव्हा कोठे त्यांना जरा हुशारी वाटली. ते लॉजिकली विचार करू लागले. जे व्हायचे होते ते होऊन गेलेय! मुख्य म्हणजे, ते आपण काही मुद्दाम केलेले नाही! तो एक सरळ, साधा अपघात होता! या शहरात, रोज हजारो अपघात होतात, त्यातलाच हा हि एक! दुसरे महत्वाचे, त्या वेळेस रस्त्यावर चिट-पाखरू नव्हते, त्या मुळे हा अपघात आपल्याच गाडीने केलाय, हे कोणाला, तरी कसे कळणार? तेव्हा इतके घाबरे होण्यासारखे फारसे काही झालेले नाही! नॉट अ बिग इशू! आपण नेहमीच नियमांचे पालन करतो, म्हणून आपले संस्कारित मन डगमगतंय! इतकच! बाकी काही नाही! सकाळ पर्यंत सगळं ओके होईल! आणि समजा भरपाई देण्याची वेळ आलीच तर, इन्शुरन्स कंपनी देईलच कि! पुढचं पुढं पाहून घेता येईल!

इतकी मनाची समजूत घालून हि, तो निपचित पडलेला बाइकवाला त्यांच्या डोळ्यासमोर, राहून राहून येत होता! काय झालं असेल त्याच? मेला असेल का स्पॉटवरच? नको! कोणी का असेना? मरायला नकोय! त्याला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असेल तर तो मरणार नाही! हल्ली मेडिकल सायन्स खूप प्रगत झालंय. मुडदा जरी वेळेत आणला तरी, डॉक्टर लोक त्याला जिवंत करतील. पण अशा भयाण रात्री कोण त्याला दवाखान्यापर्यंत नेणार? तेथे तर कोणीच नव्हते! फक्त आपणच ते करू शकलो असतो! तसे आपण करण्याइतपत, नक्कीच शुद्धीत आणि कंट्रोलमध्ये होतो! आपण थांबायला हवे होते! आपली हि मोठी चूक झाली! हे काय होऊन बसलं आपल्या हातून?आपल्या पळपुटेपणाने एका जीवाचा जगण्याचा हक्क हिरावला गेलाय! का?--का? पळालो आपण त्या स्पॉट पासून? भीतीने! कशाची भीती? कोणाची भीती? पोलिसांची! ती तर अजून हि आहेच! जवळपास CCTVचा कॅमेरा असेल तर? ती शक्यता नाकारता येणारच नव्हती. बापरे! हि बाब आपल्या लक्षातच आली नाही. पोलीस खूप चाणाक्ष असतात, आज ना उद्या ते आपला माग काढणारच! त्यांच्याकडे ट्रेनड डॉगज पण असतात! खरे तर, आपण घरी येण्याऐवजी, लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला सरेंडर होऊन, घडलेली घटना सांगायला पाहिजे होती. हि दुसरी चूक झाली! सकाळ झाली कि झाली चूक दुरुस्त करायची. पोलीस स्टेशन गाठायचे! सगळं सविस्तर सांगून, गुन्हा काबुल करायचा! होईल ती शिक्षा मुकाटपणे भोगायची!, झाल्या गोष्टीचे परिमार्जन म्हणून. मग जे होईल ते होवो! हे मनावरचं ओझं, तर पेलावं लागणार नाही! आणि समजा, पोलिसांना आपला माग काढताच आला नाही तरी, सकाळी पोलिसात जाणेच योग्य, कारण जिवंत असे पर्यंत, हे अपघाताचे मनावर असलेले ओझे, झोपू देणार नाहीच!

एकदा 'सकाळी सरेंडर व्हायचे!' हा निर्णय घेतला तेव्हा, वामनराव थोडे सैलावले! त्यांनी घड्याळात पहिले, पहाटेचे चार वाजले होते. चला, तीन एक तास पडावं. मग ठरल्या प्रमाणे-----. ते बेडरूम कडे अर्धवट वळले, तेव्हड्यात डोरबेल वाजली! ते केव्हढ्यानंदा तरी दचकले! अशा अपरात्री कोण असेल? त्यांनी दाराच्या स्पाय होलला डोळा लावला. बाहेर तो, दार उघडण्याची वाट पहात उभा होता! पोलीस! त्यांनी थरथरत्या हाताने दार उघडले.

पोर्चच्या दिव्या खाली, तो दणकट पोलीस उभा होता, हातातला दंडुका पजरत. त्याच्या बेल्टला एक हातकडी लटकत होती. कमरेला लावलेल्या होल्डरमधून, काळ्याभर पिस्तुलाचा काही भाग बाहेर डोकावत होता. त्याने डोक्यावरची कॅप भुवया पर्यंत ओढली होती. त्या कॅपच्या काठातुन त्याची थंडगार नजर, वामनरावांना एक्सरे मशीन सारखी न्याहाळत होती! जणू त्यांच्या मनातला काहूर त्याला स्पष्ट दिसत होता! वामनरावांच्या हृदयाने दोनचार पायऱ्या गाळून, जोरात धावायला सुरवात केली.
"वामनराव?" त्या पोलिसाने आपल्या दगडी आवाजात विचारले.
" हो! मीच! पण मी सकाळी---"
" काही बोलू नका!" त्याने दम भरला, किमान त्यांना तसे वाटले. त्याने गप्पकन त्यांचा थरथर कापणाऱ्या हाताचे मनगट, आपल्या पोलादी पंजात पकडले.
"चला!" तो तोंडातल्या तोंडात गुरगुरला.
वामनराव कळसूत्रीच्या बाहुली प्रमाणे त्याच्या सोबत गाडीत जाऊन बसले. दुसऱ्या क्षणी ती पोलीस व्हॅन, टाळूवरचा दिवा सायरनचा तालावर मिचकावत दौडू लागली.
०००
तो पोलीस आणि वामनराव एका हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागाच्या पेशन्ट बेड जवळ उभा होते. समोर डोक्याला भलेमोठे पांढरे बँडेज बांधलेला तरुण, असंख्य नळ्या आणि वायर्सच्या जंजाळात पडलेला होता. दोन सलाईनच्या स्टॅण्डवर IV लटकत होते. शिवाय विटकरी रंगाची रक्ताची पिशवी, वाहून गेलेल्या रक्ताची भरपाई करत होती. डोक्यावरच्या मॉनिटरवर लाल-निळे ग्राफ सारखे बदलत होते. तो तरुण मृत्यूशी निकाऱ्याची झुंज देत होता! वामनरावनी त्याला क्षणात ओळखले. तो शेखर होता, त्यांचा मुलगा!
"अरे,देवा --" वामनराव कळवळले.
" सर, याच्या खिशात लायसन्स होते. म्हणून मी तुमच्या पर्यंत इतक्या लवकर पोहचू शकलो.मी तुम्हाला घरी काहीच सांगितले नाही, कारण या बातमीने तुम्हास धक्का बसेल, जो तुम्हास या वयात सहन होणार नाही असे मला वाटले. येथे तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात सुरक्षित आहेत. तुमचा मुलगा आऊट ऑफ डेंजर आहे. हल्ली हे गाडीवाले, साले, माजलेत! तुमचा मुलगा वाचेल. तुम्ही काळजी करू नका. हि 'हिट अँड रन 'ची केस आहे. मी त्या बेमुर्वत, उन्मत्त गाडीवाल्याला सोडणार नाही! मुलगा शुद्धीवर येण्याची वाट पहायची? का तुम्हीच देताय तक्रार?" पोलिसाने विचारले.
" को-- कोठे झाला हा अपघात?"
वामनरावच्या पायाखालची जमीन सरकली. तरी त्यांनी हिमत करून विचारलेच.
" संभाजी पुलाच्या कोरर्नरला!"
मग मात्र त्यांची शुद्ध हरवली!!


सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.